औपचारिक शाळेला सक्षम पर्याय ‘मुक्त शाळा’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 12:27 PM2019-03-02T12:27:28+5:302019-03-02T12:27:37+5:30
मुलांच्या क्षमता, त्याची सर्जनशीलता, त्यांच्या आवडी या जर प्रचलित शाळेत पूर्ण होत नसतील तर मुक्त शाळेचा पर्याय पालकांकडे सक्षमरीत्या तयार असेल.
महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाने ‘मुक्त शाळा’ संकल्पना विचारात घेतल्यामुळे पुन्हा एकदा राज्यघटनेतील व्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा प्रगल्भ वाटत आहे. मुक्त शाळेच्या रुपाने पुन्हा एकदा शैक्षणिक प्रवासाला अडथळा येणारी मुले चाकोरीबाहेरील शिक्षणासाठी पूर्णत: मुक्त झाले आहे. हे प्राथमिक शिक्षणातील क्रांतिकारी पर्व म्हणावेसे वाटते...
महाराष्ट्र शासनाच्या मुक्त शाळेच्या निर्णयामुळे चाकोरीबद्ध शाळेच्या जोखडातून कोवळ्या मनाच्या व शाळेत येण्याचा कंटाळा वाटणाऱ्या मुलांची मुक्तता झाली आहे.
दुसरीकडे शिक्षण कसेही दिले तरी ती आपली मक्तेदारीच आहे, या सरकारी अथवा खासगी शाळेच्या खुज्या विचारधारेला जोरदार धडक बसली आहे. आता दर्जेदार शिक्षण द्यावेच लागेल, अन्यथा मुले मुक्त शाळेची वाट धरतील, या भीतीपायी व त्यातून शाळेशाळेची पटसंख्या कमी झाल्यास कमीपणा सिद्ध होईल. त्यामुळे दर्जेदार शिक्षणच पुढे आणावे लागेल, याला पर्याय राहणार नाही, ही मुक्तशाळेची खरीखुरी फलश्रुती म्हणावी लागेल. विशेषत: ग्रामीण भागातील शिक्षणातून काही मुले का गळतात, याचा शोध घेतल्यावर असे जाणवते की, निरस शालेय वातावरणातून मुलांच्या मनात कंटाळल्याचा तवंग निर्माण होतो. याला मुक्त शाळा पुरेसा पर्याय ठरेल, यात शंका नाही.
मुलाला त्याच्या शाळेत शिकावे वाटते अथवा नाही. मुलं शिकतेच व्हावे, यासाठी शाळेकडून काही प्रयोग होतायेत का ? याचा कोणताही विचार न करता बरेच पालक शाळा नावाच्या चार भिंतीत मुलांना टाकून मोकळे होतात, त्यांनाही जरा विचार करण्याचे स्वातंत्र्य लाभले.
‘शाळा सुटली पाटी फुटली’ हे पारंपरिक गाणे जरी काहीशा नव्या प्रयोगाने कालबाह्य ठरत होते; पण मुक्त शाळा कधी भरणारच नाही. त्यामुळे पाटी फुटण्याचा योगायोग आता येणार नाही. मुलांच्या क्षमता, त्याची सर्जनशीलता, त्यांच्या आवडी या जर प्रचलित शाळेत पूर्ण होत नसतील तर मुक्त शाळेचा पर्याय पालकांकडे सक्षमरीत्या तयार असेल. बरेच पालक महागड्या शाळेत मुलांना टाकतात. गरीब पालकांची मुले पैशाअभावी या शाळेत प्रवेशित होत नाहीत, ही पालक वर्गात चाललेली जुजबी स्पर्धा यामुळे कमी होईल.
डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, अभिनेत्याचा मुलगा अभिनेता, राजकारण्याचा मुलगा राजकारणी झाल्याची अनेक उदाहरणे महाराष्ट्रात अस्तित्वात आहेत. ही खरी तर त्यांच्या पालकांकडून दिल्या गेलेली मुक्त संस्काराची मुक्त शाळाच आहे. मुक्त शाळेच्या निर्णयामुळे मुले संस्कारी वृत्तीची व्हावीत, याला उठाव येईल.
सोबतच मुलांमध्ये अफाट क्षमता असतात, हे पालकही ओळखतात; पण या क्षमता सिद्ध करण्यासाठी औपचारिक शिक्षणाचा शिक्का आवश्यक होता, तो शिक्का आता पुसट होईल, हे खरे गमक यात दिसायला लागेल. प्रचंड गुणवत्ता असलेली दिव्यांग मुले, ऊस कामगारांची मुले, वीटभट्ट्यांवरील मुले, भिकाऱ्याची मुले, मुक्त शाळेच्या माध्यमातून गुणवत्ता सिद्धच करतील, कोणजाणे. यात काही गाडगे महाराज, बहिणाबाई, तुकडोजी, एडिसन लपलेले असतील...
नाही तरी गाडगे महाराज, बहिणाबाई चौधरी यांच्या कथा, कविता वाङ्मयाच्या अभ्यासाला आहेतच, हे सर्व भिंतीबाहेरच्या अनुभवरुपी मुक्त शाळेचेच विद्यार्थी म्हणावे लागतील. याच गाडगे महाराजांच्या महाराष्ट्रभूमीत पुन्हा एकदा रंजल्या- गांजल्यांना, उपेक्षितांना मुक्त शिक्षणाची संधी मिळते आहे.
मुक्त शाळेचा प्रयोग आहे म्हणजे अडचणी आहेतच; पण तरीही पालक-शासन, विद्यार्थी मार्ग काढतीलच; कारण....मुक्ततेचा प्रयोगच मुक्त असतो.
या प्रयोगाचे स्वागत झाले पाहिजे. महाराष्टÑ ही शिक्षणाची प्रयोगशाळा आहे. मुक्ततेचा हा प्रयोग नवे मन्वंतर घडविण्याची क्षमता ठेवून आहे. एवढे मात्र निश्चीत !