ऑपेरा हाउस
By Admin | Published: October 21, 2016 06:41 PM2016-10-21T18:41:33+5:302016-10-21T18:41:33+5:30
भारतीय रसिकांच्या गळ्यातील ताईत असलेल्या प्रतिभावंतांच्या अजरामर मैफली असोत, गाजलेली नाटके असोत किंवा सिल्व्हर ज्युबिली पाहिलेले अनेक सिनेमे असोत, स्थापत्यकलेचा अजोड नमुना असलेल्या मुंबईतल्या ऑपेरा हाउसने अनेक दशके रसिकांची सांस्कृतिक भूक भागवली. जवळपास दोन दशके बंद असलेले हे सांस्कृतिक केंद्र जुन्याच बाजासह पण नव्या झळाळीने पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीसाठी सज्ज झाले आहे.
>ओंकार करंबेळकर
मुंबईच्या सांस्कृतिक वैभवाचे साक्षीदार
मास्टर दीनानाथ मंगेशकर, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर आणि बालगंधर्व यांच्या अजरामर गाण्यांच्या मैफली असोत वा पूरब और पश्चिममधील ‘भारत का रहने वाला हॅूँ’... किंवा मुघल-ए-आझममधले ‘जब प्यार किया तो डरना क्या’ असो.. नाटक, ऑपेरा आणि सिनेमातील अशा एकाहून एक सरस गाण्यांनी मुंबईतील कलापूर्ण सभागृहाने मागचे शतक गाजवले. ते सभागृह म्हणजे ऑपेरा हाउस. मागची जवळजवळ दोन दशके बंद असलेले हे ऑपेरा हाउस आता जुन्याच बाजासह पण नवी झळाळी घेऊन रसिकांसाठी खुले झाले आहे.
मावळत्या सूर्याच्या साक्षीने रंगत जाणाऱ्या संगीत मैफली आणि ऑपेरा ..
ते पाहण्यासाठी येथे व्हिक्टोरियातून उतरणारी ब्रिटिश, भारतीय, युरोपीय, पारशी मंडळी... दरवेळेस नव्या नाटकाचा आस्वाद घेण्यासाठी जमणारा हा जमाना आता पुन्हा अवतरणार आहे. चर्नीरोडचे भारतातील एकमेव ऑपेरा हाऊस दिमाखात उभे राहिले आहे. लाकडी जिने, मखमली कारपेट आणि खुर्च्या, शंभर वर्षांपूर्वीप्रमाणेच रोषणाई, झुंबरे, तिकीट विकणारी तीच जुनी खिडकी.. आपल्याला पुन्हा त्या जमान्यात घेऊन जाण्यासाठी उत्सुक आहे.
बरोक स्थापत्यशैलीतील या अजोड वास्तूने त्यामध्ये सादर होणाऱ्या गाण्यांनी, नाटकांनी मुंबईकरांच्या जीवनात महत्त्वाचे स्थान मिळवले होते. दक्षिण आशियातील एकमेव ऑपेरा हाउस अशी बिरुदावली सन्मानाने मिळविण्यासाठी आॅपेरा पुन्हा एकदा सज्ज झाले आहे.
१८९६ साली युरोपप्रमाणे मुंबईतही ऑपेरा हाउस असावे असा विचार सुरू झाला आणि चर्नी रोड परिसरामध्ये रॉयल ऑपेरा हाउसची बांधणी सुरू झाली. टप्प्याटप्प्याने इमारतीचे बांधकाम, आतील फर्निचर आणि इतर कामे पूर्ण होत गेली. पण १९११ साली राजे पंचम जॉर्ज भारतभेटीवर आले असताना त्यांच्या हस्ते ऑपेरा उद्घाटनही करून घेण्यात आले. त्यानंतर इतर कामे सावकाश पूर्ण होत १९१६ साली सर्व ऑपेरा खऱ्या अर्थाने रसिकांच्या भेटीला तयार झाले. त्या अर्थाने यावर्षी ऑपेरा हाउसला शंभर वर्षे पूर्ण झाली असे म्हणावे लागेल.
कोलकात्याचे मॉरिस बँडमन आणि जहांगीर फ्रेमजी कराका यांनी या आॅपेरा हाउसची सर्व संकल्पना मांडून ती तडीस नेली. ब्रिटिश अधिकाऱ्यांचे आणि युरोपीय नागरिकांसाठी विरंगुळ्याचे ते केंद्र बनले. सुरुवातीच्या काळात येथे केवळ आॅपेराच होत असत, मात्र नंतर इतर संगीत मैफली, नाटकांनाही परवानगी देण्यात आली. गुजराथी, पारशी, मराठी रंगभूमीवरची नाटके येथे होऊ लागली.
नाटकांबरोबर काही वर्षांनी येथे सिनेमे दाखवण्यात येऊ लागले. बऱ्याच सिनेमांचा नारळही याच आॅपेरा हाउसमध्ये फुटला. त्यातील भरपूर सिनेमांनी सिल्व्हर ज्युबिलीही पाहिली. काही सिनेमांचे चित्रीकरणही येथे झाले होते. मुघल-ए-आझम, दो आंखे बारह हाथ, हिमालय की गोद में, पूरब और पश्चिम, अमर अकबर अँथनी सारखे सत्तरीच्या दशकापर्यंतचे बॉलिवूड गाजवणारे चित्रपट येथे लावले गेले. पृथ्वीराज कपूर, राज कपूर यांची नाटकासाठी आॅपेरा हाऊसला विशेष पसंती होती.
१९५२ साली गोंडल संस्थानचे महाराजा विक्रमसिंहजी यांनी आॅपेरा हाउस घेतले. कालांतराने ८० च्या दशकानंतर सिंगल स्क्रीन बंद करण्यात आले. प्रेक्षकांची बदलती रुची आणि बदलत्या काळामुळे आॅपेरामध्ये होणारा व्यवसायही कमी होत गेला आणि अखेर १९९३ साली ते बंद करण्यात आले. बंद केल्यानंतर गोंडलच्या सध्याच्या राजेसाहेबांच्या म्हणजे ज्योतिंद्रसिंहजींच्या मनामध्ये ते पुन्हा सुरू व्हावे अशी प्रबळ इच्छा होती.
अखेर त्यास २००८ साली मूर्त स्वरूप आले. या भव्य हाउसचा वारसास्थळांच्या यादीमध्ये समावेश झाल्यामुळे त्याची कोणतीही तोडमोड किंवा त्याचा पुनर्विकास करता येणार नव्हता. त्यामुळे दुरुस्ती आणि सुशोभिकरणानेच त्याला मूळची झळाळी देण्याचे निश्चित करण्यात आले. मुंबईतील प्रसिद्ध स्थापत्यविशारद आणि पुरातन वास्तूंना संरक्षण देण्यासाठी धडपडणाऱ्या आभा नारायण लांबा यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली.
पंधरा वर्षे बंद पडलेली इमारत मूळ ढाच्याला धक्का न लावता दुरुस्त करून सुशोभित करणे हे मोठे आव्हानच म्हणावे लागले. पण आभा आणि त्यांच्या चमूने ते आव्हान पेलले. ऑपेरा हाउसचे सिनेमागृहात रूपांतर केल्यामुळे त्याच्या अंतर्गत भागात मोठे बदल करण्यात आले होते. त्याचे बरेचसे भाग बंद केले होते, तर लोकांना सिनेमा पाहण्यात अडथळा येऊ नये म्हणून साईड गॅलरी
चक्क प्लायवूडने झाकून टाकली होती. सर्वप्रथम हा कचरा बाजूला करणे हे मोठे काम करावे लागले. त्यानंतर मूळ ऑपेरा हाउस कसे असेल याचा विचार सुरू झाला. त्यासाठी जुन्या फोटोंचा आणि पुस्तकांचा अभ्यास करावा लागला. ज्या चित्रपटांचे चित्रीकरण येथे झाले होते ते चित्रपटही आभा यांनी पाहिले. यामध्ये ऑपेरा हाउसचे रूप उलगडत गेले. नक्षीकाम आणि रंगही त्यामुळे अभ्यासता आले. करारा मार्बल आणि मिंटनच्या फरशा (करारा मार्बल इटलीमध्ये तुस्कानी प्रांतात सापडतो), दिव्यांची सुंदर रोषणाई, झुंबरे आणि रंगीत पडदे अशी ऑपेरा हाउसमध्ये आतून सजावट करण्यात आली होती.
भव्य स्टेज, अर्धवर्तुळाकार सभागार, दोन गॅलरी, दोन्ही बाजूस साईड गॅलरीज आणि बरोक शैलीमध्ये उत्तम कोरीव काम केलेले खांब व भिंती यामुळे हे ऑपेरा हाउस त्या काळात सर्वांच्या पसंतीस उतरले. ऑपेरा हाउसचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे खालच्या बाजूस ठेवण्यात आलेले सहा फॅमिली बॉक्सेस. या बॉक्समध्ये कोचावर बसून सर्व कुटुंबाला नाटकाचा, आॅपेराचा आनंद घेता येत असे. आज अशी बॉक्सची सोय इतरत्र आढळत नाही.
आॅपेरा हाऊसच्या दुरुस्तीमध्ये या बॉक्सेसचीही दुरुस्ती करण्यात आली आहे. दुरुस्ती करताना एकावर एक लावलेल्या रंगामागे भिंतींचा खरा रंग दिसून आला. त्यामुळे तेच रंग पुन्हा वापरण्यात आले. डेव्हिड ससून यांच्या कुटुंबाने दोन नाजूक सुबक झुंबरे ऑपेरा हाउसला भेट दिली होती. त्यांचीही काळजीपूर्वक सफाई आणि दुरुस्ती करून त्यांना नवी झळाळी देण्यात आली. या झुंबरांप्रमाणेच शेक्सपिअर, बायरन यांच्या चित्रांचीही दुरुस्ती करून ती लावण्यात आली. या सभागृहाची ध्वनियंत्रणाही उत्तम म्हणावी अशी होती. दोन्ही गॅलरींमध्ये नाटकाचा, गाण्याचा आवाज सुस्पष्ट ऐकू येत असे. तेदेखील या दुरुस्तीमध्ये जपण्यात आले आहे.
इतक्या मोठ्या सभागृहाच्या सुशोभिकरणात सर्वात आव्हानात्मक काम होते ते म्हणजे वातानुकूलन यंत्रणा बसविण्याचे. अशी यंत्रणा बसविण्यासाठी या उत्तुंग वास्तूच्या सर्व खिडक्या, काचा आणि इतर जागा बंद कराव्या लागल्या. एकेकाळी येथे मोठे पंखे भिंतींवर लावलेले असत. पण बदलत्या काळात वातानुकूलन यंत्रणा आवश्यक असल्यामुळे पंख्यांना रजा देण्यात आली. पंख्यांच्या जागी इतर दिव्यांप्रमाणे दिवे बसवण्यात आले. तसेच ही यंत्रणा सर्वत्र बेमालूम लपवण्याचेही आव्हान होतेच. जुन्या माहितीनुसार हे सभागृह गार करण्यासाठी बर्फांच्या लाद्यांवरून पंख्यांची हवा सोडून होणारी गार हवा आतमध्ये खेळवली जाई, असे आभा सांगतात. त्यानंतर खुर्च्या, पडदे, दिवे यांनी ऑपेराला नवे रूप दिले.
ऑपेरा हाउसच्या एकदम वरच्या गॅलरीचे तिकीट अत्यंत कमी असे आणि गरीब लोकांनाही काही आण्यात मिळावे अशी व्यवस्था करण्यात आली होती. त्या गॅलरीमध्ये खुर्च्यांच्या ऐवजी बाके टाकलेली असत. आता मात्र सर्व सभागृहामध्ये खुर्च्या वापरण्यात आल्या आहेत.
इथल्या साईड गॅलरीचा कोणत्याही प्रकारे वापर केला जात नाही मात्र ती सभागृहाच्या रचनेचा अविभाज्य भाग आहेत. साईड गॅलरीवर लावलेली प्लायवूड्स काढल्यानंतर त्यांच्या मूळ आकाराचा अंदाज आला. केवळ खांबांच्या रूपात उरलेल्या गॅलरींना नव्याने बांधण्याचा विचार करण्यात आला. त्यामुळे जुन्या फोटोंचा अभ्यास करून त्यांची दुरुस्ती करण्यात आली व इमारतीचे रंग, त्यावरील नक्षीकाम यांचा विचार करून या गॅलरी उभ्या करण्यात आल्या. या साईड गॅलरी आणि बॉक्सेस पाहण्यासाठी ऑपेरा हाउसला भेट दिलीच पाहिजे. या सुशोभिकरणामध्ये ऑपेरा हाउस नव्याने प्रत्येक दिवशी हळूहळू आपल्या मूळ रूपात जाऊ लागले. ऑपेराच्या या नव्या रूपाबद्दल बोलताना राजे ज्योतिंद्रसिंहजी आणि महाराणी कुमुदकुमारीसाहेब अत्यंत आनंदाने आभा आणि त्यांच्या कामाचे कौतुक करतात. कुमुदकुमारी यांनी युरोपातील ऑपेरा हाउसना भेटी दिल्या असून, तेथे ऑपेराही ऐकले आहेत. त्यामुळे येथेही तशाच दर्जाचे कार्यक्रम व्हावेत असे त्यांना वाटते. मुंबईसारख्या शहरामध्ये अशी सुंदर वास्तू जपली जाणे फार महत्त्वाचे आहे असे त्यांना वाटते.
या आठवड्यात ‘मामि’ फेस्टिव्हलच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाने ऑपेरा हाउस लोकांच्या भेटीला आले. त्यानंतर संगीत मैफली आणि ऑपेराचे भरपूर कार्यक्रम येथे होणार आहेत. नवे ऑपेरा हाउस साडेपाचशे लोकांना एकाचवेळी सामावून घेऊ शकेल. तसेच टप्प्याटप्प्याने कँटिनसारख्या सोयीही सुरू केल्या जाणार आहेत.
ग्रँट रोड, चर्नी रोड, गिरगाव या भागांमध्ये सिनेमागृहांची एक साखळीच होती त्यामध्ये आॅपेरा हाउस नव्याने सामील होत आहे. त्यामुळे जुन्या-नव्या पिढीच्या लोकांना एकत्र येऊन आॅपेरा, मैफली ऐकायला येण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. इतिहासाचं एक सुवर्णपान वर्तमानात नव्यानं सुरू झालं आहे...
बरोक शैली
बरोक ही शैली साधारणत: इ.स. १६०० च्या आसपास इटलीमध्ये उदयास आली. पोर्तुगीज शब्द बरोकोपासून ‘बरोक’ आला असावा असे मानले जाते. कला, साहित्य, संस्कृती, चित्रे, नाट्य, संगीत यांची मांडणी करण्यासाठी या शैलीचा विशेष उपयोग केला जात असे. बरोक शैलीमधील चित्रे आणि शिल्पेही युरोपात अल्पावधीत प्रसिद्ध झाली आणि इटलीमधून या शैलीचा स्वीकार सर्व युरोपने केला. बरोकमध्ये बांधण्यात आलेली चॅपेल्स अत्यंत सुबक व सुंदर आहेत. इंग्लंड, स्पेन, पोर्तुगाल, इटलीमध्ये नाट्यगृहांसाठी बरोक शैली मोठ्या प्रमाणात वापरली गेली. व्हॅटिकन सिटीमधील सर्व जगात प्रसिद्ध असलेले सेंट पिटर्स बॅसिलिका, रोममधील चर्च आऑफ द गेसू, सँटा सुसाना, पोलंडमधील क्रॅकाव्ह येथील सेंट पीटर अँड पॉल, लंडनमधील सेंट पॉल्स कॅथिड्रल ही सर्व सुंदर चर्चेस बरोक शैलीमध्ये बांधण्यात आलेली आहेत. त्याचप्रमाणे वॉर्सामधील विलॅनोव्ह राजवाडा, प्रागमधील ट्रोजा राजवाडा, वुडस्टॉकमधील ब्लेनहाईम राजवाडा, सेंट पिटर्सबर्गमधील पीथरॉह राजवाडा हेदेखील याच शैलीमुळे प्रेक्षणीय झाले आहेत. बरोक शैलीचे इटालियन, सिसिलियन, पोलिश, इंग्लिश, स्पॅनिश, सायबेरियन, युक्रेनियन असे उपप्रकारही आहेत.
सांस्कृतिक ओळख
ऑपेरा हाउसची इमारत ही चर्नी रोड परिसराची एक सांस्कृतिक ओळखच आहे. बरोक शैली आणि भारतीय व युरोपीय स्थापत्यशैलीचा सुरेख संगम या इमारतीच्या बांधकामामध्ये झाला आहे. स्थापत्यकला आणि संस्कृतीच्या उपासकांना अभ्यासासाठी हे अतिशय महत्त्वाचे आहे. आभा लांबा यांच्या प्रयत्नाने ते नव्याने उभे राहत आहे, त्याबद्दल त्यांचे कौतुक केलेच पाहिजे.
- राहुल चेंबूरकर, स्थापत्यविशारद आणि नागरी वारसास्थळांचे अभ्यासक
(लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत उपसंपादक आहेत.)