अफू

By admin | Published: January 24, 2015 02:55 PM2015-01-24T14:55:53+5:302015-01-24T14:55:53+5:30

मानवी मेंदूमधल्या स्मरणाच्या केंद्रांवरही ताबा मिळवणारी

Opium | अफू

अफू

Next

 वैशाली करमरकर

 
 
बेंजामीन फ्रँकलीनचे एक सुप्रसिद्ध वाक्य आहे. माणसे तीन प्रकारची असतात. Those who are movable, those who are immovable and those who move. म्हणजे काही माणसे सहज एखाद्या सामानाच्या खोक्यासारखी इथून तिथे हलवता येतात. काही माणसे अगदी ठोंब्यासारखी. त्यांना हलवता येणे कठीण. काही माणसे मात्र स्वत: हालचाल करणारी अगदी स्वयंप्रेरित असतात. 
‘सॉफ्ट पॉवर’ या आपल्या बयेसाठी पहिल्या दोन प्रकारातली माणसे अती महत्त्वाची. कारण बहुसंख्य माणसे या पहिल्या दोन प्रकारात मोडतात. बरीचशी माणसे सहजासहजी मेंढरासारखी हलवता येतात. काही अडेलतट्टंसाठी जरा जास्त युक्त्या वापराव्या लागतात, इतकेच.
जास्तीत जास्त समूहांना आपल्या दिशेने आकर्षित करणे हे मोठे कसब आहे. कलाच म्हणा ना. तर या कलेला आधुनिक विज्ञानाची सर्वतोपरी खूप मदत झाली. पैकी न्यूरॉलॉजी म्हणजे मेंदूशास्त्र याचा वाटा सर्वात मोठा. आज पाहू त्यातल्या काही गमती जमती.
प्रत्येक माणसाकडे मेंदू नावाचा एक महासंगणक आहे. त्याची एक कार्यप्रणाली आहे. त्यात हार्डवेअर आहे आणि सॉफ्टवेअर आहे. या संगणकाची कार्यप्रणाली एकदा समजली की त्याला कमांड देणे सोपे जाते. म्हणून त्याच्या कार्यप्रणालीची काही वैशिष्ट्ये !
पहिले वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येकाच्या मेंदूत बसवलेला भावनांचा फिल्टर. या फिल्टरचे नाव आमिग्दाला. बदाम बियांसाखी ही ग्रंथी गंध, चव, स्पर्श, स्वर यातून मिळालेल्या सिग्नल्सची वाटणी करते. त्याचे मुख्य दोन वाटे घालते.
‘हा अनुभव भीतीदायक आहे?’ की ‘हा अनुभव थोडा ओळखीचा आहे?’ त्यानुसार मेंदू मग स्नायूंना, हातापायांना अँक्शन घेण्याची आज्ञा देतो. थोडक्यात, आपण सर्वजण दिवसभरात ज्या कृती करतो त्या या भावनिक फिल्टरवर अवलंबून असतात. त्यामुळे समूहाच्या भावनांना हात घालणे सर्वात महत्त्वाचे. 
टीव्हीवरच्या जाहिराती भावना विकतात, वस्तू नाही. वर्तमानपत्रातल्या बातम्या भीती आणि अविश्‍वास विकतात, वस्तुनिष्ठ माहिती नाही. भीषण अपघातानंतर ‘आपको कैसे लग रहा है?’ असा मूर्ख प्रश्न अपघातग्रस्ताला विचारतात. कॅमेर्‍यापुढे त्याने ढसाढसा रडणे महत्त्वाचे. हे दृश्य पाहणारा समूह हतगात्र नाही झाला तर नवल. कोसोव्हा येथील युद्धातील धार्मिक कत्तलीची दृश्ये बीबीसीने काश्मीरच्या नावाखाली जगभर प्रसारित केली. सर्व जग काश्मीरच्या प्रश्नाकडे काविळीच्या नजरेने पाहू लागले. भावना हे मतपरिवर्तनाचे अत्यंत प्रभावी अस्त्र आहे, हे या आमिग्दालामुळे ध्यानात आले. 
आपल्या मेंदूचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे त्याची स्मरणशक्ती आणि तिची वर्गवारी. (खाली दिलेली चौकट पाहा)
अत्यल्प-अल्प आणि दीर्घ स्मरणशक्ती या वर्गवारीतली दीर्घ स्मरणशक्ती हे ‘सॉफ्ट पॉवर’च्या खेळातले फार जुने हत्त्यार आहे. आता परत जरा टेलिव्हिजन लावा बरं! सिरीयल्स बघताना त्याच त्याच जाहिराती का येत राहतात? बातम्या देणारे वार्ताहर तारस्वरात तेच तेच का बोलतात? एखाद्या दुर्घटनेची तीच तीच दृश्यफीत का फिरवली जाते? घडलेली घटना परत परत घडत आहे, फार मोठय़ा प्रमाणावर घडत आहे असे वाटत राहते. पॉप्युलर समजल्या जाणार्‍या वृत्तवाहिन्यांवरील बातम्या, चर्चासत्रे बघून झाल्यावर तुमचा मूड निराशावादी होतो की नाही? खरे सांगा. टीव्ही बंद करताना ‘या देशाचे काहीही होणार नाही आणि या जगाचा र्‍हास अटळ आहे’ असा ठाम विश्‍वास आपल्या सर्वांच्या दीर्घ स्मरणशक्तीत जातो. अशा हतगात्र समूहांवर वर्चस्व गाजवणे सोपे जाते. 
आपल्या मेंदूची आणखी एक खासियत शास्त्रज्ञांनी प्रथम प्राण्यांवर आणि मग माणसांवर केलेल्या प्रयोगातून लक्षात आली. या चित्रातल्या मनीमाऊला लहानपणी फक्त आडव्या आकाराचे ग्रील्स दाखवले. ही मनीमाऊ मोठी झाली. मग एक दिवशी तिला एका उभ्या ग्रीलच्या खोलीत ठेवले तर तिच्या मेंदूने ही माहिती ग्रहण करायला जणू नकार दिला. ही माऊ आंधळ्यासारखी वागू लागली. दिसत असूनसुद्धा दिशाहीन झाल्यासारखी चाचपडू लागली. माणसाच्या मेंदूच्या बाबतीत हीच गोष्ट घडते हे शास्त्रज्ञांच्या लक्षात आले. शिक्षणतज्ज्ञांनी याची नोंद घेतली. 
वयाच्या आठव्या-नवव्या वर्षांपर्यंत विविध अनुभव, विविध भाषा, विविध प्रकारच्या लोकांशी संपर्क असे वैविध्य अनुभवणार्‍या मुलांची ग्रहणशक्ती उत्तम होते. आता याच्या उलटही प्रकार होऊ शकतो. एकसुरी अनुभव, एकसुरी माहिती एकाच प्रकारे वारंवार आदळत राहिली तर यापेक्षा कुठलीही वेगळी माहिती माणसाचा मेंदू अजिबात स्वीकारत नाही. भारतात ज्ञानपरंपरा होती हे थोतांड वाटते. सूर्यसिद्धांत हा ग्रंथ कोपर्निकसच्या आधी सूर्य, पृथ्वी, चंद्र यांच्या भ्रमणाबद्दल अचूक माहिती देत होता यावर विश्‍वास बसत नाही. शून्याचा शोध भारताने लावला या आपल्याला गावगप्पा वाटतात. तरी बरे, बिचार्‍या अलबेरुनीने गणितावरील मूळ संस्कृत ग्रंथ पश्रीयन भाषेत भाषांतरित करून ठेवले आहेत. पण लक्षात कोण घेतो? 
अठराव्या शतकापासून इंग्रजी साम्राज्याने आडवे गज दाखवले. तेच आपलेसे वाटतात. एकविसाव्या शतकातले उभे गज दिसत असून, दिशाहीन चाचपडणे सुरू राहते. या वर्चस्ववादी सॉफ्टपॉवरखाली भाषा ही कशा चाचपडतात पहा. आपण मराठीत कन्झुमरीझम या शब्दासाठी ‘चंगळवाद’ हा शब्द बनवला. त्यामुळे त्याला नकळत ‘विवेकवाद’, ‘समाजवाद’ या धाटणीतली काहीशी सकारात्मक महिरप दिली. ‘चंगळग्रस्त’, ‘चंगळभ्रष्ट’ असे शब्द नाही रूढ झाले. स्त्रीरोगतज्ज्ञांकडे आलेल्या गर्भधारिका ‘पेशंट्स’ ठरल्या, तर डिप्रेशनवरचा उपाय म्हणून ‘रीटेल थेरपी’. परवा नवीन शब्द ऐकला ‘सीव्ही क्लिनिक’ - म्हणजे नोकरीचे अर्ज कसे लिहावे अशा प्रकारचे सल्ले देणारे ऑफिस. 
‘पेशंट’, ‘थेरपी’, ‘क्लिनिक’ असे सर्व ऐकून वाटते ना आजारी पडल्यासारखे! 
- अशी काम करते सॉफ्ट पॉवरची अफू!

Web Title: Opium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.