'ओरिजनल' तमाशा पडद्याआड
By admin | Published: May 6, 2014 03:30 PM2014-05-06T15:30:51+5:302014-05-06T15:50:42+5:30
ज्येष्ठ तमाशा कलावंत अंकुश संभाजी खाडे ऊर्फ बाळू यांचे २६ एप्रिलला निधन झाले. काळू-बाळू या विनोदी जोडगोळीने सुमारे ६0 वर्षे तमाशा गाजवला. मराठी रसिकांना आनंद दिला. त्यांना वाहिलेली आदरांजली...
- सुधीर कुलकर्णी
ज्येष्ठ तमाशा कलावंत अंकुश संभाजी खाडे ऊर्फ बाळू यांचे २६ एप्रिलला निधन झाले. काळू-बाळू या विनोदी जोडगोळीने सुमारे ६0 वर्षे तमाशा गाजवला. मराठी रसिकांना आनंद दिला. त्यांना वाहिलेली आदरांजली...
ज्येष्ठ तमाशा कलावंत अंकुश संभाजी खाडे ऊर्फ बाळू यांचे २६ एप्रिलला निधन झाले. यापूर्वी २0११ मध्ये त्यांचे बंधू काळू ऊर्फ लहू संभाजी खाडे यांचे निधन झाले. दोघांच्या रूपाने गेल्या सुमारे ६0 वर्षांतील तमाशात इतिहास घडविणारे व या इतिहासाचे साक्षीदार असणारे हरपले आहेत. एवढा प्रदीर्घ काळ काळू-बाळू या जोडगोळीने तमाशा गाजवला. मराठी मनावर राज्य केले. अखेरच्या श्वासापर्यंत जोडी एक होती. त्यांचे प्रपंच वेगळे झाले, मात्र दोघांत मतभेद कधी झाले नाहीत. सारखे दिसण्याचा, जुळेपणाचा आनंद त्यांनी सार्यांना दिला. तमाशातील त्यांची दोन हवालदारांची भूमिका गाजली. त्यातील कुठला काळू व कुठला बाळू हे ओळखणे अवघड असायचे. त्याचप्रमाणे वास्तवातही त्यांना ओळखणे अवघड असायचे. नेहमीच्या सराईतांशिवाय दोघांना ओळखणे कठीण असे. तेदेखील आपला सारखेपणा टिकवण्याचा प्रयत्न करायचे. कुठेही जाताना वेश सारखा ठेवायचे. त्यातूनही लोकांचे रंजन व्हायचे. त्यांना बघायला गर्दी व्हायची. जुळ्या भावंडांची ही जोडी अखेर नियतीने फोडली. काळू अगोदर गेले. त्यांच्या जाण्याने बाळूदेखील खचून गेले. त्यांना सतत आठवणी छळत राहिल्या. राम नसलेले आयुष्य ते जगत राहिले. आता तेही गेले.
या जोडीला नेहमी बघणार्यांना त्यांच्यातील थोडा बदल लक्षात यायचा. काळू अधिक सावळे होते. बाळू थोडे गव्हाळ वर्णाचे होते. काळू मितभाषी होते. बाळू गप्पीष्ट होते. रंगमंच वगळता कोठेही बोलावे लागले, तर बाळूच बोलायचे. दोघांत अन्य वेगळेपण कसले नव्हते. दोघे निर्व्यसनी होते. ते कलावंत म्हणून जसे मोठे होते तसेच माणूस म्हणूनही मोठे होते. घरी किंवा फडावर आलेल्यांना चहा दिल्याशिवाय ते सोडत नसत. आजच्या महागाईच्या काळात त्यांच्या फडावर. भेटायला आलेले, कार्यक्रम ठरवण्यास आलेले, कलावंतांचे नातेवाईक यांना मोफत जेवण असे. फडावर रोज दोन्हीवेळा पाच-सात जण जेवायला हमखास असतातच. दर वर्षी पाच-सहा कार्यक्रम ते मदतीसाठी द्यायचे. कुठे शाळेची इमारत, कुठे मंदिराच्या उभारणीसाठी ते कार्यक्रम देत. रयतच्या अनेक शाळा-इमारतींसाठी त्यांनी कार्यक्रम दिले आहेत. कवलापूर त्यांचे गाव. तिथेही त्यांनी रयतच्या हायस्कूलला सभागृह बांधून दिले आहे. गावच्या यात्रेत दर वर्षी यांचा तमाशा व बॅ. पी. जी. पाटील यांचे व्याख्यान असा शिरस्ताच ठरून गेला होता. बॅ. पाटील प्रत्येक व्याख्यानात मी काळू-बाळूंच्या गावचा असे सांगायचे.
घरात तीन पिढय़ा तमाशा. त्यांचे आजोबा संतूजी खाडे यांनी तमाशा सुरू केला. त्यांचे चुलते व वडील शिवा-संभा यांनी तो वाढवला. काळू-बाळू लहान असतानाच वडील वारले. चुलत्यांनी त्यांचा सांभाळ केला. मोठा प्रपंच असल्याने दारिद्रय़ाचे चटके सार्यांनाच बसले. उपाशीपोटी राहावे लागे. त्यातून शाळा सोडून दोघांनी शेती करण्यास सुरुवात केली. एक दिवस चुलत्याने व ग्रामस्थांनी त्यांना सांगितले, की तुमच्या घरात तमाशाची परंपरा आहे. ती चालू राहिली पाहिजे. तुम्ही तमाशा करा. त्यातून त्यांनी १८ व्या वर्षी चुलत्याच्या मदतीने घरातच फड तयार केला. पुढे तो नावारूपाला आणला. शिखरावर नेला. दर वर्षी तमाशाचे मोठे फड दसर्यादिवशी बाहेर पडतात व अक्षय तृतीयानंतर परत येतात. वर्षात २१0 दिवस ते बाहेर असतात. एवढय़ा वर्षात त्यांनी अनेक वग सादर केले. साधारण दर वर्षी एखादा नवीन वग बसवलेलाच असतो. पूर्वी भाऊ फक्कड, बाबूराव पुणेकर यांचे वग असायचे. आता नवी मंडळी वग लिहितात. तरीही काही ठराविक ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक विषयांचे वग गाजत असतात. त्यांनाच मागणी अधिक असते. या जोडीने बसवलेला बाबूराव पुणेकर यांचा ‘जहरी प्याला अर्थात काळू-बाळू’ हा वग अधिक गाजला. त्यात काळू व बाळू ही हवालदारांची पात्रे होती. दोघेही ती बेमालूम करायचे. त्यांच्या हजरजबाबी विनोदाने हा वग लोकांनी डोक्यावर घेतला. त्यांची संवादफेक अचूक असायची. वाक्यावाक्याला ते हशा व टाळ्या वसूल करायचे. त्यातून थकल्याभागल्या रसिकांचे रंजन व्हायचे. गावाबाहेर उभारलेल्या तंबूत हलगी वाजू लागली, की त्यांचे पाय आपोआप तमाशाकडे वळायचे. त्यांच्या काळू-बाळू या भूमिका एवढय़ा गाजल्या, की लोक त्यांना त्याच नावाने ओळखू लागले. ही पात्रांचीच नावे पुढे आयुष्यभर त्यांना चिकटली. लोक जुनी नावे विसरून काळू-बाळू या नावानेच त्यांना ओळखू लागले, बोलावू लागले. अगदी त्यांच्या पत्नीदेखील फोनवर बोलताना मी काळूची मालकीण, मी बाळूची मालकीण असे म्हणायच्या. म्हणजे लोकभावना घरीदेखील स्वीकारलेली होती. त्यांच्या एका ‘जहरी प्याला’ वगाचेच दहा हजारच्यावर कार्यक्रम झाले. मात्र, त्याच्या नोंदी त्यांनी कधी ठेवल्या नाहीत. त्यामुळे त्याची नोंद कोणत्याही रेकॉर्डला झाली नाही. लोकांच्या मनात मात्र ती कोरली गेली.
या जोडीचं सर्वांत वेगळेपण म्हणजे ते मूळ तमाशा सादर करायचे. तमाशाचा एक ढाचा ठरलेला आहे. गण, गवळण, बतावणी, रंगबाजी (यामध्ये छक्कड, लावणी, सवाल-जबाब असतात.) व शेवटी वग अशा क्रमाने तमाशा रंगत जातो. असा तंत्रशुद्ध तमाशा करणारे समकालिनात ते एकमेव होते. तमाशाच्या अभ्यासकांपुढे त्यांनी असा तमाशा सादर केला आहे. कोल्हापुरात ‘ओरिजिनल तमाशा’ अशी त्यांच्या कार्यक्रमाची जाहिरात असायची. आज गण, गवळण झाली, की तमाशात चित्रपटातील गाणी सुरू होतात. हे रोखण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र, लोकांचाच रेटा गाणी सुरू करा, असा असतो. त्यातून आज मूळ तमाशा हरवला आहे. तो सादर करणारे काळू-बाळू अखेरचे शिलेदार म्हणावे लागतील.
अखेरच्या टप्प्यात त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. त्यांच्यावरील उपचारासाठी मदतीच्या घोषणा झाल्या. काहींनी पैसे दिले. काहींची आश्वासने तशीच राहिली. नव्या पिढीकडे कर्जबाजारी फड सोपविण्याची वेळ त्यांच्यावर आली. परंपरा व कलेची नशा यामुळे आजही चौथ्या पिढीने फड सुरू ठेवला आहे. फडाबरोबर शंभर लोक असतात. त्यांची कुटुंबे यामुळे जगतात, हीच पुण्याई बरोबर असल्याचे ते मानत होते. अशा या थोर कलावंतांना आदरांजली.