आपल्या नद्या, आपले पाणी : विदर्भ आणि मराठवाड्यातून वाहणारी 'पैनगंगा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 04:30 PM2019-03-31T16:30:16+5:302019-03-31T16:31:25+5:30

विदर्भ आणि मराठवाड्यात या नदीचा प्रवाह बुलडाणा, कोळवड, वाशिम, यवतमाळ, नांदेड आणि हिंगोली या शहरांतून जातो.

Our rivers, our water: 'Painganga', flowing through Vidarbha and Marathwada same time | आपल्या नद्या, आपले पाणी : विदर्भ आणि मराठवाड्यातून वाहणारी 'पैनगंगा'

आपल्या नद्या, आपले पाणी : विदर्भ आणि मराठवाड्यातून वाहणारी 'पैनगंगा'

googlenewsNext

- विजय दिवाण

महाराष्ट्रातील विदर्भ प्रांतातून आणि काही अंशी मराठवाडा विभागातून वाहणारी पैनगंगा (किंवा पेनगंगा) ही नदी बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात उगम पावते. तिचे उगमस्थान विदर्भाच्या पश्चिम किनारपट्टीवर अजिंठा डोंगरराशींच्या ‘बुदनेश्वर’ डोंगरात आहे. उगमानंतर ही पैनगंगा नदी बुलडाणा-अकोला जिल्ह्यांच्या सीमांवरून आग्नेय दिशेने वाहते. या नदीची एकूण लांबी ६७६ किलोमीटर एवढी असून, ती यवतमाळ-परभणी व यवतमाळ-नांदेड या जिल्ह्यांच्या सीमांवरून पुढे जाऊन वणी तालुक्यातील जुगाद गावाजवळ ‘वर्धा’ नदीस जाऊन मिळते. 

विदर्भ आणि मराठवाड्यात या नदीचा प्रवाह बुलडाणा, कोळवड, वाशिम, यवतमाळ, नांदेड आणि हिंगोली या शहरांतून जातो. पैनगंगेचे खोरे एकूण २३ हजार ८९८ चौरस कि.मी. एवढे असून, त्यातील देऊळघाट, वणी, पुसद, पांढरकवडा, चिखली आणि मेहेकर या शहरांना या नदीतून पाणीपुरवठा होतो. या शहरांच्या परिसरातील शेतीसाठी सिंचनही याच नदीपासून मिळते. त्यासाठी यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद तालुक्यात इसापूर येथे अपर पैनगंगा प्रकल्प-योजनेतहत एक मोठे धरण बांधले गेलेले आहे. पैनगंगेचा संगम वर्धा नदीशी होण्याआधी पूस, आडणा, अरुणावती, खुनी आणि विदर्भ या उपनद्या पैनगंगेस येऊन मिळतात.
    यवतमाळ जिल्ह्यास अलौकिक अशी वनसंपदा लाभलेली आहे. या जिल्ह्यातील ‘पैनगंगा’ नावाच्याच अभयारण्यास तीन बाजूंनी स्पर्श करून पैनगंगा नदी पुढे नांदेड जिल्ह्यात प्रवेश करते. तिथे नदीच्या दुसऱ्या तटालगत किनवट अभयारण्य आहे. या किनवट तालुक्यात पेंदा-नागढव येथे पैनगंगा नदीच्या काठी नागनाथाचे एक लोकप्रिय मंदिरही आहे. आपल्या उगमापासूनच ही पैनगंगा नदी अत्यंत खडकाळ अशा प्रदेशातून वाकडी-तिकडी वळणे घेत वाहते. अनेक ठिकाणी या नदीचा तळ खूप खोल आहे. त्यातील काही ठिकाणी तर नदीचा प्रवाह अगदी उंचावरून खाली पडून मग पुढे वाहत जातो. त्यामुळे या नदीतून नौकानयन शक्य होत नाही. नांदेडपासून सुमारे १२५ किलोमीटर अंतरावर यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यात या पैनगंगा नदीचे पाणी उंच खडकांवरून खाली पडून एक मोठा धबधबा तयार झालेला आहे. त्याचे नाव ‘सहस्रकुंड’ धबधबा असे आहे. हा धबधबा नांदेड ते किनवट या मार्गावर इस्लापूर पाटीपासून ५ किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी पैनगंगेचा ऐलतीर मराठवाड्यात आणि पैलतीर विदर्भात अशी स्थिती आहे. येथे नदीचा प्रवाह ३५-४० फूट उंचीवरून खाली कोसळतो. नदीच्या पात्रात वरच्या भागात असणाऱ्या एका उंच खडकामुळे खाली कोसळण्यापूर्वी नदीच्या प्रवाहाचे विभाजन दोन भागांत होते. त्यामुळे त्या उंच खडकाच्या पलीकडे ‘सोनधाबी’ आणि अलीकडे ‘सहस्रकुंड’ असे दोन धबधबे तयार होतात. त्यातील अलीकडचा सहस्रकुंड धबधबा हा मोठा आहे. प्रतिवर्षी  पावसाळ्यात साधारणत: आॅगस्ट-सप्टेंबर महिन्यांत हा धबधबा अगदी रौद्र स्वरूप धारण करतो. या नदीच्या मराठवाड्याकडील भागातून हा एकच मोठा धबधबा प्रामुख्याने दिसतो; परंतु पलीकडे विदर्भाच्या बाजूने मात्र धबधब्याच्या चार-पाच छोट्या-मध्यम धारा खाली पडताना दिसतात. पैनगंगेवरील हा सहस्रकुंड धबधबा अत्यंत नयन-मनोहर असून, महाराष्ट्रातील अनेक ठिकाणचे पर्यटक तेथे गर्दी करीत असतात; परंतु येणाऱ्या पर्यटकांसाठी तेथे पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत. त्या ठिकाणी दोन्ही तीरांवरून धबधबा पाहण्यासाठीचे प्लॅटफॉर्म, पर्यटकांसाठीचे उद्यान, पैलतीरी जाण्यासाठीचे पूल आणि उपहारगृहे, स्वच्छतागृहे पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून त्यांची दुरुस्ती आणि देखभाल जास्त कसोशीने केली जाण्याची नितांत गरज आहे. 

...............
 

Web Title: Our rivers, our water: 'Painganga', flowing through Vidarbha and Marathwada same time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.