कोर्टबाहेर...

By admin | Published: August 19, 2016 03:15 PM2016-08-19T15:15:38+5:302016-08-19T15:15:38+5:30

ऑलिम्पिकचे एक निराळेच रूप मी अनुभवते आहे. दीपा कर्माकरचे पदक हुकल्याची चुटपुट लागते, तेव्हा जीझसचे रॅम रॅम आठवते आणि डोळ्यात पाणी उभे राहते. ...ते फक्त विषण्णतेचे आहे, असे कसे म्हणू?

Out of court ... | कोर्टबाहेर...

कोर्टबाहेर...

Next
>सुलक्षणा वऱ्हाडकर
(ब्राझीलमधील रिओ-दि-जानेरिओ येथे वास्तव्याला असलेल्या लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)
 
अनेक जण मला विचारतात, रिओमध्ये (हे लिहीपर्यंत) भारतीय खेळाडू रिक्तहस्त आहेत, हे समक्ष बघताना फार विषण्ण वाटत असेल ना? - अर्थात, वाटते. वाटतेच. खोटे कशाला सांगू?
पण इथे रिओच्या स्टेडियममध्ये स्वयंसेवक म्हणून काम करताना मला भेटणारी माणसे, सामान्य प्रेक्षक आणि खेळाडू यांच्यातल्या विलक्षण स्वभावछटांचे होणारे प्रत्यक्ष दर्शन हे इतके विश्वव्यापी आहे, की मनावरचे मळभ पुसले जाण्यासाठीसुद्धा ते येत नाही.
आॅलिम्पिकसाठी स्वयंसेवक म्हणून निवड झाली, तेव्हा ‘आॅपरेशन्स’ आणि ‘इव्हेण्ट्स’ अशी दोन प्रकारची कामे असणार हे कळले. दोन दिवसांचे टे्रनिंग होते. तिथली माझी सिनिअर पत्रकार होती. ती म्हणाली, ‘आॅपरेशन्सपेक्षा तू इव्हेण्ट्स कर, चांगला अनुभव मिळेल.’
काहीशी नाराज आणि नाखूश होऊन मी माझी भूमिका निवडली होती खरे, पण आज तिला थँक यू म्हणावेसे वाटते आहे. कारण तिच्यामुळे मी आॅलिम्पिकमधले तब्बल ३५ टेनिस सामने प्रत्यक्ष पाहू शकले. सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंबरोबर बोलता आले. जगभरातील लोकांशी गप्पा झाल्या. 
सानियाच्या सगळ्या सामन्यांसाठी मी कोर्टवर होते. अनेक भारतीय स्वयंसेवकांनी ही संधी साधली. सानियासाठी भारतीय प्रेक्षकांची तुफान गर्दी होती. सानिया आणि रोहन ज्याला ब्राझीलमध्ये होहन म्हणतात ते सेंटर कोर्टवर सराव बाहेर पडताना भेटले होते. परंतु मी म्हटलेल्या नमस्तेला अत्यंत कोरडेपणाने यांत्रिक नमस्ते म्हणणारी सानिया विसरणे अशक्य. रोहनही इथे कुणा भारतीयाशी बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हता.
इतर देशातले खेळाडू मात्र या कोरड्या पार्श्वभूमीवर वेगळे वागताना दिसले. स्टेडियममध्ये अनेक खेळाडू आपल्या देशाच्या प्रेक्षकांना हात उंचावून अभिवादन करत होते. निशिकोरीसानसारखा जपानी खेळाडू तर प्रेक्षकांनी दिलेला जपानी राष्ट्रध्वज हातात घेऊन कोर्टवर फिरत होता. झेक रिपब्लिकचे खेळाडू प्रेक्षकांना टेनिसबॉल भेट देत होते. नदालने वापरलेले घाम पुसण्याचे टॉवेलसुद्धा प्रेक्षक ‘आठवण’ म्हणून घेत होते. देल पोर्तोसारखे खेळाडू तर प्रेक्षकांची प्रत्येक दाद आणि टाळ्यांना मान देताना दिसले.
जागतिक कीर्तीच्या खेळाडूंचा नम्रपणाही जवळून अनुभवता आला. राफेल नदालची मेन्स डबल्स मॅच होती. मिश्र दुहेरीत टेनिसचे रजतपदक जिंकलेला अमेरिकेचा राजीव राम रिकाम्या स्टॅण्डवरील जागेत उभा राहून नदालचा सामना पाहत होता. नदालकडे पाहतानाची त्याची नजर अनिमिष म्हणतात तशी स्थिर होती. अत्यंत साधा दिसणारा, दाढी न केलेला हा तरु ण खेळाडू त्याच्या भारतीय मैत्रिणीबरोबर उभा होता. त्याच्यामागच्या प्रेक्षकांनी तक्रार केली. त्यांचे म्हणणे हा (राम) मध्येच उभा असल्याने आम्हाला सामना नीट पाहता येत नाही. ते रामच्या गावीही नसावे. खांद्यावर टर्किश टॉवेल टाकून सामना पाहत असलेला राम वेगळ्याच दुनियेत होता. 
इतक्यात गेटवरून दोन ब्राझीलिअन स्वयंसेवक घाईघाईने चालत त्याच्याजवळ आले आणि त्याला बाजूला करू लागले. राम आणि त्याची मैत्रीण पब्लिक स्टॅण्डच्या पायऱ्या उतरले. खरेतर खेळाडूंसाठी सामना पाहण्याची मुभा होती, पण तरीही रामने हुज्जत घातली नाही. तो मुकाट बाजूला होत पुन्हा त्या सामन्यात गढला. 
सामान्य माणसांसारखे वागणारे असे स्टार्स आठवडाभर दिसतच होते. लिएण्डर पेसबद्दल इथे सगळ्यांनीच मनापासून हळहळ व्यक्त केली. तो हरल्यानंतरदेखील अनोळखी ब्राझीलिअन फॅन्स स्वत:च्या कपड्यांवर त्याची सही घेताना दिसत होते. लिएण्डरही स्वत:च्या ‘स्टार’ असण्याचे कसलेही स्तोम न माजवता सर्वत्र मोकळेपणाने फिरत होता. सानिया आणि रोहनच्या डबल्स सामन्यात भारतीय टेनिसमधील सगळे जण एका स्टॅण्डमध्ये प्रशिक्षकांबरोबर बसले होते आणि लिएंडर मात्र एकटा दुसऱ्या स्टॅण्डमध्ये बसलेला दिसला. पावसामुळे एक दिवस टेनिस सामने झाले नाहीत त्यादिवशी आम्ही रेनकोट घालून दुसरी जबाबदारी निभावत होतो. तेथे माझी ओळख ६० वर्षीय जिझसशी झाली. मी आणि हॉँगकॉँगचा अ‍ॅडम्स गप्पा मारत होतो. त्याला चीनबद्दल बरेच सांगायचे होते आणि मला भारताबद्दल. आम्हा दोघांना एकमेकांच्या देशाबद्दल आस्था होती. आम्हाला जिझस भेटला आणि तो मला चक्क रामराम म्हणाला. माझे मॅण्डरिन ऐकून पहिल्या दिवशी अ‍ॅडम्स चकित झाला होता आणि मी जीझसचे हे रॅम रॅम ऐकून. जिझस म्हणाला तो इंटरनेटवर हिंदी शिकतोय. त्याला हिंदी भाषा आवडते. मग काय पावसात आमच्या भारत, चीन आणि ब्राझीलबद्दलच्या जिव्हाळ्याच्या गप्पा चालू झाल्या. - हे असे जगावेगळे आॅलिम्पिक मी अनुभवते आहे. दीपा कर्माकरचे पदक हुकल्याची चुटपुट लागते, तेव्हा जीझसचे रॅम रॅम आठवते आणि डोळ्यात पाणी उभे राहते. 
...ते विषण्णतेचे आहे, असे कसे म्हणू?
 
आरोप... आणि वस्तुस्थिती
सानिया आणि रोहनच्या दुहेरी सामन्याच्या वेळी ‘चर्चेचा विषय’ ठरलेले भारताचे क्रीडामंत्री विजय गोयल आणि त्यांच्या पत्नी दिसल्या. सामन्याच्या ब्रेकमध्ये मिसेस गोयल आणि नंतर मिस्टर गोयलही उठून बाहेर गेले. गेम चालू असताना कुणालाही आत येता येत नाही. हा नियम मोडून हे दांपत्य मध्येच आत आले, ही मोठी चूक झाली. त्यानंतरच्या त्या पत्राचे प्रकरण भारतीय माध्यमांमध्ये बरेच गाजले. आॅलिम्पिकसारख्या सामन्यांमध्ये अशा शिष्टाचाराचे नियम कसोशीने पाळले जातात. ते सुरक्षा व्यवस्थेसाठी आवश्यकही असते. माझी स्थानिक मैत्रीण ल्युएना उरु ग्वेच्या एका मंत्र्यांसाठी आणि दुसरी मैत्रीण क्लॉडिया ही युरोपिअन आॅलिम्पिक फॅमिलीसाठी प्रोटोकॉल स्वयंसेवक म्हणून काम करते आहे. त्या दोघी सतत कामात दिसतात कारण त्यांना दर क्षणाला सगळे नीट चालले आहे ना याकडे लक्ष ठेवावे लागते. क्लॉडिया टीचर आहे. उत्तम इंग्लिश बोलते. त्या दोघी सांगत होत्या, ‘‘परदेशी पाहुण्यांना, विशेषत: मंत्रिमहोदयांना सगळे नियम माहीत नसतात. त्यामुळे त्यांना सांभाळून घेणे ही आमची जबाबदारी आहे. कोणत्या विभागात मंत्री प्रवेश करू शकतात, कोणत्या विभागात नाही यासाठी अधिस्वीकृती कार्डवर क्रमांक असतात. त्या क्रमांकानुसार त्यांचे प्रवेश मर्यादित होतात. त्यामुळे कुणी त्याचे उल्लंघन केले, तर ती त्या स्वयंसेवकांचीही जबाबदारी आहे. असे होते तेव्हा आमच्याकडून अपूर्ण माहिती गेलेली असते किंवा कम्युनिकेशन गॅप राहते...’’
विजय गोयल यांच्या याबाबतीत ज्या चुका झाल्या त्या प्रवेशाच्या होत्या. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मैदानावर आगंतुकाला प्रवेश नाही मग तो कुणीही असेल, हा इथला नियम आहे; तो गोयल यांनी तोडला. नियम मोडला गेला.. म्हणून समज दिली गेली!

Web Title: Out of court ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.