पाकिस्तान - चीन नवा दहशतवाद

By admin | Published: June 22, 2014 12:47 PM2014-06-22T12:47:09+5:302014-06-22T12:47:09+5:30

दहशतवादाचा प्रश्न केवळ भारताला भेडसावत आहे असे नाही. तो चीनलाही तितकाच भेडसावतो आहे आणि पाकिस्तानलाही; बदलत्या परिस्थितीमध्ये या आंतरराष्ट्रीय प्रश्नाकडे डोळसपणे पाहणे गरजेचे आहे.

Pakistan - China New Terrorism | पाकिस्तान - चीन नवा दहशतवाद

पाकिस्तान - चीन नवा दहशतवाद

Next

 डॉ. विजय खरे

 
दहशतवादाचा प्रश्न केवळ भारताला भेडसावत आहे असे नाही. तो चीनलाही तितकाच भेडसावतो आहे आणि पाकिस्तानलाही; बदलत्या परिस्थितीमध्ये या आंतरराष्ट्रीय प्रश्नाकडे डोळसपणे पाहणे गरजेचे आहे. हा एका देशाचा प्रश्न नसून, जागतिक प्रश्न आहे.. त्यामुळे याकडे नव्या सामरिक व सुरक्षेच्या चौकटीतून बघणे गरजेचे आहे.  जागतिक पातळीवर वेगवेगळ्या राष्ट्रांशी संवाद साधून प्रतिदहशतवादाची धोरणे आखणे गरजेचे आहे.
......................
चीनचे परराष्ट्र व्यवहारमंत्री वॅग यी यांनी भारताच्या नवनिर्वाचित परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली. दोन्ही राष्ट्रे परस्परांचे प्रतिस्पर्धी नाहीत, तर ते एकमेकांचे सहकारी आहेत. या दोन्ही देशांनी एकमेकांबद्दल अविश्‍वास व सीमाप्रश्न बाजूला ठेवून उभयपक्षी संबंध सुधारण्यास प्रयत्न केले पाहिजे, अशी अपेक्षा दोन्ही देशांनी व्यक्त केली आहे. दुसरीकडे  भारताच्या निमंत्रणावरून पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष नवाज शरीफ यांनी नरेंद्र मोदींशी चर्चा केली आहे. हे घडत असतानाच पाकिस्तानच्या कराचीतील जीना आंतरराष्ट्रीय विमानतळावर आत्मघातकी हल्ला करून तालिबानी दहशतवाद्यांनी पुन्हा आपले डोके वर काढले आहे. 
या पार्श्‍वभूमीवर दहशतवाद व सुरक्षेपुढील आव्हानांबाबत नव्याने विचार करणे गरजेचे झाले आहे.. ‘तेहरिक-ए-तालिबान’ या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेने १३ एप्रिल रोजी कराचीवर हल्ला करण्यात येईल, अशी धमकीदेणारे ट्विट केले होते.  त्याकडे पाकिस्तानसह जागतिक समुदायाने दुर्लक्ष केले.  ओबामा यांनी अफगाणिस्तानमधून आपले सैनिक माघारीचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर तालिबान्यांबरोबर चर्चेचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत व नवाज शरीफ यांनी पाकिस्तानच्या आर्थिक विकासासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्या अनुषंगाने कराची शहर हे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे.  त्यामुळे पाकिस्तानातील लोकशाहीचा संस्थात्मक ढाचा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांनी केलेला आहे. पाकिस्तानात लोकशाही बळकट होते की काय, अशी भीती दहशतवाद्यांना आहे.  
नुकतेच चीन मध्येही   Xinjang (जीआंग) प्रांतातील व  Urmuqi (ऊर्मकी) येथील मुख्य बाजारपेठेत बॉम्बस्फोट झाला हनवंशीय चिनी लोकांचे आर्थिक प्राबल्य असणार्‍या शहरात हा बॉम्बस्फोट करण्यात आला व त्यात ३१ लोक मारले गेले व जवळपास १00 लोक आजही मृत्यूशी झुंज देत आहेत.  यापूर्वी १ मार्च व ३0 एप्रिलमध्ये         ऊ र्मकी रेल्वे स्टेशनवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्यामुळे चीनमधील दहशतवादाचे वाढते प्रश्न भारताच्या सुरक्षिततेला पुढील काळात धोका ठरू शकतात. नुकत्याच झालेल्या घटनेकडे पाहता दहशतवाद्यांनी जीआंग प्रांतात कमी तीव्रतेचा संघर्ष घडवून सार्वजनिक ठिकाणांना लक्ष्य केले आहे.  हा संघर्ष केवळ चीनमधील जीआंग प्रांतातील युगर दहशतवाद्यांचा नसून, युगर आणि हन लोकांमध्ये वाढता तणाव आहे. विशेष म्हणजे युगर दहशतवादी हे अल-कायद्याशी निगडित असल्यामुळे हे हल्ले आता का वाढत आहे, याचाही ऊहापोह होणे गरजेचे आहे. 
१९९0 ते २000 पर्यंत पूर्व तुर्कस्तानात इस्लामिक चळवळीचे अस्तित्व वाढले होते; परंतु २00३ मध्ये पाकिस्तानचे वजिरीस्तान येथील लष्करी कार्यवाहीत त्यांचा नेता हसन मसून मारला गेला. त्यानंतर २00५ मध्ये त्याचे तुर्कस्तान इस्लामिक पक्षाचे प्राबल्य वाढले आहे व त्यांचे संबंध उत्तर वजिरीस्तान व पाकिस्तानी तालिबानी गटासोबत आहेत व या दोन्ही गटांनी चीन सरकार विरोध ‘जिहाद’ ची घोषणा केलेली आहे.  शिवाय चीनचे जिआंग प्रांताबाबतीचे ध्येयधोरणाबाबतही वांशिक व धार्मिक भेदभाव हेही महत्त्वाचे कारण आहे.
जिआंग हा प्रांत इराण एवढा आहे. शेती, गॅस, पेट्रॉकेमिकल्स्चे महत्त्व पाहता एकूण उत्पन्नाचा ६0 टक्के GDP ही या प्रांतातून मिळतो. शिवाय मध्य आशियासोबत गॅस पाईपलाईन याच मार्गाने जात आहेत. त्यामुळे सामरिकदृष्टीने हा प्रांत चीनसाठी महत्त्वाचा आहे.  अफगाणिस्तानामधील हेरत येथील भारतीय दुतावासात चार दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यात कोणतीही मुनष्यहानी झाली नाही.; परंतु त्याद्वारे भारत सरकारला दहशतवाद्यांनी इशाराच दिलेला आहे. त्यामुळे दहशतवादाचा प्रश्न केवळ भारताला भेडसावत आहे, असे नसून हा जागतिक प्रश्न आहे.. त्यामुळे या प्रश्नाकडे नव्या सरकारने सामरिक व सुरक्षेच्या चौकटीतून बघणे गरजेचे आहे.  दहशतवाद हा प्रश्न जागतिक आहे, त्यामुळे भारताने जागतिक पातळीवर वेगवेगळय़ा राष्ट्रांशी संवाद साधून प्रतिदहशतवादाचे धोरण आखणे गरजेचे आहे. हे धोरण आखताना कोणत्याही समूहाला असुरक्षित वाटता कामा नये. त्यासाठी एक जनजागृती गरजेची आहे. केवळ भावनात्मक घोषणा देऊन दहशतवादाचा बीमोड करणे शक्यच नाही. कारण हा लढा ‘असमांतर’ आहे. त्यासाठी संवाद, विकास व विश्‍वास या त्रिसूत्रींच्या आधारे भारताला दहशतवादावर विजय मिळविता येईल.  त्यासाठी इच्छाशक्ती व राजकीय नेतृत्वाची दूरदृष्टी महत्त्वाची आहे.. 
प्रतिदहशतवादाचे धोरण आखत असताना दहशतवादी कृत्यांचा बीमोड करण्यासाठी विशेषत: इंटरनेटच्या बाबतीत एखाद्या वेबसाईटवर बंदी न घालता त्यावर बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे.. आज इंटरनेटचा वापर आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे; परंतु दहशतवादी गटांना त्याचा फायदा झाला आहे. कारण इंटरनेटद्वारे दहशतवादी संघटना जागतिक, विभागीय व राष्ट्रीय पातळीवर कमी खर्चात आपले नेटवर्क तयार करीत आहे.  त्याचबरोबर त्यांना अर्मयादित भौगोलिक आणि सामरिक माहिती मिळते.  आपल्या विचारांशी जुळणारी माणसे त्यांना सतत भेटतात किंवा निवडता येतात. त्यासाठी आता राष्ट्र, राज्याच्या सीमांशी र्मयादा त्यांना उरलेले नाही. त्यामुळे विध्वंसक कृत्ये करणे शक्य होत आहे. काही अंशत: विकसित राष्ट्रे यावर उपाय म्हणून अशा वेबसाईट किंवा माहितीवर बंदी आणत आहेत. त्यामुळे आपोआपच त्यागोष्टीला जागतिक प्रसिद्धी मिळते व त्यात दहशतवाद्यांचा फायदा होतो.  प्रतिदहशतवादाचे धोरण आखत असताना प्रगत राष्ट्रे आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे surveillance  चा वापर करतात. भारतातही पोलीस व लष्करी दले प्रतिदहशतवादाच्या धोरणावर आक्रमक झाली, तरी त्यावर नागरीहक्काबाबत ओरड होते. येणार्‍या कालखंडात  four generation of warfare (4GW) चे तंत्र दहशतवादी वापरणार आहेत.. त्यात अराष्ट्रीय घटक हे पांरपरिक राष्ट्र राज्याविरुद्ध लढणार आहेत. त्यात इंटरनेट हे मुख्य युद्घनीतीचे शास्त्र ठरणार आहे.. प्रतिदहशतवादाच्या धोरणाबाबत भारताची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. कारण जागतिक पातळीवर लोकशाही बळकटीकरणाबरोबरच आर्थिक आणि लष्करी शक्तीत भारत विकास करीत आहे.. त्याचबरोबर दहशतवाद व नक्षलवाद हे प्रश्नही आता राष्ट्रीय सुरक्षेचे मुख्य मुद्दे बनले आहेत. एकीकडे अमेरिकेसह युरोपीयन युनियन प्रतिदहशतवादाचे धोरण अयशस्वी ठरत आहे. त्यामुळे भारताला केवळ दहशतवादाबाबतीत राष्ट्रीय भूमिका न घेता आंतरराष्ट्रीय पातळीवर एक दिशादर्शक धोरण ठरवावे लागणार आहे. केवळ तंत्रज्ञानाच्या जोरावर आता दहशतवादाचा बीमोड करता येणार नाही. विकास आणि धर्मनिरपेक्षता हा भारताचा संदेशच यापुढे मोलाचा ठरणार आहे. 
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे संघर्ष आणि युद्घाची व्याप्ती बदलत आहे.  त्यामुळे आतान भेटता युद्घ ही संकल्पना अस्तित्वात आलेली आहे. यामध्ये कोणत्याही शारीरिक बळाचा वापर किंवा शस्त्रांचा वापर आपल्या सीमारेषेच्या सभोवताली किंवा आत केला जात नाही.  यात केवळ माहितीचा वापर करून त्याला तंत्रज्ञानाची जोड देऊन राजकीय व सामरिक हित जोपासण्याचा प्रयत्न केला जातो. येणार्‍या काळात अशा युद्घपद्घतीचा वापर आपल्यापेक्षा कमी लष्करीबळ असणारी राष्ट्रे करणार आहेत.
प्रतिदहशतवादाचे धोरण आखत असताना नव्या सरकारने Counter -radication चे धोरण स्वीकारणे गरजेचे त्यात Countering violent Extremism करत असताना दहशतवाद्यांची भरती कमी कशी करता येईल, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. दहशतवादी कृत्ये करणारी हे वेगवेगळय़ा विचारधारा असणार्‍याचा समूह आहे. त्यात धर्म, पंथ, वंश यांचा समावेश आहे. त्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या धोरणात सर्व समावेशकता गरजेची आहे. २0११ मध्ये इंटरनेटच्या माध्यमाद्वारे गुगलने विकीकुरानबाबत एक समिट आयोजित केली होती. त्याद्वारे दहशतवाद्यांचे वेगवेगळे प्रश्न, त्यांच्या मागण्या, सूचना, जागतिक नागरी समाज आणि सरकार यांच्यातील समन्वय, आर्थिक विषमता असे विषय घेऊन चर्चा केलेली होती. तशा पद्घतीची योजना नव्या सरकारने व राज्य सरकारने आणणे गरजेचे आहे. दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी रोजगार व विकास महत्त्वाचा आहे. काही अंशत: जम्मू-काश्मीरमध्ये पंचायत राजद्वारे दहशतवाद कमी होतांना आपणास पाहावयास मिळतो. त्यासाठी सरकारने विश्‍वास बांधणीची प्रक्रिया अधिक सुलभ करणे गरजेचे आहे. २६/११ नंतर अंतर्गत सुरक्षा व्यवस्थापनात बराच बदल होत आहे. आधुनिक शस्त्रे खरेदीपासून पोलीस दलातील पुनर्रचना करण्यात येत आहे.; परंतु त्यात हवे तेवढे यश मिळालेले नाही. त्यासाठी उत्तर आयर्लंडद्वारे पोलीस यंत्रणेत जसे बदल करण्यात आले, तसेच बदल आपण करणे गरजेचे आहे. त्यात पोलीस आणि सामान्य माणूस यांच्यात संपर्क वाढविणे गरजेचे आहे.  आज भारतात प्रत्येक राज्यात स्वत:ची पोलीस दले आहेत व Anti Terrorism squad (ATS) आहेत व सोबत गुप्तहेर यंत्रणा कार्यरत आहे; परंतु त्यात राजकीय हस्तक्षेप व जातीय व धार्मिक रंग दिल्यामुळे सामान्य लोकांचा विश्‍वास सरकारी यंत्रणेवर राहात नाही.  त्यामुळे पोलीस यंत्रणा, केंद्र, राज्य सरकार यांच्यातील योग्य समन्वयकच  दहशतवादावर मात करू शकतो.
..........
(लेखक पुणे विद्यापीठात संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभागात प्राध्यापक आहेत.)

Web Title: Pakistan - China New Terrorism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.