पालकांची अपेक्षा, बालकांवर ओझं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 12:12 AM2019-05-05T00:12:15+5:302019-05-05T00:19:50+5:30

प्रत्येक आई-बाबांचे मुलांच्या बाबतीत दोन प्रकारचे समज असतात. एक म्हणजे मूल कितीही मोठं झालं तरी ते लहानच आहे आणि दुसरे म्हणजे अकाली प्रौढत्व आल्याचे भासवतात. आजच्या पालकवर्गाचा (गैर) समज आहे की, हे स्पर्धेचे युग आहे. त्यामुळे मुलाला सर्व काही

Parents expectations, babies oozing | पालकांची अपेक्षा, बालकांवर ओझं

पालकांची अपेक्षा, बालकांवर ओझं

Next

- डॉ. अश्विनी पाटील -

प्रत्येक आई-बाबांचे मुलांच्या बाबतीत दोन प्रकारचे समज असतात. एक म्हणजे मूल कितीही मोठं झालं तरी ते लहानच आहे आणि दुसरे म्हणजे अकाली प्रौढत्व आल्याचे भासवतात. आजच्या पालकवर्गाचा (गैर) समज आहे की, हे स्पर्धेचे युग आहे. त्यामुळे मुलाला सर्व काही आलेच पाहिजे. चांगले मार्क्स मिळवावेत, खेळात प्रावीण्य मिळवावे, विविध विषयांवर वाचन करावे, निदान रोज घरी येणारी वर्तमानपत्रे वाचावीत, एखादा छंद जोपासावा, क्लासला जावे, व्यायाम करावा, मन:शांतीसाठी हरिपाठ म्हणावा, इंग्रजीवर प्रभुत्व मिळवावे, टी. व्ही.वरील बातम्या बघाव्यात, समाजात कसे वागावे, याचे नियम जाणून घ्यावेत.

अशा एक ना धड अनेक अपेक्षांचे ओझे बालकावर लादत असतात आणि त्या पूर्ण व्हाव्यात म्हणून उठता-बसता टोकतही असतात. हे ओझं खरंतर मूल जन्माला आल्यापासून प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष झेलत आलेली असतातच. प्रत्येक गोष्ट पद्धतशीरपणे आणि पालकांच्या अपेक्षेप्रमाणे करणे मुलांना शक्य नाही. मग, या ओझ्याखाली कोवळं मनं आपली स्वप्ने, आवडी-निवडींना मुरड घालतात. यामुळे मौलिक व्यक्तिमत्त्वाच्या विकासाला खीळ बसते.

पालकांनी अपेक्षांची भली मोठी यादी करताना मुलांच्या मानसिकतेचा, बुद्धिमत्तेचा आणि क्षमतांचा विचार करणे काळाची गरज आहे. मुलांनी अपडेट राहावे, त्यांना सर्व गोष्टींचे ज्ञान असावे, समाजात या स्पर्धेत टिकून राहावे, अशी अपेक्षा असणं हे पालकांच्या दृष्टीने स्वाभाविकच आहे. त्यात चूक असे काहीच नाही; पण मुलांच्या मनावर आपल्या वागण्याने काही परिणाम तर होणार नाही ना, याचेही चिंतन करणे आवश्यक आहे. काही कुटुंबांत नकळतपणे चुकीच्या शब्दांचा उल्लेख केला जातो. उदा. - तुझा काही उपयोग नाही, तुला काही कळत नाही, तुझ्यामुळे लोक आम्हाला नावे ठेवतात, तू आमची मान खाली घालशील यासारख्या वाक्यांनी मुलांच्या मनावर आघात होतात. अशा प्रकारची मानसिक हिंसा पालक म्हणून आपल्याकडून होऊ नये यासाठी सावध राहायला हवे.

मुलांसमोर नकारार्थी वाक्यांचा पाढा वाचू नये. जर मुलांनी तुमच्या अपेक्षा पूर्ण कराव्या, असे वाटत असेल तर तुम्हीही त्यांच्या कृतींमध्ये सहभागी व्हायला हवे. प्रत्येक व्यक्ती ही इतरांपेक्षा वेगळी आहे. व्यक्तिभिन्नतेपायी कोण डॉक्टर होईल, कोण इंजिनिअर, कोणी उत्तम व्यावसायिक होईल, कोणी संगीतकार. जो तो आपल्या क्षमतेनुसार घडत जाईल.


अमेरिकेतील प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॉ. हावर्ड गार्डनर यांनी मुलांच्या बुद्धिमत्तेविषयी ‘मल्टिपल इंटिलिजन्स’ हा महत्त्वाचा सिद्धांत मांडला. त्यांच्या मते, बुद्धिमत्तेला अनेक बाजू आहेत. प्रत्येक व्यक्तीची बौद्धिक क्षमता वेगळी आहे.
 

एखादी व्यक्ती चांगला गायक असेल, तर एखादा अवघडात अवघड गणित चटकन सोडविणारा असेल. एकूणच काय तर एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखी नसते.
गार्डनर यांनी आठ प्रकारच्या बुद्धिमत्ता सांगितल्या आहे.

१) भाषिक बुद्धिमत्ता,
२) गणितीय बुद्धिमत्ता,
३) संगीतविषयक बुद्धिमत्ता, ४) त्रिमित्रीय बुद्धिमत्ता, ५) आंगिक गतिसंवेदन कौशल्य विषयक बुद्धिमत्ता, ६) निसर्गविषयक बुद्धिमत्ता, ७) आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता आणि ८) व्यक्तीअंतर्गत बुद्धिमत्ता.


गार्डनरचा हा बुद्धिमत्तेचा सिद्धांत व्यक्ती विविध परिस्थितीत जी कौशल्ये दाखविते त्यावर आधारित आहे. मुलांच्या बुद्धिमत्तेचे मापनासाठी व आवड जाणून घेण्यासाठी नक्कीच उपयोगी पडेल.
 

पालकांनीही मुलांच्या आवडी-निवडीचा विचार करून शैक्षणिक समुपदेशकाशी चर्चा करून निर्णय घ्यावा. मुलांना स्पेस द्यावा. आपल्या मनात मुलांविषयी काय भावना आहेत. या स्पष्टपणे बोलाव्यात.त्यांना निर्णयप्रक्रियेत समाविष्ट करून घ्यावे. त्यामुळे मुलांच्या मनातही आपल्या मतांचा घरात विचार होतोय ही भावनादृढ होईल.

 

(लेखिका मानसशास्त्र विषयाच्या तज्ज्ञ आहेत.)


 

Web Title: Parents expectations, babies oozing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.