पास्तेल आणि रोमिओ- जुलिएता
By admin | Published: July 22, 2016 05:16 PM2016-07-22T17:16:46+5:302016-07-22T17:52:43+5:30
रिओच्या रस्त्यांवर स्वस्तात मिळणारे आणि भारतीय जिभांना जवळचे असणारे खाद्यपदार्थ शोधणार असाल, तर या यादीची मोठीच मदत होईल!
- सुलक्षणा वऱ्हाडकर
ऑलिम्पिकसाठी रिओमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला अनेकानेक प्रश्न असतील. त्यातला एक महत्त्वाचा म्हणजे खाण्यापिण्याची व्यवस्था काय?
भाषेचा गंध नसलेल्या देशात जाताना ही धास्ती असतेच असते. आणि त्यातून अशा ठिकाणी महिनाभर राहायला जायचं असेल तर विचारूच नका. साधारण जास्त दिवस ब्राझीलमध्ये कुणी फिरायला येणारा असेल, तर सर्वसोयींनी युक्त अपार्टमेंट भाड्याने मिळतात, जिथे सर्व फर्निचर आणि छोटे स्वयंपाकघरही असते. हाताने बनवून खाणे या महागड्या देशात पर्यटकांना परवडते. शिवाय आपल्या आवडीचे जेवण बनवता येते.
रिओला येणाऱ्या प्रत्येकाला ३२ किलो वजनाच्या दोन बॅगा विमानातून आणता येतात. त्यामुळे इथे रिओमध्ये येऊन तुम्ही (पैसे वाचवण्यासाठी) राहत्या ठिकाणी स्वयंपाक करणार असाल तर तूरडाळ आणि गव्हाची कणिक आठवणीने आणा, हे मी गेल्याच रविवारी सांगितलं.
पण ज्यांना या स्वयंपाकाच्या भानगडीत पडायचे नाहीये त्यांचे काय? इथल्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन नेमकं काय मागायचं? साधारण भारतीय चवींशी मिळतेजुळते आणि तरीही ब्राझीलची ‘चव’ देणारे असे काय मिळते इथे?
- असा प्रश्न असेल, तर तुमच्यासाठी रिओची एक खाद्ययात्रा :
जवळपास महिनाभर तुम्ही जिथे राहणार तिथे स्वयंपाक रांधणार नसलात आणि खिसा गरम असेल तर रिओमध्ये तुमच्या जिभेचे भरपूर लाड होऊ शकतील.
सगळ्यात प्रसिद्ध, स्वस्तात मिळू शकणारा, चविष्ट आणि पोटभरीचा पदार्थ म्हणजे पास्तेल आणि उसाचा रस... !
पण जर समजा तुम्ही घरी स्वयंपाक करणार नसाल तर मात्र तुम्ही काही ब्राझीलिअन पदार्थ हमखास खाऊ शकता.
पास्तेल आणि उसाच्या रसानंतरची डीश ‘मोकेका’ म्हणजे फिश करी जी साधारण भारतीय गोवन फिश करीसारखी आहे. ‘बोबो दे कमाराव’ ही बाहियाची डिश आहे. कोळंबीचा घट्ट रस्सा असतो यात. मक्याच्या पिठासारखा अथवा बेसन पिठात केल्यासारखी चव असते. ‘कावदु कमाराव’ ही आणखी एक कोळंबीची डिश. यात रस्स्यामध्ये चवळी असते, बटाटा असतो. थोडी फिकी चव असते. पण अडणार नाही काम.
‘मिस्तो केंची’ हा एक सॅण्डविचचा प्रकार आहे. म्हणजे इथल्या पव फ्रान्सिस ब्रेडमध्ये, मोझरेला चीजची स्लाईस आणि ‘प्रेझेंतो’ किंवा ‘पेतो दे पेरू’ (टर्की) टाकून ग्रिल्ड केलेले सॅण्डविच.
तुम्ही शाकाहारी असाल तर ‘पदारिया’ म्हणजे बेकरीमध्ये तसे सांगा.. सो मोझारेला मिस्तो केंची, नाव प्रेझेंतो इ पेतो यात अंडे टाकता येईल.
इथे रस्तोरस्ती युरोपसारख्या पदारिया आहेत. यात असंख्य गोडाचे पदार्थ मिळतात. पाव मिळतात.
रिओमधला पिझ्झा खास असतो. यात केळ्याचा पिझ्झा असतोे. पेरूचा जॅम इथे लोकप्रिय आहे. ‘ग्वायाबादो’ असे म्हणतात त्याला.
आपल्या पनीरसारखे पनीर इथे मिळत नाही.. कॉटेज चीजचा एक प्रकार मिळतो पण तो खूप महाग असतो. म्हणजे २०० ग्रॅमसाठी २०० रु पये लागतात. त्यापेक्षा इथले लोकल ‘केजो मिनास’ वापरून पाहा. गायीच्या दुधापासून हे चीज बनवले जाते. याचे सॅण्डविचही बनवतात. हे कच्चे खाल्ले जाते. पनीरप्रमाणे वापरायचे असल्यास ते विरघळून जाते किंवा चिकट होते.
शेंगदाण्याच्या चिक्क्या, बर्फ्या मात्र इथे खूप मिळतात. खारे शेंगदाणे तर समुद्रकिनाऱ्यावर मिळतातच पण सुपर मार्केटमध्येसुद्धा भाजलेले शेंगदाणे मिळतात.
लसूण-आल्याची पेस्ट मिळते.. एकत्र आणि स्वतंत्र दोन्ही पेस्ट मिळतात. मिरचीबरोबरसुद्धा मिळतात.
इथे मिळणाऱ्या मिरचीमध्ये तेल टाकून आपल्याला हवा तो तिखट इफेक्ट आणू शकतो. भारतासारखा चहा इथे मिळत नाही. पण कॉफी मिळते. दूध टाकून थोड्या गोड चवीची हवी असेल तर ‘काफे लेईचे’ अशी आॅर्डर द्यायची..
इथला ‘कमाराव रिसेतो’सुद्धा लोकप्रिय आहे. कोलंबीचा पुलाव असे याचे अनुवादित नाव आहे.
‘असाई’ हे येथील वंडर फ्रुट आहे. याला वेगळीच चव आहे. जांभळ्या रंगाचे हे फळ असते. मला याची चव करवंद आणि जांभळाच्या मधली वाटली. सीताफळ, रामफळ, अननस, आंबा, पेरू, चिकू, पपई अशी सगळी भारतातील फळे इथे मिळतात. इथले कलिंगड अत्यंत गोड असते. मार्केटमध्ये गेल्यास तुम्हाला फळांच्या फोडी फ्रीमध्ये चाखायला मिळतात.
इथे मॅकडोनाल्ड खूप महाग आहे आणि इथले केएफसी बंद आहे, हे लक्षात ठेवलेले बरे!
आॅलिम्पिकचे सामने पाहत भटकत फिरणाऱ्यांना दुपारच्या क्षुधाशांतीसाठी एक स्वस्तातला पर्याय आहे. त्याला प्रातो फेयितो असे म्हणतात.
दुपारच्या वेळेला रस्तोरस्ती एखादी लहानशी चारचाकी गाडी तिच्या डिकीमध्ये गरम गरम जेवणाचे डबे घेऊन फिरते. ठरावीक ठिकाणी, मोठ्यामोठ्या टॉवर्सच्या शेजारी तिथे काम करणाऱ्या कष्टकरी वर्गासाठी अवघ्या दहा-दहा हीआईसमध्ये हे जेवण उपलब्ध असते. यात फ्रेंच फ्राइज, भात, एक लेट्युसचे पान, एक टोमॅटोची फोड, राजमा ज्याला इथे फेजाव असे म्हणतात तो किंवा फेजवादा, याच्या जोडीला एखादा बीफ-चिकन किंवा फिशचा तुकडा असतो.
इथे मिळणारा शाकाहारी राजमा त्यातले मांसाचे तुकडे काढून ‘शाकाहारी’ बनवतात.. त्यामुळे शुद्ध शाकाहारींनी त्याच्या वाट्याला न जाणेच योग्य!
ब्राझीलिअन म्हटले की फुटबॉल, सांबा, बिकिनी घातलेल्या स्त्रिया, बिअर घेऊन नाचणारे लोक, भव्य दिव्य कार्निवल आणि कडू कॉफी आठवते ..
गेली दोन वर्षे वर्ष मी ब्राझीलमध्ये राहते आहे. मला जे ब्राझील रोजच्या आयुष्यात भेटते ते याबरोबरच याच्या पलीकडचेही आहे.
आचार-विचार, राहणीमान, जेवणखान सगळ्यात या देशाची स्वत:ची अशी परंपरा आहेच; शिवाय ज्या-ज्या राज्यकर्त्यांनी इथे येऊन राज्य केले त्यांच्या स्वयंपाकाची चव, त्यांचे जिन्नस, पदार्थ घेऊन इथली खाद्यसंस्कृती अत्यंत संपन्न आणि मुख्य म्हणजे गोड बनली आहे. इथले लोक गोड फार खातात आणि अत्यंत आवडीने खातात!
एकतर या देशात ताजी, मधुर, नैसर्गिकरीत्या पिकलेली फळे मुबलक मिळतात. ब्राझीलमध्ये किमान ५० प्रकारच्या केळांची लागवड होते. मूळच्या ब्रजिलिअन असलेल्या असाई, केळे, नारळ, आंबा, पेअर, पीच, भोपळा, रताळे, अंजीर, पपई, माराकुजा, काजू, ग्वाराना, पेरू, अननस, प्लम, संत्रे, मोसंबी, अवकाडो या सगळ्याचा वापर इथल्या गोडाच्या पदार्थात होतो.
फळांचा वापर करून बनवलेले केक तर ब्रजिलिअन घरात दर आठवड्याला बनतात. म्हणजे आपण जितक्या सहजपणे शिकरण बनवू तेवढ्या सहजपणे केक बनवले जातात.
गाजराचा केक, भोपळ्याचा केक, केळ्याचा, मक्याच्या पिठाचा, आंब्याचा, सोयाबीनच्या पिठाचा, माराकुजाचा, लोण्याचा, बटरचा, पपईचा, ताज्या किसलेल्या नारळाचा, संत्र्याचा, कोकोचा व इथे उपलब्ध असेलल्या यच्चयावत फळांचा केक बनवला जातो.
इतकेच काय तर इथे पिझ्झासुद्धा गोड असतो. म्हणजे केळाचा पिझ्झा, चॉकलेटचा पिझ्झा, आंब्याचा पिझ्झा.. आणि वरून दालचिनी किंवा जायफळ.
घरात कुणी पाहुणे आले तर अचानक काय गोड करायचे हा प्रश्न ब्रजिलिअन बाईला पडत नाही. केळे अर्धे कापून, त्यावर मोझोरेला चीज टाकून, मधाची धार टाकली.. ओव्हनमध्ये काही सेकंद फिरवले आणि त्यावर दालचिनी टाकली की झाले झटपट डेझर्ट.
यातले काही निवडक गोड पदार्थ... यांची चव रिओमध्ये येणाऱ्या प्रत्येकाने चाखलीच पाहिजे :
अहोज दोसे : म्हणजे आपली तांदळाची खीर. पुडिंगइतके घट्ट असणारा हा पदार्थ दालचिनी पावडर टाकून खाल्ला जातो.
बेझिनो : आटवलेल्या दुधामध्ये लोणी, खोबरे आणि साखर घालून हे गोल लाडू बनवले जातात. नारळाचा कीस वापरून त्याला त्यात गडबडा लोळवले जाते .
बोलो डे ओलो : पातळशा स्पंज केकमध्ये पेरू, मारमालेड किंवा आटवलेले गोड घट्ट दूध फिलिंग म्हणून वापरून त्याचा रोल बनवतात.
काजुझिन्यो : आटवलेले घट्ट दूध, लोणी, दाण्याचा कूट आणि काजू घालून बनवलेला कपकेकसारखा पदार्थ. आपल्या दाण्याच्या कुटाच्या लाडवासारखा लागतो.
कान्जिका : गोडसर मक्याचे दाणे दुधात मऊसर शिजवून त्यात दालचिनी टाकतात. काही ठिकाणी नारळाच्या दुधाचाही वापर करून ही घट्ट खीर बनवतात.
के्र मे दे पपाया : रोजच्या ब्रेकफास्टमध्ये ब्रजिलिअन माणसाला पपई खायला आवडते. इथे तळहातावर बसतील इतक्या लहान लहान पपई मिळतात. व्हॅनिला आइस्क्रीममध्ये पपईचा गर ब्लेंडरमध्ये फिरवून घेतात. त्यावर मनाजोगे टॉपिंग टाकले जाते. थंडगार वाढले जाते.
गोयाबादा : पेरूच्या गरापासून बनवलेला हा पदार्थ भारतीय चवीच्या जवळ जाणारा आहे. पेरूचा गर, पाणी आणि साखर. आलेपाक वड्यासारख्या या वड्या असतात.
रोमियो जुलियेता : पेरूच्या गरापासून बनवलेले गोयीबादा आणि पांढरे चीज वापरून हा गोड पदार्थ बनवला जातो. म्हणजे एक थर पेरूचा, एक चीजचा.
मन्जार ब्रान्कू : नारळ, साखर जाळून केलेलं कैरामल आणि ड्राय प्लम्स वापरून हे डेझर्ट बनवतात.
मोसे जी माराकुजा : माराकुजा फळाचा गर, आटवलेले घट्ट दूध आणि खूप दाट साय किंवा क्रीम एकत्र करून फ्रीजमध्ये आठ तास ठेवून द्यायचे.. की झाला हा एक्झॉटिक पदार्थ तयार.
पे जे मोलाकी : अर्थात आपली शेंगदाण्याची चिक्की...
तापिओका : हा अत्यंत चवदार पदार्थ आहे. साबुदाण्याच्या पिठासारखा दिसणारा पण कंदमूळ असलेल्या पिठाचा प्रकार. या कंदमुळाचे पीठ तव्यावर पेरून त्यावर चिकन, चीज, खोबऱ्याचा कीस, मिल्कमेडसारखे घट्ट दूध, साय, चॉकलेट, पेरूचा जॅम असे बरेच काही टाकून डोशासारखा आकार दिला जातो.. तुम्हाला हवा तो प्रकार तुम्ही घेऊ शकता.
चव आणि पौष्टिक असे मिश्रण असलेला हा पदार्थ रस्तोरस्ती मिळतो आणि अत्यंत स्वस्त असतो.
पास्तेल खा, ‘कवदू काना’ प्या!
ब्राझीलमध्ये येऊन तुम्ही पास्तेल खाणार नाही असे कसे होईल? आयताकृती आकाराचा हा एक खाद्यपदार्थ. इथले फास्टफूड म्हणूयात. तुम्ही ब्रेकफास्ट केला नसेल, दुपारचं जेवण मिळालं नसेल तर पास्तेल तुमच्या पोटभरीला येतोच येतो.
शंभराहून जास्त वर्षे पास्तेलची परंपरा आहे. खाद्यसंस्कृतीचे अभ्यासक म्हणतात की, याचे मूळ थेट विसाव्या शतकात आहे. जपानी निर्वासित कॉफीचे मळे सोडून दक्षिण ब्राझीलमधील शहराकडे धावले. तो काळ जपानी नागरिकांच्या विरोधातील होता. त्यामुळे जपानी नागरिकांनी व्यवसाय म्हणून उपाहारगृहे चालू करताना चिनी पदार्थांचा आसरा घेतला. जपानी चव ब्राझीलमध्ये लोकप्रिय नव्हती. त्या चवीची ओळखही नव्हती. त्यामुळे स्प्रिंग रोल्स बनवून ही उपाहारगृहे सुरू झाली. लोकप्रिय झालीत. स्प्रिंग रोल्स ज्या पट्ट्यांपासून बनवले जात होते त्याच पट्ट्यांपासून पास्तेलचा जन्म झाला. आकार बदलला, आतले फिलिंग्स बदलले; परंतु तंत्र तेच होते. पोस्टकार्डहून जरासे मोठे पास्तेल उभ्या आडव्या ब्राझीलमध्ये घराघरांत पोहोचले आहेत. एरवी जेवण करताना ब्राझीलिअन व्यक्ती अन्नाला स्पर्श करीत नाहीत. म्हणजे काट्या-चमच्याच्या साहाय्याने खातील; पण पास्तेल मात्र थेट कढईतून हातात दिले जाते. कागदाच्या नॅपकिनमध्ये ठेवून उभ्याउभ्याच खाल्ले जाते. आपल्याकडे सामोसाच्या पट्ट्या विकत मिळतात तशा पास्तेलच्या पट्ट्यासुद्धा बाजारात विकत मिळतात. तुमच्या आवडीप्रमाणे यात फिलिंग टाकता येते. यात दाण्याचे कूट असते. फ्रांगो कातुपेरी हा इथला लोकप्रिय पास्तेल आहे. म्हणजे ग्रेटेड चिकन आणि इथले स्थानिक चीज असलेले पास्तेल लोकप्रिय आहेत. यात रेड मीटसुद्धा असते. त्यानंतर मिनास चीजचे पास्तेल आवडीने खाल्ले जाते. गायीच्या दुधापासून बनवलेले मिनास चीज पारंपरिक ब्राझीलिअन चीज आहे. यात मोझरेला चीज टाकले जाते. कोळंबी आणि बटाटा टाकूनही बनवले जाते, पामच्या कंदापासूनही फिलिंग बनवले जाते. खूप विविधता असते यात.
रस्त्याच्या कडेला, लहान लहान ठेल्यांमध्ये पास्तेल विकले जाते. या दुकानांना ‘पास्तेलारीअस’ असे म्हणतात. पास्तेलबरोबर उसाचा रस दिला जातो. हा रस बाटलीमध्ये किंवा कपामध्ये मिळतो. एकदम फ्रेश. यात कधी कधी मोसंबीचा रस टाकतात, कधी अननसाचा. लिंबूही आवडीप्रमाणे पिळले जाते.
भारतात ज्याप्रमाणे फास्टफूडबरोबर शीतपेये पिण्याची साथ आलीय त्याप्रमाणे इथे उसाचा रस प्यायला जातो. त्याला ‘कवदू काना’ म्हणतात. पास्तेल घेऊन तिथल्या तिथे उसाचा रस घेतला तर तुमच्या कपात ते रिफीलसुद्धा करून देतात. या पास्तेलमध्ये पिमेन्ता म्हणजे मिरचीचा सॉस टाकता येतो.. बारीक चिरलेला लसूण, कांदासुद्धा टाकता येतो.
आठवडी बाजारात दुपारी दीडच्या सुमारास ही दुकाने बंद होतात. या वेळेस तुम्ही जर गेलात तर तुम्हाला फ्री पास्तेल मिळतात. तळून ठेवलेले पास्तेल सगळ्यांना फुकट वाटतात.

फारोफा - आपले मेतकूट !
रिओमध्ये यच्चयावत ब्राझीलिअन्स ‘फारोफा’ खाताना दिसतात. म्हणजे दाणेदार दिसणारी एक पावडर, जी भात, चिकन, मासे, बीन्स अशी कशाही बरोबर वाटीभर घेतली जाते. कोरडी चटणी असावी तशी ही पावडर आहे. कंदमुळांचे पीठ करून ते भाजून घेतले जाते. अगदी खरपूस नाही पण बऱ्यापैकी भाजले जाते. यात कांदा, लसूण, बेकन आणि अजून काही हर्ब्स टाकले जातात. कोणत्याही डिशवर टाकून हे खाल्ले जाते. अत्यंत पौष्टिक असा हा प्रकार आहे. ब्राझीलिअन बार्बेक्यू पार्टीमध्ये फारोफा अगदी मस्ट आहे.