पतंजली - दोन संन्याशांच्या उद्योजकतेची थक्क करणारी कहाणी..

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2017 02:00 AM2017-10-08T02:00:00+5:302017-10-08T02:00:00+5:30

दोघे संन्यासी. एक भगव्या वेशातला, तर दुसरा पांढरी वस्त्रे परिधान करणारा! त्यांनी एकत्र येऊन एक कंपनी काढली. मग दुसरी, तिसरी, चौथी.. हे साम्राज्य वाढवत नेले आणि यथाकाल एका छत्राखाली आणले : ‘पतंजली आयुर्वेद’ हे त्याचे नाव. चार वर्षांतच या कंपनीचे व्यवहार दहा हजार कोटींचा आकडा ओलांडून गेले. - हे सारे कसे, कशातून, कशाच्या आधाराने आणि कोणत्या बळावर साध्य झाले असेल? रामदेव बाबाच सांगताहेत, त्या विलक्षण प्रवासाची गोष्ट..

Patanjali - Stunning story of two Sannyasis entrepreneurs. | पतंजली - दोन संन्याशांच्या उद्योजकतेची थक्क करणारी कहाणी..

पतंजली - दोन संन्याशांच्या उद्योजकतेची थक्क करणारी कहाणी..

googlenewsNext

कहाणी सुरू होते हरियाणातल्या सैदलीपूर या छोट्याशा खेड्यातून!
साल १९६५. रामनिवास आणि गुलाबोदेवी या गरीब शेतकरी दांपत्याच्या पोटी एका मुलाचा जन्म झाला. दोघांची प्रभू रामचंद्रांवर विलक्षण श्रद्धा. श्रद्धेपोटीच त्यांनी आपल्या नवजात मुलाचे नाव रामकिसन असे ठेवले.
हाच मुलगा पुढे जाऊन स्वामी रामदेव म्हणून अवघ्या जगाला ज्ञात होईल, भारतातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत स्थान मिळवेल आणि मोठ्या चतुर हिकमतीने अध्यात्माची सांगड व्यवसायाशी घालून अवघ्या उद्योगविश्वाला हैराण करून सोडील, असे कुणाच्या स्वप्नातदेखील आले नसेल.
रामकिसन जात्याच हुशार आणि कष्टाळू होता, पण तो ७/८ वर्षांचा असताना शाळेतून मित्रांबरोबर घरी येत असताना त्याच्या डाव्या पायातले बळ अचानक गेले आणि तो जमिनीवर कोसळला. तोंडही वेडेवाकडे झाले.
छोट्या रामकिसनला आलेला अर्धांगवायूचा झटका तीव्र स्वरूपाचा होता. डॉक्टरांनी सांगितलं, वाकडेतिकडे शरीर आणि अधू पाय घेऊनच आता रामकिसनला उर्वरित आयुष्य कंठावे लागेल.
रामकिसन आता मित्रांबरोबर मिसळू शकत नव्हता. त्यांच्याबरोबर कबड्डी किंवा कुस्तीदेखील खेळणे तर दूरच!
काही दिवसांतच तो एकटा पडला. एकाकी राहू लागला. मग नाइलाजापोटी रामकिसनने आपला बहुतांश वेळ गावातल्या वाचनालयात घालवायला सुरुवात केली. त्याच्यापुढे दुसरा पर्यायही नव्हता आणि त्याला वाचायला आवडतही होते. याच निराशे, हताशेच्या काळात त्याच्या वाचनात योगासनांवरचे एक पुस्तक आले. त्यात योगाभ्यासाचे फायदे विस्ताराने सांगितले होते.
त्याने पुस्तक वाचून योगासने अवगत करायला सुरुवात केली...
रामकिसनचा बाबा रामदेव बनायच्या एका मोठ्या प्रवासाची ही सुरुवात होती.
शरीर साथ देत नव्हते. लुळे हात-पाय तोल सांभाळू शकत नव्हते. शरीराची निम्मी बाजू दुबळी पडलेली, त्यात कोणतीही संवेदना नाही, तरीही रामकिसनने जिद्द धरली.
रामकिसनच्या शरीरात तर आयुष्यभर काहीही बदल होणार नाही, हे डॉक्टरांनीच लिहून दिलेले होते आणि घरातल्यांनीही स्वीकारले होते. तरीही हिंमत न हारता आपल्या मृत अवयवांमध्ये जीव आणायचाच या जिद्दीने रामकिसन पुस्तक समोर ठेवून योगासने करत राहिला. रोज योगासने करताना आपल्या मृत अवयांसमोर तो पराभूत व्हायचा, तेव्हाही त्याची इच्छाशक्ती कधीही पराभूत व्हायची नाही.
आज जी आसने बाबा रामदेव लोकांना अर्ध्या तासात करायला शिकवतात ती आसने स्वत:च्या शरीराशी झगडत अवगत करायला त्यांना स्वत:ला मात्र दहाएक वर्षांचा काळ लागला.
बाबा रामदेव. त्यांचे दीर्घकालीन सोबती असलेले आचार्य बालकृष्ण आणि ‘पतंजली आयुर्वेद’ या मुख्य कंपनीच्या पंखाखाली ग्राहकोपयोगी वस्तूंच्या बाजारपेठेवर कब्जा मिळवत दरवर्षी दुप्पट वेगाने विस्तारत चाललेले त्यांचे साम्राज्य! स्वतंत्र भारताच्या औद्योगिक इतिहासातला हा नवा झळाळता अध्याय लिहिण्याचे सारे श्रेय केवळ दोघांचे!
दोघे संन्यासी. एक भगव्या वेशातला, तर दुसरा पांढरी वस्त्रे परिधान करणारा! समकालीन भारतात विविध कारणांनी बहरलेल्या ‘आध्यात्मिक बाजारपेठे’त अशा दोघा संन्याशांचे सर्वोच्च करिअर काय असणार? सत्संग लावायचे, गुरु पौर्णिमा किंवा रामनवमी, हनुमान जयंती उत्सव यांचे मोठेमोठे मांडव टाकायचे, भजने म्हणायची, प्रवचने करायची, भोजनावळी घालायच्या, महाप्रसाद आयोजित करायचे. नंतर मग दूर कुठल्यातरी हिमालयातल्या जागी एखाद्या मंदिराच्या बांधकामाची घोषणा करायची आणि त्यासाठी देणग्या गोळा करत फिरायचे. खूपच महत्त्वाकांक्षी असतील तर प्रत्येक राज्यात, परदेशात मंदिरांचे बांधकाम काढायचे आणि गावोगावी सत्संग आयोजित करून निधी जमवायचा. या सगळ्यातून आपोआप उभ्या राहणाºया अखंड वर्धिष्णू जनसमर्थनाच्या जोरावर राजकीय नेत्यांना आपल्या दावणीला आणून बांधायचे. हा कोणत्याही ‘महाराजां’साठी करिअरचा राजमार्ग!
- पण बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांनी वेगळा रस्ता धरला. त्यांनी एकत्र येऊन एक कंपनी काढली. मग दुसरी काढली. मग तिसरी. हे साम्राज्य वाढवत नेले आणि यथाकाल एका छत्राखाली आणले : पतंजली आयुर्वेद!
या कंपनीने लोकांच्या रोजच्या उपयोगाच्या वस्तू आणि औषधे बनवायला सुरुवात केली. टूथपेस्ट, शाम्पू, साबण यांपासून मधापर्यंत आणि चपातीच्या आट्यापासून कवठाच्या मुरंब्यापर्यंत! हा सारा माल धडाक्यात बाजारात विकायला सुरुवात केली आणि बाजारपेठेतल्या मंदीने-स्पर्धेने आधीच जेरीला आलेल्या भल्याभल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांची झोप उडवली.
पाचशे-आठशे कोटींच्या घरातले व्यवहार चारेक वर्षांत दहा हजार कोटींचा आकडा ओलांडून गेले आणि आता येत्या पाच वर्षांत एक लाख कोटींपर्यंत झेप घेण्याची तयारी पूर्ण होऊन काम सुरूही झाले आहे.
- हे सारे कसे, कशातून, कशाच्या आधाराने आणि कोणत्या बळावर साध्य झाले असेल? रामदेव बाबा आणि त्यांचे भागीदार आचार्य बालकृष्ण ही दोन माणसे एकेकाळी हिमालयात साधनेत व्यग्र होती. अचानक हे स्वत:चे कारखाने, दुकाने, दवाखाने, उत्पादने काढून व्यवसाय करायचे त्यांच्या मनात का आणि कसे आले असेल?
याच साºयाचा शोध आणि पंतजली उद्योगाची प्रत्यक्ष रामदेव बाबांकडूनच ऐकावी अशी विलक्षण कहाणी ‘लोकमत दीपोत्सव’मध्ये...

Web Title: Patanjali - Stunning story of two Sannyasis entrepreneurs.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.