मुस्लीम स्त्रियांच्या मुक्तिचा मार्ग....महिलांना तंत्रज्ञान साक्षरतेसाठी मदत करावी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2017 04:00 AM2017-09-10T04:00:00+5:302017-09-10T04:00:00+5:30
असंतोष आणि संघर्षाला जन्म देणाºया खºया-खोट्या धारणांमुळे मुस्लीम स्त्रियांच्या जीवनावर भयंकर परिणाम होतो. सरकारला खरोखरच मुस्लीम स्त्रियांची चिंता असेल तर त्यांनी या महिलांना तंत्रज्ञान साक्षरतेसाठी मदत करावी. तसे झाले तर खºया अर्थाने त्या स्वतंत्र आणि ग्लोबल होतील. वैचारिक क्रांती घडवण्याचे अमर्याद सामर्थ्य या तंत्रज्ञानात आहे.
हुमायून मुरसल
समाजात असंतोष आणि संघर्षाला जन्म देणाºया खºया-खोट्या धारणा आणि धारणांच्या राजकारणाचा मुस्लीम स्त्रियांच्या जीवनावर भयंकर परिणाम होतो.
अंधधारणाचे राजकारण आपल्या देशात शिखरावर आहे. वर्चस्व राखण्यासाठी या धारणा समाजात जाणीवपूर्वक बनवल्या जातात. डिजिटल तंत्रज्ञानामुळे त्या अत्यंत वेगाने पसरवणे आणि त्याचे राजकीय ‘शक्तीमध्ये रुपांतर करणे’ शक्य झाले आहे.
खोट्या धारणांचा राजकीय वापर जगभरात सत्ता उलथवण्यापासून सत्ता हस्तगत करण्यापर्यंत कसा झाला हे आपण पाहिले आहे. स्वदेशात माजलेल्या अंधाधुंदीचा आपणही अनुभव घेत आहोत. ‘इस्लाम एक अत्यंत कर्मठ आणि आजच्या काळात प्रतिगामी धर्म असून, संपूर्ण जगालाच याचा गंभीर धोका आहे.’ ही अशीच एक धारणा जगमान्य करण्यात आली आहे. मुस्लीम स्त्री सर्वाधिक ‘शोषित आणि दडपलेली असण्याचे मूळ इस्लाममध्ये आहे या धारणेतून तलाकचा तर्कसुद्धा जन्मतो.
जमिनीच्या पोटात सतत उलथापालथी सुरू असतात. विशिष्ट एका क्षणी त्यामुळेच भूकंप होतो. कोणत्याही स्त्रीच्या घटस्फोटामागे अशीच कारणे अगदी लग्नापूर्वीपासून दडलेली असतात; पण मुळात ‘मुस्लीम पुरुष अमानुष आणि सरफिरा आहे, इस्लाम त्याच्या अपराधाना बळ देतो’, हा एकांगी विचार पक्का रूजला आहे. गोष्टीरूपी उदाहरणे सांगून जणू प्रत्येक मुस्लीम स्त्री तलाक पीडित आहे किंवा तलाक पीडित होणाच्या मार्गावर आहे, असे भासवणाºया एनजीओ पत्रकारितेने या विचारांना प्रतिष्ठित केले आहे. इतर सदाचारी व सोशिक पुरुषांना ही कारणमीमांसा लागू होण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे देशभरात फक्त तलाकच्या प्रश्नावर काहूर माजते. इतर स्त्रियांचा काडीमोड, पाट लावणे, परित्यक्तेपण सोज्वळ करणांनी घडते.
मुस्लीम समाजातील धर्मगुरुंनी तलाक प्रकरणात आपले पवित्र विचार उधळल्याने गुंता अधिक वाढला आणि सामाजिक स्तरावर प्रश्न सोडविण्यात मुस्लीम समाजाला अपयश आले. धार्मिक कारणांची चिकित्सा आणि त्यावर उपाययोजना जरूर व्हावी. तिहेरी तलाक रद्द होण्याबद्दल दुमत असण्याचे कोणतेच कारण नाही. पण धार्मिक सुधारणा ही अत्यंत चिवट वैचारिक परिवर्तनाची लढाई असते. न्यायालयाचा हस्तक्षेप पुरेसा नाही. फुले, आंबेडकरांचे वारसदार आता हिंदुत्वाचे रक्षक का झाले? चिंतन करायला हरकत नाही. पुरुषसत्ताक आणि जात्यंध समाजाचा रोग, त्याचबरोबर स्त्रियांच्या ‘शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक दुबळेपणा, मागासलेपणाच्या कारणांना दूर करण्यासाठी आवश्यक प्रभावी सरकारी आणि सामाजिक असे दोन्ही हस्तक्षेप पूर्णपणे दुर्लक्षित राहिले आहेत. खरे तर मुस्लीम स्त्रियांविषयी कळवळा हे निमित्त आहे. मुळात ‘मुस्लीम लोकसंख्या कमी करणे आणि धर्मांतर रोखण्यासाठी इस्लामविषयी द्वेष निर्माण करणे’ हे लक्ष्य आहे. कॉँग्रेसद्वेषापायी समाजवाद्यांनी भाजपाला राजसिंहासनापर्यंत नेण्यात मोठा वाटा उचलला. तसेच बावळट पुरोगाम्यांनी मुल्लामौलवींच्या द्वेषापोटी आरएसएसचा हा अजेंडा सार्वत्रिक करण्यात धन्यता मानली. एकदा द्वेषांध झाल्यावर परिणामांची पर्वा करतो कोण?
‘लव जिहाद’वर नोटाबंदी किंवा जीएसटीपेक्षा जास्त चर्चा झाली. आता एनआयए याचा तपास करणार आहे. म्हणजे प्रत्यक्ष दहशतवादी हल्ल्याइतकाच देशाला लव जिहादचा गंभीर धोका आहे! सामाजिक फाळणी रूंदावणारा हा पुढचा टप्पा आहे. प्रतिक्रि या स्वरूप मला मुस्लीम समाजात वेगळेच वास्तव ऐकायला मिळाले. जवळपास प्रत्येक शहरातून २० ते ३० मुस्लीम मुलींनी मुस्लिमेतर मुलांशी लग्न केल्याचा त्यांचा दावा आहे. उच्चशिक्षित मुलींना बुरख्यात ठेवणारा कठमुल्लावादी नवरा नको आहे, हेही सत्य आहे. या प्रकरणात हाहाकार माजवण्यात आला. उलमांनी मोहल्ल्यांतून सभा घेतल्या. प्रत्येक आई-बापाला गांभीर्याची कल्पना देण्यात आली. स्वघोषित स्कॉड तयार झाले. मुस्लीम मुलींच्या शिक्षणावर, नोकरीवर आणि स्वातंत्र्यावर कुºहाड कोसळली. अनेकींना घरी बसावे लागले. आठवीनंतर शिक्षणावर बंदी, को- एज्युकेशन बंद, बुरखा सक्ती, मोबाइल बंदी, धार्मिक शिक्षण आणि संस्कार वर्गांची सक्ती, एकटीला बाहेर जाण्यास बंदी... असे फतवे जारी झाले. भीतीचा माहोल तयार झाला. शिकलेल्या बायांनी याला विरोध करून हिंमत दाखवली; पण कर्मठ विचारांच्या ढिगाºयाखाली ‘शेकडो मुलींचा जीव दडपला गेला. स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा अवकाश आणखी आक्र सला. त्यांची मोजदाद कोण करणार ? पाच टक्के तलाक पीडित स्त्रियांच्या दु:खासाठी देश उभा ठाकला, याचा आनंद आहे; पण अशा बावळट राजकारणाने ९५ टक्के स्त्रियांचे स्वांतत्र्य चुरगळले जाऊन भीतीपोटी मुलींना कुटुंबातील प्रिय पाळीव प्राण्याचा दर्जा प्राप्त झाला. या अमानुषतेला जबाबदार संघटना मोदींच्या पल्लेदार भाषणांनी रोखल्या जात नाहीत. त्याचे काय करणार?
लेखिका फातीम मरनसी यांनी ‘द व्हेल अॅण्ड द मेल एलाइट : अ फेमिनिस्ट इंटरप्रिटेशन आॅफ विमेन्स राइट्स इन इस्लाम’ या आपल्या पुस्तकात ‘ख्रिश्चन, ज्यू लोक रात्रंदिवस टीव्ही चॅनेलवर चालणाºया पाद्रींची प्रवचने ऐकत राहतात. चंद्रावर गेलेला नील आर्मस्ट्रॉँग जेव्हा बायबलमधील ‘प्रभूने पृथ्वी आणि स्वर्ग बनविले..’ ही अवतरणे जगाला ऐकवतो तेव्हा त्यांच्या धार्मिकता जगाच्या आड येत नाही; पण इस्लामचे अनुकरण करणारे मात्र आधुनिक होऊ शकत नाहीत!’- या दाव्याबद्दल अत्यंत मार्मिक प्रश्न उपस्थित केला आहे.
दोन धर्मांच्या तुलनेसाठी मी हे लिहित नाही; पण कोट्यवधींच्या संख्येने नदीपात्रात डुबक्या घेऊन पापमार्जन झाल्याचे मानणारा, अंधश्रद्धेत लपेटलेला, गायीच्या मलमूत्राचा प्रसाद स्वीकारणारा, लैंगिक छळाचे आरोप झाले तरी भक्तिभावाने बुवांच्या पायावर लीन होणारा, जपजाप, यज्ञ, याग करणाºया पुरोहिताला स्वत:हून श्रेष्ठ मानणारा, मनुस्मृतीचा आज्ञापालक श्रद्धाळू हिंदु जर सहिष्णू आणि सुधारणावादी असू शकतो, सात पिढ्या तोच नवरा मिळावा म्हणून वडाची पूजा करणाºया हिंदु स्त्रिया आधुनिक होऊ शकतात, मग स्त्रीचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व मान्य करून शिक्षण, संपत्तीचा अधिकार देणारा, लग्नाला स्त्री-पुरुषांचा करार मानणारा इस्लाम मुस्लिमांना आधुनिकतेपासून कसा रोखू शकतो?
श्रद्धा आणि विवेक यांच्या वाटा विरूद्ध झाल्या की सगळ्या धर्मात हेच घडते. बिंबवलेल्या अंधधर्मधारणा दोन समाजामध्ये किती प्रचंड अविश्वास निर्माण करू शकतात याकडे मी लक्ष वेधू इच्छितो. एकदा देशाच्या फाळणीने आपण फार मोठी किंमत चुकवलेली असताना हिंदू-मुस्लिमांमध्ये प्रेमभाव निर्माण होण्याऐवजी सामाजिक फाळणीकडे पुन्हा आपली पावले पडत आहेत, याची मला अधिक चिंता आहे.
संघर्षावर विश्वास असणाºयांनी त्या मार्गे जरूर मुक्ती शोधावी. अंधधारणांच्या राजकारणातून काही चांगले निष्पन्न होईल यावर माझा विश्वास नाही. उलट ंहिंदुराष्ट्राची भीती दाखवून परंपरावादी कडेकोट किल्ले उभारतील. यामध्ये मुस्लीम स्त्रिया कोंडले जाण्याची भीती मला जास्त वाटते. त्यामुळे मुस्लीम स्त्रियांनी घटनेने दिलेल्या आणि इस्लामने १४०० वर्षांपूर्वीच बहाल केलेल्या शिक्षणाच्या अधिकाराचा पुरेपूर वापर करावा. मुस्लीम पुरुषांनी मनाचा मोठेपण दाखवावा. डिजिटल युगाने एका नव्या क्र ांतीची शक्यता निर्माण झाली आहे. तिला आजमावण्याचा प्रयत्न व्हावा, असे मला वाटते. खरे तर ज्ञानाधारित समाजाचा भाग बनण्यासाठी मुस्लीम समाजाने आपली शक्ती पणाला लावायला हवी. गोहत्याबंदीचे कायदे करून खाटीकखाने बंद करण्यात आले. जनावरांची विक्र ी करणाºयांचा अमानुष मारहाण करून जीव घेण्यात आला. याने कुरेशी समाजाच्या जगण्याचा आधार गेला. पण मुस्लिमांनी संकटाला संधीत रूपांतरित करण्याला शिकले पाहिजे. आता त्यांनी ज्ञानाधारित रोजगार आणि उद्योगांना आपल्या जगण्याचे साधन बनवण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे. तसे आधुनिक मानवसंसाधन घडविण्यासाठी संस्था उभाराव्यात. लाखो मदरसे आणि मशिदी उभारताना कवडीची सरकारी मदत घेतलेली नाही. ही सुप्त आर्थिक शक्ती आहे. जकात किंवा अन्य स्वरूपात होणारा धार्मिक खर्च, बचत त्यांनी तंत्रज्ञान-विज्ञान शिक्षणासाठी खर्च करावी. शिक्षण, संशोधन आणि विकाससंस्था उभारण्यासाठी वक्फचा उपयोग करावा.
मुस्लीम मुलींना खासकरून आयटी आणि डाटा टेक्नॉलॉजी, मेडिसीन, आर्टिफिशिअल इंटिलीजन्स, मासमीडिया, लॉ, फायनान्स, एज्युकेशनल प्रोफेशन व संशोधन क्षेत्रात विशेष संधी द्यावी. व्हर्च्युअल क्लासरूम, ई-लर्निंग, इंटरनेट लर्निंग, तंत्रज्ञानाचा वापर करावा. प्रत्येक स्त्रिला आयटी आणि इंटरनेट साक्षर करण्याची विशेष मोहीम हाती घ्यावी. हे तंत्रज्ञान आत्मसात करून बुरखा किंवा घरच्या भिंती किंवा बाह्य असुरक्षिततेच्या अडथळ्यावर मात करून त्या ग्लोबल होतील. या तंत्रज्ञानात वैचारिक क्र ांती घडवण्याचे सामर्थ्य अमर्याद आहे. ही शक्ती स्त्रियांना हुकमी मुक्ती देईल. सरकारला खरोखरच मुस्लीम स्त्रियांची चिंता असेल तर त्यांनी प्रत्येक मुस्लीम स्त्री अथवा मुलीला एक मोफत स्मार्टफोन किंवा टॅब, मोफत इंटरनेट सेवा व उच्चशिक्षणासाठी अनुदानीत संस्था देण्याची हिंमत दाखवावी. मुस्लीम स्त्रियांना तलाकसाठी नवा कायदा देण्यापेक्षा ही शक्ती दिली तर त्या स्वत:ची मुक्ती स्वत:च्या सामर्थ्यावर मिळवतील यावर माझा अधिक विश्वास आहे. या प्रमेयावर आधारित पहिले संस्थात्मक मॉडेल ‘सेंटर फॉर रेनसॉँ’ कोल्हापूर जिल्ह्यात आकार घेत आहे. ज्यांना हे पटते त्यांनी साथ द्यावी, हे आवाहन!
(दीर्घकाळ डाव्या चळवळीशी संबंधित असलेले लेखक मुस्लीम समाजातील सुधारणावादी प्रयत्नांमध्ये सक्रीय आहेत.)