शांततामय सहजीवन
By admin | Published: October 3, 2015 10:09 PM2015-10-03T22:09:30+5:302015-10-03T22:09:30+5:30
सप्टेंबर 1979. तारुबंद्याच्या डॉक्टरच्या निवासस्थानात मी स्थिरस्थावर झालो. भारतीय वनसेवेतील माङया आधीच्या तुकडीचे अधिकारी श्री. बिश्वास
Next
>- प्रकाश ठोसरे
अनुवाद : अरविंद आपटे
सप्टेंबर 1979. तारुबंद्याच्या डॉक्टरच्या निवासस्थानात मी स्थिरस्थावर झालो. भारतीय वनसेवेतील माङया आधीच्या तुकडीचे अधिकारी श्री. बिश्वास चिखलद:याला विभागीय कार्यालयात सहायक वन संरक्षक म्हणून नुकतेच रुजू झाले होते. आम्ही दोघं 1977 साली एक पूर्ण वर्ष सोबत असल्याने माझा बिश्वासांशी चांगलाच परिचय होता. बिश्वासांना फार थोडे मित्र होते, मी त्यातला एक होतो. ‘पक्षी निरीक्षणाचा छंद’ या एका गोष्टीमुळे आम्ही जवळ आलो होतो. पक्षी निरीक्षणात विश्वास माङो गुरू होते. देहरादूनच्या भारतीय वन संशोधन संस्थेच्या (एफआरआय) निसर्गरम्य आवारात ते मला पक्षी निरीक्षणासाठी सोबत घेऊन जात. बिश्वास मितभाषी होते, त्यांच्या काही खास सवयी होत्या आणि वेळ न पाळण्याबाबत त्यांची ख्याती होती. एके सकाळी मला चिखलद:याहून वायरलेसवरून संदेश आला की बिश्वास तारुबंद्याला येत आहेत आणि दुपारनंतर रंगराव येथील कूप क्रमांक 4 मधले छापणीचं काम तपासणार आहेत. वन खात्याच्या छापणीच्या कामात परिपक्व झालेली झाडे तोडीकरता निवडली जात आणि जमिनीपासून साडेचार फुटावर त्याला लाल रंगाचा पट्टा मारला जाई. रंगराव कूप क्र. 4 तारुबंदा-कुंड रस्त्यावर तारुबंद्यापासून 3-4 किलोमीटरवर होता. पावसाळा अजून सरला नसल्याने मी या रस्त्याची अद्याप दुरुस्ती केली नव्हती. त्यामुळे त्यावरून जीप जाणं शक्य नव्हतं. आम्हाला तपासणी पायीपायीच करावी लागणार होती.
सवयीप्रमाणो कोणतंही खास कारण नसताना बिश्वास तारुबंद्याला उशिरा पोचले. दुपारच्या जेवणानंतर ते गावक:यांशी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत गप्पा मारत बसले (खरं तर हे काम तपासणी झाल्यानंतरही करू शकले असते) आणि सहानंतर आता काम बघायला जाऊ अशी त्यांनी इच्छा प्रकट केली. आता चालत जायला उशीर होईल म्हणून मी ट्रॅक्टर बोलावून घेतला. तो मॅसी-फग्र्युसन ट्रॅक्टर होता आणि जंगलातील कच्च्या रस्त्यावरील अतिवापरामुळे खिळखिळा होऊ लागला होता. त्याचे हॉर्नशिवाय सगळे भाग वाजत. त्याचा स्टार्टर, क्लचप्लेट कामातून गेली होती. हेडलाईटच्या जागी दोन अंतर्वक्र पोकळ्याच राहिल्या होत्या असा तो एकमेवादित्य नमुना होता. मी स्वत:, बिश्वास, वनक्षेत्रपाल इंगळे आणि वनरक्षक पातूरकर यांनी ड्रायव्हरला झाकून टाकत ट्रॅक्टरवर आमच्या जागा पकडल्या. एकदाचा ट्रॅक्टर निघाला. आधीच काळी माती त्यात पावसाळ्यातील रबरबाटात फसणारी चाकं अशा परिस्थितीत आमचं मार्गक्रमण सुरू झालं. मला एक जागा आठवते जिथं वळणावर घसरणा:या ट्रॅक्टरने अचानक यू-टर्न घेतला आणि परत तारुबंद्याच्या दिशेने तोंड केलं होतं.
आम्ही रंगराव कुप क्र. 4 मध्ये पोचलो तेव्हा जवळपास काळोख झाला होता. आम्ही ट्रॅक्टरवरून खाली उतरलो. ड्रायव्हरने ट्रॅक्टर वळवून तारुबंद्याच्या दिशेने तोंड केलं. ट्रॅक्टरचा स्टार्टर काम करत नसल्याने त्यानं ट्रॅक्टर बंद करायला नकार दिला. त्याने ट्रॅक्टरवरची आपली जागाही सोडली नाही. तो खूपच तणावाखाली वाटला. आम्ही पटकन आवरतं घ्यावं यादृष्टीने तो पुटपुटला ‘ही श्वापदांची वेळ आहे, आपली नव्हे.’ एका हातात छापणी रजिस्टर व मोजमापाची टेप, दुस:या हातात टॉर्च सांभाळत बिश्वास जंगलात घुसले. रस्त्याजवळच्या सागाच्या झाडापाशी जाऊन टॉर्चच्या उजेडात त्यांनी झाडावरचा नंबर वाचायचा प्रयत्न केला. त्यांचं हे काम सुरू होतं ना होतं तोच अगदी जवळून वाघाची डरकाळी ऐकू आली. (नंतर स्थानिकांनी पुष्टी दिली की तिथं एक आक्रमक वाघिण तीन बछडय़ांसह वास्तव्य करत होती.) आम्ही सर्वांनी ट्रॅक्टरकडे धूम ठोकली. तिथं ड्रायव्हर आधीच थरथर कापत बसला होता. आम्ही ट्रॅक्टरवर नीट बसलो की नाही हे न बघताच त्यानं टॉर्चच्या उजेडात धाडकन ट्रॅक्टर सुरू केला. धडपडत, लळत लोंबकाळत, ज्याचा कशाचा आधार मिळेल तो घेत आम्ही कसेबसे तारुबंदा विश्रमगृहात पोचलो. तो गरीब बिचारा ड्रायव्हर अजून घामेघूम झाला होता. त्याच्या अंगभर काटा फुलला होता. अशा प्रकारे बिश्वासांच्या पहिल्या क्षेत्र तपासणीचा फज्जा उडाला. तारुबंद्याच्या विश्रमगृहात पोचल्यावर रात्रीच्या जेवणाच्या वेळेपर्यंत माङो बॉस ब:यापैकी सावरले होते. जेवताना ते म्हणाले की, मी परत रंगराव कुप नं. 4 च्या छापणीच्या कामाच्या तपासणीला येणार आहे. त्या दिवशीच्या तपासणीच्या बोजबा:यामुळे त्यांचा मूड चांगला नव्हता. त्यामुळे माङो प्रत्येक विधान उडवून लावत होते. मी त्यांना म्हणाल्याचं आठवतंय की आपण ज्या भागात वाघाची डरकाळी ऐकली तिथं मी बिबटय़ाच्या पाऊलखुणा पाहिल्या आहेत. बिश्वासांनी माझं म्हणणं हसण्यावारी नेलं. त्यांचं ठाम मत होतं की वाघ आणि बिबटे एकाच भागात राहत नाहीत आणि अशीच वेळ आली तर बिबटय़ा वाघाकडून मारला जातो. माझं असं मत होतं की जोपर्यंत एकमेकांची शिकार चोरण्याची पाळी येत नाही तोपर्यंत त्यांचं ‘शांततामय सहजीवन’ शक्य आहे. अशा प्रसंगात वाघ आणि बिबटय़ात तीव्र संघर्ष होण्याची शक्यता असते. बिश्वास त्यांच्या मतावर अगदी पैजेवर ठाम होते आणि शांततामय सहजीवनावर पैज लावूनच ते रात्री उशिरा चिखलद:याला रवाना झाले.
बिश्वासांच्या दौ:याला महिना होऊन गेला. ऑक्टोबर हीटने आम्हाला तापून सोडलं होतं. रात्रीच्या उकाडय़ापासून सुटका व्हावी म्हणून तारुबंद्याच्या गावक:यांनी पंधरा दिवस झाले घराबाहेर झोपायला सुरुवात केली होती. तारुबंद्याच्या धूळभ:या रस्त्याच्या दुतर्फा त्यांची घरं होती, घराबाहेर लोकं झोपत होते. विश्रमगृह गावाच्या एका टोकाला तारुबंदा-कुंड रस्त्यावर होते. तिथून गावातल्या सोमजी पटेलच्या पहिल्या घरापर्यंत जवळपास अर्धा किलोमीटर मोकळी जागा होती. गावाच्या दुस:या टोकाला माझं घर म्हणजे डॉक्टरचं निवासस्थान होतं. प्राप्त परिस्थितीत सांजावल्यावर सोमजीच्या घरापासून माङया घराकडे यायला अगदी छोटासा रस्ता होता.
एके संध्याकाळी काही अपरिचित मंडळी तारुबंद्याला आली. त्यांच्याकडे एक बैलजोडी होती. विचारपूस केल्यावर असं कळलं की दुर्गम भागातल्या अडलेल्या गावक:यांकडून स्वस्तात बैलं विकत घेऊन मोठय़ा शहरात चढय़ा भावाने विकण्याचा त्यांचा व्यवसाय होता. अंधार पडत आल्याने आजची रात्र तारुबंद्यात काढण्याचा त्यांचा विचार होता. माङया गेटजवळच्या पळसाच्या झाडाला (हे झाड अजूनही तिथं आहे) बैल बांधण्याची त्यांनी परवानगी मागितली. माझा होकार मिळताच त्यांनी पटकन बैल बांधले. त्यांना चारापाणी केलं, स्वत: जेवण केलं आणि आरोग्य केंद्राच्या व्हरांडय़ात झोपायला गेले.
आतला काळोख, उकाडा, जंगली उंदीर, डास, ढेकूण या सर्वांना मी अगदी उबून गेलो होतो, त्यामुळे आपणही बाहेर चंद्रप्रकाशात झोपावं असा माङया मनात विचार आला. मनात असा विचार येताच माङयासाठी लगेच बांबूंना बांधलेला दोरखंडाचा एक झोपाळा कम बिछाना तयार केला गेला. बिछान्याला छानशी मच्छरदाणीही लावली गेली. माङया वडिलांनी अगत्यपूर्वक दिलेली ऑलिव्ह ग्रीन रंगाची मच्छरदाणी अशा प्रकारे कामी आली होती. तिने माङो फक्त किडे, डासांपासूनच नव्हे, तर उंदीर, सरपटणा:या प्राण्यांपासून माझं रक्षण केलं. एवढंच नव्हे तर या मच्छरदाणीने वाघ, अस्वलांपासून माझं मानसिक रक्षण केलं. मी बिछान्यावर पडल्या पडल्या क्रिकेट या किडय़ांचं समूहगान, विविध घुबडांचा घुत्कार, चकव्यांचं तालबद्ध चक्कू चक्कू ऐकत होतो, तर अधूनमधून मोरांचा केकाही ऐकू येत होता. अर्थात महत्त्वाचे आवाज होते ते शाकाहारी प्राण्यांनी वाघ, बिबटे, रानकुत्र्यादि मांसाहारी जंगलफेरीसाठी निघाल्याने केलेले धोक्याचे इशारे !
मी खूप थकलो होतो म्हणून हे आवाज मला फार काळ जागे ठेवू शकले नाहीत. मी थोडय़ा वेळातच अगदी ठार झोपी गेलो. मी सूयर्वंशी कुळातला नसल्याने भल्या पहाटेच जंगली कोंबडय़ांच्या बांगेने जागा झालो. भोवतालचं अंधुकसं दिसेल इतपतच उजेड होता. माङयापासून दहा मीटरवर बांधलेल्या दोन बैलांपैकी एकाला मारून अर्धवट खाल्लं होतं, दुसरा अजून त्या धक्क्यातून सावरला नव्हता. काही न खातापिता पुतळ्यासारखा निश्चल उभा होता. मी शिकारी भोवतालच्या पाऊलखुणा तपासल्या तर त्या बिबटय़ाच्या होत्या. पाऊलखुणांचा मागोवा घेत गेलो तर बिबटय़ा तारुबंदा-कुंड रस्त्याकडून (जिथं आम्हाला वाघाची डरकाळी ऐकू आली होती) आल्याचं स्पष्ट होत होतं. रस्त्याच्या कडेला घराबाहेर झोपलेल्या बायका, पुरुष, लहान मुलांच्या मधून गावाच्या एका टोकाकडून दुस:या टोकाकडे येऊन त्याने शिकार केली होती हे पाहून माङया आश्चर्याला पारावार उरला नाही. अशा भुकेलेल्या बिबटय़ापासून दहा मीटरवर मी शांतपणो झोपलो होतो, पण त्याने माझी दखलही घेतली नव्हती. यावरून एक धडा मिळाला की जर पर्याय असला तर बिबटय़ा भक्ष म्हणून माणसाच्या वाटेला जात नाही.
बिश्वास यांचा विश्वास बसो वा ना बसो एक मात्र खरं होतं की, बिबटय़ा आणि वाघाचं शांततामय सहजीवन शक्य असण्याची पैज मी जिंकलो होतो.