पेंग्विनचा ‘पायगुण’

By admin | Published: August 5, 2016 07:06 PM2016-08-05T19:06:16+5:302016-08-05T19:06:16+5:30

गेले काही दिवस पेंग्विनवरुन मुंबईचं राजकारण तापलं होतं. आता थेट साऊथ कोरियाहून पेंग्विन मुंबईत दाखल झाले आहेत. ४५ कोटी रुपयांच्या या प्रकल्पात सध्या शाही थाटात त्यांची निगराणी सुरू आहे

Penguin's 'crazy' | पेंग्विनचा ‘पायगुण’

पेंग्विनचा ‘पायगुण’

Next
>राहुल रनाळकर
(लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत शहर संपादक आहेत.)
 
गेले काही दिवस पेंग्विनवरुन मुंबईचं राजकारण तापलं होतं. आता थेट साऊथ कोरियाहून पेंग्विन मुंबईत दाखल झाले आहेत. ४५ कोटी रुपयांच्या या प्रकल्पात सध्या शाही थाटात त्यांची निगराणी सुरू आहे. पॅसिफिक महासागराच्या तीरावरील हे पक्षी तीन महिन्यांनंतर पर्यटकांच्या दर्शनासाठी खुले केले जातील. पेंग्विन्सचं हे आगमन राणीच्या बागेचंही भवितव्य ठरवणार आहेत.
 
गुरुवार, २८ जुलैचा दिवस मुंबईसह राज्यातील बच्चे कंपनीसाठी अत्यंत खास ठरला. एक अत्यंत सुखद धक्का देणारा, उत्सुकता निर्माण करणारा हा दिवस होता. बच्चे कंपनीसह ज्यांना पशू-पक्षी-प्राणी जीवनाविषयी कुतूहल असतं, अशा सगळ्यांचं लक्ष एका हळुवार बातमीनं वेधून घेतलं होतं. ती बातमी होती मुंबईत पेंग्विन दाखल झाल्याची... कायम हसतमुख दिसणारे हे गुबगुबीत पक्षी थेट मुंबईत कसे दाखल झाले, याचं अनेकांना राहून राहून आश्चर्य वाटत होतं. पेंग्विन पक्ष्यांच्या इवल्याशा पावलांनी मुंबईच्या जिजामाता भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय अर्थात राणीच्या बागेत जणू चैतन्य पसरलं होतं. राणीच्या बागेत आठ पेंग्विन दाखल होणार असल्यानं येथेही तब्बल दोन ते अडीच महिन्यांपासून जय्यत तयारी सुरू होती. पेंग्विन या गोंडस प्राण्यावरून मुंबईत राजकीय वातावरण तापलेलं असलं, तरीदेखील ही बातमी मात्र बहुसंख्य मुंबईकरांना सुखावणारी ठरली. 
इंटरेस्टिंग... हो खरंय... बहुचर्चित पेंग्विन्सची मुंबईत एंट्री झाली आहे... कदाचित पेंग्विनच्या पायगुणानं तरी देशातील सर्वांत जुन्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाचा कायापालट होऊ शकतो, अशी आशा निर्माण झाली आहे. यानिमित्तानं राणीचा बाग पुन्हा फुलण्यास सुरुवात झाली, तर पेंग्विनची एंट्री नक्कीच आनंददायी ठरेल. या निमित्तानं सध्या मुंबईचं राजकारण ढवळून निघालेलं असलं, तरी सामान्य मुंबईकरांमध्ये पेंग्विनबद्दलची उत्सुकता मात्र नक्कीच निर्माण झालेली आहे. 
एका खास एअर कार्गोमध्ये साऊथ कोरियाची राजधानी सेऊलमधून आठ पेंग्विन साडेआठ तासांचा प्रवास करून मुंबईत दाखल झाले. या स्पेशल एअर कार्गोमध्ये पक्षी-प्राण्यांसाठी स्पेशल एरिया तयार केला जातो. त्यात ठरावीक एका क्रेटमध्ये दोन पेंग्विन ठेवण्यात आले. पेंग्विनच्या वाहतुकीची संपूर्ण रचना आंतरराष्ट्रीय मानांकनाप्रमाणे निश्चित केली गेली होती. सर्व मानांकन पाळण्याची पुरेपूर खबरदारी घेण्यात आली होती. गेल्या सहा महिन्यांपासून पेंग्विनच्या मुंबई आगमनासाठी विविध परवानग्या घेण्यात येत होत्या. त्यात केंद्र सरकारचा वाइल्ड लाइफ विभाग, अ‍ॅनिमल हसबंड्री विभाग, सेंट्रल झू अ‍ॅथॉरिटी, फॉरेन ट्रेड डिपार्टमेंट, कस्टम, केंद्र सरकारचे कोरंटाइन आॅफिसर या सगळ्यांच्या रीतसर परवानग्या घेण्यात आल्या. मुंबईत उतरल्यावर वातानुकुलीत वाहनातून त्यांना राणीच्या बागेत आणण्यात आलं. मुंबईतही दोन ते अडीच महिन्यांपासून पेंग्विनसाठी क्वारंटाइन एरिया बनवण्याचं काम सुरू होतं. पुढचे तीन महिने आठही पेंग्विन क्वारंटाइन एरियात २४ बाय ७ निरीक्षणाखाली आहेत. या भागात सीसीटीव्ही बसवण्यात आलेले आहेत. दोन पूर्णवेळ डॉक्टर्सची नेमणूक करण्यात आलेली आहे. १२ ते १८ डिग्री तपमान ठेवण्यात आलेलं आहे. शिवाय कूलिंग एरियात प्युरिफिकेशन लाइफ सपोर्ट सिस्टिम सज्ज आहे. या सिस्टिमनुसार पाण्यात पेंग्विननं केलेली विष्ठा स्वच्छ केली जाते. सगळं पाणी लगेचच स्वच्छ केलं जातं. 
तीन महिने या पेंग्विनची संवेदनशीलपणे तपासणी करण्यात येणार आहे. त्यांच्या खानपानाची विशेष काळजी घेतली जात आहे. विविध प्रकारचे मासे या पेंग्विनसाठी आणण्यात येतात. एका पेंग्विनला सध्या सरासरी ३०० ते ४०० ग्रॅम मासे आहार म्हणून लागतात. प्रत्येक पेंग्विनचा स्वभाव कसा आहे, याचीही नोंद रोज ठेवली जात आहे. रोज या आठही पेंग्विनचा रिपोर्ट तयार केला जात आहे. 
पेंग्विनचा हा संपूर्ण प्रकल्प ४५ कोटींचा आहे. आठही पेंग्विनसाठी पालिकेला एकत्रित दोन कोटी रुपये मोजावे लागले आहेत. ६-७ कोटी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी खर्च झाले आहेत. पाच वर्षांच्या देखभालीसाठी ६-७
 
कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे, तर क्वारंटाईन एरियासाठी ४८ ते ५० लाखांचा खर्च आला आहे. ४५ कोटींच्या प्रकल्पामध्ये एक्वेरियम उभारण्याचेही काम सुरू आहे.
पेंग्विनसाठी सध्या एक खास जागा निर्माणाधीन आहे. सध्या आठही पेंग्विनसाठी उभारण्यात आलेला क्वारंटाईन भाग २५० चौरस फुटांचा आहे. तीन महिन्यांनंतर त्यांना १७०० चौरस फुटांच्या वातानुकूलीत जागेत हलवण्यात येईल तेव्हा मुंबईकर बच्चे कंपनी या पेंग्विनला प्रत्यक्ष पाहू शकतील. सध्याच्या आठ पेंग्विनमध्ये तीन नर तर पाच मादी आहेत. सर्व पेंग्विन एक वर्ष ते तीन वर्षे वयाचे असून, त्यांचे वजन एक ते अडीच किलोच्या दरम्यान आहे. 
प्राणिसंग्रहालयाच्या नवीन इमारतीमध्ये तळ मजल्यावर सुमारे १७०० चौ़ फूट क्षेत्रफळाचे संपूर्णपणे वातानुकूलित पेंग्विन प्रदर्शन कक्ष तयार करण्यात येत आहे. या कक्षाचे तपमान १६ ते १८ डिग्री अंश सेल्सिअस इतके नियंत्रित करण्यात येईल. 
पेरु आणि चिली देशांत समुद्रात पेंग्विनची वस्तीस्थळे आहेत. या पक्ष्यांसाठी राणीच्या बागेत असलेल्या पिंजऱ्याला शंभर चौरस मीटरची काच असेल. हा पिंजरा अर्धा पाण्याने भरून त्यात रेती, पाणी, खडक भरून कृत्रिम समुद्र साकारण्यात येईल. या कक्षात सुमारे सहा ते आठ हजार लिटर पाणी लागेल. मुख्य कक्षात पेंग्विनना स्थानांतरित केल्यानंतर तेथे वर्षाला सुमारे ६० ते ८० हजार लिटर्स पाणी लागेल.
एकाच कुटुंबातील हे आठ पेंग्विन असून, मुंबईत आल्यानंतर पहिले काही तास हे पक्षी थोडे बिथरले होते. मात्र अवघ्या काही तासांत त्यांनी वातावरणाशीही जुळवून घेतले़ पाण्यात आनंदाने नाचताना बागडताना पाहून कर्मचारीही खूश झाले. 
आंतरराष्ट्रीय मानकांनुसार पेंग्विनना सध्या संपूर्णपणे तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे़ हे खास पथक त्यांच्या खाण्यापिण्याकडे काटेकोरपणे लक्ष ठेवून आहेत. पेंग्विनला मुंबई मानवतेय का? याचे निरीक्षण करून नोंद घेतली जात आहे. डॉ़ मधुमीता आणि गोवा ट्रेड संस्थेचे डॉ़ रत्नकुमार यांच्या नेतृत्वाखाली पथक कार्यरत आहे.
आॅस्ट्रेलियातील आॅशियानिस कंपनीला पाच वर्षांसाठी पेंग्विनच्या देखरेखीचे कंत्राट दिले आहे. आशियात श्रीलंका, मलेशिया, थायलंड, सिंगापूर या ठिकाणी हम्बोल्ट प्रजातीचे पेंग्विन प्राणिसंग्रहालयांमध्ये ठेवण्यात आलेले आहेत. या पेंग्विनच्या रक्ताची, विष्ठेची चाचणीही वेळोवेळी करण्यात येईल़ तीन महिन्यांच्या परीक्षणानंतरच मुंबईकरांना या पेंग्विनना पाहता येईल.
सध्या या पेंग्विन्सना त्यांच्या गळ्यावरील रंगीत पट्ट्यांवरून ब्ल्यू रिंग, रेड रिंग अशीच नावे ठेवण्यात आली आहेत़ काही दिवसांनंतर या सर्वांना भारतीय नावं मिळणार आहेत.
 
राणीचा बाग -
राणीच्या बागेची एकूण जागा ५३ एकर.
मुंबईत मध्यवर्ती आणि गजबलेल्या भागात राणीच्या बागेचा परिसर.
१८९२ मध्ये प्राणिसंग्रहालयाची स्थापना.
२०० कोटींचा पुनरुज्जीवन प्रकल्प राबविण्यात येणार.
पुढच्या १८ महिन्यात हा प्रकल्प पूर्णपणे नवे रूप धारण करेल.
पेंग्विन एरियाप्रमाणे १० विविध एरिया विकसित करणार. 
आफ्रिकन प्राणी संग्रहालयात आणणार जिराफ, शहामृग, झेब्रा आणण्याचा प्रस्ताव.
शेजारील मफतलालची ७ एकर जागाही ताब्यात घेणार.
शेजारील अन्य ४ एकर जागाही घेण्याचा विचार.
प्राणिसंग्रहालयाला रोज ३५०० पर्यटक भेटी देतात.
शनिवार, रविवारी ही संख्या आठ हजारांवर जाते.
प्राणिसंग्रहालय एक्स्चेंज सिस्टिममधून काही प्राणी आणणार.
या सिस्टिमनुसार अतिरिक्त प्राणी-पक्षी एक्स्चेंज केले जातात.
राणीच्या बागेत ५०० प्राणी, पक्ष्यांची क्षमता. 
सध्याच्या घडीला अवघे १३० प्राणी. त्यात पक्षी अधिक.
 
पेंग्विनच्या आगमनानंतरचे आक्षेप
ोमुंबईत मूलभूत सुविधांची वानवा असताना पेंग्विनचा अट्टहास का?
प्राणिसंग्रहालयांमध्ये पक्षी-प्राण्यांना ठेवणं क्रूरता आहे, निरागस प्राण्यांना वेठीस धरणे कितपत योग्य?
जगभर प्राणिसंग्रहालये कायमची बंद करा, अशी मोहीम सुरू असताना मुंबईत प्राणिसंग्रहालये पुनरुज्जीवनाचा घाट का घातला जातोय?
प्राणिसंग्रहालयांमध्ये पुरेशी काळजी घेण्यात आजवर मुंबई पालिका अपयशी ठरल्याचे रेकॉर्ड आहे. प्राण्यांचे अकाली मृत्यू, पक्षी-प्राण्यांच्या चोरीच्या घटनांची नोंद.
देशभरातील प्राणिसंग्रहालयांची तुलना करता मुंबईतील प्राणिसंग्रहालयात सर्वाधिक पक्षी-प्राण्यांच्या मृत्यूची नोंद झालेली आहे.
पेंग्विन आपल्याकडील वातावरणासाठी बनलेले नाहीत. त्यांच्या मूळ नैसर्गिक हवामानापासून पक्ष्यांना वेगळे करता कामा नये. हम्बोल्ट प्रजातीचे पेंग्विन पक्ष्यांचे नाव हम्बोल्ट या पॅसिफिक समुद्रातील हम्बोल्ट खाडीवरून देण्यात आलं आहे. पेरू आणि चिली देशातील किनाऱ्यांवर या जातीचे पेंग्विन मोठ्या संख्येनं आहेत. हे पेंग्विन ६० ते १५० मीटर खोलीपर्यंत समुद्रात जातात, तर एका तासात ३० समुद्री मैल अंतर ते पोहून जातात. कोणतेही कृत्रिम वातावरण या पेंग्विनना पॅसिफिक महासागराचे ‘फिलिंग’ देऊ शकत नाही. 
मुंबईत अगदी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत २० ते ४० टक्क्यांपर्यंत पाणी कपात होती. जर भविष्यात पाणीटंचाई निर्माण झाली तर या पेंग्विनचे हाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आयपीएलचे सामनेदेखील पाणीटंचाईमुळे इतरत्र हलवण्यात आले होते. त्यामुळे सर्व पक्षी-प्राण्यांना पुरेसे पाणी टंचाई काळातही मिळेल, याची हमी कोणीच देऊ शकणार नाही. 
पेंग्विनसाठी २४ तास १२ ते १८ डिग्री एसी लागणार आहे. त्यामुळे मोठा खर्च अपेक्षित आहे. मुंबईला वीज पुरवणे कठीण बनत आहे. त्यात पालिकेला हा खर्च करणे कितपत योग्य आहे?
 

Web Title: Penguin's 'crazy'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.