शहर सोडून गेलेली माणसं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 06:03 AM2020-04-19T06:03:00+5:302020-04-19T06:05:06+5:30

उपरे, हुसकावलेले, किंवा नाइलाजाने जगायला बाहेर पडणारे.  माणसांचे लोंढे, मग ते सतराव्या शतकातले असोत किंवा  या सहस्रकातले असोत, त्यांची कथा आणि व्यथा एकच असते,   2020 सालातल्या मार्च महिन्याच्या अखेरीला  शहरांमधून बाहेर पडणारे लोंढे  कधीतरी एखादा चित्नकार कॅनव्हासवर नोंदवून ठेवेलच.  कला-इतिहासातील माणसांच्या लोंढय़ात  अजून एक भर पडेल.

People who left the city.. History through paintings and pictures.. | शहर सोडून गेलेली माणसं

शहर सोडून गेलेली माणसं

googlenewsNext
ठळक मुद्देहाकलल्या गेलेल्या माणसांची वेदना, अस्वस्थतता, अडचणी  समजून घ्यायला चित्र-भाषेइतकं समर्थ दुसरं माध्यम नाही : उत्तरार्ध

- शर्मिला फडके
शहरं त्यांच्या करता नसतात; कधीच नव्हती. शहरांना त्यांची गरज असते, त्यांनाही शहरांची असतेच. एकमेकांना ते वापरून घेतात, पुरेपूर. पण संकटकाळात; मग तो दंगलींचा काळ असो, पुराच्या लोंढय़ाचा असो, किंवा कोरोनाच्या महामारीचा; शहर कधीच त्यांच्या पाठीशी उभं रहात नाही. शहर त्यांना विश्वासही देऊ शकत नाही की आम्ही तुम्हाला आसरा पुरवू, मजुरी नाही मिळाली तर पोटाला अन्न देऊ. शहर फक्त निर्विकारपणे त्यांचे जाणारे लोंढे बघत रहातं. पुन्हा येतीलच हे, शहर सुस्थितीत आलं की याची स्वार्थी खात्नी शहरातल्या प्रत्येकाला असते. 
कलेच्या इतिहासाने शहरं सोडून जाणार्‍या माणसांचे असे अनेक लोंढे वेगवेगळ्या कालखंडात पाहिले.
तात्याना फाझलादिदाह या इराणी चित्नकाराचं पोट्र्रेट ऑफ माय फादर अँज अ एलियन हे पेंटिंग महत्त्वाचं आहे. इराणमधून 1970 साली ते अमेरिकेत आले, त्यावेळी त्यांना रेसिडेन्ट एलियन असं ओळखपत्न दिलं गेलं, जे पुढील अनेक दशकं त्यांची एकमेव ओळख बनलं. या ओळखीच्या पलीकडे ते एक पती, वडील, भाऊ होते, आणि एक जबाबदार नागरिकही होते, जरी तो दर्जा त्यांना कधीच दिला गेला नाही. त्या ओळखपत्नामध्ये वडिलांचं व्यक्तिमत्त्व जणू विरघळून गेलं. तात्यानाच्या चित्नामध्ये फक्त हे ओळखपत्न आहे. मागचा वडिलांचा चेहरा अस्पष्ट, धूसर, कडा विरघळून गेलेला असा. 
युद्ध, रोगराई, दुष्काळ, वातावरणातले बदल, नैसर्गिक आपत्ती यासोबतच अधिक संपत्तीचा हव्यास, धाडस, छंद, मजा याकरताही स्थलांतरण होतच असतं, मात्न हे स्थलांतरण बहुतांशी वैयक्तिक स्वरूपाचं असतं, त्यातला संघर्षही कलेची ऊर्मी ठरू शकतोच. 
हाइव काहरिमान ही मूळ बगदादला जन्मलेली चित्नकार पॅरिसच्या रस्त्यांवर वाळवंटांचा शोध घेते, तिला ती खरोखरच तिथे दिसतात, मृगजळांसहित. वाळवंटाची ही चित्नं माझा भूतकाळ आणि भविष्यकाळाचं चित्नण आहे असं ती सांगते.
एडेल रॉड्रिग्झ हवाना क्यूबाला जन्मला. बोटीतून आलेली माणसं अशी स्थलांतरितांची एक वैशिष्ट्यपूर्ण ओळख असते, त्याचीही होती. बोटीतून आलेली माणसं तडीपार, गुंड, गुन्हेगार, माफीया असतात, त्यांना ‘अलग’ ठेवणं गरजेचं असतं, नाहीतर सामाजिक हवा ‘प्रदूषित’ होते, हे ऐकत, अनुभवत एडेल मोठा झाला. त्याचे अनुभव त्याच्या चित्नांमध्ये उमटले.
यामध्ये अतिशय सकारात्मक पेंटिंग आहे आर्ट स्टिगल्मन यांचे. अ वॉर्म वेलकम असंच त्या पेंटिंगचं नाव! हिटलरच्या छळछावणीतून बचावलेल्या काही भाग्यवंतांपैकी त्याचे आई-वडील. 1950 मध्ये आर्ट अमेरिकेत आला, आपल्या वडिलांच्या खांद्यावर बसून, त्यावेळी तो तीन वर्षांचा होता. बोटीतून येताना त्याला वडिलांनी ती भव्य स्री दाखवली. स्वातंत्र्य देवतेचा पुतळा. 
स्थलांतर ही वैश्विक संकल्पना, आदिमानव ते आजचा आधुनिक मानवाचा इतिहास हा स्थलांतराचा इतिहास आहे, स्थलांतराइतकी सनातन संकल्पना दुसरी कोणतीही नाही, मानवामधली ती उपजत प्रेरणा आहे. मग तरीही, लाखो, हजारो वर्षांच्या अनुभवाचा वारसा गुणसूत्नात रुजलेला असूनही, माणूस स्थलांतरामुळे अस्वस्थ नेमका का होतो? तर यामागचं एक साधं उत्तर असं की स्थलांतर जेव्हा लादलं जातं, तेव्हा ते कायम वेदनादायीच असतं.
शहर सोडून आपल्या गावाच्या आर्शयाला गेलेली ही माणसं, अनेकदा त्यांना तिथेही आसरा दिला न जाणं यासारखी क्रूर गोष्ट दुसरी नाही. 
स्रिया कशा सामोर्‍या जातात स्थलांतरणाला? डेबोरा सजिर्शी या इराणीयन अमेरिकन चित्नकर्तीच्या मते स्रिया आपली ओळख जपून ठेवण्याची धडपड करत नाही, त्या स्मृती जपतात. 
स्थलांतरित जेव्हा चित्नकार असतो तेव्हा त्याच्या चित्नांमधल्या भवतालात स्थलांतरणाचा इतिहासच नाही, भूगोलही नोंदवला जातो. 
नैनसुख हा मिनिएचर आर्टिस्ट पंधराव्या शतकात आपल्या लघुचित्नांमधून हिमाचल प्रदेशातल्या कांगरा खोर्‍यापासून राजस्थानच्या सपाट वाळवंटी प्रदेशापर्यंतचा आपला प्रवास चित्रित करतो, तेव्हा तो त्याचं स्थलांतरणच नोंदवत असतो. निसर्गातले, वातावरणातले, माणसांमधले, पेहेरावांमधले, पशुपक्षी, झाडाफुलांमधले, प्रवासी वाहनांमधले बारीकसारीक तपशील तो चितारतो. 
अनेकदा स्थलांतरण हे उखडलं जाणं असतं. उखडलं जाण्याच्या, उघड्या पडलेल्या मुळांच्या जखमा कधीच भरून येत नाहीत. पिढय़ान्पिढय़ा त्या भळभळत राहातात.  
सतराव्या शतकातल्या ‘द ग्रेट सर्ब मायग्रेशन’वर पाजा योवानोविक या सर्बियन चित्नकाराने 1896मध्ये रंगवलेली चार भव्य तैलचित्नांची मालिका बुडापेस्टच्या मिलेनियम एक्झिबिशनचा एक भाग होती. लहान होडक्यांमध्ये बसून डॅन्यूब नदी ओलांडण्याच्या प्रयत्नांमधल्या सर्ब स्थलांतरितांचं एक चित्न त्यात होतं.
1896मध्ये प्लेगला भेदरून गेलेल्या लोकांचे लोंढे मुंबई शहराबाहेर हजारोंच्या संख्येनं जायला लागले तेव्हा त्यांच्याकरता गाड्या अपुर्‍या पडल्या.  
उपरे, हुसकावलेले किंवा नाइलाजाने जगायला बाहेर पडणारे. माणसांचे प्रत्येक लोंढे, मग ते सतराव्या शतकातले असोत किंवा या सहस्रकातले सिरियन निर्वासितांचे असोत, किंवा मुंबई, दिल्लीमधले उद्याची भ्रांत पडलेल्या मजुरांचे असोत, त्यांची कथा आणि व्यथा एकच असते, जगण्याकरता, तग धरून रहाण्याकरता मुलाबाळांना खांद्यावर बसवून, संसार खाकोटीला मारून पायी हजारो मैल चालत जाण्यातली असहायता तीच असते. 
भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी जिवाच्या भीतीने आपापली जन्मभूमी सोडून रेषेच्या अलीकडे आणि पलीकडे सैरावैरा धावत गेलेल्या लाखो निरपराधांनी तर जीव गमावले. उरले-सुरले आजही रक्ताळलेल्या आठवणींसहित जगताहेत.
आणि मग न राहवून आठवतात बंगालच्या महाभीषण दुष्काळात चित्ताेप्रसादांनी काढलेली ती चित्नं ! भारतीय माणसांच्या जगण्यातली विदारकता आजही तीच आहे हेच पुन्हा पुन्हा सिद्ध होत रहातं.
2020 सालातल्या मार्च महिन्याच्या अखेरीला शहरांमधून बाहेर पडणारे हे लोंढे कधीतरी एखादा चित्नकार कॅनव्हासवर नोंदवून ठेवेलच. कला-इतिहासातील माणसांच्या लोंढय़ात अजून एक भर पडेल.

sharmilaphadke@gmail.com
(लेखिका ज्येष्ठ कला समीक्षक आहेत.)

Web Title: People who left the city.. History through paintings and pictures..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.