टक्केवारीची सूज

By admin | Published: June 17, 2016 05:39 PM2016-06-17T17:39:20+5:302016-06-17T18:04:51+5:30

नुकताच दहावीचा निकाल लागला. राज्यात तब्बल चार हजार शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. चार लाख विद्यार्थ्यांना ७५ टक्क्यांपेक्षाही अधिक गुण मिळाले. ५१ हजार विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले. शंभर टक्के गुण मिळवणारेही अनेक विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांना मिळणारे एवढे भारंभार गुण कशाचे निदर्शक आहेत? आपल्या शिक्षणव्यवस्थेसमोर नव्या प्रश्नचिन्हांची मालिका या ‘गुण’वत्तेनं निर्माण केली आहे..

Percentage Swelling | टक्केवारीची सूज

टक्केवारीची सूज

Next

मुलांना परीक्षेत किती गुण मिळावेत?
मुलांनी पास व्हावं हे ठीक, पण किती गुणांनी?
आणि निकाल तरी किती टक्के लागावा?
दरवर्षी दहावीच्या परीक्षेचा निकाल लागला की विद्यार्थ्यांची ‘गुण’वत्ता अगदी फसफसून बाहेर पडताना दिसते. यंदाही ती दिसली. 
८०, ८५, ९०, ९५ अगदी शंभर टक्के गुण!
कसे काय मिळतात एवढे गुण?
‘गुण’वत्तेच्या एक्स्प्रेस गाड्या सुसाट धावू लागायला फार वर्षे नाही झालीत.
पण त्यापूर्वी काय स्थिती होती?
परीक्षेत पहिल्या आलेल्या मुलाने ८०-८५ टक्क्यांचा उंबरठा ओलांडला तरी डोळे पांढरे व्हायची वेळ यायची. ‘गणित’ विषय सोडला तर कुठल्याच विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवण्याची सोय नव्हती आणि शक्यताही नव्हती.
आजकाल मराठीसारख्या भाषा विषयातही मुलं ९० टक्क्यांच्या वर गुण मिळवतात.
एकीकडे गुणवंत मुलांची ही तऱ्हा, तर दुसरीकडे गुणवंत शाळांचा निकालही पार आभाळापर्यंत पोहोचलेला. 
शेकडो विद्यार्थी असलेल्या शाळांतला एकूण एक विद्यार्थी पास?
बरं, अशा शाळा तरी किती असाव्यात?
चार-चार हजार शाळांतील एकही विद्यार्थी नापास नाही?
मुलं जर खरोखरच हुशार असतील आणि शाळाही मुलांकडून खरोखरच इतकी गुणवत्तापूर्ण तयारी करून घेत असतील तर उत्तमच, पण त्यामागचं खरं इंगित काय आहे?
आजकाल अनेक शाळा मुलांना हजारो, लाखो रुपये फी घेऊन अगदी केजीपासून अ‍ॅडमिशन देतात. पण नववीच्या वर्गात त्यांच्या लक्षात आलं, की हा विद्यार्थी दहावी पास होण्याच्या लायकीचा नाही, की लगेच ते त्याला सक्तीनं शाळेतून नाव कमी करायला लावतात. भले त्याला वर्गात बसू देतील, पण दहावीची परीक्षा ‘बाहेरून’च द्यायची, आमच्या शाळेतून नाही!
टिपिकल हाय क्लास इंग्रजी शाळांचं हे लोण आता हळूहळू इतर शाळांपर्यंतही पोहोचू लागलंय. शंभर टक्के निकालाचं गुपित हे आहे..
आणि मुलांना पोतीच्या पोती भरून गुण कसे मिळतात? बिहारमध्ये गुणवत्ता यादीत आलेल्या मुलांना त्या विषयाचं नावही सांगता आलं नाही, ही अलीकडचीच वस्तुस्थिती.
‘बेस्ट आॅफ फाइव्ह’, शाळांच्या हातात आलेले मूल्यमापनाचे वीस टक्के गुण, परीक्षेतील प्रश्नांची कमी कमी होत गेलेली काठीण्य पातळी, अधिकाधिक ‘सोप्या’कडे होत गेलेला प्रवास, परीक्षेत हमखास यशस्वी होण्याचा रामबाण फॉर्म्युला, ‘गुणवत्ते’ची हमी घेतलेले क्लासेस, गाइड्स, घोकंपट्टी.. अशी अनेक कारणं त्यामागे आहेत.
काय करायचं या ‘गुण’वत्तेचं? गुण मिळाले, पण आकलन, समज आली का, ज्ञान वाढलं का, असे अनेक गंभीर प्रश्न यानिमित्तानं निर्माण झाले आहेत.
विद्यार्थ्यांच्या गुणांच्या टक्केवारीची ही सूज दिवसेंदिवस वाढतेच आहे. त्यामुळे आर्थिक आणि शैक्षणिक शोषणाच्या नवनवीन पद्धतीही उदयास येताहेत. कशी थोपवायची टक्केवारीची ही सूज? विद्यार्थ्यांच्या खऱ्या मूल्यमापनाचे निकष आता तरी बदलायला हवेत, हे यातलं महत्त्वाचं मंथन...

Web Title: Percentage Swelling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.