तृप्ती! - पीटर वायसिंगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 06:01 AM2020-07-12T06:01:00+5:302020-07-12T06:05:01+5:30
ऑस्ट्रियामधून मी पहिल्यांदा आणि एकटाच भारतात आलो, तेव्हा 19 वर्षांचा होतो. एकच ध्यास मनात होता, कर्नाटक संगीत शिकण्याचा! माझा प्रवास काकणभर अधिकच खडतर होता, कारण केवळ संगीतातच नाही तर रोजच्या जगण्यातही परंपरेच्या शुद्धतेचा आग्रह धरणारा हा प्रांत. सेवेचा सर्मपण भाव, गोळीबंद संस्कृत भाषा, तत्त्वज्ञान, त्यात गुंफलेले जीवनविषयक भाष्य कसे उलगडणार आणि पोहोचणार आमच्यापर्यंत? हे सगळे अडथळे ओलांडून मला पुढे जायचे होते आणि माझ्या गुरुपर्यंत पोहोचायचे होते. शेवटी पोहोचलोच मी माझ्या ध्येयापर्यंत!
- पीटर वायसिंगर
वायकॉम नावाच्या केरळमधील एका छोट्याशा गावाकडे निघालो होतो मी. सोळा-सतरा वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे आणि माझे वयही त्याच्याच आसपासचे, म्हणजे एकोणीस-वीस एवढेच. ऑस्ट्रियामधून प्रथमच भारतात येत होतो, तेही एकटा आणि ओळखीचे फारसे कोणतेही दुवे हातात नसताना!
एकच ध्यास मनात होता, कर्नाटक संगीत शिकवणारा गुरु शोधणे. अभिजात भारतीय संगीताच्या आंतरिक ओढीने भारतात येण्याचे धाडस करणारे माझ्यासारखे युरोप-अमेरिकेतील तरुण त्यावेळी सर्वात प्रथम उतरत ते दिल्लीमध्ये. पुढचा मुक्काम अर्थात अहोरात्र नृत्य-संगीत जगणारा वाराणसीचा गंगा घाट किंवा स्वरांच्या वाटेने आतील शांतीचा मार्ग दाखवणारे ऋषिकेश. मी मात्र ह्या गावांचा विचारसुद्धा न करता थेट त्याच्या विरुद्ध दिशेने, दक्षिणेकडे निघालो होतो. त्या प्रांताचे वेगळेपण दाखवणार्या कर्नाटक संगीताच्या गुरुच्या शोधार्थ.
हा प्रवास इतरांच्या मानाने काकणभर अधिकच खडतर होता. केवळ संगीतातच नाही तर रोजच्या जगण्यातच परंपरेच्या शुद्धतेचा आग्रह धरणारा हा प्रांत. हातात गिटार घेऊन जाझला साथ करणार्या गोर्या तरुणाला स्वीकारायचे तर त्यासाठी इंग्लिश भाषेची बाराखडी तरी गुरुला ठाऊक हवी! आणि शिष्यासाठी तर ही परीक्षा अधिकच बिकट. इथले रोजचे जगणे निसर्गातील पंचमहाभूतांच्या चक्राशी आणि संगीत-नृत्याशी जोडलेले. पायसमच्या नैवेद्यासोबत देवाला रोज सेवा द्यायची ती स्वरांच्या माध्यमातून. सेवेचा हा सर्मपण भाव आम्हा गोर्यांना कसा कळणार? कशी कळणार गोळीबंद संस्कृत भाषा आणि त्यातील छोट्याशा श्लोकाच्या चिमटीत पकडलेला तत्त्वज्ञानाचा तलम पदर? भारतीय दर्शने आणि रामायण-महाभारतातून गुंफले गेलेले जीवनविषयक भाष्य कसे उलगडणार आणि पोहोचणार आमच्यापर्यंत?
हे सगळे अडथळे ओलांडून मला पुढे जायचे होते आणि माझ्या मनातील प्रामाणिक इच्छा गुरुपर्यंत पोहोचवायची होती. ती बहुदा पोहोचली आणि मला कर्नाटक संगीत शिकवणारा पहिला गुरु भेटला. गुरु वासुदेव नम्बुद्री. कपाळावर भस्म, अंगावर मुंडू आणि भाषा फक्त मल्याळम. कसा होणारा संवाद आमच्यामध्ये? भाषेची गरजच त्यांना कधी जाणवली नाही, इतके-इतके ते अल्पाक्षरी होते. दिवसातून फार तर फार तीन किंवा चार शब्द त्यापुढे बोलणे म्हणजे शब्दांची निष्कारण उधळमाधळ..! आमच्यामध्ये भाषेचे बंध नव्हते; पण ते नसणे स्वरांना मंजूर होते, कारण गुरुंच्या मते माझी स्वरांची समज छान होती. ती माझ्या गिटारवादनामुळे मिळाली आहे ते त्यांना पक्के ठाऊक होते; पण माझे शिक्षण सुरू झाले त्या पहिल्या दिवशी त्यांनी एक अट घातली, जे संगीत इथे शिकायला मिळेल ते गिटारवर अजिबात वाजवायचे नाही..! ती पाळणे अशक्य आहे ते पक्के ठाऊक असूनही मी त्यावेळी (पुरती!) मान तुकवली ! आणि गुरुगृही माझे शिक्षण सुरू झाले. गाणे शिकायला भल्या दुरून एका चिमुटभर गावात आलेल्या या गोर्याकडे तेव्हा सगळे गाव कुतूहलाने बघत असे..!
शालेय वयात डॉक्टर किंवा वकील वगैरे होण्याच्या अपेक्षेचा बोजा माझ्या पालकांनी माझ्या डोक्यावर लादला नाही हे बरेच झाले. गणित-विज्ञानाचा मला भारी कंटाळा. अशा मुलांनी काय करायचे असते? मला उत्तर सापडले ते जाझ गिटार वादनात. ते वाजवताना मजा येत होती? - असेल बहुदा. कंटाळा नक्की येत नव्हता! गिटार वाजवता-वाजवता ते इतरांना शिकवण्याचा आत्मविश्वास माझ्या सरावाने मला दिला. आणि स्वत:च्या पायावर उभे करणारे काहीतरी कौशल्य आपण मिळवले म्हणून मी स्वत:वरच खूश झालो. तेव्हा मी संगीत नावाच्या थांग नसलेल्या दुनियेच्या उंबरठय़ावरसुद्धा उभा नव्हतो. तो क्षण आला ‘शक्ती’ नावाच्या अल्बममुळे.
भारतीय रागसंगीत आणि वीणावादन यात खोलवर बुडी मारलेल्या स्वत:ला ‘महाविष्णू’ असे संबोधणार्या जॉन मॅकलौग्लिनने काढलेला हा अल्बम. झाकीर हुसेनचा तबला, एल शंकरचे व्हायोलीन, विकू विनायकचे घटम आणि भारतीय रागसंगीताची बैठक..!
भूल पडून, लौकिक सगळे झटकून, मागे टाकून या स्वरांच्या मागे जावे असे सर्व काही त्यात होते आणि माझ्यासाठी ते पुरेसे होते ! झाकीर हुसेन नावाच्या कलाकाराचे केवळ दोन(च) हात समोरच्या वाद्यातून जे बोल निर्माण करीत होते ती मला निव्वळ जादू वाटत होती. भारतीय संगीत शिकण्यासाठी तबला शिकणे गरजेचे आहे असा माझा त्यावेळी उगीचच समज झाला आणि मी तबला शिकणे सुरू केले. जतिंदर ठाकूर या माझ्या तबला गुरुने, अल्लारखा साहेबांच्या शिष्याने, भारतीय संगीताबद्दल माझे अनेक गैरसमज दूर केले.
या ओळखीत माझी मैत्री झाली ती कर्नाटक संगीताशी. एकदा जवळ केलेल्या स्वरांशी जिवाभावाचे नाते जमवण्याचा माझा स्वभाव, गंभीर, अर्थाच्या शोधार्थ वाटा-वळणे तुडवणारा. संगीत माझ्यासाठी मुक्ती-शांतीचे दरवाजे उघडणारी किल्ली कधीच नव्हती. तसले काही मला मिळवायचेही नव्हते. मला शोध होता तो माझ्या भाषेचा. मी त्या त्या वेळी जसा आहे, जसा विचार करतो, जगाकडे बघतो तसे प्रामाणिकपणे सांगता येईल अशी भाषा. ही भाषा कर्नाटक संगीताकडून मिळेल, असे आश्वासन मला माझ्या वासुदेव गुरुजींनी दिले.
त्या छोट्या गावाचे जगण्या-वावरण्याचे आणि खाण्यापिण्याचे सगळे नियम पाळणे सोपे नव्हते; पण मी त्याबद्दल कधीच तक्रार केली नाही. त्या काळात रोजचा दिनक्रम पाळणे हे अनेक गैरसोयींमुळे अवघड होते; पण दुसरीकडे दक्षिण भारतात संगीत महोत्सवांचा मोसम सुरू झाला की तोच दिनक्रम भरजरी होऊन जायचा..! अशा दिवसांत रात्री झोपताना मनात असायची लौकिकाच्या पल्याडचे काही अनुभवल्याची तृप्तीची एक असीम भावना..
चेन्नईच्या एका संगीत महोत्सवात यू र्शीनिवास त्यांच्या गाडीतून उतरताना दिसले. कर्नाटक संगीताला इलेक्ट्रिक मेंडोलीनची देणगी देणारा आणि देशाच्या सीमेपलीकडील रसिकांच्या तरुण पिढीला आपल्या वादनाने वेड लावणारा हा प्रतिभावान तरुण कलाकार. मी त्यांना गाठण्यासाठी त्यांच्यामागे पळालो आणि चाहत्यांच्या तुडुंब गराड्यात ते हसतमुखाने पुढे सरकत असताना एकदम त्यांच्यासमोर जाऊन उभा राहत त्यांना म्हणालो, ‘मला तुमचा शिष्य व्हायचे आहे.’ ते फक्त हसले आणि हातात कार्ड देत म्हणाले, ‘उद्या फोन कर’.
या तरुण, उमद्या गुरुला एक कलाकार म्हणून माझ्या अपेक्षा आणि इच्छा समजत होत्या. मला त्यांच्याकडून कर्नाटक संगीतातील पारंपरिक रचना ऐकून, समजून घ्यायच्या होत्या, त्या वाजवण्याचे तंत्र शिकायचे होते. वासुदेव सरांकडे जे शिक्षण झाले त्यात गायनाचा भाग अधिक होता. ते सांगतील त्या आलाप आणि पलट्याचे अनुकरण करणे हे शिक्षण होते. या तरुण गुरुकडे मी कर्नाटकी ढंगाने वाद्य वाजवणे शिकत होतो. रागाच्या छोट्या स्वरावली, त्यातील नाजूक कोवळ्या गमक आणि हरकती त्यांच्या वाद्यामधून निर्माण होताना बघत होतो. हा टप्पा अनुकरणाच्या पुढचा, निर्मितीच्या प्रक्रियेचा होता.
कर्नाटक (आणि जाझ संगीत) यांच्याबद्दल आजही समाजात असलेला एक मोठा गैरसमज म्हणजे, पणजोबा-खापर पणजोबांच्या पिढय़ांनी बांधलेल्या रचनाच आजचे कलाकार वाजवतात. हे एक अर्धसत्य आहे. परंपरेबद्दल अतिशय आदर मनात असलेल्या कर्नाटक संगीताने या पारंपरिक रचना हा आपल्यासाठी संदर्भबिंदू म्हणून मानला आहे. त्या संदर्भापासून, त्याला नमस्कार करूनच वादन/गायन सुरू होते इतकेच. पण याचा अर्थ तीच आणि तेव्हढीच बांधलेली रचना फक्त कलाकार वाजवत नाही. त्या रचनेमध्ये असलेल्या मोकळ्या जागा टिपत त्या दिवशी त्यात उमललेला रंग दाखवत, त्यातील अर्थ आपल्या भाषेत तो कलाकार सांगत असतो.
या वाटचालीत ती रचना आणि ती मैफल मग त्याची होत जाते ! त्या रचनेची बंधने मान्य करीत आतून उसळत येणारे उत्स्फूर्त स्वर हे त्या कलाकाराने त्या दिवशी त्या रचनेला बहाल केलेले त्याचे देणे असते. त्यासाठी तो राग समजावा लागतो, त्याचे रुसवे-फुगवे, त्याचे लाड-कौतुक करणारी भाषा जाणून घ्यावी लागते. त्या स्वरांच्या गाभ्याजवळ असलेल्या भावाच्या कोवळ्या कंदाला स्पर्श करावा लागतो. ह्यातले काहीच कागदावर लिहिलेले नसते. ते गुरुमुखातून ऐकावे लागते. मैफलीत स्वत:ला आणि रसिकांना असे समाधानाचे क्षण देणारा मी स्वरांपासून वेगळा उरतो कुठे? वातावरणात उमटणार्या आणि विरून जाणार्या त्या स्वरांमध्ये मला मी दिसत असतो..
आता भारतीय पद्धतीप्रमाणे जे वाद्य लावता येईल असे पाच तारांचे मेंडोलीन मी बनवून घेतले आहे. व्हिएन्नामध्ये आमची ‘राग’ नावाची संस्था आम्ही सुरू केली आहे. ज्याचा एकच हेतू आहे, भारतीय संगीत माझ्या देशातील लोकांना ऐकायला मिळावे. संगीत हे कोणत्या देशाचे कधीच नसते, ते असते स्वरांचे, त्या स्वरांच्या अनेक आकृती ज्यांना खुणावत राहतात अशा प्रतिभेचे, आणि काळालासुद्धा पुरून उरणार्या शाश्वत आनंदाचे. या वाटेवर आणि आजच्या काळाच्या तुकड्यावर उभा मी एक बिंदू आहे..
पीटर वायसिंगर
पीटर वायसिंगर हा ऑस्ट्रियामधील कलाकार. कर्नाटक संगीताच्या कठोर आणि पारंपरिक व्यवस्थेने शिष्य म्हणून स्वीकार केलेला हा एखादाच परदेशी कलाकार. पीटर इलेक्ट्रिक मेंडोलीन वादनाच्या सोलो मैफली करतो याखेरीज नृत्याला साथ करतो. त्याने पंडित सुरेश तळवलकर यांच्याकडे तबल्याचे शिक्षण घेतले आहे. व्हिएन्नामध्ये तो भारतीय संगीताचे शिक्षण देतो आणि ह्या संगीताचे जाणकार र्शोते तयार व्हावे म्हणून आपल्या ‘राग’ संस्थमार्फत अभिजात भारतीय संगीताच्या मैफलींचे आयोजन करतो.
मुलाखत, शब्दांकन : वंदना अत्रे
vratre@gmail.com
(ही लेखमाला दर पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होईल.)