परदेशातील चित्ररंग!

By admin | Published: August 26, 2016 04:55 PM2016-08-26T16:55:21+5:302016-08-26T17:24:50+5:30

तुर्कीतल्या बोर्नोव्हा शहरात एका कॉफीशॉपसमोर चित्र काढत होतो. थोड्या वेळाने चित्रावर ऊन आले. कॉफीशॉपच्या मालकाने लगेच माझ्या डोक्यावर छत्री धरली.

Pictures from abroad! | परदेशातील चित्ररंग!

परदेशातील चित्ररंग!

Next

 - मुलाखत : सुदीप गुजराथी

तुर्कीतल्या बोर्नोव्हा शहरात एका कॉफीशॉपसमोर चित्र काढत होतो. 
थोड्या वेळाने चित्रावर ऊन आले.
कॉफीशॉपच्या मालकाने लगेच
माझ्या डोक्यावर छत्री धरली.
दर अर्ध्या तासाने स्वत:च रंगांसाठीचे पाणी बदलून देऊ लागला.
ऊन सरकले की दर तासाने
छत्रीही सेट करून देत होता.
परदेशातले असे अनेक अनुभव.
चित्रकलेतले तिथले वटवृक्षही
इतके नम्र की नतमस्तक व्हावे.
ना ‘मोठेपणा’, ना अहंमन्यता,
ना कुठला बडेजाव.
परदेशातल्या चित्रसंस्कृतीनेही
आम्हाला संपन्न केले आहे.



तुम्ही आजवर अनेक देशांना भेटी दिल्या, चित्रांची प्रात्यक्षिके केली. तिथल्या कलावंतांचा भारताकडे, इथल्या चित्रकलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असतो? काय जाणवले? 
- आम्ही परदेशांत हिंडलो ते जलरंगातल्या चित्रांनिमित्त. आश्चर्य वाटेल, पण भारतातील जलरंग शैलीविषयी त्यांच्या कल्पना आजही ‘ऐतिहासिक’ म्हणाव्या अशाच आहेत. जलरंगाच्या क्षेत्रात भारतात अलीकडे घडलेल्या घडामोडी, इथले जागतिक दर्जाचे कलावंत याविषयी तिकडच्या कलावंतांना फारशी माहितीच नाही. भारतीय जलरंगातली चित्रे म्हटली की स्वातंत्र्यपूर्व काळातली राजस्थानी, कांगरा, मुघल वा रजपूत शैली त्यांच्या डोळ्यांसमोर येते. परदेशी चित्रकारांना लाजवतील असे सावळाराम हळदणकर, गजानन हळदणकर, ग. ना. जाधव, एम. आर. आचरेकर यांच्यासारखे नावाजलेले दिग्गज जलरंग चित्रकार भारतात होऊन गेले; पण त्यांची नावेही तिथपर्यंत पोहोचलेली नाहीत. त्या काळात आताइतकी माध्यमे, तंत्रज्ञान विकसित झालेले नव्हते; शिवाय आपल्याकडे चित्रकलेला गौण स्थान दिले जात असे. त्यामुळे विदेशात अजिंठा-वेरूळची लेणी, कैलास मंदिर, खुलताबाद माहीत असते; पण स्वातंत्र्योत्तर काळात भारतात झालेले जलरंगातले काम त्यांच्यापर्यंत पोहोचलेले नसते. त्याकाळी ही चित्रकार मंडळी साधनांअभावी परदेशांत जाऊ शकली नाहीत. गोपाळराव देऊलकर यांनी मात्र आपली तैलचित्रे परदेशात नेली. त्यांना लंडनच्या रॉयल अकादमीची फेलोशिप मिळाली होती. आपल्याकडचे कलावंत प्रसिद्धीकडे लक्ष देत नाहीत, स्वत:तच गुरफटलेले असतात.. त्याचा हा परिणाम असावा. अर्थात, हे परदेशी चित्रकारांचेच मत आहे! 
परदेशी चित्रकारांचा आपल्या कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन विचाराल, तर त्यांना आपली शैली भावते. आपल्या चित्रांविषयी तिकडे उत्कंठा अन् आकर्षण आहे. भारतीय चित्रांत भडक, ब्राइट रंगांचे प्रमाण जास्त असते. आपल्याला मुळात भडक रंगांचे आकर्षण अधिक आहे. लाल, भगवा रंग चित्रांत अधिक वापरला जातो. हा बहुधा ऋतुमानाचाही परिणाम असावा. तिकडे सतत पाऊस अन् थंडी... ऊन क्वचितच पडते. वातावरणात एकप्रकारची म्लानता असते. त्यामुळे तिकडचे लोक करडे, आकाशी वा फिक्या रंगाचे कपडे वापरताना दिसतात. याउलट आपल्याकडे वर्षातले दहा-अकरा महिने कडक ऊन असते. साहजिकच त्याचा मनावर परिणाम होतो अन् तो चित्रांतून उमटतो. तिकडे त्यांना फिकट, पांढरट रंग पाहून कंटाळा आलेला असतो. तुलनेत आपली चित्रे ताजी वाटतात. बारकाईने पाहिल्यास लक्षात येईल, आमच्या चित्रांमध्येही ऊन-सावलीचा, छाया-प्रकाशाचा खेळ रंगलेला दिसतो. इंडियन यलो, क्रोम, कॅडमियम रेड या रंगांचा अधिक वापर असतो. त्यामुळे चित्रे कशी जिवंत भासतात आणि हीच गोष्ट त्यांना जास्त भावते. 

परदेशी चित्रकारांसमवेतचा तुमचा ऋणानुबंध मोठा आहे. त्यांच्यासोबतचा तुमचा अनुभव काय सांगतो? दोन्हीकडच्या कलावंतांत काही फरक दिसतो का?
- सगळ्यात महत्त्वाचा फरक म्हणजे, तिथले ज्ञानाने आणि अनुभवानेही दिग्गज, साठी-सत्तरीतले कलावंतही तरुण चित्रकारांशी स्वत:हून संवाद साधतात, चर्चा करतात. आपण कोणीतरी मोठे आहोत असा आविर्भाव त्यांच्यात अजिबातच दिसत नाही. आपल्याकडे आपण ज्येष्ठ मंडळींना मान, आदर देतो. त्यांना काय हवे नको ते पाहतो; पण तिथे सगळे एकसमान मानले जातात. उलट आपण सवयीनुसार एखाद्या ज्येष्ठ कलावंताप्रति आदर व्यक्त केल्यास ते नम्रतेने सांगतात, ‘असे करू नका, आपण सारे बरोबरीचे आहोत!’ त्यांना आपल्या चित्राबद्दल विचारल्यास किमान वीस-पंचवीस मिनिटे तरी बोलतात. याउलट आपल्याकडे ज्येष्ठ कलावंतांमध्ये अहंभाव, लहरीपणा इतका असतो, त्यांची मुद्रा एवढी गंभीर असते की, कलेचे विद्यार्थी त्यांना भेटायलाही घाबरतात! त्या कलावंतांची चित्रे चाळीस-चाळीस लाखांना विकली जातात; पण तरीही त्यांचे पाय कायम जमिनीवर असल्याचे दिसते. आपला मोठेपणा विसरून सर्वसामान्यांतही ते तितक्याच सहजपणे मिसळताना दिसतात. 
चीन, तुर्की, अमेरिका, इटली, स्वीडन अशा कितीतरी देशांत आम्हाला हाच अनुभव आला. इटलीत भेटलेले स्वीडनचे पासष्ट वर्षीय स्टानालिस्को झोलाज असोत, अमेरिकेतले अडुसष्ट वर्षे वयाचे जॉन बल्मेनिआन असोत की त्र्याहत्तर वर्षांचे लॉटेन मॅक्राथजेन असोत, चित्रकलेच्या प्रांतात प्रत्येकाचं काम वटवृक्षासारखं, पण तरीही अत्यंत नम्र. अमेरिकेत थॉमस स्कॉलर हे तिथले प्रख्यात चित्रकार आम्ही न बोलावता प्रत्यक्ष स्थळचित्रणाच्या ठिकाणी येऊन भरभरून बोलले, चित्रांचे विश्लेषण केले. आपल्याकडे अशी वृत्ती अभावानेच दिसते. ‘आपल्याला विचारले नाही, मग कशाला बोलायचे’, असा विचार केला जातो. याउलट तिकडचे कलावंत चित्रकार म्हणून जेवढे श्रेष्ठ असतात, तेवढेच माणूस म्हणूनही ग्रेट असतात. ती माणसे स्पर्धा, बक्षिसांचाही विचार करताना दिसत नाहीत. निव्वळ कलेचा आनंद घेतात अन् मनसोक्त जगतात. 

तुमच्या चित्रांमध्ये बऱ्याचदा जुने वाडे, नाशिकचा गोदाघाट.. असा आपल्याकडचा संस्कृतिरंग चितारलेला असतो.. रंग आणि संस्कृतीचा हा संगम परदेशी चित्रकारांसाठी नवाच असेल. त्यावर त्यांची काय प्रतिक्रिया असते? 
- आपल्याकडे जशी मंदिरे, घाट आहेत तसेच तिकडे चर्च दिसून येतात. इटली हा देश तर स्थापत्यकलेसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे तिकडेही अशी चित्रे चितारली जातात. खरे तर आधी निसर्गचित्रे फारशी प्रचलित नव्हती. साधारणत: सतराव्या-अठराव्या शतकात जोसेफ टर्नर, जॉन कॉन्स्टेबल यांनी प्रथम निसर्गचित्रे काढायला प्रारंभ केला. त्यापूर्वी व्यक्तिचित्रेच काढली जात; पण या चित्रकारांनी मानवी आकारांना कमी प्राधान्य दिले, प्रसंगचित्रे बाजूला ठेवली आणि वातावरणाचे चित्रण करण्यास सुरुवात केली. त्यातून छाया-प्रकाशाला महत्त्व आले. पुढे अनेक जण केवळ निसर्गचित्रेच काढू लागले. भारतातही घाट, मंदिरे चितारली गेली. फक्त त्यांचा फॉर्म परदेशापेक्षा निराळा होता. त्यामुळे आपल्या चित्रांचे तिकडे आकर्षण आहे. राजस्थानातील कलात्मक राजवाड्यांची चित्रे त्यांना खूप भावतात. राजस्थाननेही आपला हा वारसा उत्तमरीत्या जपला आणि त्याचे मार्केटिंगही केले आहे. विदेशी लोकांना ज्या मोजक्या भारतीय गोष्टी आठवतात, त्यात एक असतो ताजमहाल, दुसरे राजस्थानमधील वाडे अन् तिसरा बनारसचा घाट... त्यांना नाशिकचा गोदाघाट माहीत नसतो. कारण आपण त्याचं ‘मार्केटिंग’ तर केलं नाहीच;

शिवाय तो वारसा जपलाही नाही. व्हेनिससारख्या शहरात गल्ल्यांतून पाणी वाहते. चीनमध्येही असेच सुमारे दीड हजार वर्षे जुने असलेले एक शहर आहे- त्याचे नाव सुघाऊ. त्यांनी हे अख्खे शहरच्या शहर जपले आहे. त्यातल्या घरांचे नूतनीकरण करायचे असले तरी ते जुन्याच पद्धतीने करायचे, असा नियम आहे. आपल्याकडे मात्र गोदाघाटाभोवतीची जुनी घरे पाडून टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या. आमच्या चित्रांतील गोदाघाट पाहून अमेरिकेतील एक महिला कलावंत खास नाशिक पाहण्यासाठी आल्या; पण घाटावर आल्यावर त्या अस्वस्थ झाल्या अन् म्हणाल्या, ‘हा घाट तुमच्या चित्रांतून किती सुंदर दिसतो.. प्रत्यक्षात किती अस्वच्छ आहे...!’ 

प्रत्येक देशात त्या-त्या रंगाला सांस्कृतिक संदर्भ असतात. आपल्याकडे लाल, भगवा रंग क्रांतीचे प्रतीक आहे, हिरवा रंग समृद्धीचा मानला जातो. हे संदर्भ लक्षात घेऊन चित्रे काढली जातात. ते तिकडच्या चित्रकारांना कितपत भावते? त्यांची रंगांची भाषा वेगळी असते का? त्यांच्या रसग्रहणात काही फरक पडतो का?
- आधी सांगितल्याप्रमाणे तिकडे जरा ‘न्यूट्रल’ रंग वापरले जातात. त्यामुळे रंगांची भाषा बदलते, हे खरे; पण परीक्षण करताना इथे अमुक रंगच का वापरला, असे विचारले जात नाही. तिथे आपल्या चित्राचा फक्त एक कलाकृती म्हणून विचार होतो. भारतात ‘ब्राइट’ रंगांचा अधिक वापर होतो, हे काहींना माहीत असते, तर काहींना नसतेही. इतर चित्रांच्या तुलनेत आपली चित्रे वेगळी दिसतात खरी; पण आस्वाद व रसग्रहणात काही फरक पडत नाही. चित्राची भाषा समजून घेऊन नव्हे, तर ताल, तोल, लय ही कलेची मूलतत्त्वे चित्रात जपली आहेत का, हे पाहून परीक्षण होते. काही वेळा आमच्या चित्रात भगवा झेंडा येतो, तेव्हा ‘हे काय आहे?’ असे विचारले जाते. मग त्यांना भगवा हा भारतात त्यागाचा रंग मानला जातो, आमच्या धर्मात त्याग व समर्पणाला महत्त्व आहे, असे आम्ही पटवून देतो. 

एक कलावंत म्हणून अनेक देशांत तुम्ही भारताचे प्रतिनिधित्व केलेय.. त्या-त्या देशातील सरकारी यंत्रणा, अधिकारी यांची कलावंतांविषयीची भूमिका काय असते? ‘फुटेज’ खाण्याची की केवळ आयोजकाची?
- आपल्याकडे एखाद्या कार्यक्रमासाठी मोठे स्टेज उभारतात, समोर भरपूर खुर्च्या मांडल्या जातात. स्टेजवर लोकप्रतिनिधी, सरकारी अधिकाऱ्यांना मानाचे स्थान दिले जाते. पहिल्या रांगेतल्या खुर्च्या त्यांच्यासाठी राखून ठेवल्या जातात. अमेरिकेत मात्र अगदी ओबामासुद्धा एखाद्या कोपऱ्यात उभे राहून बोलू शकतात! परदेशात सरकारी अधिकारी, आयोजकांपैकी एकही जण स्टेजवर पाय ठेवत नाही. तिथे फक्त निमंत्रितांना मान दिला जातो. अनेक कार्यक्रम त्या देशाच्या शासनाने आयोजित करूनही आम्हाला तिथे नेमके शासकीय अधिकारी, मंत्री कोण हे ओळखता आले नाही, इतक्या सामान्य रीतीने ते वावरत असतात. एकदा एक व्यक्ती शांतपणे चित्रे न्याहाळताना आम्ही पाहिली. नंतर आम्ही तिथल्या प्रतिनिधीला विचारले की, ‘येथे या देशाचे सांस्कृतिक मंत्रीही आले असल्याचे कळले, ते कोठेय?’ त्यावर प्रतिनिधीने चित्रे न्याहाळणाऱ्या त्या व्यक्तीकडे बोट दाखवले! म्हणजे इतका वेळ आमच्या आजूबाजूला सहजतेने वावरणारी ती व्यक्ती त्या देशाची सांस्कृतिक मंत्री होती! पण सुरक्षा नाही की कार्यकर्त्यांचा गराडा नाही... आपल्याकडे याउलट चित्र असते. आपण पाहुणे सोडून आपल्याच माणसांची सरबराई करण्यात मग्न असतो. 

आपल्याकडे चित्रसाक्षरता फारशी नाही. तिकडे काय परिस्थिती आहे? भारतीय चित्रकार म्हणून रसिकांकडून कशी दाद मिळते? 
- युरोपीय देशांत चित्रकलेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. रोम, इटली, अ‍ॅमस्टरडॅमसारख्या ठिकाणी चित्रसाक्षरता खूपच वरच्या पातळीची दिसून येते. भारतात आपण रस्त्यात चित्र काढत बसल्यावर पाहणाऱ्यांच्या चेहऱ्यावर ‘काय चाललेय याचे?’ असे विचित्र भाव असतात. तिकडे मात्र लोक शांतपणे आपली कला पाहतात. अनेकदा तर चित्र अर्धवट असतानाच ‘विकायचे का?’ विचारतात. किंमत परवडत असली तर चित्र पूर्ण झाल्यावर घेऊन जातात! तिथल्या सामान्य लोकांसह उद्योजक, व्यावसायिकांनाही कलेप्रति अतीव आदर असल्याचे दिसून येते. 
तुर्कीतल्या बोर्नोव्हा शहरात असाच एका कॉफीशॉपसमोर चित्र काढत बसलो होतो. पंधरा-वीस लोक आजूबाजूला बसून ते पाहत होते. थोड्या वेळाने चित्रावर ऊन येऊ लागले. ते लक्षात येताच खुद्द त्या कॉफीशॉपच्या मालकाने पुढे सरसावत माझ्या डोक्यावर छत्री लावून सावली करून दिली. शिवाय दर अर्ध्या तासाने येऊन स्वत:च्या हाताने रंगांसाठीचे पाणी बदलून देऊ लागला... विशेष म्हणजे, त्याच्या कॉफीशॉपच्या खुर्च्यांवर बसूनच रसिक माझी कला न्याहाळत होते. तरी त्या मालकाने साधी नाराजीही व्यक्त केली नाही. उलट दर तासाने ऊन सरकल्यावर तो छत्री सेट करून द्यायचा. हा अनुभव माझ्या हृदयाला खूपच भिडला. आपल्याकडे असे दुकानासमोर कोणी एकटे बसले तरी ‘धंद्यात खोटी’ म्हणून दुकानदारांच्या कपाळावर आठ्या पडतात. 

युरोपियन व आशियायी देशांतील कलावंत, रसिकांत काही फरक आहे का? परदेशांत तुम्ही भरपूर भटकंती केलीय... एक कलावंत म्हणून काय अनुभव येतो? 
- तिकडे कलावंतांना खूपच सहकार्य मिळते. तुम्ही चित्र काढण्यासाठी जागा शोधत असाल, तर लोक स्वत:हून मदत करतात. कोठे गर्दीच्या ठिकाणी बसलो, तर वाहतूक पोलीस जागा करून देतात. अगदीच वाहतुकीला अडथळा येणार असेल, तर मात्र अत्यंत नम्रतेने अन्यत्र बसण्याची विनंती करतात. एवढेच नव्हे, तर आपले साहित्य हलवण्यासाठीही मदत करतात. 
इटलीत सामान्य माणसांचा आलेला एक अनुभवही सांगण्यासारखा आहे. एका मोठ्या चित्रप्रदर्शनासाठी निरनिराळ्या देशांतून आम्ही पंधरा-वीस कलावंत जमलो होतो. आम्हाला विशिष्ट लोकेशनवर ग्रुप फोटो घ्यावासा वाटला; पण त्यासाठी रस्त्याच्या मध्यभागी उभे राहावे लागणार होते. आम्ही तसे उभे राहून सात-आठ फोटो घेतले अन् अचानक भानावर येऊन पाहिले तर आमच्या दोन्ही बाजूंना दहा-पंधरा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या; पण ते सारे तसेच थांबून होते. त्यातल्या एकानेही हॉर्न वाजवून आम्हाला डिस्टर्ब केले नाही. आम्ही सारे रस्त्यातून बाजूला झाल्यावर दोन्ही बाजूंची वाहने शांतपणे निघून गेली. 
असा अनुभव आपल्याकडे येईल? 
साधे चित्र काढत असतानाही लोक आजूबाजूला घोळका करून गप्पा मारतील, चित्रावर कॉमेंट करतील, मोठमोठ्याने मोबाइलवर बोलतील... आणखी काय-काय करतील! 
अर्थात, भारतातही काही चांगले अनुभव येतात. जोधपूरला एका गल्लीत चित्रे काढत असताना, एका महिलेने अनवधानाने घरातून रस्त्यावर पाणी फेकले. ते आमच्या साहित्याच्या खालून वाहू लागल्यावर तिला चूक लक्षात आली आणि धावत जाऊन घरातून कपडा आणून ती चक्क रस्ता पुसायला लागली! तिला आम्ही रोखले. 
नाशिकला कपालेश्वर मंदिराच्या परिसरात एका घराच्या कोपऱ्यावर बसून लॅण्डस्केप करीत होतो. माझ्यासोबत २० ते २५ विद्यार्थीही होते. ते पाहून समोरच्या हॉटेलमालकाने आम्हा सर्वांसाठी मोफत चहा पाठवून दिला. त्याच्या नोकराने सांगितले की, ‘तुम्ही चित्र काढताय हे पाहून आमच्या मालकाला लई आनंद झाला. त्यांनी तुमच्यासाठी फुकट चहा पाठवलाय... आणि आणखी काही लागले तर सांगा असा निरोप दिलाय..’ 
- भारतात असे अनुभव खूप दुर्मीळ असतात.. पण ते येतात, हेही नसे थोडके!

नाशिक येथील चित्रकार 
राजेश व प्रफुल्ल सावंत या बंधूंनी आजवर अमेरिका, इटलीपासून ते चीनपर्यंत अनेक देशांत कलावंत म्हणून भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. 
तिथे निसर्गचित्रांची प्रात्यक्षिके सादर करताना अनेक प्रदर्शनांतही ते सहभागी झाले आहेत. 
काय होता त्यांचा तिथला अनुभव? विदेशी कलावंत, रसिकांचा प्रतिसाद, चित्रसाक्षरता आणि देशोदेशी 
अनुभवलेल्या कलासंस्कृतीविषयी 

प्रफुल्ल सावंत यांच्याशी संवाद

 

Web Title: Pictures from abroad!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.