प्लॅस्टिकबंदी- चांगले, वाईट आणि व्यवहार्य काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 06:02 AM2019-10-20T06:02:00+5:302019-10-20T06:05:04+5:30
प्लॅस्टिक घातक आहे; पण त्याचे अनंत उपयोगही आहेत. सरकारलाही एका बाजूला प्लॅस्टिकचा खप कमी करायचा आहे, तर दुसर्या बाजूला तो वाढवायचाही आहे. अशावेळी ‘सिंगल यूज प्लॅस्टिक’वर सरसकट बंदी घालण्यापेक्षा प्लॅस्टिकचा पुनर्वापर, त्याला पर्याय आणि त्यासंदर्भातील नव्या तंत्रांचा शोध या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत.
- विनय र. र.
एकदाच वापरून टाकून देण्याच्या प्लॅस्टिक उत्पादनावर टप्प्याटप्प्याने बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. एकदाच वापरून फेकून दिल्यामुळे प्लॅस्टिकचा कचरा होतो. नदी, नाले, शेते, जमीन, डोंगर, वाड्या, वस्त्या येथे ते अडकून पडते. प्लॅस्टिकमुळे गटारींमध्ये पावसाचे पाणी शहरांमध्ये तुंबून राहते.
पाणी पिण्याच्या प्लॅस्टिकच्या बाटल्यांवर पूर्वी स्पष्टपणे लिहिलेले असे की, या बाटल्या चिरडून, मोडून कचर्यात टाकाव्यात. पाण्याच्या बाटल्या एकदाच वापराव्यात असा संकेत त्यामुळे समाजामध्ये पसरला. वास्तविक पाण्याच्या बाटल्या किती काळ वापरता येतील, तर माझ्या मते पाण्याच्या बाटलीवर जी एक्स्पायरी डेट लिहिलेली असते, म्हणजे सुमारे एक वर्षापर्यंत तरी या बाटल्या पिण्याचे पाणी भरण्यासाठी वापरायला हरकत नसाव्यात.
नुसते पाणीच नाही तर आजकाल अन्य द्रवपदार्थ औषधे, तेले, दारू, सरबतेसुद्धा प्लॅस्टिकच्या बाटल्यांमधून विकली जातात आणि त्या अर्थाने या बाटल्यासुद्धा एकदाच वापरायच्या म्हणून मानल्या जातात.
प्लॅस्टिकच्या कॅरिबॅग तर जणू काही फेकून देण्यासाठीच असतात अशी सर्वांची समजूत झाली आहे कारण यासाठी कमी कमी दर्जा होत जाणारे प्लॅस्टिक वापरले जाते आणि एकदा कॅरिबॅग फुटली की निरूपयोगी होते. मात्न अशा टाकून दिलेल्या प्लॅस्टिकचा वापर करून ते डांबरामध्ये मिसळून पक्के आणि वर्षानुवर्षे चालणारे मजबूत, खड्डे न पडणारे रस्ते तयार करता येतात ही गोष्ट प्रयोग करून सिद्ध झाली आहे.
एकदाच वापरून फेकून देण्याचे अगदी साधे उदाहरण म्हणजे पत्नावळ. पत्नावळीमध्ये पान काड्यांनी जोडून एक पसरट ताट तयार करतात. अर्थात पाने आणि काड्या या बायोडिग्रेडेबल म्हणजे जैव विघटनशील असल्यामुळे त्याच्या कचर्याची माती आणि खतही होतं. आजही शहरांमध्ये ठिकठिकाणी कुल्फी विकणारे लोक याच पानांचा वापर करून पॅकिंगपण तयार करतात. पॅकिंग तर होतेच; पण ही पाने उष्णतेची दुर्वाहक आहेत त्यामुळे कुल्फी गार राहील याची खात्नीही होते.
प्लॅस्टिकच्या बाबतीत आणखी एक वापर होतो तो म्हणजे सिंगल यूज सिरींजचा. मध्यंतरी एड्सचा प्रभाव प्रचंड होता तेव्हा त्याचा प्रसार रोखण्यासाठी तसेच आरोग्यासाठी एका रु ग्णाला वापरलेली इंजेक्शनची सुई दुसर्या रुग्णाला वापरू नये, असा विचार समोर आला. पूर्वी इंजेक्शनच्या सुया आणि काचेच्या सिरिंज उकळत्या पाण्यात ठेवून निर्जंतुक करून त्या दुसर्यांसाठी वापर करण्याची आरोग्यकारक पद्धत होती. त्यामुळे धातू, काच यांचा खपही र्मयादित होत असे. मात्न आता केवळ सुयाच नाही तर पूर्ण सिरींजच एकदाच वापरून टाकून दिली जाते. ती प्लॅस्टिकची बनवलेली, प्लॅस्टिकच्या पिशवीत पॅक केलेली असते आणि त्यामध्ये अनेक ठिकाणी प्लॅस्टिकचा वापर केला जातो. प्लॅस्टिक विघटनाला 1000 वर्षे लागतात. भारत गरीब आणि काटकसरी लोकांचा देश आहे. प्लॅस्टिकच्या पुनर्वापराबाबात भारतात 60 टक्के, तर जगात 20 टक्के प्लॅस्टिक पुनर्वापरात येते.
सिंगल यूज प्लॅस्टिकबाबत व्याख्या स्पष्ट नाही अशी तक्र ार जिगीश दोशी (अध्यक्ष, प्लास्ट इंडिया फाउण्डेशन - प्लॅस्टिक संबंधित संस्था, संघटना, समूह यांची शिखर फाउण्डेशन) यांनी केली आहे. त्यांच्या मते एक कोटी थेट आणि दहा कोटी विसंबून लोकांची रोजीरोटी या प्लॅस्टिकबंदीमुळे बुडेल. सालिना 30-40 हजार कोटी रुपयांचा व्यवसाय संपेल.
पॅकिंग उद्योगामध्ये प्लॅस्टिकसारखे सर्वात उत्तम साधन उपलब्ध नाही. प्लॅस्टिकमध्ये अनेक गोष्टी साठवता येतात, त्यांची वाहतूक करता येते, त्यातून सांडलवंड होत नाही. त्यामुळे प्लॅस्टिकचा मोठय़ा प्रमाणात तसेच पॅकिंग उद्योगात वापर केला जातो.
भारतात सध्यातरी प्लॅस्टिकच्या पिशव्या, कप, प्लॅस्टिकचे चमचे, थाळ्या, 200 मिलीपेक्षा छोट्या बाटल्या, स्ट्रॉ, विशिष्ट प्रकारचे पाऊच यांच्यावर बंदी आहे. 2022 पर्यंत प्लॅस्टिकचे पूर्ण निर्मूलन करावे असे आता केंद्र सरकारने ठरवले आहे आणि राज्यांनाही तसे आदेश दिले आहेत.
दरडोई प्लॅस्टिक वापरामध्ये जगाची सरासरी 28 किलो एवढी आहे तर भारताची सरासरी अकरा किलो एवढी आहे. 2022 सालापर्यंत भारताला दरडोई प्लॅस्टिकचा खप 20 किलोग्राम करायचा आहे. एवढा खप झाला की आपण विकसित देशांमध्ये गणले जाऊ!
सध्या एकदाच वापरावयाचे प्लॅस्टिक एकूण प्लॅस्टिकच्या 50 टक्के खपते आहे. एका बाजूला प्लॅस्टिकचा वापर वाढविण्यासाठी प्रयत्न चालू आहे आणि दुसर्या बाजूला सिंगल यूज प्लॅस्टिक कमी करण्याचा प्रयत्न चालू आहे ही शर्यत नेमकी कशा प्रकाराने पुढे जाईल याबद्दल नीट काळजीपूर्वक लक्ष ठेवले पाहिजे.
रिकाम्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर - ‘या पिशव्या पंधरा रुपये किलो या दराने आम्ही परत घेऊ’, असे छापण्याची सक्ती आहे. मात्न व्यवहारामध्ये असा अनुभव येतो की ज्या कंपनीचा माल प्लॅस्टिक पिशवीत आहे तीच कंपनी तिच्या उत्पादनाच्या कव्हरसाठी वापरलेले प्लॅस्टिक परत विकत घेते. आपण काही एकाच कंपनीकडून एक किलो प्लॅस्टिक जमा होईल एवढा माल आणत नाही, त्यामुळे कायद्यामधला प्लॅस्टिक परत घेण्याच्या किमतीचा आदेश छापण्याची सक्ती केवळ एक औपचारिकताच राहते. याला व्यवहारात शून्य अर्थ आला आहे.
दुसर्या बाजूला प्लॅस्टिकच्या ऐवजी पॅकिंग मटेरिअल कोणते वापरायचे असा प्रश्न निर्माण होतो आणि त्यामध्ये कागद किंवा पुठ्ठा वापरावा अशा सूचना दिल्या जातात. मात्न एवढय़ा मोठय़ा प्रमाणात कागद पुठ्ठा तयार करणे यासाठी किती वनस्पतींचा, झाडांचा बळी द्यावा लागेल याचाही विचार करण्याची गरज आहे त्यामुळे असलेल्या प्लॅस्टिकचा पुनर्वापर करणे, पुनर्वापर करण्याच्या करण्याची नवीन तंत्ने शोधणे ही महत्त्वाची बाब राहते.
या बाबतीत अन्य देशांमध्ये कोणते कायदे केले आणि त्याचे काय परिणाम झाले आहेत हेही पाहणे उपयुक्त ठरेल. अमेरिकेमध्ये सेंट फ्रान्सिस्को येथे तसेच वॉशिंग्टन डीसी आणि बोस्टन येथे सिंगल प्लॅस्टिकवर 2017 सालापासून बंदी टाकण्यात आली. आत्तापर्यंत चाळीस हजार डॉलर दंड वसूल करण्यात आला. एवढेच नाहीतर रवांडा या छोट्याशा देशांमध्येसुद्धा प्लॅस्टिक बॅग आणि पॅकेजिंगवर पूर्णपणे बंदी आणली आहे. 2016 मध्ये फ्रान्समध्ये बंदी आणली. कॅनडामध्येही मॉँट्रियल ऑलिम्पिकपासून बंदी चालू आहे. जपाननेही विशेषत: प्लॅस्टिक बॅग, स्ट्रॉ, प्लॅस्टिकची भांडी आणि कप यांवर बंदी घातली आहे.
2 ऑक्टोबरपासून ज्या प्रमाणात सिंगल यूज प्लॅस्टिकवर बंदी घालण्याची हवा करण्यात आली होती त्याप्रमाणे कायदा करण्यात आला नाही. केवळ लोकजागरण, लोकांना प्लॅस्टिकचे दुष्परिणाम सांगणे एवढय़ापुरतीच आपली वाटचाल केंद्र सरकारने सीमित केली आहे. राज्य सरकारांनाही या प्रमाणे आदेश गेलेले आहेत. बंदी घालणे हा त्या प्रश्नापासून सुटण्याचा मार्ग नाही हे सरकारच्या लक्षात आले ही अतिशय चांगली गोष्ट झाली. त्यानिमित्त नवे पर्याय तपासले जातील.
प्लॅस्टिकचा वापर..
आपण काय करू शकतो?
आपण ज्या प्लॅस्टिक वस्तू वापरतो त्यांचा पुनर्वापर करता येईल अशा पद्धतीने त्यांची देखभाल करावी.
पॅकिंग मटेरिअल म्हणून ज्या प्लॅस्टिकचा वापर होतो त्याचं वर्गीकरण करणं महत्त्वाचं आहे.
योग्य ठिकाणी त्यांची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे.
आपण घरात साठवलेली वर्तमानपत्नाची रद्दी दुकानात नेऊन देतो त्याप्रमाणे घरात साठवलेलं प्लॅस्टिक हे प्लॅस्टिकच्या भंगारवाल्याला देणे हेही प्लॅस्टिकचे दुष्परिणाम रोखण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल ठरू शकतं.
त्या पुढचा भाग- जमा केलेल्या वर्गीकृत प्लॅस्टिकचा पुनर्वापर करणं. यामध्ये वेगवेगळ्या उत्पादक आणि पुनर्वापर करणार्या कंपन्या आधीच काम करत आहेत त्यांना अधिक प्रोत्साहन देण्याची गरज आहे.
याबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला नगरपालिकेचे उदाहरण महत्त्वाचे मानले पाहिजे. वेंगुल्र्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना मदतीला घेऊन प्लॅस्टिकचे वर्गीकरण कसे करावे याबद्दल वाड्या-वस्त्यांमध्ये माहिती देण्यात आली. सुका कचरा, नॉन बायोडिग्रेडेबल कचरा कोणत्या वारी, कोणत्या प्रकारचा कचरा गोळा करता येईल याबाबत एक नियम घालून दिला. उदा. सोमवारी प्लॅस्टिक, मंगळवारी थर्माकोल, बुधवारी कागद, गुरुवारी काच इ. अशा पद्धतीने त्या त्या वारी तो कचरा संकलित केला आणि त्याचा पुनर्वापर केला. त्यातून स्वच्छता तर झालीच; पण नगरपालिकेलाही उत्पन्न मिळाले.
छत्तीसगडमध्ये अंबिकापूर येथेही प्लॅस्टिकचे वर्गीकरण करून पुनर्वापरासाठी ते छोट्या उद्योजकांकडे दिलं. त्यामुळे प्लॅस्टिकचे दुष्परिणाम कमी झाले. गोव्यामध्ये पणजी, केरळमध्ये त्रिची, कर्नाटकमध्ये मैसूर, महाराष्ट्रात पाचगणी आणि कर्जत हीसुद्धा उदाहरणं आपल्यासमोर आहेत. कचर्यापासून पुनर्निर्मिती कशी करता येते हे त्यांनी दाखवून दिले आहे.
प्लॅस्टिक उत्पादक कंपन्यांनाही यामध्ये समाविष्ट करून घेण्याची अतिशय गरज आहे कारण या कंपन्यांना विशिष्ट प्रकारचे प्लॅस्टिक लागते. ते प्लॅस्टिक त्यांना सहज उपलब्ध होऊ शकत असेल तर त्यांच्या कच्च्या मालाच्या खर्चात आणि उत्पादन खर्चातसुद्धा कपात होऊ शकते आणि उत्पादन चांगलं आणि कमी किमतीत मिळू शकतं.
vinay.ramaraghunath@gmail.com
(लेखक मराठी विज्ञान परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष आहेत.)