पो:या ते वेटर, वस्ताद ते गवंडी!
By admin | Published: May 30, 2015 03:06 PM2015-05-30T15:06:24+5:302015-05-30T15:06:24+5:30
रोज किमान पाचशेची नोट! त्यामुळे ग्रामीण भागातले कामगार महानगरांकडे धावायला लागले. ग्रामीण भागातल्या या रोजगारटंचाईचा ‘फायदा’ झाला किशोरवयीन मुलांना. पूर्वी फडकं मारणा:या पो:याचा हॉटेलातला वेटर झाला. चहा-नाष्टय़ाची ऑर्डर घेणारा ‘वस्ताद’ महानगरात ‘गवंडी’ झाला! बापाएवढा ‘पगार’ आत्ताच कमावल्याचा गर्व त्याच्या चेह:यावर दिसायला लागला!.
Next
- ग्रामीण बालकामगारांच्या ‘प्रमोशन’ची धक्कादायक कहाणी!
सचिन जवळकोटे
चौकातल्या कॉर्नरवरच्या टपरीवर घोळका बसलेला. एकानं ‘कट’ चहाची ऑर्डर दिली. दुस:यानं हाक मारली, ‘ये बारक्याùù टेबलावर जरा फडकं मार की.’ समोरचं चुणचुणीत पोरगं हातात चहाचे चार-पाच ग्लास घेऊन आलं, ‘सायेब.. फडकं मारायला कुणीबी नाय.’ घोळक्यातून प्रतिप्रश्न आला, ‘मग तू काय करतोयंस?’ पुन्हा थाटात उत्तर आलं, ‘मी आता वेटर हाय.. फडकं-बिडकं मारायचं काम आपल्याकडं नाय!’ घोळका चमकला. कारण, ‘बारक्यानं फडकं घेऊन फक्त साफसफाईचंच काम करावं,’ या मानसिकतेला धक्का बसला होता; पण त्यांना कुठं माहीत होतं की, ‘ग्लोबलायङोशन’चा परिणाम तळागाळातल्या बालकामगारांवरही होत गेला होता.
या ‘बारक्या’ला जेव्हा ‘लोकमत’नं बोलतं केलं, तेव्हा हाती आली विस्मयचकित करून टाकणारी ब्रेकिंग न्यूज. उघडी झाली बालकामगारांच्या विश्वातल्या ‘प्रमोशन’ची धक्कादायक कहाणी. गेल्या दहा-पंधरा वर्षात मुंबई, पुणो, नाशिक, नागपूर अन् औरंगाबादसारख्या मोठय़ा शहराकडे ग्रामीण भागातल्या तरुणांचा लोंढा झपाटय़ानं वळलेला. ‘बारावीनंतरचं शिक्षण’ बिग सिटीत किंवा ‘दहावी नापास’नंतर रोजगारासाठीही याच शहरात. तालुक्याच्या ठिकाणी शंभर-सव्वाशे रुपयांचा मिळणारा रोजगार सोडून बहुतांश मंडळी महानगरातल्या बांधकाम क्षेत्रत घुसलेली; कारण तिथं त्यांना मिळतेय रोज किमान पाचशेची नोट. यामुळं झालं काय.. ग्रामीण भागातल्या रोजगार क्षेत्रत प्रचंड टंचाई निर्माण झाली. पाच-पन्नास रुपये जास्त पगार वाढवूनही कामगार मिळेनात. अशावेळी या पोकळीचा सर्वाधिक फायदा झाला किशोरवयीन मुलांना. चौदा ते वीस वयोगटांतील ही मुले हॉटेलिंगमध्ये शिरली. जिथं फडकं मारायला पूर्वी फक्त सत्तर-ऐंशी रुपये मिळायचे, तिथं खाऊन-पिऊन दोनशे रुपये खिशात खुळखुळू लागले. खेडय़ातला ‘बारक्या’ आता तालुक्यात ‘वेटरदादा’ बनला; कारण पूर्वी चहा-नाष्टय़ाची ऑर्डर घेणारा ‘वस्ताद’ आता महानगरात ‘गवंडी’ झाला. हातात फडकं घ्यायला टाळणारा हा बारक्या वेटर ऊर्फ चंदू सांगत होता, ‘म्या सातवी पास. गेल्या वरशी शाळा सोडली. माय म्हणत हुती ‘बक्कळ शिकायचं, पन् बापानं ईरोध केला. शिकूनशान काय फायदा? इंजिनरबी आजकाल बेकार राहिल्याती. तवा आत्तापासनं कामाला लाग, असं मोठय़ा दादानं सांगितलं. त्यो पुण्यामंदी मिस्त्री हाय. पुढच्या वरसापासनं त्याच्या हाताखाली म्याबी जाणार. तोपत्तूर इथंच च्या-भजी बगणार.’
चंदूच्या वयाएवढय़ा मुलांवर शिक्षणासाठी महिन्याला दोन-तीन हजार रुपये खर्च होत असताना हा मात्र तब्बल सहा हजार रुपये कमवत होता. विशेष म्हणजे त्याच्या खाण्या-पिण्याचा भारही घरच्यांवर नव्हता. त्याचं वय असावं अवघं तेरा-चौदा वर्षे; मात्र एवढय़ा कोवळ्या वयातही त्याला व्यवहारी जगाची झालेली जाणीव लक्षणीय होती, कौतुकास्पद होती; मात्र धक्कादायकही होती. आपण बालकामगार आहोत, हे त्याच्या ध्यानात नव्हतं, उलट बापाएवढा रोजगार आपण कमावतोय याचा त्याला गर्व होता.
सोसायटीत बायाक्काबरोबर घरोघरी जाऊन धुणी-भांडी करणारी ‘पमा’ ऊर्फ प्रमिला पंधरा वर्षाची. नुकतीच दहावीची परीक्षा देऊन सुट्टीत चार घरचं काम करू लागलेली. बायाक्का मोठय़ा कौतुकानं बोलू लागली,‘ माजी लेक लई गुणाची. गिरॅजूयेट हुणार हाय. मातूर कॉलेज फीपायी सुट्टीमंदी दोन महिने माज्यासोबत काम करू लागलीया. माजी जुनी घरं तिला दिली हायती. अन् म्या नव्या कामावर चालली हाय. चार घराचं बत्तीसशे रुपये तिला एका म्हैन्यात मिळाल्याती. आसं तीन म्हैन्याचं धा हजार रुपये तिच्याच खात्यामंदी म्या ठिवणार हाय.’
बायाक्का बोलत असताना प्रमिला मात्र मान खाली घालून पायाच्या अंगठय़ानं जमीन उकरत होती. तिला हे काम कदाचित आवडत नसावं; मात्र आपल्या पुढच्या शिक्षणाच्या खर्चासाठी तीनं नाईलाजानं हे काम स्वीकारलेलं. भविष्यात ‘उत्तम कर्मचारी’ बनण्यासाठी ती आता ‘बालकामगार’ होऊन घरोघरी फिरत होती. लोकांची उष्टी काढत होती. खरकटी भांडी विसळत होती. अकाली प्रौढत्व घेऊन लोकांचे उंबरठे ङिाजवित होती.. कारण, ती नुसतीच बालकामगार नव्हती; तर अस्वस्थ विद्यार्थिनीही होती.
गावाबाहेरच्या वीटभट्टीवर लाल मातीची टोपली उचलणारा ‘चिमण्या’ तसा अवघ्या बारा वर्षाचा. मातीच्या धुराळ्यातच तो जन्मलेला. वाढलेला. मोठा झालेला. लाल मातीच्या पलीकडं काही वेगळं विश्व असतं, हे या ‘चिमणलाल’ला आजपावेतो कधी माहीतच नव्हतं. कारण त्याचे आजोबा या भट्टीवर काम करता-करताच मेले. आई-वडिलांचं आयुष्यही इथंच काळवंडून गेलेलं. कच्च्या विटांच्या भिंतीना फाटक्या साडीचा झोपाळा बांधून त्यात ‘चिमण्या’ला लहानपणी झुलविलं गेलेलं. उपाशी पोटातल्या आगीपेक्षाही वीटभट्टीची धग लाखपटीनं चांगली, या वास्तवाची झळ पोहोचलेल्या कुटुंबात हा बिच्चारा मोठा झालेला. गावात ङोडपीची प्राथमिक शाळा होती. तिथं चौथीर्पयत त्याचं कसंबसं शिक्षण झालं. हायस्कूल मात्र शेजारच्या मोठय़ा गावात असल्यानं दगडी इमारतीकडं पाठ करून त्यानं विटांची रांग पसंत केलेली. बालकामगार म्हणजे काय, हे त्याच्या गावीही ठावूक नव्हतं. वडीलधा:यांच्या वेठबिगारीचा पिढीजात धंदा आपणही पुढं चालवितोय, एवढीच परंपरागत भावना त्याच्या मनात रुजलेली. मोठय़ा बहिणीच्या लग्नासाठी आई-वडिलांनी वीटभट्टी मालकाकडून पंचवीस हजार रुपये अॅडव्हान्स घेतलेले. त्याची परतफेड पगारातून करताना आपल्याही राबण्याची मदत होतेय, एवढीच जाणीव त्याला झालेली. मात्र, या कर्जफेडीला ‘हातभार’ लावताना आपले कोवळे ‘हात’ रोज किती ‘भार’ उचलताहेत, हे त्याला कुठं माहीत होतं. अन् त्याच्या अडाणी आई-वडिलांना तरी कुठं ठावूक होतं?
आठवडा बाजारात रस्त्याच्या कडेला मनगटावर बांधण्याची प्लॅस्टिकची अक्षरं विकायला बसलेली सुनीता तशी पूर्ण अशिक्षितच. मात्र, व्यवहारापुरतं आकडय़ांची सवय तिला झालेली.. अन् शब्द तयार करण्यासाठी अक्षरांची ओळख तिनं कशीबशी करून घेतलेली. चौदा वर्षाच्या सुनीताचा फोटो काढण्यासाठी फोटोग्राफर पुढं सरसावला, तशी ती गडबडली, डोळ्यांत पाणी काढून विनवण्या करू लागली. आपण ‘बालकामगार’ आहोत. हे कदाचित तिला ठावूक असावं. वडील आजारी होते म्हणून नाईलाजानं तिला हा व्यवसाय चालवावा लागलेला. तिच्या पाठीमागं अजून पाच छोटय़ा बहिणी होत्या. रोज पंधरा-वीस माळा विकत गेल्या तरच घरातल्या आठ जणांचं पोट भरतं, हे ती पूर्णपणो जाणून होती; म्हणूनच भर उन्हात रस्त्यावर बसून येणा:या-जाणा:यांची रिकामी मनगटं न्याहाळू लागलेली. आपल्या तळहातावरची भाग्यरेषा पुसट असावी म्हणूनच की, काय परक्यांच्या मनगटावर ती अक्षरांची माळ गुंफू लागलेली.
लिंबू-मिरचीचा ‘जॅकपॉट’!
शनिमंदिराजवळ लिंबू-मिरच्या विकणारी मंजू तर अवघी सात-आठ वर्षाची. झोपडपट्टीत राहणा:या मंजूची अपंग आई घरात या वस्तू तयार करायची. मग पहाटे लवकर उठून ही इवलीशी छोकरी एखादं मंदिर गाठायची. देवही कसे वारानुसार ठरलेले. शनिवार अन् पौर्णिमा-अमावस्या हे तिच्यासाठी जणू फुल्ल सिझनचे दिवस. आपल्या वस्तू नेमकं कोणं पटकन विकत घेऊ शकतं, हेही तिला अनुभवातून लक्षात आलेलं. त्यामुळं ‘कपाळावर गंध’ किंवा ‘तोंडी मंत्र’ असलेल्या श्रद्धाळू लोकांसमोर ती बरोबर लिंबू-मिरच्या धरायची. नवीकोरी कार तर तिच्यासाठी ज्ॉकपॉटच. गाडी किंवा घराला नजर लागू नये, म्हणून लोक तिच्याकडून ही वस्तू विकत घेत असले तरी तिच्या प्राक्तनाला लागलेली नियतीची नजर हटविण्याची किमया मात्र या शेकडो लिंबू-मिरच्यांना आजपावेतो जमली नव्हती; म्हणूनच ही अभागी पोर वयाच्या पाचव्या वर्षापासून ‘बालकामगार’ हा शिक्का ललाटी मारून वणवण फिरत होती.
(लेखक ‘लोकमत’च्या सातारा आवृत्तीचे प्रमुख आहेत.)