‘पोएट दि प्लास्टिक्स’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 06:04 AM2020-03-01T06:04:00+5:302020-03-01T06:05:08+5:30
जगप्रसिद्ध प्रॉडक्ट डिझायनर करीम रशिद. जागतिक दर्जाच्या हजारो ब्रँड्ससाठी काम करणारा हा कलावंत अतिशय विनयशील आहे. ते म्हणतात, उत्तम दर्जाची, सुंदर डिझाइनची प्रॉडक्ट्स जगाला देऊन हे जग सुसह्य बनविणे हे डिझायनर्सचे काम आहे. यासाठी मला फक्त एक पेन, संगीत व एक फोन एवढय़ा गोष्टी पुरेशा आहेत.
- सतीश पाकणीकर
मला अगदी स्पष्ट आठवतेय ती संध्याकाळ. नुकताच मी ऑफिसमधून घरी आलो होतो. इतक्यात आतल्या खोलीतून माझा मुलगा ध्रुव लगबगीनं बाहेर आला. त्याच्या चेहर्यावरचे भाव बघून मला लक्षात आले की याला काहीतरी सांगायचंय. तो त्यावेळी प्रॉडक्ट डिझाइनच्या शेवटच्या वर्षाला होता. मी त्याच्याकडे बघून ‘काय विशेष?’ असं विचारल्याक्षणी त्यानं सांगितलं की- ‘बाबा, माझी इंटर्नशिपसाठी निवड झालीय.’ माझ्या नजरेतून हे वाक्य काही विशेष नव्हतं. अशा निवडी होत असतातच. त्याच्या पुढच्या वाक्यानं मात्न मी जरा सावरून बसलो. ‘मी गेल्या महिन्यात न्यू यॉर्कमधल्या करीम रशिद यांना माझ्या कामाचे नमुने व माझ्या नवीनच केलेल्या वेबसाइटची लिंक पाठवली होती. त्यांची मेल आलीय. त्यांनी मला इंटर्न म्हणून निवडल्याचं कळवलंय.’ तो दिवस होता 29 एप्रिल 2015. ही मुलं किती वेगळ्या पद्धतीने विचार करतात आणि कृतीही करतात हा विचार मनात येता येता तो मला पुन्हा म्हणाला, ‘सप्टेंबरमध्ये यायला सांगितलंय.’
‘अरे, म्हणजे हातात फक्त चारच महिने आहेत आणि सर्व तयारी करायला लागणार!’ माझ्या तोंडून नकळत वाक्य बाहेर पडलं.
पुढच्या मिनिटाला मनात विचार आला की आत्ताच्या या काळात कोण कुठला डिझायनर ज्याचं नाव ‘करीम रशिद’ आहे, ज्याच्याबद्दल आपल्याला काही माहिती नाही अशा माणसाकडे, इतक्या लांब, एवढा खर्च करून मुलाला पाठवायचं म्हणजे जरा टेन्शनच. मी ध्रुवला म्हटले की ‘ बघू. आपण जरा चौकशी करू. मग ठरवू.’
‘अरे बाबा, मी सगळी माहिती मिळवल्याशिवाय त्यांना रिक्वेस्ट पाठवीन का?’ इति ध्रुव.
दुसर्या दिवशी माझ्या एका मित्नाकरवी मी पुण्यातल्या एका नामवंत प्रॉडक्ट डिझायनरकडे चौकशी केली व ध्रुवला तेथे पाठवावे का याच्यावर त्यांचे मत विचारले. पुण्यातल्या एका मुलाने, तेही ‘अंडर ग्रॅज्युएट’ असताना अशी रिक्वेस्ट पाठवणे, त्यावर करीम रशिद यांच्याकडून होकार येणे या सर्वांमुळे ते डिझायनरही चकित झाले होते. ते म्हणाले - ‘अरे, ज्याला आम्ही प्रॉडक्ट डिझाइनमधील देव मानतो खुद्द त्याने याला बोलावले आहे. यावर विचार करायचा नाही, तर लगेच कृती करायची.’ त्यांच्या या वाक्याने आम्ही निश्चिंत झालो होतो.
मी दुसर्याच दिवशी करीम रशिद यांची वेबसाइट बघितली. थक्क झालो. खरं तर स्वत:ची वेबसाइट बनवताना कोणीही चांगल्याच गोष्टी, चांगलेच फोटो दाखवणार ना? पण वेबसाइट पाहताना एक जाणीव झाली की, या माणसाने किती झपाट्याने आणि किती प्रचंड काम केले आहे. किती मोठा आवाका आहे या माणसाचा. जन्माने इजिप्शियन व कॅनडात वाढलेल्या या कलाकाराने न्यू यॉर्कमध्ये त्यावेळी साधारण तीन हजार प्रॉडक्ट्स डिझाइन केलेली, तीनशे महत्त्वाची अवॉर्ड्स, जगातल्या चाळीस देशांत फिरती, तेथील सर्व महत्त्वाच्या ब्रँड्ससाठी केलेले काम आणि टाइम मॅगझिनने- ‘अमेरिकेतील सर्वात प्रसिद्ध प्रॉडक्ट डिझायनर’ असे केलेले वर्णन या गोष्टी त्याला ‘डिझायनर’ लोक देव का मानतात हे सिद्ध करण्यास पुरेशा होत्या. मी लगेचच ध्रुवच्या अमेरिकन व्हिसाच्या तयारीला लागलो.
आवश्यक असलेले सर्व फॉर्म्स, फोटो, सर्टिफिकेट्स, बँकेतील ठेवींच्या पावत्या, घराची कागदपत्ने. एक एक करताना दीड महिना कसा गेला ते कळलेही नाही. बरेच मोठे बाड तयार झाले आणि आम्ही मुंबईतील अमेरिकन कॉन्सुलेटमध्ये पोहोचलो. ही मोठी गर्दी. साधारण तीन-चारशे व्हिसाउत्सुक आत गेले. त्यांच्या बरोबर आलेले बाहेरच जास्त उत्सुकतेने ताटकळले. मग एक-एक उमेदवार बाहेर येऊ लागले. व्हिसा मिळाल्याने अतिआनंदी झालेले काही, तर तो रिजेक्ट झाल्याने रडतच बाहेर आलेले काही. ध्रुव बाहेर आला. त्याच्या चेहर्यावर कोणतेच भाव नव्हते. मला उमगेना, काय झाले असेल ते! तो भेटला आणि म्हणाला- ‘बाबा, मला त्यांनी दोनच प्रश्न विचारले. एक म्हणजे ‘जे-वन’ व्हिसा म्हणजे काय हे माहीत आहे ना? (तेथून आल्यावर किमान दोन वर्षे परत अमेरिकेस जाता येणार नाही.) आणि दुसरा म्हणजे तेथे कशासाठी जात आहेस?’ मी त्यांना उत्तर दिले- ‘करीम रशिद यांच्याकडे इंटर्न म्हणून जात आहे.’ त्या माणसाने करीम रशिद यांची वेबसाइट बघितली आणि मला म्हणाला- ‘ यू आर व्हेरी फॉच्यरुनेट टू वर्क विथ करीम रशिद. गो अँण्ड कलेक्ट युअर व्हिसा फ्रॉम पुणे ऑफिस.’ आम्ही दीड महिना खर्चून जमवलेले बाड त्याने बघितलेही नाही. करीम रशिद यांच्या नुसत्या वेबसाइटने सारे काम केले होते.
15 सप्टेंबर 2015 या दिवशी ध्रुव मॅनहॅटन येथील करीम रशिद स्टुडिओत पोहोचला. त्यातच त्या आठवड्यात 18 सप्टेंबरला करीम रशिद यांचा 55वा वाढदिवस होता. तो वाढदिवस स्टुडिओत साजरा केला गेला. वयाने सर्वात लहान असलेला ध्रुव त्यांच्यात एकदम मिसळून गेला. इतका की, नंतर एकदा त्याचा मला अचानक फोन आला. ‘बाबा, आज काय झालं माहीत आहे का? अरे आज करीम रशिद यांनी मला शेजारी बसून फॉर्म व स्पेस थिअरी शिकवली. जवळजवळ दीड तास.’
आपल्या स्टुडिओत आलेल्या एका परदेशी विद्यार्थ्यास, की जो इंटर्न म्हणून काहीच महिने राहणार आहे, त्याला स्वत:चा किमती वेळ घालवून फॉर्म व स्पेस थिअरी कोण शिकवेल? अशी व्यक्ती जी स्वत:च्या कामावर, डिझाइन या विषयावर निरंतर प्रेम करणारी व त्याबद्दल तळमळ असणारी असेल. करीम रशिद ही अशी व्यक्ती आहे. करीम रशिद एक मोठा ब्रँड आहे आणि हा ब्रँड एक-दोन दिवसात बनलेला नाही तर त्यामागे छोट्या–छोट्या गोष्टीतून केलेला, जपलेला विचार आहे. किती छोट्या गोष्टीतून? - तर, एकदा ‘मायोरी’ या ब्रँडसाठी काही काम करत सगळी टीम स्टुडिओत उशिरापर्यंत थांबली होती. अर्थातच ध्रुवही. लवकर घरी गेलेले करीम त्यांच्या लहानग्या तीन वर्षांच्या ‘किवा’ या मुलीला कडेवर घेऊन आले. त्यांनी त्यांच्या सहायकाला सांगितले की तिला त्यांच्या ऑफिसमध्ये बसव व चित्न काढण्यासाठी कागद व रंगीत पेन दे. ते ब्रँडसाठी काम करणार्या त्यांच्या टीमपाशी आले. टीमने केलेले काम बारकाईने पाहू लागले. काही सूचनाही करू लागले. त्यांच्या केबिनमध्ये व टीम जेथे होती त्यामध्ये मोठे काचेचे पार्टिशन होते. थोड्या वेळाने हातात त्या टीमचे व तेथे उभ्या असलेल्या करीम यांचे काढलेले चित्न घेऊन किवा तेथे आली. सर्वांनाच ते चित्न आवडले. करीम यांनी किवाला मांडीत बसवले व तिला ते चित्न कशाचे आहे हे विचारले. तिनेही वर्णन केले. मग करीम म्हणाले- ‘कोणी काढलंय हे चित्न?’ किवा म्हणाली- ‘मी !’
‘म्हणजे कोणी? - तर किवाने. मग चित्नाच्या खाली किवाचे नाव नको का?’ असे म्हणत त्यांनी चित्नाच्या खाली तिला तिचे नाव लिहायला लावले. ब्रँडची सुरु वात इतक्या लहान गोष्टीपासून होते.
असाच एकदा ध्रुवचा फोन आला की करीम रशिद मुंबईत एका कार्यक्रमात की-नोट स्पीकर म्हणून येणार आहेत. तुम्ही त्यांना तेथे जाऊन भेटाल का? ही मोठीच संधी होती. मी नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. आमची नावे प्रिंट केलेले बॅजेस आठवड्यात माझ्या पत्त्यावर पोहोचले. आम्ही तिघेही भाऊ वेळेच्या आधीच तेथे पोहोचलो. त्यांना आधीच भेटायचे हा विचार मनात ठेवून. थोड्याच वेळात दरवाज्यापाशी गडबड-लगबग जाणवली. कॉरिडॉरमधून आयोजकांबरोबर पांढर्या शर्टवर घातलेला फिकट गुलाबी सूट, गुलाबी शूज व पांढर्या फ्रेमचा चष्मा, उजव्या हातात गुलाबी पट्टा असलेले अँपल वॉच अशा वेशातील साडेसहा फूट उंचीचे करीम रशिद आत आले. गुलाबी रंग अतोनात आवडणारे करीम स्वत:ची वेशभूषाही स्वत:च डिझाइन करतात. अगदी शूजपर्यंत सर्वकाही. कार्यक्र म सुरू व्हायला काही वेळ होता. त्यामुळे ते पुढील रांगेत येऊन बसले. त्यांना भेटण्याची ही चांगली संधी होती. आम्ही पुढे गेलो. मी हात पुढे करून माझी ओळख करून दिली, ‘वेलकम टू इंडिया. आय अँम सतीश पाकणीकर.’ शेक हँड करीत ते म्हणाले- ‘ध्रुवज फादर?’ मी मान हलवली. एवढय़ा व्यापातून वेळ काढून एखाद्या टॉकसाठी जायचं तर त्यातही हा माणूस काय काय गोष्टी लक्षात ठेवतो? अर्थात अशा पदापर्यंत पोहोचायचे तर सर्व बारीकसारीक आठवणी ठेवाव्याच लागत असणार यांना. माझा विचार पूर्ण होईपर्यंत ते मला म्हणाले, ‘ध्रुव इज डुइंग वेल. ही इज एन्जॉइंग द वर्क.’ - माझ्यासाठी, एका बापासाठी याच्यापेक्षा काय जास्त हवे असणार?
कार्यक्र म सुरू झाला. सगळे स्टेजवर जाऊन बसले. बर्याच जणांची भाषणे होती. माझं सगळं लक्ष करीम रशिद यांच्याकडे होतं. भाषणं ऐकताना ते बराचसा वेळ त्यांच्या हातातल्या कागदावर स्केचिंग करीत होते. नंतर त्यांच्या भाषणाची वेळ झाली. त्यानंतर अर्धा तास बेसिक डिझाइनवर ते जे काय बोलले ते म्हणजे कमीत कमी वेळात जास्तीत जास्त मजकूर र्शोत्यांपर्यंत पोहोचवण्याचं उत्तम प्रात्यक्षिक होतं. आणि हो. स्केचिंग करताना ऐकलेल्या भाषणातील संदर्भ त्यांनी चपखलपणे गुंफले होते. मल्टिटास्किंगचा आदर्श नमुना.
‘बदलत्या सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय मुद्दय़ांचा विचार करत डिझायनर्सनी आपली कला सादर केली पाहिजे. त्या बरोबरीनेच मानवी अनुभव, भावना, कार्यक्षमता, उत्पादनक्षमता, नवीन सामग्री व नवीन प्रक्रिया यांचा सखोल विचार करीत मानवी पातळी लक्षात ठेवून सहज-सोपी व टिकाऊ अशी संरचना करणे गरजेचे आहे. सौंदर्य शास्र हे मानवाचा विचार करीतच अंमलात आले पाहिजे. अशाप्रकारे जर डिझाइन वापरले तर सौंदर्याबरोबरच आरामदायकता, कार्यक्षमता व उपयुक्तता यांचा अनुभव आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही. खराब डिझाइन अडचणी निर्माण करते, तणाव निर्माण करते, गुंतागुंत निर्माण करते तर चांगली रचना मानवी वर्तनही बदलू शकते व नवीन सामाजिक परिस्थिती तयार करू शकते. डिझाइनचे सौंदर्य साधेपणात आहे. डिझाइन ही आत्ताच्या काळात जगण्याची कला आहे. मनुष्य दिवसात सरासरी सहाशे वस्तूंना स्पर्श करतो. त्यामुळे डिझायनरकडे मानवाचे आयुष्य उन्नत करण्यासाठी भरपूर संधी आहे. ‘उत्तम दर्जाची, सुंदर डिझाइन्स असलेली प्रॉडक्ट्स जगाला देऊन हे जग सुसह्य बनविणे हे डिझायनर्सचे काम आहे. यासाठी मला फक्त एक पेन, संगीत व एक फोन एवढय़ा गोष्टीही पुरेशा आहेत.’ इति करीम रशिद.
त्यानंतर परत एकदा, नुकतेच 21 नोव्हेंबर 2019 रोजी करीम रशिद मुंबईत व्याख्यानाला आले होते. यावेळीही त्यांच्या तशाच गुलाबी सुटात. यावेळीही त्यांच्याशी संवाद साधता आला. त्यांची काही प्रकाशचित्नेही टिपता आली. अगदी त्यांना रिक्षात बसवून फोटो टिपता आले. महत्त्वाचे म्हणजे तेथून शिकून पुण्यात आलेल्या ध्रुवबरोबर आजही त्यांचा उत्तम संपर्कआहे.
जागतिक दर्जाने हजारो ब्रँड्ससाठी काम करणारा हा कलावंत इतका विनयशील कसा, असा प्रश्न मनात येतो न येतो तोच त्याचं लगेचच उत्तरही मिळतं, ‘जेव्हा विचारात स्पष्टता असते, आपल्या कामावर प्रेम असते आणि काही करून दाखवण्याची ऊर्मी असते त्यावेळी जगाचे जीवन सुखमय करणार्या तीन हजारहून जास्त प्रॉडक्ट्सची निर्मिती एखादा डिझायनर करू शकतो. पॉलिप्रॉपेलीन (अर्थात प्लॉस्टिक) या घटकाचा यथोचित आणि प्रचंड वापर करीत मानवाला रंगीबेरंगी प्रॉडक्ट्सच्या दुनियेत घेऊन जातो त्याचं नाव असतं करीम रशिद. ‘पोएट दि प्लास्टिक्स’ असे सार्थ नामाभिधान मिळणारा तो कलाकार असतो करीम रशिद!
sapaknikar@gmail.com
(लेखक प्रसिद्ध प्रकाशचित्रकार आहेत.)