पोएट ऑफ द वेस्ट'
By admin | Published: April 29, 2014 03:35 PM2014-04-29T15:35:01+5:302014-04-29T15:35:01+5:30
सफाई कामगारांची फलटण ‘येस सर’चा नारा देत आव्हान स्वीकारल्याचं दर्शवते. इराणीयन दिग्दर्शक मोहम्मद अहमदी यांच्या ‘पोएट ऑफ द वेस्ट’ या चित्रपटातील हे आरंभीचे दृश्यच आपल्याला खिळवून ठेवते. कल्पकता व अर्थपूर्णतेचे मिश्रण यात आहे.
सफाई कामगारांची फलटण ‘येस सर’चा नारा देत आव्हान स्वीकारल्याचं दर्शवते. इराणीयन दिग्दर्शक मोहम्मद अहमदी यांच्या ‘पोएट ऑफ द वेस्ट’ या चित्रपटातील हे आरंभीचे दृश्यच आपल्याला खिळवून ठेवते. कल्पकता व अर्थपूर्णतेचे मिश्रण यात आहे.
पडद्यावर शीर्षके उमटतात आणि मागोमाग बुटांचे खाटखाट असे आवाज येतात. जणू सैन्याचे संचलन चालले आहे वा ते मोहिमेवर निघाले आहेत. ध्वनीची तीव्रता वाढत जाते. शीर्षके संपतात आणि दिसतात केशरी रंगाचा युनिफॉर्म परिधान केलेले आणि हातात झाडू घेतलेले सफाई कामगार. झाडूही बंदुकीसारखा खांद्यावर घेतलेला.
मध्येच रस्त्याच्या कडेला पडलेला कचरा दिसतो. त्यातले उंदीर दिसतात. वेळ भल्या पहाटेची. मग दुरून येणारी कचर्याची गाडी आणि रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या कचर्याच्या पिशव्या उचलीत गाडीत टाकणारे सफाई कामगार दिसतात. ही वरात अशी पुढे येत असताना त्यातलाच कुणी तरी आपली गोष्ट सांगायला लागतो.
‘‘काल रात्री मी पंचवीस वर्षांचा झालो. मला कालपर्यंत कल्पना नव्हती, की इराणमध्ये तीस लाख बेकार आहेत. पण नगरपालिकेने तीन हजार नोकर्या उपलब्ध करून दिल्यात. म्हणजे हजारामागे एक.. आणि मी नशीबवान ठरलोय. हजारातला एक. मी नशीबवान आणि नऊशे नव्याण्णव कमनशिबी.’’
गाडी हळूहळू पुढे सरकतेच आहे. मागून येणारे कामगार आजूबाजूच्या पिशव्या गाडीत फेकत आहेत. ‘‘परंतु मला नोकरी सहजासहजी मिळालेली नाही. त्यासाठी मला तीन कठीण परीक्षा द्याव्या लागल्या. पहिली परीक्षा विज्ञानविषयक.’’
कचर्याची पिशवी जड असावी. दोघं दोघं उचलताहेत. आता वेगळाच आवाज ऐकू येतो. ‘‘सूर्यमालेविषयीचा केपलरचा तिसरा सिद्धांत कोणता?’’ हे ऐकू येतायेताच वर्ग दिसतो. फळ्याशी उभा असलेला चष्मीश तरुण दिसतोय. मग तो फळ्यावर सूर्यमालेची आकृती काढतो. बाजूला केपलरचा गणिती सिद्धांत मांडू लागतो. मध्येच मग तोच रस्त्यावर कचरा उचलताना दिसतो. आता त्या सफाई कामगारांच्या बटालियनपैकी कोण आपली गोष्ट सांगतंय ते स्पष्ट होतं.
आता पुन्हा वर्ग दिसतो आणि हा फळ्यावर अजून तो सिद्धांत मांडताना दिसतो. ओळीमागून ओळी चालूच आहेत. पलीकडे परीक्षक दिसतो. पुन्हा हा आपल्या साथीदारांबरोबरच कचरा उचलताना दिसतो.
‘‘दुसरी परीक्षा धर्मविषयक होती.’’ आता तो मशिदीत दिसतो. त्याच्या समोरचा माणूस दिसत नाही. सलाम, वालेकुम सलामचा औपचारिकपणा पार पडतो. परीक्षा सुरू होते.
‘‘तुझा धर्म कोणता?’’
‘‘इस्लाम.’’
‘‘दिवसातून किती वेळा नमाज पढतोस?’’
‘‘तीन वेळा. एकदा सूर्याेदयापूर्वी, दुसर्यांदा माध्यान्ही आणि मग सायंकाळी.’’
‘‘नमाज पढून दाखव.’’
हा उठतो. नीट उभा राहतो. कानावर हात ठेवीत सुरू करतो-
‘‘अल्ला हो अकबर..’’
आता तो रस्त्याच्या कडेला खाली बसून गटार उपसताना दिसतो.
‘‘तिसरी परीक्षा ही राजकीय स्वरूपाची होती.’’ एक ऑफिस दिसतं. हा समोर बसलेला. या बाजूला मुलाखत घेणारा.
‘‘तू लेफ्टीस्ट आहेस की रायटिस्ट?’’
‘‘मी असा टोकाचा नाही.’’
‘‘म्हणजे तू कोणाच्याच बाजूचा नाहीस का?’’
‘‘नाही म्हणजे मी नोकर्यांच्या बाजूचा आहे. मला जगायचंय आणि मला चांगली माणसं आवडतात.’’
‘‘स्पष्ट सांग. तू लेफ्टीस्ट आहेस की रायटिस्ट?’’
‘‘मला नाही माहीत. कारण हे दोघेही बदलत राहतात. काल जे लेफ्टीस्ट ते आज रायटिस्ट झाले आणि उद्या पुन्हा लेफ्टीस्ट होतील. जे आज रायटिस्ट आहेत ते उद्या लेफ्टीस्ट होतील. मला खरंच कळत नाही. मी गोंधळलोय.’’
‘‘आम्हाला अशी तुझ्यासारखी गोंधळलेली माणसं नकोत. तू नापास. निघ आता.’’ तो उठतो. केबिनच्या दाराशी जातो. वळतो.
‘‘सर, मला माफ करा. पण जेव्हा लेफ्टीस्ट चांगले असतात तेव्हा मी लेफ्टीस्ट असतो आणि जेव्हा रायटिस्ट चांगले असतात तेव्हा मी रायटिस्ट असतो. आता तुम्हीच मला सांगा सर, लेफ्टीस्ट चांगले की रायटिस्ट?’’
पुन्हा पहिले दृश्य दिसते. केशरी रंगाचा युनिफॉर्म परिधान केलेले आणि हातात झाडू घेतलेले सफाई कामगार. झाडूही बंदुकीसारखा प्रत्येकाने खांद्यावर घेतलेला. सारे अटेन्शनमध्ये उभे. समोर त्यांचा प्रमुख आहे, जो दिसत नाही; मात्र त्याचा करारी आवाज ऐकू येतोय. तो त्याच्या ‘सैन्या’ला लढय़ासाठी सज्ज राहण्याचा आदेश देतो आहे.
‘‘तुम्ही स्वच्छतेची मोहीम हाती घेतली आहे आणि सर्व प्रकारच्या प्रदूषणाशी तुम्हाला प्राणपणानं लढायचं आहे. उंदरांची पैदाइश बेफाम वाढली आहे. त्यांच्याशीही तुम्हाला लढायचं आहे.’’
सफाई कामगारांची फलटण ‘येस सर’चा नारा देत आव्हान स्वीकारल्याचं दर्शवते. इराणीयन दिग्दर्शक मोहम्मद अहमदी यांच्या ‘पोएट ऑफ द वेस्ट’ या चित्रपटातील हे आरंभीचे दृश्य आहे. इराणीनय सिनेमाला नव्वदच्या दशकात जागतिक पातळीवर नेणारे मोहसिन मखमलबाफ यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. परंतु असा प्रतिभावंत जरी साथीला असला तरी अहमदी यांनी आपले वेगळेपण राखले आहे. त्यांचा चित्रपट मखमलबाफ यांच्या चित्रपटांपेक्षा निश्चितच वेगळा ‘दिसतो’. सिनेमॅटोग्राफीचं शिक्षण घेतलेले अहमदी यांनी स्वत:च्या हाती कॅमेरा न घेता आपल्या संकल्पनेतली दृश्यात्मकता छायाचित्रकार मोहम्मद अलदपुश यांच्या मदतीने नेमकी साधली आहे. त्यांची चित्रपट माध्यमावरची पकड चित्रपटभर जाणवत राहते.
तीन-तीन परीक्षा पार करीत ही सफाई कामगाराची नोकरी मिळविणारा कथानायक पदवीधर आहे. परंतु त्या बटालियनमध्ये तो असा एकटाच नाही. इतरांच्याही कथा अशाच आहेत. उच्च शिक्षण घेऊनसुद्धा नोकरी मिळत नाही असा हा अभूतपूर्व बेकारीचा काळ आहे. केवळ इराणच नव्हे, तर जगभर ही परिस्थिती आहे. या सफाई कामगारांपैकी एकाला तर पायलट व्हायचं होतं; परंतु त्याच्याही हाती झाडूच आला. विमानाचा आवाज कानांवर आला की रस्ते साफ करता करता त्याचा हात थांबतो आणि तो वर आकाशाकडे विमान दिसेनासे होईपर्यंत पाहतो. कष्टी होतो आणि पुन्हा साफसफाईला लागतो.
जागतिकीकरणानंतर जगभरच पसरलेल्या बेकारीचं आणि त्यामुळे शिकल्या-सवरल्या तरुण पिढीचं हतबल होणं याकडे लक्ष वेधतानाच दिग्दर्शक मोहम्मद अहमदीने, ल्ली ेंल्ल२ ३१ं२ँ ्र२ ंल्ल३ँी१ ेंल्ल२ ३१ीं२४१ी या उक्तीचा उपयोग करून घेत, अस्वस्थ करणार्या वास्तवाला ब्लॅक ह्युमर पद्धतीने अतिशय सहजतेनं हाताळलंय.
कवी मनाच्या या काहीशा गमत्या माणसाला दारोदार कचरा गोळा करत जाताना असंच एक ‘ट्रेजर’ सापडतं. कुणी तरी लिहिलेल्या चिठ्ठय़ांचे तुकडे..! तो ते जुळवतो. वाचतो. आणि मग त्या चिठ्ठय़ा लिहिणारीचा शोध घेतो. तिचा प्रेमात पडतो. व्यक्त मात्र कधीच करत नाही. तिच्या आसपास राहण्याचा सतत प्रयत्न करतो.. आणि तिच्या ते लक्षात येणार नाही याची काळजीही घेतो. ती अडचणीत असते तेव्हा तिला मदतही करतो.
उच्च मध्यमवर्गीयांच्या त्याच वस्तीत असाच तो एका कवीच्या संपर्कात येतो. त्याच्या दारावरचा कचरा गोळा करताना कागदाचे बोळे त्याला सापडतात. तो ते उघडून वाचतो. त्या न जमलेल्या कविता असतात. तो मग त्या कवीशी बोलतो. त्याच्या कविता म्हणून दाखवतो. आपला चाहता भेटल्याचा कवीलाही आनंद होतो. हा कवीला, कविता कशी लिहायची असंही विचारतो. कवी त्याला आपला कवितासंग्रह भेट देतो.
चित्रपटातल्या वर वर्णन केलेल्या प्रसंगात सैनिकी वातावरणाची केलेली योजना भलतीच कल्पक आणि अर्थपूर्ण आहे. सुरुवात होते सैनिकी संचलनाच्या वेळी होणार्या बुटांच्या खाडखाड ध्वनीने आणि या प्रसंगाचा शेवट होतो तोही सैनिकी पद्धतीने दिल्या जाणार्या आदेशाने! जगभर साचत चाललेला कचरा आणि त्यातून निर्माण झालेलं प्रदूषण याच्याशी अशीच युद्धसदृश लढाईच करायला हवी हेच यातून सूचित केलं जातं. आणि हा केवळ डोळ्यांना दिसणाराच कचरा आणि प्रदूषणच नव्हे तर त्याही पलीकडे एकूणच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांत पसरलली घाण याकडेही लक्ष वेधलं जातं आहे. या प्रसंगात कथानायक आपली गोष्ट सांगताना नोकरीसाठी दिलेल्या तीन परीक्षांबद्दल बोलतो. व्यवस्थेतला सारा फोलपणाच त्यातून उघडा पडतो. अगदी पोथीनिष्ठांच्या एकांगी वृत्तीसकट! कथानायक अतिशय सहजपणे साकारणारा फरझीन मोहदेस हा अभिनेता आणि एकही शब्द न बोलता बोलक्या चेहर्याने सारं काही व्यक्त करणारी लैला हतामी ही अभिनेत्री यांचा हा चित्रपट अविस्मरणीय ठरण्यात मोलाचा वाटा आहे.
(लेखक भारतीय व जागतिक चित्रपटांचे व्यासंगी अभ्यासक, दिग्दर्शक व परीक्षक आहेत.)