कोवळी सहानुभूती

By Admin | Published: May 10, 2014 05:49 PM2014-05-10T17:49:23+5:302014-05-10T17:49:23+5:30

शाळेच्या बाहेर गोळ्य़ा बिस्कीटं विकणारा एक लहान मुलगा आणि शाळेत शिकणारी काही मुलं यांची छान मैत्री जमली. आपल्या या गरीब मित्राविषयी एक प्रामाणिक सहानुभूती, ममत्त्व आणि शब्दापलीकडचं एक नातं निर्माण होत गेलं. त्यातूनच आपल्या या मित्रालाही आपल्यासारखं शिकता यावं म्हणून शाळेतल्या मुलांनी स्वत:हून पुढाकार घेतला..

Poor sympathy | कोवळी सहानुभूती

कोवळी सहानुभूती

googlenewsNext

 प्रा. डॉ. द. ता. भोसले

 
शाळेच्या बाहेर गोळ्य़ा बिस्कीटं विकणारा एक लहान मुलगा आणि शाळेत शिकणारी काही मुलं यांची छान मैत्री जमली. आपल्या या गरीब मित्राविषयी एक प्रामाणिक सहानुभूती, ममत्त्व आणि शब्दापलीकडचं एक नातं निर्माण होत गेलं. त्यातूनच आपल्या या मित्रालाही आपल्यासारखं शिकता यावं म्हणून शाळेतल्या मुलांनी स्वत:हून  पुढाकार घेतला..
 
 
एका नामवंत शिक्षण संस्थेचे बालवाडी ते बारावीपर्यंतचे शिक्षण देणारे एक भव्य शिक्षण-संकुल शहराच्या उपनगरात साकार झालेले. वसंतनगर, शारदानगर आणि सुयोगनगर या परिसरातील जवळजवळ सारी मुले-बालके येथेच प्रवेश घेतात. शिकून मोठी होतात. भव्य इमारती, प्रशस्त क्रीडांगण, उत्तम शिस्त आणि कर्तव्यदक्ष शिक्षकवर्ग यांमुळे या संस्थेने स्वत:ची चांगली प्रतिमा निर्माण केलेली. शिक्षण आणि संस्कार, शिक्षण आणि व्यक्तिमत्त्व विकास, शिक्षण आणि समाजभान यांचा एक सुरेख संगम या संस्थेने साधलेला आहे.
तो शाळेचा शेवटचा तास असल्याने बरीच मुले क्रीडांगणावर खेळत होती. प्रत्येक वर्गाचा छोटासा गट एखाद्या कोपर्‍यात खेळ खेळण्यात रंगून गेलेला होता. इयत्ता सहावीच्या सात-आठ मुलांचा गट फुटबॉल खेळण्यात दंग होता. खेळ अगदी रंगात आला होता. तेवढय़ात एका विद्यार्थ्याने बॉलला पायाचा असा टोला लगावला, की तो चेंडू प्रवेशद्वाराच्या बाहेर असलेल्या गच्च झाडी-झुडपांत गायब झाला. नशीब, तिथेच प्रवेशद्वारासमोर गोळ्या, चॉकलेट विकणार्‍या एका छोट्या मुलाच्या डोक्यात चेंडू आदळला नाही. तो लहान मुलगा थोडासा बाजूला सरकला आणि त्याच्या जवळून जाणार्‍या चेंडूकडे तो बघत राहिला. तेवढय़ात एका क्षणात आपल्या सावजाचा पाठलाग करणारा एक मोठा साप सळसळत त्या झाडीत घुसला. दिसेनासा झाला. खेळणारी तीन पोरे चेंडू शोधण्यासाठी बाहेर आली. त्यातली दोन मुले त्या झुडपाकडे जात असतानाच या गोळ्या विकणार्‍या अकरा वर्षांच्या छोट्या पोरानं धावत-धावत त्यांना अडवले. घाबरलेल्या आवाजात तो म्हणाला, ‘‘तिकडं जाऊ नका चेंडू आणायला. आताच एक भला मोठा सोप तिथं जाताना पाहिलाय मी. डसला पायाला तर काय करणार तुमी? उद्या सकाळी मी तुम्हाला काढून देईल.’’ त्यानं हे नुसतं सांगितले, तरी या खेळणार्‍या मुलांचा थरकाप झाला.
आणि खरेच सकाळी शाळा भरताना या पोरानं चेंडू शोधून त्या मुलांच्या हवाली केला. सुनील, राकेश आणि अमोल अशी त्यांची नावं होती. त्यांनीच त्याला ही आपली नावे सांगितली. त्या दिवसापासून यांची ओळख झाली. ओळखीतून मैत्री जुळली. पुढे-पुढे तिला अधिक जिव्हाळ्याचे रूप लाभत गेले. मधल्या सुट्टीत हे तिघेही त्याच्याकडून गोळ्या, चॉकलेट घेऊ लागले.
त्याचे सारे आयुष्यच समजत गेले. त्याचे नाव होते गोविंदा. वय सुमारे अकरा वर्षांचे. मराठवाड्यातल्या कुठल्या तरी दुष्काळी खेड्यातून आईबापाबरोबर पोट भरण्यासाठी या शहरात आलेला. एकदा तो निरागस भावनेने यांना म्हणाला, ‘माजा बाबा मजूर म्हणून बांधकामावर काम करतो. जवळच आहे हे बांधकाम. तिथंच एका छोट्या खोपीत आमी र्‍हातो. आई लगनाची जेवणं करणार्‍या आचार्‍याकडे कामाला जाती. मीसुद्धा वाढप्याचं काम करतो. आईबरुबर मलाबी रोजगार मिळतो. भरपेट जेवायला मिळतं. कधी-कधी तर उरलेला सारा भात-भाजी मालक देतो. उरले तर जिलेबी, गुलाबजामसुदिक खायला मिळतात. मालकानं दिले, तर तुमालाबी एकदा मी गुलाबजाम खायला देईन.’’ त्यानंतर न राहवून अमोलने त्याला विचारले, ‘‘आणि तुझ्या शाळेचं कसं रे? जातोस का नाही?’’ चेहरा वेडावाकडा करत तो म्हणाला, ‘‘माझ्या बाबानं घातलं न्हायी. त्याची कामाची ठिकाणं बदलतात. गावंसुद्धा बदलतात. पुढच्या साली घालतो तुला साळेत, असा तो म्हणतो. मलापण तुमच्यावानी शाळेत जावंसं वाटतं. गुरुजीच्या मागं गाणी म्हणावीशी वाटतात. खेळ खेळावं, असंसुदिक वाटतं. पण, बाबाच्या मजुरीवर भागत न्हायी. आईला अधी-मधीच काम मिळतं. म्हणून तर घरखर्चासाठी मी गोळ्या, चॉकलेट विकतो. घरात मला धाकट्या दोन बहिणीसुदिक हायेत. तुमी मला थोडं थोडं शिकवा. बाहेर मी गोळ्या इकत इकत लिहायला शिकीन, वाचायला शिकीन.’’ गोविंदाची शिक्षणाची ही आच या तिघा मित्रांना अस्वस्थ करून गेली. आपल्याएवढे वय असलेल्या या पोराला वाढप्याचं काम करावं लागतं. शिकायची इच्छा मारावी लागते. पोटासाठी दिवसभर उन्हातान्हात उभे राहून चार पैसे मिळवावे लागतात, याचे त्यांना फार वैषम्य वाटले. त्याच्याविषयी त्यांना अपार सहानुभूती वाटली.
पाचवी-सहावीतील ही मुले असूनही त्यांची ही सहानुभूती वरवरची नव्हती. वांझ नव्हती. पाठीवर दप्तर घेणारी ही मुलं आणि पाठीवर दारिद्रय़ाचं ओझं घेणारा हा गोविंदा यांच्यामध्ये एक शब्दांच्या पलीकडचं नातं निर्माण झालं. त्यातूनच हे तिघे मित्र दुपारचा डबा खाताना त्याला भाजी-पोळी देऊ लागले. पाणी देऊ लागले. एकानं तर त्याचे भाजणारे पाय पाहून वापरात नसलेली, पण चांगल्या स्थितीतील एक चप्पल त्याला दिली. वर्गातल्या अनेक मित्रांना यांनी गोविंदाकडून गोळ्या, चॉकलेट विकत घ्या, असं आग्रहानं सांगितलं. राकेशने तर त्याच्या वाढदिवसाचा केक आठवणीने त्याला खाऊ घातला. नंतर नंतर तर एकानं पाटी विकत आणली. दुसर्‍यानं अंकलिपी आणि चित्रांचं पुस्तक आणलं. तिसर्‍यानं खडू, कागद, पेन त्याला भेट दिले आणि वेळ मिळेल तशी तीन शिक्षक आणि एक विद्यार्थी अशी यांची शाळा शाळेच्या गेटवरच सुरू झाली. शिकणारा कमालीचा आनंदित झाला. शिकविणार्‍याला कमालीचे समाधान झाले. दिवसभर गोळ्या विकल्यानंतर झोपडीच्या तोंडाशी, नगरपालिकेच्या दिव्याखाली गोविंदाची ज्ञानसाधना सुरू झाली. त्याच्या स्लेट पाटीवर उमटणारे अक्षर त्याला सुवर्णाचे अक्षर वाटू लागले. सुवर्णाचा हंडा सापडावा, एवढा त्याला आनंद झाला.
पण, मध्येच त्याच्या आनंदाला गालबोट लागले. नेहमीप्रमाणे गोळ्या-चॉकलेट घेण्याच्या निमित्ताने आले. बहुतेक ते अकरावी-बारावीच्या वर्गातील असावेत. त्यातील एकाने दांडगाईने मूठभर चॉकलेट घेऊन अवघे दोनच रुपये त्याच्या हातावर ठेवले. गोविंदा अधिक पैसे मागण्यासाठी हुज्जत घालत होता. योग्य रक्कम मागत होता. तोच आणखी एकाने मूठभर गोळ्या घेऊन आपल्या मुखात घातल्या. शिवाय, त्याचे पैसेही देईना. तो त्याच्या हाताला धरून पैशाची मागणी करीत असतानाच तिसर्‍याने त्याचा गोळ्याचा ट्रे लाथेने पालथा केला आणि त्यालाच दमदाटी करीत ते खिदळत निघून गेले. गोविंदा कमालीचा घाबरला. तिथेच रडत बसला. नेहमीप्रमाणे सुनील, अमोल व राकेश तेथे येऊन पाहतात, तर तो रडत बसलेला. रडत रडत त्याने झालेला प्रसंग सांगितला. त्याबरोबर या तिघांनी सरळ मुख्याध्यापकांकडे तक्रार केली. त्या दांडगट मुलांना पकडले आणि शाळाप्रमुखाने त्यांना शिक्षा करावी, अशी विनंती केली. चॉकलेट-गोळ्यांचे पैसे देण्यास भाग पाडले. गोविंदाच्या हातात ती रक्कम देताना मुख्याध्यापक म्हणाले, ‘‘मुलांनो, आज तुम्ही  फार चांगली गोष्ट केली. खर्‍या शिक्षणाचे तुम्ही आज दर्शन घडविले. तुम्हाला एखाद्या विषयात चार मार्क कमी पडले, तरी हरकत नाही. पण, जगणं सुंदर आणि कृतार्थ करण्यासाठी आवश्यक असणारं शिक्षण तुम्ही मिळविले आहे. तुमचा मला अभिमान वाटतो.’’
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक असून, मराठी भाषा, लोकसंस्कृती यांचे ज्येष्ठ अभ्यासक
व निवृत्त प्राचार्य आहेत.)

Web Title: Poor sympathy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.