पोरगी पुढंच जायाचं म्हणती
By admin | Published: July 22, 2016 05:25 PM2016-07-22T17:25:37+5:302016-07-22T17:25:37+5:30
कष्टात गेलं, आणखी कसं जाणार? लहानपणापासून आम्ही संपूर्ण कुटुंब मोलमजुरी करण्यासाठी दिवसभर बाहेर असायचो. शेळ्या, बकऱ्या, गुरे वळण्यात लहानपण गेलं.
ढवळू ठमके
तुमचं आयुष्य कसं गेलं?
- कष्टात गेलं, आणखी कसं जाणार? लहानपणापासून आम्ही संपूर्ण कुटुंब मोलमजुरी करण्यासाठी दिवसभर बाहेर असायचो. शेळ्या, बकऱ्या, गुरे वळण्यात लहानपण गेलं. कधी गाडीवर कामाला जायचो, कधी बिगारी कामाला, तर कधी एखाद्या ट्रॅक्टरवर. मिळेल ते काम करून रोजची भाकरी कमवायची एवढंच आयुष्य. पैशाची चणचण तर रोजचीच. आजही तेच आहे. बदल एवढाच, की पोरं बदलली माझी. आता त्यांच्याकडे नजर लावून असतो.
तुम्ही कधी तुमच्या गावाबाहेर पडलात का? मोठं शहर, आपला देश.. यातलं काय माहीत होतं तुम्हाला?
- कसं असणार? आणि कशाला? गरजच नव्हती. आणि ऐपत तरी कुठं होती? गणेशगाव आणि नाईकवाडी ही दोन गावं.. बास! त्यातही मी राह्यलो मळ्यात. आमच्या गावातही जायचो नाही फार. वेळच मिळायचा नाही आणि गावात जाऊन करायचं काय? काही खरेदी करायचं तर जवळ पैसे हवेत ना?
अंजनाने पळायच्या शर्यतीत भाग घेतल्यावर पहिल्यांदा मी लातूर शहर पाहिलं. अंजना तेव्हा आठवीत होती. लेकीच्या स्पर्धेच्या निमित्ताने आयुष्यात पहिल्यांदा घराबाहेर, गावापासून दूर, हॉस्टेलच्या खोलीत मी तीन दिवस राहिलो. तिथे जेवलो ते मी जेवलेलं पहिलं बाहेरचं जेवण! मग धुळ्याला गेलो अंजनाबरोबर. माझ्या लेकीचीही माझ्यासारखीच गत होती. ही शहरं कशी असतात, इथे गेल्यावर काय करायचं, कसं वागायचं काही माहीत नव्हतं. पोरगी पळली, मेडल जिंकली, की ते घेऊन घरी यायचं. बाकी कुठलं मी शहर बघायला? ‘भारत माझा देश आहे’ हे शाळेत शिकलो, ते अंधुक आठवतं.. पण देश म्हणजे काय असतो, ते मला माहिती नाही. भारत म्हणजे काय असं विचाराल, तर मी गप्प बसून राहीन. माहितीच नाही ना! गणेशगाव हाच माझा भारत. मुलीच्या यशानंतर काही ठिकाणी गेलो, लोकांनी कौतुक केलं, आर्थिक मदत केली. त्यातून थोडं थोडं समजलं, तेवढंच!
आपली पोरगी हुशार आहे, हे तुम्हाला कधी कळलं?
- मी कविता राऊतबद्दल ऐकलं होतं. पुढे अंजनाचे शिक्षक म्हणाले, की ही पण पळेल, तेव्हा हरखूनच गेलो, की आपली पण पोरगी करील कायतरी. मग शाळेत तिचा सराव सुरू झाला. शाळा सुटल्यानंतर मी तिला बांधांच्या सीमा सांगून पळायला लावायचो. त्यात वेळ कसा कमी होईल ते बघायचो. ती स्पर्धांसाठी प्रवास करायला लागली, तेव्हा गाडीभाड्याचे पैसे नव्हते. मग उधारी करायचो. पैसे देईल त्याच्या घरी मजुरी करून, त्याचे काम करून पैसे फेडायचो.
अंजनाच्या आयुष्यात तुमच्या तरुणपणापेक्षा काय चांगलं/वेगळं आहे?
- फार नाही फरक. तिच्या नशिबी पण कष्ट फार. माझ्यासारखेच! मी कष्टात संपलो. भूक कशी भागवायची यासाठी कष्ट. तिचे कष्ट वेगळे आहेत, वेगळ्या कारणासाठी आहेत, एवढंच!
अंजना खेळते. बाहेर कुठेकुठे जाते. त्यामुळे बाहेरच्या जगाशी आत्ता कुठे गाठ पडली आहे. मला यातलं काही कळत नाही.
पण ती वेगळं काहीतरी करील, तिने करावं असं फार वाटतं. माझं आयुष्य नको तिच्या वाट्याला यायला.
तुम्हाला अंजनाबद्दल कधी काळजी वाटते का? कशाची?
- माझी मुलगी शिक्षणासाठी गणेशगाव सोडून नाईकवाडीला गेली तेव्हापासूनच मला, तिच्या आईला, माझ्या आईवडिलांना सगळ्यांनाच तिची काळजी वाटते. कारण आम्ही बाहेरचं जगच पाहिलेलं नाही. कसं वागायचं, काय करायचं हे कधी कुणी सांगितलं नाही. पण पोरगी पुढेच जायचं म्हणते. तिला मेडल मिळालं पायजे, मोठ्ठं मेडल. पण हे सगळं नीट होईल ना, तिला कुणी त्रास दिला तर याची काळजी वाटते. मी कधी कुणाला सांगत नाही, पण मला कसली काळजी वाटते, हेही मला सांगता येत नाही. मग मी देवावर विश्वास टाकतो. तो पाहील.
शब्दांकन : भाग्यश्री मुळे