पोस्टमेन इन द माउंटन्स
By Admin | Updated: May 17, 2014 21:27 IST2014-05-17T21:27:59+5:302014-05-17T21:27:59+5:30
चीनच्या हुनान प्रांतातलं खेडं दिसतं. नुकतं कुठं उजाडू लागलं आहे. मागोमाग कुणाचं तरी बोलणं ऐकू येतं.

पोस्टमेन इन द माउंटन्स
चीनच्या हुनान प्रांतातलं खेडं दिसतं. नुकतं कुठं उजाडू लागलं आहे. मागोमाग कुणाचं तरी बोलणं ऐकू येतं.
‘‘अशाच एका सर्वसाधारण दिवशी पोस्टमन म्हणून माङया आयुष्याची सुरुवात झाली.’’
आतून घर दिसतं. एक वयस्कर माणूस पत्रंचे, पार्सलचे गठ्ठे नीट लावताना दिसतो. मक्याचं कणीस खात एक तरुण आतून येतो आणि कामात असलेल्या त्या वयस्कर माणसाकडे पाहत राहतो.
‘‘मी लावून ठेवलेली पत्रं बाबांनी पुन्हा आपल्या पद्धतीने लावली. त्यांना माझी काळजी वाटत होती. मलाही होतीच. परंतु मी उगाचच चिंता करीत स्वत:ला छळत नव्हतो. मला खात्री होती, की मी सर्व नीट पार पाडेन.’’
मुलगा आता समोर येऊन बसतो. तसं वडील एक कागद त्याला दाखवतात.
‘‘हा पाहा तुङयासाठी मी नकाशा तयार करून ठेवलाय.’’ मुलगा नकाशा हातात घेतो. ‘‘जाऊन येऊन दोनशे चाळीस मैलांचा प्रवास आहे. तीन दिवस लागतात. दोन रात्री डोंगरातल्या गावातच मुक्काम करायचा.’’
‘‘मला दोन दिवस पुरतील.’’
वडील मंदसे हसतात. आपल्या कामात असलेली आई या बापलेकाकडे पाहत म्हणते, ‘‘खरं तर आता गावात शेतीसाठी अनुकूल वातावरण आहे. शेती कर. नाही तर शहरात जाऊन काही तरी कामधंदा कर.’’
तयारी होते. मुलगा भलीथोरली, गच्च भरलेली बॅग पाठीशी मारतो आणि निघतो. आईवडील निरोप द्यायला अंगणात येतात. त्यांचा कुत्र तिथेच रेंगाळतो. वडील त्याला जवळ घेतात. हलकेच थोपटतात. ‘‘आजवर मला केलीस तशी त्याला सोबत कर. जा.’’ कुत्र तिथेच. पुढे गेलेला मुलगा वळून पाहतो. त्याच्या लक्षात येतं. कुत्र सोबतीला यायला तयार नाही.
‘‘अरे असं काय करतोस. त्याचा पहिला दिवस. रस्ता कसा कळेल त्याला?’’ कुत्र हलायचं नाव घेत नाही. वडील आत जातात आणि कपडे बदलून, काठी घेऊन बाहेर येतात. आता कुत्र त्यांच्या पुढे. मुलगा दोघांना पाठोपाठ येताना पाहतो.
‘‘आई, काही लागलं, सवरलं तर मित्रंना सांग माङया.. आणि आई, काळजी घे नीट.’’
‘‘आई.. आई.. आई..’’ वडील स्वत:शीच पुटपुटतात. काहीसे चिडचिडल्यासारखे. काल निवृत्त झालेले पोस्टमन वडील आणि आता त्यांची जागा घेतलेला मुलगा. दोघांचा प्रवास सुरू होतो. सोबतीला त्यांचा कुत्र. प्रवास सगळा डोंगरद:यातून. गावं सगळी डोंगरातच वसलेली.
एका गावात येतात. एका वाडासदृश घरात दाराकडे तोंड करून बसलेली वृद्धा. आधी कुत्र आणि मग बापबेटे येतात. तिचं पत्र देतात. ती ते उघडते. एका कागदात एक नोट असते. वृद्धा ती नोट आतल्या खिशात ठेवते. वाचण्यासाठी पत्र पुढे करते. वडील त्या पत्रतला काही मजकूर वाचतात. तो त्या पत्रकडे पाहतच राहतो. तो कोरा कागद असतो. वडील खुणोनेच सुचवतात. तोही मग ते ‘वाचू’ लागतो.. लवकरच तुला शहरात घेऊन जाणार आहे.. तुझी खूप आठवण येते वगैरे वगैरे..
वृद्धेकडून निघाल्यानंतर बापबेटय़ात आजीच्या नातवाविषयी बोलणं होतं. ‘‘तुम्ही का तिला अशी खोटी आशा लावता?’’ वडील मग नातवाच्या कृतघ्नपणाची सारी कथा सांगतात. मुलगा म्हणतो, ‘‘तुम्ही केलं तेच मीही यापुढे करत राहीन.’’ वडिलांना बरं वाटतं. प्रवास पुढे चालू राहतो. एक मोठी घळ उतरून आल्यावर समोर नदी दिसते. ‘‘नदी इथे पार केली, की आठेक मैलांचा फेरा चुकतो. पोस्टाची बॅग नीट डोक्यावर घेऊन नदी पार कर. बॅगेत तांदूळ नाहीत. पत्रं आहेत लोकांची जपून चल.’’
मुलगा खालून पँट दुमडू लागतो. ‘‘तुम्ही थांबा इथे. मी करतो सारं नीट.’’ तो बॅग डोक्यावर घेऊन निघतो. एकटाच पलीकडे जातो आणि निरोप घेतल्यासारखा हात हलवतो. हसतो. वडीलही हसतात. बॅग खाली ठेवून पुन्हा या किना:याकडे येतो. वडिलांना पाठकुळी घेतो. हळुवार संगीत सुरू होतं. ते अवघडल्यासारखे. कु त्र त्यांच्यापुढे. आरंभी त्या मुलाचा आतला आवाज ऐकू आला तसा आता पुन्हा ऐकू येतो.
‘‘गावातली ज्येष्ठ मंडळी म्हणतात. जेव्हा पोरगा बापाला पाठीवर घेतो तेव्हा तो मोठा झालेला असतो.’’ वडील अधिकाधिक भावूक होत जातात. त्यांना पोराचं बालपण आठवतं. दिसू लागते बाजारात वडिलांच्या खांद्यावर बसलेला हा लहानपणीचा गोड पोरगा. वडिलांचे डोळे भरून येतात. संगीताची लय तीव्र होत जाते.
हा वडिलांना खाली उतरवतो. ते त्याच्याकडे पाहत असतात. तो वळून पाहतो तशी ते नजर वळवतात. तो हसतो. ‘‘पोस्टाच्या बॅगेपेक्षा तुमचं वजन कमी आहे.’’ बापबेटे समोरासमोर बसतात. ‘‘पाणी बर्फासारखं गार आहे ना. माझी गुडघेदुखी त्यामुळेच सुरू झाली.’’
वडील पाईप पेटवतात. एक झुरका घेतात. त्याच्या हाती देतात. तोही सहजपणो घेतो आणि दोनतीन मस्त झुरके घेतो. वडील कौतुकाने त्याच्याकडे पाहतात. नजरेत असतं.. पोरगा मोठा झाला. ! याच्या आधीच्या एका प्रसंगात तोच पाईप मागतो. परंतु त्या वेळी दोघंही एकमेकांकडे पाहत नाहीत. इथवरच्या प्रवासात बापबेटय़ात मोकळेपणा येत जातो.
कुत्र लाकडं आणून टाकतो. ‘‘त्याला माहीत आहे, की या पाण्यातून आलो, की मला शेकोटीची ऊब लागते.’’
‘‘पण मला नकोय. निघुया आपण.’’
‘‘अरे त्याचं मन राख.’’
पोरगा हसतो. शेकोटी पेटविली जाते. मध्येच वडिलांना काही तरी आठवतं. ते गंभीर होतात.
‘‘तुङया मानेजवळ जखमेचा व्रण दिसला मला.’’
‘‘लहानपणी वरून लाकूड पडलं होतं.’’
‘‘पण तुझी आई मला कधी कशी बोलली नाही.’’
‘‘मीच तिला तसं सांगितलं होतं.’’ वडील काही क्षण भूतकाळात जातात. ‘‘तू जन्मलास तेव्हा मी घरी नव्हतो. त्या वेळी तीन-तीन महिन्यांनी मी घरी यायचो. त्या वेळी तुङया आईने मला पत्र लिहिलं होतं. मी आयुष्यभर दुस:यांची पत्र वाटली. मला पाठवलेलं ते पहिलं पत्र होतं. तुङया जन्माची बातमी वाचून मी इतका खूष झालो, की मी माङया भत्त्याच्या पैशातून जंगी पार्टी दिली.’’
मुलाचे डोळे चमकतात. तो काहीसा भावूक होतो.
‘‘मला वाटायचं वडिलांचं माङयावर प्रेमच नाही. आईला असं बोललो, की ती रागवायची.’’ ते सणासुदीला क्वचितच घरी असत. असले की मात्र भरपूर फटाके आणीत. तो घराजवळ इतर मुलांबरोबर फटाके वाजवताना दिसतो. इकडे शेकोटी विझत येते. तो उठतो.
‘‘बाबा चला, निघुया’’
‘‘काय म्हणालास.?’’
तो वळून पाहत म्हणतो,
‘‘म्हटलं बाबा निघुया.’’ आणि तो बॅग उचलून चालू लागतो. पलीकडे बसलेल्या कुत्र्याला वडील म्हणतात,
‘‘ऐकलंस का रे, तो मला आज प्रथमच बाबा म्हणाला.’’
चीनच्या या ‘पोस्टमेन इन द माउंटन्स’मध्ये म्हटलं तर एक पारंपरिक कथा आहे. बापाकडून मुलाकडे पुढच्या काळाची सूत्रे येतात. बाप वृद्ध होणार, पोरगा बापाची जागा घेणार. जगरहाटीच आहे ही. परंतु, या रुटीनला इथे दिग्दर्शक हो जिआंकी आपल्या कलाकौशल्याने एक आगळं सौंदर्य बहाल करतो. बापबेटय़ात तसा सहसा संवाद नसतो. मुलांचं जग सगळं आईभोवतीच फिरत असतं. वडील तसे ‘दूर’च असतात. पण या जगरहाटीनुसार सारं व्हावंच लागतं.. आणि
इथे त्या दरम्यान या बापबेटय़ातलं नातं
बारीकसारीक प्रसंगातून, घटीतातून उलगडू लागतं.
एका नजाकतीनं, सहजतेनं! वाहत्या झ:याला जसं
त्याचं एक सौंदर्य आहे तेच इथे या बापबेटय़ातल्या उलगडत जाणा:या नातेसंबंधात आहे. ती नदी
मुलगा पार करतो तेव्हा वेळ कमी लागतो आणि
बापाला पाठकुळी मारून नेतो तेव्हा जास्त वेळ
लागतो. वरकरणी हे स्वाभाविकच आहे. परंतु इतकंच नाही ते. पोराच्या पाठीवर बसलेल्या बापाच्या मनात केवढय़ा काय काय गोष्टी येऊन जातात. त्याला काळाचा केवढा पट असतो. तो ताणलेला काळ यासाठी असतो. अशा किती तरी गोष्टी दिग्दर्शक सहज जाता
जाता करतो आणि त्यातून आवश्यक तो परिणाम तितक्याच सहजपणो गाठतो. ‘रोड मूव्हिज’ जॉनरमधल्या या चित्रपटात प्रवास अवघ्या जगण्याचीच छान उकल करीत जातो.
(लेखक भारतीय व जागतिक चित्रपटांचे
व्यासंगी अभ्यासक, दिग्दर्शक व परीक्षक आहेत.)