सत्तेच्या खेळातील त्या वाकबगार 'अँगेला मर्केल'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2017 05:19 PM2017-09-30T17:19:48+5:302017-10-01T06:40:51+5:30
अनाकर्षक दिसणारी, बोलणारी, कायम शांत राहणारी ही ‘मुलगी’ राजकारणात कोणाला काय आव्हान देणार, असंच तेव्हा सगळ्यांना वाटलं होतं; पण पक्षातल्या इतरांना दूर सारून तीच नंतर तब्बल तीनदा चॅन्सेलर झाली. जे जे ‘दांडगे’ आपल्या रस्त्यात आले, त्या प्रत्येकाला तिनं आडवं केलं. जवळून ओळखणारे तर या बाईला ‘शिकारी’च म्हणतात. आपल्या कार्यकाळात त्यांनी अनेक निर्णय बदलले. त्यांची लोकप्रियताही घटली, तरी यंदा चवथ्या वेळीही त्याच चॅन्सेलर झाल्या. कारण वेळ पाहून निर्णय घेण्यात आणि सत्तेच्या खेळात त्या वाकबगार आहेत.
- निळू दामले
अँगेला मर्केल प्रेस कॉन्फरन्समध्ये उभ्या होत्या. बुटक्या. फिकट बेज रंगाचं अगदीच अनाकर्षक जॅकेट. एक पांढरं हेल्मेट घातलंय असं वाटणारे डोक्यावरचे केस. संथपणे, एकाच लयीत, आवाजाचे कोणतेही चढउतार न करता, एकाच सुरात मर्केल पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देत होत्या. एकाच पट्टीत, एकाच सुरात बोलत होत्या, कंटाळवाणं. सामान्यपणे त्यांचं म्हणणं पाच-दहा मिनिटं ऐकलं की, प्रेक्षकांना झोप येते. पण पत्रकारांना झोप येऊन चालणार नसतं, त्यांना काही तरी निश्चित असं हवं असतं. हेच जर मर्केल संसदेत बोलत असत्या तर संसदेतली अर्धी बाकं रिकामी झाली असती.
‘तुमची खूप मतं विरोधकांनी खाल्लीत, तुम्ही अल्पसंख्य आहात मग सरकार कसं स्थापन करणार?’
‘तुमचा सहकारी सोशल डेमॉक्रॅट पक्ष तुम्हाला सोडून गेलाय, आता तुम्ही कोणाला बरोबर घेणार?’
‘ज्यांच्याशी तुमचं भांडण आहे असे ग्रीन्स आणि फ्री डेमॉक्रॅ ट्स यांच्याशी तुम्ही जुळवून घेणार काय?’
‘सत्ता मिळवण्यासाठी तुम्ही इतर विरोधी पक्षातली माणसं फोडणार काय?’..
असे प्रश्न राजकारणी माणसाला विचलित करतात, त्यांचं विचलित होणं त्यांच्या चेहºयावरच्या आठ्या आणि त्रासावरून दिसतं. राजकारणी चिडतात, उलट उत्तरं करतात, उत्तर द्यायला नकार देतात.
मर्केल एकदम शांत. कुठंही ठाम कमिटमेंट न देणारी निर्विकार उत्तरं येतात. निर्विकार चेहरा.
दोनेक तास कॉन्फरन्स चालते. पत्रकारांना किंवा टीव्हीवर ही कॉन्फरन्स पहाणाºयांना भविष्यात काय होणारे याचा काहीही पत्ता लागत नाही.
एका प्रश्नाला उत्तर देताना मर्केल म्हणाल्या की, २०१७ची संसदेची निवडणूक लढवायची की नाही याबद्दल त्या साशंक होत्या. कारण आधी झालेल्या स्थानिक संसदांच्या निवडणुकीत त्यांच्या ख्रिश्चन डेमॉक्रॅ ट पक्षानं मार खाल्ला होता. पर्यायी जर्मनी या टोकगामी परतिरस्कारी ग्लोबलायझेशनला विरोध करणाºया पक्षाला भरपूर मतं मिळाली होती. स्थलांतरितांच्या संकटामुळं लोकक्षोभ वाढला होता आणि मर्केल यांची लोकप्रियता घसरत चालली होती.
मर्केल यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर जर्मनीतले अभ्यासक, तज्ज्ञ प्राप्त परिस्थितीचं विश्लेषण करत होते. पर्यायी जर्मनीवादी (नाझीवादीही) हा उजव्या टोकाचा आणि सोशल डेमॉक्रॅट हा डाव्या टोकाचा पक्ष वाढले होते.
मर्केल यांचा मध्यमार्गी ख्रिश्चन डेमॉक्रॅट हा पक्ष लोकांच्या नजरेतून उतरला होता. जर्मनीमध्ये लोकशाहीच धोक्यात आली होती. पुन्हा एकदा समाजवाद किंवा नाझीवाद जर्मनीत फोफावण्याची शक्यता निर्माण झाली होती.
परंतु मर्केल यांना या बदललेल्या वातावरणापेक्षा सत्ता टिकवून धरण्याची चिंता असावी. मर्केल नेहमी दाट धुक्यात कार चालवत असतात. समोर फक्त पाच फुटापर्यंतचंच दिसत असतं. त्या पलीकडं काय आहे याचा विचार करून कार चालवणं मूर्खपणाचं असतं. पहिले पाच फूट, नंतरचे पाच फूट, नंतरचे पाच फूट अशा रीतीनं त्यांची कार पुढं सरकते. धुकं संपेपर्यंत.
मर्केल यांनी थेरटिकल केमिस्ट्रीत डॉक्टरेट केली आहे. राजकारणात येण्यापूर्वी अनेक वर्षं त्यांनी प्रयोगशाळेत संशोधन केलं आहे. संशोधनाची शिस्त त्यांच्या रक्तात भिनली आहे. वैज्ञानिक व्यवहारात अभ्यासाला महत्त्व असतं, शिकायचं असतं. घटकांचं रासायनिक वागणं वैज्ञानिक कसोट्यांवर निरखायचं, त्यात विकार येऊ द्यायचे नाहीत, नंतर ज्या शक्यता दिसतात त्यावरून निर्णय घ्यायचा. नंतर तो निर्णय शेंडी तुटो वा पारंबी मोडो या निर्धारानं अमलात आणायचा.
१९७७ साली मर्केल यांच्याशी अँगेला यांचं लग्न झालं. लवकरच त्यांच्या लक्षात आलं की, या माणसाशी आपलं जमणं शक्य नाही. १९८१मध्ये त्या घटस्फोट देऊन मोकळ्या झाल्या.
१९९० साली त्या ख्रिश्चन डेमॉक्रॅट या पक्षात दाखल झाल्या आणि लगोलग त्या संसदेतही दाखल झाल्या. निवडून आल्यावर त्यांनी आनंदोत्सव इव्हेण्ट वगैरे केला नाही, वाच्यता केली नाही. आपला आनंद किंवा दु:ख सार्वजनिक करायची सवय त्यांना नाही. गप्प राहाणं, शांतता, हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं एक महत्त्वाचं अंग आहे, म्हटलं तर ते हत्यारही आहे.
मर्केल त्यांचं अनाकर्षक असणं, अनाकर्षक बोलणं, शांत राहाणं तत्कालीन पक्षाध्यक्ष आणि चॅन्सेलर हेल्मुट कोल यांना आवडलं, उपयोगी पडलं. पुढाºयांना अशी गप्प बसणारी माणसं आवडतात, कारण ती आपले प्रतिस्पर्धी नाहीत असं त्यांना वाटतं. कोल मर्केलना मुलगी म्हणत, काहीसं उपहासानं, काहीसं त्या निरूपद्रवी आहेत, असं दाखवत.
कोलनी मर्केलना एका अगदीच फालतू खात्याचं मंत्री केलं. त्या खात्याच्या सचिवालाही वाटायचं की मर्केल एक फालतू बाई असून, आपल्यामुळंच ती मंत्रिपद सांभाळू शकते. मर्केलनी पद घेतलं आणि काही तासातच त्या सचिवाला हाकलून दिलं. आपल्याला पाहिजे ती, आपल्या विश्वासातली माणसं निवडली.
कोलना वाटत होतं की, आपण मर्केलसारख्या मुलीला नेमून आपला एक निरूपद्रवी अनुयायी तयार केलाय. पण वेळ आल्यावर मर्केल यांनी मुसंडी मारली. एका वर्तमानपत्रात लेख लिहून जगाला सांगितलं की, कोल हे संदर्भहीन झाले आहेत, आम्हीच पक्ष पुढे नेणार आहोत. या लेखानं खळबळ उडाली, कोल यांना पक्षानं नेतृत्वातून रिटायर केलं. मर्केल पक्षाच्या अध्यक्ष झाल्या, चॅन्सेलरपदाच्या सत्ताशिडीवरच्या शेवटल्या पायरीवर त्या पोचल्या.
पदावरून दूर झाल्यावर एका समारंभात असताना त्यांच्या शेजारी बसलेल्या पत्रकारानं कोलना मर्केलबद्दलचं मत विचारलं. कोल म्हणाले, ‘मीच मर्केलला निवडलं. मी माझा खुनी निवडला. मीच माझ्या अस्तनीत साप ठेवला.’ २००५ साली संसदेची निवडणूक झाली. तेव्हा सोशलिस्ट श्रोडर जर्मनीचे चॅन्सेलर होते. एका मुलीनं कोल यांना दूर केलं म्हणजे त्यांचा पक्षच बावळट होता असं श्रोडर यांना वाटत असे. आपण स्मार्ट आहोत, आपल्याला दूर सारून मुलगी चॅन्सेलर होऊच शकत नाही असं ते म्हणत असत. ते मर्केलचा उल्लेख नेहमीच उपहासानं करत असत. एका पत्रकार परिषदेत मर्केलनी हुशारीनं श्रोडरना सांगून टाकलं की, त्यांचा पक्ष आता मागं पडलेला असल्यानं जर्मन जनता आता त्यांना सहन करणार नाहीये. श्रोडर यांचा पक्ष आणि मर्केल यांचा पक्ष सत्तेत जरी सहकारी असले तरी आपसात त्यांच्यात चढाओढ होतीच. त्याचा फायदा मर्केलनी घेतला. श्रोडर यांना हाकलण्यासाठी मर्केल यांच्या पक्षानं निरूपद्रवी मुलीला पाठिंबा दिला.
मर्केल यांची खेळी यशस्वी ठरली. पक्षातल्या इतरांना दूर सारून मर्केल चॅन्सेलर झाल्या. श्रोडर या कसलेल्या राजकारणी माणसाला सत्तेनं अव्हेरलं. जर्मनीतली पहिली महिला चॅन्सेलर. पूर्व जर्मनीतून आलेली. दोन लग्न झालेली. सावत्र मुलं असलेली. जर्मनीतल्या कन्झर्व्हेटिव समाजात या साºया गोष्टी म्हणजे सत्तेला नकार मानला जातो.
भारतात एक गुंगी गुडिया होती. बापाच्या छायेत, बापानं लाडानं वाढवलेली आणि बापानं सत्तेत नेऊन बसवलेली एक स्त्री पंतप्रधान झाली होती. भारतातली पहिली स्त्री पंतप्रधान. राज्यशास्त्रातल्या सगळ्या कसोट्या धाब्यावर बसवून स्त्री एक सर्वाधिक शक्तिमान राजकारणी ठरली.
२००५ साली एक मुळमुळीत बोलणारी स्त्री जर्मनीची चॅन्सेलर झाली आणि तिनं रेकॉर्ड केला. लागोपाठ चवथ्यांदा ती चॅन्सेलर झाली आहे.
अमेरिकेचे जर्मनीतले राजदूत जॉन कोर्नब्लुम यांनी मर्केल यांना जवळून पाहिलं होतं. कॉर्नब्लुम म्हणतात, ‘तुम्ही त्यांना आडवे गेलात तर मेलात. राजकारणात किती तरी दांडगे पुरु ष त्यांना आडवे गेले आणि राजकारणातून फेकले गेले.’
२००४ साली मर्केल यांच्या साठाव्या वाढदिवशी कन्झर्व्हेटिव पुढारी मायकेल ग्लॉसनी पेपरात लिहिलं ‘मर्केल एक जातिवंत शिकारी आहे. शिकार नेमकी केव्हा गाठायची ते तिला चांगलं कळतं. जेव्हा कोंबडा कोंबडीचा पाठलाग करत असतो तेव्हा तो बेसावध असतो हे मर्केलला माहीत आहे. नेमक्या त्या क्षणांची वाट पाहून ती शिकार करते.’
चॅन्सेलरपदाच्या तीन कार्यकाळात मर्केल यांनी अनेक भूमिका बदलल्या. एकदा समलिंगी संबंधांना विरोध केला आणि नंतर पाठिंबा दिला. अणूऊर्जेला पाठिंबा दिला, विरोध केला. स्थलांतरित हे जर्मन संस्कृतीला धोकादायक आहेत असं म्हटलं आणि नंतर त्यांनाच स्वीकारणारे कायदे केले.
वेळ पाहून त्या निर्णय घेतात. अंतिम ध्येय सत्तेत टिकणं हेच असतं. त्यासाठी लागणारी चिकाटी त्यांच्यात आहे.
शेवटी राजकारण हा सत्तेचा खेळ तर आहे. त्या खेळात त्या वाकबगार आहेत.
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत. damlenilkanth@gmail.com)