- प्रासंगिक - सुवर्णमहोत्सव शाहिरी परिषदेचा...! 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2019 06:00 AM2019-02-03T06:00:00+5:302019-02-03T06:00:12+5:30

शाहिरी डफ गर्जायला लागला, की अगदी नसानसांत स्फुरण चढते. पण शाहीर हा केवळ लावणी - पोवाडे गाऊन मनोरंजन करणारा कलावंत नव्हे, तर...

- prasangik - suvarna mahotsav Shahiri Conference ...! | - प्रासंगिक - सुवर्णमहोत्सव शाहिरी परिषदेचा...! 

- प्रासंगिक - सुवर्णमहोत्सव शाहिरी परिषदेचा...! 

googlenewsNext

- शीतल कापशीकर- 

महाराष्ट्र शाहीर परिषदेच्या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने ३, ४ व ६ फेब्रुवारी रोजी पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागांत शिववंदना, शंभूवंदना, बालशाहीर पोवाडा गायन स्पर्धा, शोभायात्रा, नामांकित युवा शाहिरांचे सादरीकरण आदी कार्यक्रम आयोजिण्यात आले आहेत. त्यानिमित्त...
उच्चरवाने गातो कवना । मनी जपतो। शाहिरी बाणा । संस्कृती आमुची आहे थोर । तीच पोवाड्यातून सांगणार । शाहिरी डफ गर्जणार हो जी जी जी ।।
शाहिरी डफ गर्जायला लागला, की अगदी नसानसांत स्फुरण चढते. पण शाहीर हा केवळ लावणी - पोवाडे गाऊन मनोरंजन करणारा कलावंत नव्हे, तर तो आपल्या कलेद्वारे समाजाचे प्रबोधन करणारा एक लोकशिक्षक आहे. समाजात जे काम संतांचे तेच शाहिरांचे. संत अभंग-ओव्या गातात तर शाहीर फटका-पोवाडा. अशा अनेक शाहिरांना सामावून घेणारी आपली महाराष्ट्र शाहीर परिषद.
(स्व.) शाहीर योगेश व (स्व.) किसनराव हिंगे यांच्या मुख्य पुढाकाराने महाराष्ट्र शाहीर परिषदेची स्थापना ५० वर्षांपूर्वी दासनवमी तथा नरवीर तानाजी मालुसरे पुण्यतिथीच्या दिवशी झाली. स्थापना झाल्यावर या दोघांनी सबंध महाराष्ट्रभर फिरून शाहिरांना संपर्क केला. मुंबईचे शाहीर आत्माराम पाटील, नागपूरचे शाहीर भीमराव बावनकुळे, अकोल्याचे शाहीर मोहन मोहोड, सांगलीचे शाहीर महर्षी र. द. दीक्षितगुरुजी साताºयाचे शाहीर शमशुद्दीन शेख, कोल्हापूरचे शाहीर राजाराम जगताप, सांगलीचे शाहीरसम्राट बापूराव विभूते व त्यांच्या भगिनी अंबूताई विभूते - बुधगावकर आदी तत्कालीन शाहिरांना बरोबर घेऊन महाराष्ट्र शाहीर परिषद संघटना विस्तारकार्य व सभासद नोंदणी काम मोठ्या प्रमाणात केले. यामध्ये काही राष्ट्रीय शाहिरी, तर काही भेदिक शाहिरी, विदर्भात गेलो तर डहाका, खडी गंमत, दंडार या प्रकारची शाहिरी गाणारे अशा विविध पद्धतीने शाहिरीकला जोपासणारे साधारणपणे २५०० शाहीर परिषदेचे सभासद आहेत. या शाहिरांनी केवळ इतिहासकालीन पोवाडे रचून गायले नाहीत, तर तत्कालीन सामाजिक स्थिती, विविध संघटना, समाजसेवक यांचेदेखील पोवाडे जनमानसांत लोकप्रिय केले. शाहिरीच्या माध्यमातून समाजात वीरश्री संचारावी, मनामनांतून करुणा जागवावी, देशप्रेम, धर्मप्रेम, विद्याप्रेम, संघभावना, दुर्जनद्वेष, अधर्माविषयी चीड यांची जागृती शाहिरांनी त्यांच्या कलेतून केली. शाहीर परिषदेने सातत्याने अनेक राष्ट्रपुरुषांचे चरित्र उजेडात तेवते ठेवण्याचा व त्यायोगे ते गुण समाजात कसे पसरतील, हा प्रयत्न केला आहे.
महाराष्ट्र शाहीर परिषद ही सर्वात जुनी सांस्कृतिक क्षेत्रातील संघटना आहे. तसेच चांदा ते बांदा अर्थात मुंबई ते विदर्भ अशी संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेली संघटना आहे. विदर्भ, खान्देश, मराठवाडा, प. महाराष्ट्र, मुंबई - प्रत्येक ठिकाणी गायला जाणारा शाहिरीतील प्रकार वेगळा, पण परिषदेने हे सर्व एकत्र एका धाग्यात बांधून ठेवले आहेत. त्यामुळेच प्रतिवर्षी होणाºया वार्षिक सर्वसाधारण सभेला तसेच दर पाच वर्षांनी होणाऱ्या अधिवेशनात सगळे शाहीर एकत्र भेटतात. आपापल्या जिल्ह्याचे वार्तापत्र प्रांत कार्यकारिणीसमोर सादर करतात. सरकारदरबारी होणाऱ्या शाहिरांच्या उपेक्षेवर चर्चा करतात, शाहिरीकला पुढे कशी जाईल. त्यासाठी आवश्यक प्रयत्न काय असावेत, यावर ऊहापोह होतो. 
महाराष्ट्र शाहीर परिषदेचे पहिले अध्यक्ष शाहीर पांडुरंग खाडिलकर. पुढे कालपरत्वे अध्यक्ष बदलत गेले, परंतु शाहीर योगेश ह्यांनी सर्वाधिक काळ अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. संघटना वाढीसाठी शाहीर योगेशांनी दिलेले योगदान खूप महत्त्वपूर्ण आहे. पुढे (मे २०११ मध्ये) शाहीर दादा पासलकर यांनी अध्यक्षपदाची धुरा खांद्यावर घेतली व संघटनेचे काम नेटाने पुढे नेले. सांगलीचे शाहीर बजरंग आंबी, शाहीर रामचंद्र जाधव, शाहीर अनंत साळुंखे, कोल्हापूरचे शाहीर श्यामराव खडके, शाहीर रंगराव पाटील, विदभार्चे शाहीर बहादुल्ला बराडे, जळगावचे शाहीर शिवाजीराव पाटील, जालन्याचे शाहीर नाना परिहार, पुण्याचे शाहीर अंबादास तावरे, शाहीर प्रकाश ढवळे यांना बरोबर घेऊन दादांनी परिषदेत भरीव कामगिरी बजावली. त्यांनी महाराष्ट्रातील पहिले राज्यस्तरीय शाहिरी साहित्य संमेलन डिसेंबर २०११ मध्ये आयोजिले व यशस्वीरीत्या पार पाडले. महाराष्ट्र शाहीर परिषदेच्यावतीने शाहिरीकलेची दखल घेतली जावी, ही कला वाढीस लागावी यासाठी प्रतिवर्षी युवा शाहीर, शाहीर गौरव, शाहीर भूषण, तसेच ज्येष्ठ शाहिरांना शाहीरमहर्षी यांसारख्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. आजमितीला पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात परिषदेचे स्वत:चे छोटेखानी कार्यालय आहे. हा सगळा आढावा घेतला की शाहिरीला काल, आज आणि उद्याही उज्ज्वल दिवस नक्की होते, आहेत आणि असतील हे चित्र स्पष्ट होते.
यंदाच्या या सुवर्णमहोत्सवी वर्षात पुणे, सांगली, होऊ घातलेले पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, नागपूर अशा विविध ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आयोजिण्यात येत आहेत. पुणे जिल्हा शाखेचे अध्यक्ष शाहीर प्रकाश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवड परिसरात विविध ठिकाणी शाहिरी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करून शेकडो बालशाहीर तयार केले. दोन वर्षांपूर्वी भक्ती -शक्तीसमूह शिल्पाजवळ महाराष्ट्रदिनी एकाच व्यासपीठावर शंभर बाल, युवा, महिला व ज्येष्ठ शाहिरांनी सादरीकरण करण्याचा अनोखा उपक्रमदेखील शाहीर प्रकाश ढवळे यांनी राबविला. पुणे जिल्हा शाखेच्या संघटनात्मक कामात शाहीर वनिता मोहिते, शाहीर शीतल कापशीकर, शाहीर प्रचीती भिष्णूरकर यांचे मोलाचे काम आहे. महाराष्ट्र शाहीर परिषदेच्या या ५० वर्षांच्या प्रदीर्घ वाटचालीला मानाचा मुजरा आणि सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा !!!
        शीतल कापशीकर
(लेखिका महाराष्ट्र शाहीर परिषदेच्या  सरचिटणीस आहेत.)

Web Title: - prasangik - suvarna mahotsav Shahiri Conference ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.