..करीन ती पूर्व!
By Admin | Published: March 19, 2016 02:44 PM2016-03-19T14:44:41+5:302016-03-19T14:44:41+5:30
‘पृथ्वी गोल आणि फारशी मोठी नाही. पश्चिमेला तारू हाकारलं की हाहा म्हणता पूर्वेला हिंदुस्तानात पोचू’ याच गैरसमजाच्या जोरावर कोलंबसानं मोहीम आखली, पण कुणी पैसेदाता पाठीराखा लाभेना. शेवटी स्पेनच्या राणीनं या उफराटय़ा मोहिमेला भांडवल दिलं, पण तो जिवंत परतणार नाही हे गृहीत धरूनच! कोलंबसानं नवी भूमी तर शोधली, पण तो हिंदुस्तान नव्हता.तरीही आपण पूर्व शोधल्याच्या समाधानातच तो शेवटपर्यंत राहिला.
>
कोलंबसाच्या चार सागरी मोहिमांचा खडतर प्रवास
- डॉ. उज्ज्वला दळवी
पृथ्वी गोल आहे. ती तशी फारशी मोठी नाही. मी अटलांटिक महासागरात पश्चिमेला जात राहिलो की पूर्वेकडच्या हिंदुस्तानात सहज पोचेन!’’
- कोलंबसाचा आशावाद आणि आत्मविश्वास अटलांटिकसारखाच अथांग होता. कोलंबस स्वत: इटलीमधला विणकर. लोकरीचं कापड विकायला त्याने जहाजातून प्रवास केला आणि तो समुद्राच्या प्रेमात पडला. त्याने दर्यावर्दींच्या देशात, पोर्तुगालमध्ये मुक्काम ठोकून, लॅटिन, स्पॅनिश, पोर्तुगीज भाषा शिकून आणि सोबत जहाजांवर खलाशी म्हणूनही राबून तो नौकानयन, महासागर, नकाशे यांच्यात पारंगत झाला. पण सारा अभ्यास ‘सद्गुरूवाचोनी’ असल्यामुळे ‘पृथ्वीच्या गोलावर पश्चिमेला तारू हाकारलं की ते हाहा म्हणता पूर्वेला पोचेल’ हा गैरसमजही त्याच्या डोक्यात पक्का झाला. त्याच्याच जोरावर त्याने आपली अंतरंगी मोहीम आखली. पण त्याच्या जगावेगळ्या जगप्रवासाला कुणी पैसेदाता पाठीराखा लाभेना.
त्यावेळी हिंदी महासागरातून बराच व्यापार होत होता. पोर्तुगीजांनी आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घातला होता. पण अनोळखी, अथांग महासागरावर, पश्चिमेला भरकटत पूर्व शोधायचा बेत त्यांनाही वेडेपणाचा वाटला. इटलीच्या राजघराण्याने तो प्रस्ताव उडवूनच लावला. स्पेनच्या राजाराणीने थोडय़ाशा पगाराच्या वाटाण्याच्या अक्षता लावून कोलंबसाला आपल्या पदरी ठेवून घेतला. एखाद्या उपवर मुलीच्या खमक्या बापाच्या चिकाटीने कोलंबस राजघराण्यांचे उंबरठे ङिाजवत, मिनतवा:या, मोर्चेबंदी करत राहिला.
शेवटी त्याच्या प्रयत्नांना यश आलं. पूर्वेकडचे मसाले, मौल्यवान धातू आणि रत्नं स्पेनसाठी आणणं आणि पूर्वेच्या अडाणी माणसांना ख्रिस्ती धर्माची दीक्षा देणं या दोन महत्कार्यांसाठी स्पेनच्या धर्मनिष्ठ राणीने त्या मोहिमेला भांडवल द्यायचं कबूल केलं. त्या आर्थिक आशीर्वादाखेरीज तिने त्याला सान्ता मारिया नावाचं मोठं आणि निना आणि पिन्टा नावाची दोन लहान अशी तीन जहाजंही दिली. त्या उफराटय़ा सफरीतून कोलंबस जगून वाचून परतेल याची तिला फारशी आशा नव्हती. म्हणून मोठय़ा उदारपणो तिने मोहिमेच्या नफ्याचा दहावा हिस्सा आणि नव्या जगाचे शासकीय हक्कदेखील त्याला देऊ केले. स्पेनमधल्या पिन्झॉन घराण्यातल्या तालेवार आणि महत्त्वाकांक्षी दर्यासारंगांनी त्या चक्र म विश्वविक्र माची महती जाणली. कोलंबसाच्या सफरीसाठी खंद्या खलाशांचा ताफा जमला. पण त्या सगळ्या स्पॅनिश खलाशांना इटालियन सरखेल कोलंबस उपरा, परका वाटत होता.
खलाशी जमले तरी काबाडकष्टी कामं करायला गडीमाणसं मिळेनात. मग वाळीत टाकलेल्या, ज्यू-जिप्सी वगैरे जिवांना सागरापार हाकलायला मोहिमेची सबळ सबब राज्यकत्र्यानी राबवली. त्या माणसांत शिंपी, रंगारी, सोनार वगैरे अठरापगड लोक होते. फाशीची शिक्षा झालेल्या एका कैद्याला त्याच्या तीन दोस्तांनी तुरु ंगातून सोडवून तडक जहाजावर हजर केला. मोहिमेवर असेतो त्याचा मृत्युदंड तहकूब केला गेला. अटलांटिकच्या अथांग अज्ञातात जिवावर उदार होऊन हाकारलेल्या जहाजात कोलंबसाच्या जिवाला जीव देणारे साथीदार जेमतेम हाताच्या बोटावर मोजण्याइतके होते.
चौदाशे बेचाळीसच्या ऑगस्टमध्ये सुरू झालेली पहिली मोहीम मार्च 1443 पर्यंत चालली. त्या सात महिन्यांत जहाजांवरच्या हालांना पारावार नव्हता. पाझरत्या भिंती, सततची ओल, कुबट वास, पथारी पसरायला ना कुठे धड जागा, रात्रंदिवस अंग मोडून काम, रोज तेच ते खारवलेलं-सुकवलेलं अन्न, प्यायला शेवाळलेलं पाणी, त्याने होणारी मळमळ, वांत्या-जुलाब यांनी खलाशी बेजार झाले. दोन महिने किना:याचं दर्शन झालं नाही तेव्हा टेकीला आलेल्या खलाशांत बंडाळी माजली. अखेर बारा ऑक्टोबरच्या मध्यरात्री ‘जमीन! जमीन!’चा पुकारा झाला आणि श्रमांचं सार्थक झालं. पण मग सान्ता मारिया ओहोटीत किना:यावर अडकून फुटली. पिन्टाचा कप्तान मार्टिन पिन्झॉन त्याचं जहाज घेऊन पळून गेला. धाकटय़ा निनात सगळी माणसं मावेनात. तेव्हा चाळीस लोकांना एका बेटावर सोडून कोलंबस परतला. वाटेत त्याला पिन्झॉन पिन्टासह येऊन मिळाला, दिलजमाई झाली. पण वादळाने पुन्हा त्यांची ताटातूट केली. ‘पूर्व’ सापडल्याची वार्ता आणि पुराव्यादाखल सोनं, तंबाखू, अननस, टर्की वगैरे नवलाईच्या गोष्टी घेऊन स्पेनला पोचलेल्या कोलंबसाचं धूमधडाक्यात स्वागत झालं. त्याचा मोठा मानसन्मान झाला. त्याच्यानंतर काही तासांनीच स्पेनच्या किना:याला लागलेल्या पिन्झॉनकडे कुणी ढुंकूनही पाहिलं नाही. हाय खाऊन तो लवकरच मरण पावला.
कोलंबसाच्या पुढच्या दोन मोहिमांचा उद्देश पूर्वेला स्पेनची वसाहत स्थापन करणं हा होता. पण स्कव्र्हीसारखे आजार, खलाशांची बंडं, स्थानिक लोकांशी चकमकी वगैरे कित्येक अडचणी आल्या. त्याच्या अनुशासनाबद्दल अनेक तक्र ारी झाल्या. राणीने पाठवलेल्या नव्या अधिका:याने कोलंबसाला बेडय़ा ठोकून स्पेनला नेलं. तरीही, ‘मलाक्काची सामुद्रधुनी शोधायला’ कोलंबस 15क्2 मध्ये चौथ्यांदा पश्चिमेला गेला. त्यावेळी त्याच्या जहाजांना वाळवी लागली. तो एका बेटावर वर्षभर अडकून पडला. आजार, अपमान, आवर्ती वादळं सोसून पन्नाशीतला कोलंबस कसाबसा वर्षभराने स्पेनला परतला.
कोलंबसाने शोधलेली भूमी हिंदुस्तान नसून तो नवा खंड होता हे 15क्क् सालापर्यंत सा:या युरोपला समजलं होतं. कोलंबस मात्र अट्टहासाने, आपण पूर्व शोधल्याच्या समाधानातच शेवटपर्यंत राहिला. कोलंबसाने प्रशासनात, स्थानिक माणसांशी वागण्यात चुका केल्याही असतील, आपल्याला पूर्वेचा आशिया खंडच सापडल्याचा हट्ट तो दुराग्रहाने धरून बसलाही असेल; पण त्याने अनेक संकटांशी सामना करत, ‘पश्चिम ते पूर्व’ इराद्याने एक अभूतपूर्व प्रवास केला.
अनंत अमुची ध्येयासक्ती,
अनंत अन् आशा, किनारा तुला पामराला’
हे कविवर्य कुसुमाग्रजांनी केलेलं त्याचं गर्वगीत सार्थ आहे. कोलंबसाच्या साहसाने खलाशांना नवा दृष्टिकोन दिला, माणसाला भूगोलाची नवी ओळख करून दिली, मानवी इतिहासातलं एक नवं पर्व सुरू केलं. त्याच्या भव्य स्वप्नापुढे, दिव्य कर्तृत्वापुढे केव्हाही मान झुकते, हात जुळतात.
मृत्यूनंतरही प्रवास
1506 मध्ये कोलंबसने स्पेनमध्ये देह ठेवला. पण तिथून पुढची चारशे वर्षं त्या देहाचा प्रवास चालूच राहिला. कोलंबसाचा दफनविधी स्पेनमध्ये एका लहानशा गावी झाला. तीन वर्षांनी त्याच्या अस्थी तिथून हालवून स्पेनमधल्याच सेविल गावाजवळ नेल्या गेल्या. पण कोलंबसाची अंतिम इच्छा तर ‘आपला दफनविधी पूर्वेलाच व्हावा’ अशी होती. त्या इच्छेला मान देऊन त्याच्या सुनेने, चौतीस वर्षांनंतर सेविलहून अस्थी हलवल्या आणि वेस्ट इंडीजमधल्या एका बेटावर पाठवल्या. कोलंबस पुन्हा एकदा अटलांटिक महासागरापार पोचला. सतराशे पंचाण्णवमध्ये फ्रेंचांनी ते बेट बळकावलं. तोवर कोलंबसाच्या अस्थींचं जागतिक महत्त्व वाढलं होतं. स्पेनने घाईघाईने वेस्ट इंडीजहून अस्थी क्यूबाला नेल्या. अमेरिकेने 1898 मध्ये क्यूबा काबीज केलं. त्यावेळी स्पेनने तो अस्थींचा महान ठेवा परत सेविलला नेऊन तिथल्या कॅथीड्रलमध्ये मोठय़ा इतमामाने दफन केला. मृत्यूनंतर चारशे वर्षांनी कोलंबसाची पाचवी अमेरिकावारी पूर्ण झाली. डीएनए-तपासाने त्या अस्थी कोलंबसाच्याच असल्याचं सिद्ध झालं आहे. त्यांच्यावर सुंदर स्मारकही बांधलेलं आहे.
(लेखिका गेली तीस वर्षे सौदी अरेबिया आणि त्याआधी इंग्लंडमध्ये वास्तव्याला होत्या. ‘मानवाचा प्रवास’ हा त्यांच्या संशोधनाचा विषय आहे.)
ujjwalahd9@gmail.com