प्रचलित वास्तुकलेत ना कला, ना कुसर!
By admin | Published: April 1, 2017 03:11 PM2017-04-01T15:11:15+5:302017-04-01T15:34:06+5:30
चौकोन वा चौरसापेक्षा त्रिकोण ही रचना अतिशय मजबूत आहे. भूमितीचा हा प्राथमिक सिद्धांत आहे. वास्तुतज्ज्ञ, अभियंते घर बांधताना या तत्त्वांकडे का दुर्लक्ष करतात? त्याची फळे इतरांना भोगावी लागतात.
- लॉरी बेकर
यांच्याशी झालेल्या गप्पांची आठवण
चौकोन वा चौरसापेक्षा त्रिकोण ही रचना अतिशय मजबूत आहे.
भूमितीचा हा प्राथमिक सिद्धांत आहे. वास्तुतज्ज्ञ,
अभियंते घर बांधताना या तत्त्वांकडे का दुर्लक्ष करतात?
त्याची फळे इतरांना भोगावी लागतात.
सध्या आजूबाजूला असणाऱ्या इमारती व घरे पाहून वास्तुकलेच्या प्रवासाबद्दल आपल्याला काय वाटते?
व्यावसायिक वास्तुविशारदाला कलावंत म्हणता येईल का, असाही प्रश्न विचारता येईल. वास्तुविशारद एक कल्पना मांडतो (म्हणजे तशी अपेक्षा आहे). त्याला ग्राहकाची संमती मिळवावी लागते. त्यानंतर शहराच्या नियोजन अधिकाऱ्याकडून परवानगी मिळवावी लागते. त्यामुळे कागदावर काढलेल्या संकल्पनांना कला असे म्हणायचे ठरवले, तर अंतिम निर्मितीशी त्याचा संबंध काय उरतो, हे तपासून पाहावे लागेल. त्यातून पुढे कंत्राटदार बांधकामाचा ताबा घेतो. त्या कल्पनांचे ‘क्रॉँक्रिटीकरण’ करणाऱ्या कंत्राटदाराला वास्तूमधील कला दिसू शकत नाही, समजणे तर फारच दूृर! एकंदर व्यवहार चौरस फूट व घनफुटाच्या परिभाषेत चालतो. तिथे कलेला कुठले स्थान असणार? शब्दकोशामध्ये पाहण्याचे कष्ट घेतले तर कला म्हणजे सौंदर्याची निर्मिती अशी व्याख्या केलेली आहे. बघताक्षणी दृष्टीला त्रास न होता सुखावह वाटावी अशी निर्मिती म्हणजे कला असे आपल्याला म्हणता येईल. सध्याची बांधकामे, इमारती म्हणजे कलेचा आविष्कार आहेत असे म्हणता येईल का (अपवाद सतीश गुजराल), असा प्रश्न मला पडतो.
भारतामधील वास्तुकलेच्या वाटचालीत भारतीय वास्तुकलेचा विकास होऊ शकला नाही, असे म्हणता येईल का?
‘भारतीय वास्तुकला’ अशी काही शैली आहे असे मला वाटत नाही. स्थानिक साधनसामग्री वापरून त्या-त्या भागातील वातावरण, भौगोलिकतेला अनुरूप अशी घरे बांधली जायची. केरळी, राजस्थानी किंवा डोंगराळ भागातली, समुद्रकाठची वास्तुकला.. असे म्हणणे योग्य होईल. पुढचा मुद्दा आहे विकासाचा! बांधकामात नवीन सामग्री, नवे तंत्र वापरणे हाच विकास असे बऱ्याच जणांना वाटते. माती आणि दगडापासून सलोह काँक्रीट (आर.सी.सी.), लाकूड वा दगडाच्या जाळीऐवजी अॅल्युमिनियम व काचेचा वापर हा विकास आहे असे कित्येक जण मानतात. ‘बांधकामातील विकास’ म्हटले जाते तेव्हा त्यांना लिफ्ट, एअर कंडिशनिंग, गरम व थंड पाण्याची सोय ही आधुनिक उपकरणे अभिप्रेत असतात. एखाददुसरा अपवाद वगळता वास्तुकलेची पारंपरिक शैली काळाच्या ओघात नाहीशी होत गेली. तिचे अवशेष फक्त हॉलिडे रिसॉर्ट्समध्येच आढळतात. विकास म्हणजे सुधारणा किंवा पुढचा टप्पा गाठणे या दृष्टीने पाहिले तर पारंपरिक शैलीचा विकास झाला नाही.
अलीकडे कला व वास्तुकलेसंबंधी चर्चा निघाली की ‘स्थानिक’ हा शब्दप्रयोग ऐकायला मिळतो. स्थान, लोक, भाषा यांचा उल्लेख करताना ‘स्थानिक’ हे विशेषण वापरले जाते, परंतु वास्तुकलेबाबतीत स्थानिक म्हटले की बहुतेकांच्या डोळ्यांसमोर माती, बांबू वापरलेली झोपडी उभी राहते. स्थानिक म्हणजे ग्रामीण असाही कैक जणांचा ग्रह असतो. वर्तमानाशी संबंध न सांगता भूतकाळाशी निगडित असणारी शैली असे काही जणांना वाटू लागते. प्रचलित वास्तुकलेची भाषा आणि त्यामधील निंदाव्यंजक शब्दप्रयोग लक्षात घेऊनच आपल्याला वेगळ्या उद्देशांनी स्थानिक वास्तुकलेविषयी बोलावे लागेल.
आपल्या पूर्वजांनी केलेल्या स्थानिक वास्तुकलेचे सौंदर्य आणि उपयोगिता पाहून मी नेहमीच थक्क होत आलो आहे. स्थानिक सामग्रीतून वादळवारा, तुफान पाऊस यांचा अदमास घेऊन त्यामध्ये टिकाव धरणारी घरे त्यांनी तयार केली. तऱ्हेतऱ्हेची माणसे, त्यांचे उद्योग, पशू-पक्षी या सर्वांना सामावून घेणारी ती घरे होती. हे खरे हॅबिटाट अॅवॉर्डचे मानकरी.
‘स्थानिक’ म्हणवली जाणारी सध्याची वास्तुकला अतिशय खेदजनक आहे. तिच्यात कला नाही आणि कुसरही नाही. भारतभर कुठेही जा. लोकांचा अधिक काळ घराच्या बाहेर जातो. घरात जात नाही. याचा विचार पूर्वीच्या स्थानिक वास्तुकलेने केला होता. आताच्या वास्तुकलेत या घटकांचा मागमूस दिसत नाही, असे मी म्हणतो तेव्हा, ‘आपल्या पूर्वजांच्या काळी लोकसंख्येचा स्फोट झाला नव्हता, स्थलांतराचे प्रमाण अगदी कमी होते’ - हे ऐकवले जाते. ते बरोबर आहे. तरीदेखील शंभर घरांच्या वस्तीचे गाव आणि शंभर कुटुंबांची कॉलनी यांची तुलना करायचे स्वातंत्र्य मी घेईन.
प्रचलित वास्तुकलेचे सामर्थ्य कशात आहे?
सलोह काँक्रीट हे प्रचलित वास्तुकलेचे सामर्थ्य आहे. वास्तविक सलोह काँक्रीटमधील लोखंडामुळे बारकाव्यांमध्येसुद्धा कसब दाखवता येते. आकारात विविधता आणता येते. पण वापर करणाऱ्यांना याची जाण नसल्यामुळे काँक्रीटचा उपयोग वाढूनही आकारातील वैविध्य, बारकाव्यांमधील प्रावीण्य अजिबात दिसत नाही. केवळ यांत्रिक पद्धतीने ठोकळेबाज वापर दिसतो.
देशातील बदलत्या आर्थिक, सामाजिक, राजकीय परिस्थितीचे पुढील काळातील वास्तुकलेवर कसे परिणाम होतील?
या बदलत्या वास्तवाचे आम्हा वास्तुविशारदांना आणि नागरिकांना कुठे भान आहे? देशासमोर ऊर्जेचे संकट बिकट होत असूनही आपली उधळमाधळ चालूच राहते. ऊर्जेची बचत होऊ शकेल अशी बांधकाम सामग्री आपण वापरत नाही. स्थानिक सामग्री उपलब्ध असूनही दूरवरची सामग्री आणण्याकरिता अतोनात वाहतूक करतो. बहुसंख्य जनता कशी जगते हे बघण्याची आपली इच्छा नाही. आपण नियोजनकर्ते, बुद्धिवंत, सत्तेशी जवळीक असणारे ‘महा’जन त्याकडे हेतुपुरस्सर डोळेझाक करतो. उपलब्ध साधनसंपदेचा उपयोग होत नसेल तर त्याला विकास म्हणणे ही शुद्ध दिशाभूल आहे.
कुठल्याही वैयक्तिक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये रामबाण उपाय असल्याचे दावे केले जात आहेत. असे उपाय शोधण्यासाठी देशभर सर्वत्र धावाधाव चालू आहे. याविषयी..
बांधकामासंबंधीचे काही नियम सांगणाऱ्या ‘वास्तुशास्त्रा’मागे सहज जाणवणाऱ्या बाबी आहेत. काही कारणांसाठी त्याला धर्माचा मुलामा दिला गेलाय. प्रत्यक्ष स्थऴावर इमारत कशी असावी, हे ‘वास्तुशास्त्र’ सांगते.
बाकी मग घरातील कोणत्या घटकाला कुठे व का स्थान असावे हे त्यात असते. माझ्या ग्राहकांचे भूखंड छोटे असतात. त्यांना धनसंपत्ती, पाणी, प्रवेशाची, झोपण्याची, अग्नीची जागा ठरवायला वाव नसतो. मला वाटते ऊन, वारा, पाऊस यांचा विचार करणं अधिक महत्त्वाचं आहे.
सगळ्या खोल्यांमधून मोकळी हवा, स्वच्छ सूर्यप्रकाश खेळायला पाहिजे. एवढे शास्त्र पाहणे पुरेसे आहे.
गेल्या काही वर्षांमधील भूकंपात पारंपरिक व आधुनिक दोन्ही प्रकारची घरे उद्ध्वस्त झाली. यातून कोणता धडा घेता येईल?
मी नेहमी जुन्याचे टुमणे लावतो असे म्हणतात. माझी त्याला काही हरकत नाही. भारताला भूकंप काही नवे नाहीत. तो धोका लक्षात घेऊनच भूकंपप्रवण भागात घरे बांधली जायची. भूकंपाचे हादरे कायम बसतात, अशा हिमालयीन भागात मी अठरा वर्षे होतो. तिथे उत्तम जाडीच्या दगडातून घरे बांधतात. त्यांचा सांधा दोन हातांची बोटे एकमेकात गुंफल्यासारखा असतो.
तो अतिशय भक्कम असल्याने घरांची हानी होत नाही. उत्तर काशी, चमोल, लातूर भागात इतर भागांतून आलेल्या अकुशल मिस्त्रींनी घरे बांधली. त्यांना पारंपरिक बांधकाम माहीत नव्हते. म्हणून ती घरे सदोष होती. भूकंपात हानीचे प्रमाण त्यामुळे वाढले.
छायाचित्रांमधून व दूरचित्रवाणीवरून जे पाहिले, त्यावरून गुजरातमधील बांधकामांची गुणवत्ता भीषण होती हे मात्र सहज लक्षात येते. भूकंप नैसर्गिक असला तरी होणाऱ्या हानीला मानवाची निर्मितीच जबाबदार आहे. त्रिकोण ही रचना अतिशय मजबूत आहे.
चौकोन वा चौरस दुबळे असतात. हा भूमितीचा प्राथमिक व साधा सिद्धांत आहे, त्याची वारंवार प्रचिती येते. उच्चविद्याभूषितांना ही मूलभूत तत्त्वे कशी समजत नाहीत? केरळमधील पारंपरिक घरातून हे नियम काटेकोरपणे पाळलेले दिसतात.
आम्ही वास्तुतज्ज्ञ, अभियंते घर बांधताना या तत्त्वांकडे का दुर्लक्ष करतो? त्याची फळे इतरांना भोगावी लागतात.
मुलाखत : अतुल देऊळगावकर