तत्त्वज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 06:03 AM2018-12-30T06:03:00+5:302018-12-30T06:05:06+5:30

दुष्काळी गावात होतो. एका कुटुंबाला कोडे घातले, ‘आपल्या गावात पाणी नाही एक. आपल्याला आत्महत्या करायची नाही दोन. आपल्याला गाव सोडून शहरात स्थायिक होण्याजोगे वातावरण नाही तीन. आता मला सांगा आपण जगायचे कसे?’ सुवर्णा म्हणाली, मी सांगते उत्तर !

For the prevention of farmer suicides.. | तत्त्वज्ञ

तत्त्वज्ञ

Next
ठळक मुद्देसचिवालयात बसून अनेक जेष्ठ अधिकाऱ्यांना सुचणार नाही अशी कल्पना. पाणी नाही तर विकत घ्या आणि व्यवसाय करा. मूलगामी विचार!..

- विनायक पाटील

बायफ मित्रा या संस्थेच्या नवजीवन या प्रकल्पाअंतर्गत मी खेड्यापाड्यात फिरत असतो. हा प्रकल्प आहे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या पुनरुत्थानाचा.
२४ डिसेंबर २०१८.
मी नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात रेडगांव येथे होतो. भाग दुष्काळी, भागच काय सबंध तालुकाच दुष्काळी.
रेडगांव येथे काळे आडनाव असलेल्या कुटुंबातील भाऊरावने आत्महत्या केली होती. आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या पत्नीचे नाव ‘लंका’. म्हातारीची समज जेमतेम. घरात मुलगा आणि सून. मुलाचे नुकतेच अपेंडिक्सचे आॅपरेशन झालेले. थोडा अशक्त (कदाचित आॅपरेशनमुळे असेल) सून सुदृढ. तिचे नाव सुवर्णा. १२ वी पास. चुणचुणीत. अशा कुटुंबाच्या भेटीला गेलो की त्यांना इकडच्या तिकडच्या गप्पा करुन मी बोलते करतो. बोलायला लागल्यावर लक्षात येते की ही अडचणीतील माणसे एका अनामिक दडपणाखाली असतात. मोकळेपणाने बोलायला लागल्यावर लक्षात येते की यांना सगळी माहिती आहे. बरेचसे विषय माहीत आहेत आणि तर्कही भक्कम आहे.
या गावात यंदा ठार दुष्काळ. आत्ताच (डिसेंबर महिन्यात) पिण्याच्या पाण्यासाठी टँकर विकत आणावा लागतो. टँकर विकत घ्यायचा तो कोरड्या विहिरीत ओतायचा आणि ते पाणी नंतर काढून माणसांच्या आणि जनावरांच्या पिण्यासाठी वापरायचे. एका टँकरची किंमत रुपये तीन हजार पाचशे. सगळाच आनंद.
सर्व काळे कुटुंबीय बसले. गप्पा सुरु. मी त्यांना विचारले, ‘मी तुम्हाला एक कोडे घालतो, त्याचे उत्तर द्याल काय?’
ते म्हणाले प्रयत्न करु.
मी कोडे घातले, ते असे :
आपल्या गावात पाणी नाही एक... आपल्याला आत्महत्या करायची नाही दोन... आपल्याला गाव सोडून शहरात स्थायिक होण्याजोगे वातावरण नाही तीन... आता मला सांगा आपण जगायचे कसे?.. हे माझे कोडे!
कुणालाच उत्तर सुचत नव्हते. पाच मिनिटे शांतता.
मग सुवर्णा बोलती झाली. म्हणाली, ‘मला उत्तर सापडले.’
म्हटले, सांग तुझे उत्तर!
ती म्हणाली, ‘पाणी विकत घ्यायचे आणि व्यवसाय करायचा’
- मी चमकलोच! व्वा काय कल्पना आहे. नव्हे हे तर तत्वज्ञान! सचिवालयात बसून अनेक जेष्ठ अधिकाऱ्यांना सुचणार नाही अशी कल्पना. पाणी नाही तर विकत घ्या आणि व्यवसाय करा. मूलगामी विचार.
मी सुवर्णाला विचारले, ‘अगं, समजा पाणी विकत घेतले तर तू व्यवसाय काय करशील?’
ती म्हणाली, ‘मी शेळ्या पाळीन. मला अनुभव आहे. तुम्ही मला दहा शेळ्या आणून द्या. सहा महिन्यात त्या वितील, त्यांना पिले होतील. ती सहा महिन्यात विकायला येतात. सध्याच्या भावात सहा महिन्याचा बोकड पाच हजार रुपयांना विकला जातो आणि शेळी चार हजार रुपयांना. त्यातला एक बोकड आणि एका शेळीच्या पैशातून एक वर्षाच्या पाण्याच्या रकमेची परतफेड होईल. मला आठ उरतील तो माझा फायदा. फक्त शेळ्यांसोबत मला पाणी साठवण्यासाठी एखादी टाकी द्या म्हणजे पंधरा ते वीस दिवसांची चिंंता नाही. टाकी रिकामी झाली की पुन्हा टँकर मागवीन.’
पाण्याच्या टाक्या बनवणाºया एका कंपनीचे मालक माझे मित्र आहेत. एखादी अर्धी कापलेली टाकी त्यांचेकडे मिळते का ते पहाण्यासाठी मी निघालो आहे.
मिळेल मिळेल. टाकी मिळेल..
(साहित्य-कला आणि शेतीसह अनेक विषयांमध्ये सखोल जाण असलेले लेखक महाराष्ट्राचे
ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री आहेत.)

manthan@lokmat.com

Web Title: For the prevention of farmer suicides..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.