प्रिझन इनसाइड मी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 06:05 AM2018-12-16T06:05:00+5:302018-12-16T06:05:09+5:30
तुरुंगवास म्हणजे शिक्षाच. तिथे स्वत:हून कोण कशाला जाईल? पण दक्षिण कोरियातल्या एका तुरुंगात मात्र स्वत:हून जाण्यासाठी लोक आपले नाव नोंदवत आहेत. का? कारण त्या ‘तुरुंगात’ जाऊन आलेले म्हणतात, ‘इथल्या बंदिवासातच मला माझे हरवलेले स्वातंत्र्य मिळाले.’
- पवन देशपांडे
आयुष्याच्या कैदेतून बाहेर काढणाऱ्या एका विलक्षण तुरुंगाची कोरियन कहाणी..
मोबाइल नोटिफिकेशनची रिग्ां वाजली की ‘आॅफिसचा तर मेसेज नसेल?’ या विचारानं धस्स होतं अनेकांना हल्ली.
मेसेजेस, ई-मेल, व्हॉट्सअॅप अशा अनेकानेक मार्गांनी आता माणसांच्या भोवती त्यांचं काम आणि त्या कामातले ताणतणाव अखंड भुणभुणत असतात. सकाळचा गजर झाल्यापासून रात्री झोपेपर्यंत हे टेन्शन असतंच सतत. नवीन काय वाढून ठेवलंय या चिंतेने अनेकांची तर झोपही उडालेलीच असते कायमची.
कधी एखाद्या कामाची डेडलाइन संपत आलेली असते, कधी एखादा प्रोजेक्ट रिपोर्ट सबमिट करायचा असतो, कधी आजूबाजूला असणाºयांशी तुलना करत स्वत:ला सिद्ध करत बसायचं असतं. कधी आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठीचा झगडा सुरू असतो तर कधी कुटुंबातील समस्यांनी डोक्यात भुंगा केलेला असतो. घरच्या, कामाच्या, व्यक्तिगत आयुष्यातल्या, कुटुंबातल्या अनेकानेक प्रश्नचिन्हांचे टोकदार भाले घेऊनच जगत असतात जगातली बहुतेक माणसं.
आता हे असे ताण पूर्वी नव्हते का माणसांना?
होतेच !
- पण त्यांचं असं सतत स्वत:भोवती भुणभुणणं शक्य करणारी टेक्नॉलॉजी आली आणि जगण्यातला तोल बिघडला. आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर आपल्याला डोक्याला ताण देणाºया गोष्टी गोंदण म्हणून कायम चिकटलेल्या असतात, त्या प्रत्येकाच्या बाबतीत वेगळ्या स्वरूपात, वेगवेगळ्या तीव्रतेच्याही असू शकतात. त्यामुळे त्यावर प्रत्येकाची प्रतिक्रियाही वेगळी असते. पण, या ताणतणावाच्या वातावरणात रोज नवी भर पडत असते हे मात्र नक्की.
आता तर आपण आपलं आयुष्य टेक्नॉलॉजीशी बांधून घातलं आहे. आपण अधिक वेळ यंत्रांसोबतच घालवतो. आॅफिसमध्ये कम्प्युटर/लॅपटॉप आपल्याला चिकटलेला असतो. मोबाइल तर आपल्या शरीराचा एक अवयवच होऊन बसला आहे. तंत्रज्ञानामुळे कामाचे तास कमी होतील असे वाटत होते. प्रत्यक्षात तंत्रज्ञानासोबत काम आणि त्याचा वेगही वाढला आहे. शिवाय पूर्वीच्या आॅफिसमध्ये असे तशी निश्चित वेळही आता कामाला उरलेली नाही.
मग त्यावर उपाय काय?
दक्षिण कोरियाने एक नवा मार्ग शोधून काढला आहे.
तो म्हणजे, डोक्याला शॉट देणारे सगळे कप्पे बंद करून थेट तुरुंगातच जाऊन राहायचे !
तुरुंग?
हो !
आणि तोही स्वत:च स्वत:साठी निवडलेला !
जगात सर्वाधिक तास काम करणाºयांच्या क्रमवारीत दक्षिण कोरियाचा नंबर तिसरा लागतो. या देशातील लोकांना दर आठवड्याला किमान ६० तास काम करावे लागते. म्हणजे आठवड्याची एक सुटी सोडली तर रोजचे १० तास काम. त्याशिवाय प्रवासाला लागतो तो वेळ वेगळा. त्यात ट्राफिक !
यात अडकलेले असंख्य लोक.
त्यापैकीच एक नो जी हियांग या वकील बाई. त्यांचा नवरा सतत कामाला जुंपलेला. दोघांच्या भेटी मुश्कील झाल्यावर त्यांनी काहीतरी मार्ग काढायचे ठरवले. त्या सांगतात, ‘‘माझा नवरा आठवड्याला १०० तास काम करायचा. कायम कामात बुडालेला. त्यामुळे आमच्या जगण्याला काही अर्थच नव्हता उरला. ते काम म्हणजे एक प्रकारचे तुरुंग होते. त्यात त्याने स्वत:ला कैद करून घेतले होते !’’
या गृहस्थांचे नाव क्योन योंग सिओक. ते एकदा बोलता बोलता वैतागून आपल्या पत्नीला म्हणाले, ‘‘या कामातून मुक्त होण्यासाठी मी जेलमध्येही जायला तयार आहे. निदान तिथे तरी शांतता लाभेल.’’
- त्या सहज संवादातून दोघा पती-पत्नींना एक खास कल्पना सुचली आणि त्यांनी खरोखरच कामाच्या ताणाने वैतागलेल्या लोकांसाठी एक तुरुंग सुरू करायचे ठरवले.
या प्रयोगाचे नाव ठेवले : प्रिझन इनसाइड मी !
गुन्ह्याची शिक्षा म्हणून नव्हे, तर (अति) कामाच्या/तणावाच्या शिक्षेतून सुटका म्हणून स्वत:च या तुरुंगात जायचे, अशी कल्पना ! इथे निवांत शांतता आहे, मनासारखे वागण्याची मोकळीक आहे; पण हे हॉटेल नव्हे. कारण या तुरुंगात कडक नियम आहेत आणि ते पाळावे लागतात.
दक्षिण कोरियातल्या हाँगचेआॅन नावाच्या शहरात ‘प्रिझन इनसाइड मी’ हा तुरुंग आहे. सध्या या तुरुंगात राहण्यासाठी २४ तासांसाठी ९० डॉलर द्यावे लागतात. २४ तासांपासून आठवडाभरापर्यंत राहता येते. सध्या एकूण २८ सेल आहेत म्हणजे एकावेळी केवळ २८ लोकांना इथे कैदी म्हणून राहाता येते. आजवर या तुरुंगात २००० कैदी राहून गेले आहेत. यापैकी कोणाला आॅफिसच्या कामांचा ताण होता, कोणाला अभ्यासाचा. कोणाला घरातल्या कटकटींचा, तर कोणाला स्वत:च्याच महत्त्वाकांक्षांच्या ओझ्याचा !
कामात आकंठ बुडाल्याने जगणेच विसरत चाललेल्या, सतत नव्या कामाचे-नव्या महत्त्वाकांक्षांचे ओझे घेऊन वावरणाºया लोकांना स्वत:बरोबर वेळ घालवण्यासाठी थोडी उसंत मिळावी, हा या प्रयोगाचा हेतू !
इथे फार सुखसोयी नाहीत; पण आराम करता येईल, अशी व्यवस्था मात्र आहे.
एरवी आलिशान घरात राहण्याची सवय असणारे अनेक कैदी या तुरुंगाच्या छोट्याशा चिंचोळ्या खोलीत स्वत:शी मनमुक्त संवाद साधतात.
या जेलमध्ये जाऊन आलेल्या जाँग वा-नम एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाल्या, ‘‘मी खरे तर एखाद्या हॉलिडे डेस्टिनेशनच्या शोधात होते. मला माझ्या कामातून काही काळ सुटका हवी होती. रोजच्या ताणावर उपाय हवा होता. रिसॉर्ट शोधताना अचानक हे तुरुंग गवसले. मला असाच काहीतरी उपाय हवा होता. कामाच्या ताणामुळे माझा स्वभाव प्रचंड खुनशी झाला होता. कधी कधी अशा वागण्याचा मलाच त्रास व्हायचा. या तुरुंगातल्या वास्तव्यामुळे मला माझाच नव्याने शोध लागला.’’
या तुरुंगात सिगारेट, दारू किंवा तत्सम कोणत्याही व्यसनांना पूर्णपणे बंदी आहे. विशेष म्हणजे या तुरुंगात येतानाच कैद्याकडील सर्व प्रकारचे गॅजेट्स काढून घेतले जातात. तुरुंगात असेपर्यंत त्या ‘कैद्या’ला फोन, इंटरनेट, इ-मेल किंवा व्हॉट्सअॅपसारख्या सर्व प्रकारच्या संवाद साधनांपासून दूर राहावे लागते.
घर, आॅफिस तर सोडाच; जगात काय चालले आहे यातले काहीही या ‘कैद्यां’ना कळत नाही; कारण त्यासाठी काही साधनच नसते. फक्त स्वत:बरोबरच राहायचे. स्वत:चा संवादही फक्त स्वत:शीच !
योगासने करायला एक चटई आणि काही लिहावेसे वाटले, तर डायरी आणि पेन तेवढे मिळते. शिवाय निसर्गरम्य ठिकाणी काही वेळासाठी भटकंती करायला मिळते.
सगळेच जण स्वखुशीने तुरुंगात आलेले असल्याने सुरक्षा फारशी लागत नाहीच. कारण यातला एकही जण कैदी म्हणून पळून जाण्याचा विचार करत नाही. इथे राहून गेलेल्या पार्क हे-री आपला अनुभव सांगताना म्हणतात ते मोठे सुंदर ! पार्कबाई म्हणतात, ‘‘या तुरुंगात पाय ठेवल्यावर मला फार शांत वाटले, आणि इथल्या बंदिवासातच मला माझे हरवलेले स्वातंत्र्य मिळाले.’
काय मिळणार नाही?
1. तुरुंगातील इतर कैद्यांशी बोलण्याची संधी.
2. मोबाइल अगर लॅपटॉप यातले काहीही सोबत नेता येणार नाही.
3. वेळ पाहाता येणार नाही, कारण कुठेही घड्याळ नसेल.
4. स्वत:‘कडे’ पाहता येणार नाही, कारण कुठेही आरसा नसेल.
5. निळ्या रंगाचे कपडेच परिधान करावे लागतील.
6. बिछाना मिळणार नाही. फरशीवरच झोपावे लागेल.
7. ५४ चौरस फुटाच्या चिंचोळ्या खोलीत राहावे लागेल.
काय मिळेल?
1. चहासाठी साहित्य
2. पेन आणि वही
3. योगासनांसाठी चटई
4. छोटेखानी स्वच्छतागृह
5. नास्ता म्हणून रोज तांदळाची लापशी
6. जेवायला उकडलेले रताळे आणि केळ्याचा शेक
(लेखक लोकमत वृत्तसमूहात
वरिष्ठ मुख्य उपसंपादक आहेत.)
pavan.deshpande@lokmat.com