खासगी आयुष्याचे शोरूम
By admin | Published: September 24, 2016 08:32 PM2016-09-24T20:32:06+5:302016-09-24T20:32:06+5:30
समाजमाध्यमे ही भुकेले राक्षस असतात, हे हुशार माणसाला माहीत असते. समाजमाध्यमांवर तुम्ही तुमचा सगळा वर्तमान तिथे ओकलात की मग ती तुम्हाला तुमचा भूतकाळ तिथे ओकायला लावतात. असे करत करत ती तुम्हाला जगासमोर नागडी करून ठेवतात. आपल्याजवळचे खासगी, वैयक्तिक आणि मोलाचे सारे काही तुम्ही देऊन बसता आणि तुमच्या आयुष्याचे एक टीव्ही चॅनेल कधी तयार झाले हे तुम्हाला कळतच नाही
Next
>सचिन कुंडलकर
मत प्रदर्शित करण्याचे आणि हवे तसे व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला असायला हवे हे खरे आहे. आपल्याला काहीतरी सुचणे आणि ते व्यक्त करणे या दोन्हीच्या मध्ये काळाचे अंतर जायला हवे. राग आला की दहा आकडे मोजून मग तो बाहेर काढावा असे म्हणतात तसेच आपल्याला काही सुचले आणि म्हणावेसे वाटले की ते काही वेळाने म्हणावे. कदाचित असे केल्याने आपले म्हणणे जास्त टोकदार आणि आवश्यक होईल. कदाचित असे होईल की काही वेळाने ते म्हणायची गरज उरणार नाही. पण असे केले तर आपल्या आणि दुसऱ्याच्या मनाचा आत्मसन्मान टिकून राहू शकतो. आणि आपल्या म्हणण्याला थोडी किंमत उरू शकते. लिहिणे आणि गरळ ओकणे यात फरक आहे. तसाच फरक मते मांडणे आणि बरळणे यात आहे. फेसबुककर्ते झुकेरबर्ग हे हुशार व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांना महाराष्ट्रात मनोरुग्ण तयार व्हावे असे अजिबात वाटत नव्हते. त्यांना फेसबुक तयार करताना महाराष्ट्र माहीतच नव्हता. (अरे बापरे, किती हा घोर अपमान) आणि आपल्याला मात्र वाटते आहे की हे सगळे पांढरे निळे मायाजाल मराठी समाजाच्या परंपरांच्या अस्मितेसाठी आणि संस्कृतिसंवर्धनासाठी जन्माला आले आहे. पण तसे नाही. जसे की परदेशात महाराष्ट्र मंडळे निघावीत आणि अमेरिकेत नाट्यसंगीताचे स्वर कानी पडावेत म्हणून सॉफ्टवेअर कंपन्या इथल्या कोवळ्या, हुशार आरत्या पाठ असणाऱ्या किंवा सुरळीची वडी करता येणाऱ्या मुलामुलींना खुडून सातासमुद्रापार कामाला नेत नाहीत. तसेच आहे हे. सर्व गोष्टींचा उद्देश मराठी माणसांपाशी आणि त्यांच्या इतिहास आणि परंपरा यांच्यापाशी येऊन थांबत नाही. आपल्यामागे, आपल्यापुढे आणि आजूबाजूला खूप विशाल, विस्तृत जग पसरले आहे याची जाण ठेवली की मग घरातून आॅफिसला जाताना सिग्नलला उभे असले की माझ्या मुलाच्या वाढदिवसाच्या फोटोला किती लाइक पडले असतील या विचाराने जीव घाबरा होत नाही. ब्लडप्रेशर वाढत नाही.
आपले राहते जग सोडून मनाच्या पातळीवर इतरत्र राहावेसे वाटणे ही मनुष्यभावना खूप महत्त्वाची आहे. शांतता आणि स्थैर्य आलेल्या मनाला सुचू लागते तसेच अतिशय अस्वस्थ मनाला खूप काही सुचते. मग ते मन आजूबाजूच्या ओळखीच्या वातावरणातून सुटका मागते आणि वेगळ्या जगामध्ये जायला उत्सुक बनते. ही भावना प्रत्येक जगणाऱ्या मनुष्याला आहे. नुसतीच लेखकांना असते असे नाही. लेखक या भावनेला अतिशय कष्टाने घाटदार आकार देऊन परिश्रमपूर्वक कथा आकाराला आणत असतात. वेगळ्या आभासी जगात जाण्याची इच्छा आणि तसे करण्याची ताकद प्रत्येक माणसाकडे असते. पण या ताकदीचे काय करायचे याची समज जर शिक्षणातून आली नसेल तर मग सातत्याने पर्यायी आणि आभासी जग तयार करून त्यात राहण्याचे व्यसन आधी एकेकट्या व्यक्तीला आणि मग मोठ्या प्रमाणावर संपूर्ण समाजाला लागते. व्यसन जरूर केले पाहिजे पण त्याचे दीर्घकाळाने होणारे परिणाम लक्षात घेऊन आणि त्याची संपूर्ण किंमत फेडायची ताकद मनात असेल तर ते करावे. आयुष्यभर व्यसने करून मग भक्तिमार्गाला लागणारी आणि इतरांना व्यसने सोडायला लावणारी माणसे व्यसनाचा अपमान करत असतात. व्यसनाचा शेवट हा ते करणाऱ्या माणसाच्या अंतामध्ये असतो आणि त्यामुळे अतिरेक आणि व्यसने ही फक्त जिगरबाज लोकांनाच शोभतात ही जाणीव आता पर्यायी आभासी जगात सतत वावरणाऱ्या माणसांना यायला हवी आहे. पर्यायी जगात सतत वावरले की मग प्रत्यक्ष आयुष्यातले छोटे आनंद आणि शांतता उपभोगण्याची माणसाची क्षमता नष्ट होत जाते. पर्यायी जगात जर काही आपल्याला लागेल असे बोलले गेले तर त्याचा मोठा परिणाम आपल्या विचारांवर आणि प्रत्यक्ष जगातील आपल्या कृतींवर होत राहतो. आपण गरजेपेक्षा जास्त मोठे होऊन बसतो. चित्रपटातील नट हे काम संपले की त्यांच्या खासगी जगात गुप्तपणे आणि शांतपणे राहतात. कारण प्रसिद्धी हा त्यांचा व्यवसाय असतो, गरज नसते याची त्यांना जाणीव असते. सामान्य माणूस पर्यायी जगामध्ये स्टार होऊन बसला की त्याला आपल्या आजूबाजूचे दिवे बंद करून अंधारात एकट्याला बसताच येत नाही. स्वत:ला तो गरजेपेक्षा जास्त महत्त्वाचा मानून बसतो. त्या जगात कोणी त्याला काही बोलले की तो क्रूरपणे त्या माणसाला तिथे जाऊन डसतो. आपल्याला वाटणे आणि आपल्याला कळणे यातला फरक त्याला कळेनासा होतो. आणि तो इतरांच्या कामावर, ज्ञानावर आणि कलाकृतींवर जहरी टीका करून आपण मोठे झालो आहोत असे स्वत:ला मानून घेऊ लागतो. महानगरांमध्ये राहणाऱ्या माणसाला आपण सामान्य आहोत ही आवश्यक जाणीव रोजच होत असते पण छोट्या शहरांमध्ये आणि गावांमध्ये राहणारी माणसे प्रसिद्धीला भयंकर भुकेली बनतात आणि मग समाजमाध्यमांवर नकळतपणे स्वत:च्या प्रतिमा तयार करत आणि त्या सांभाळत बसतात. तिथे माणसाची दमणूक सुरू होते. सुशिक्षित आणि हुशार शहरी माणसाला हे माहीत असते की समाजमाध्यमे ही भुकेले राक्षस असतात. तुम्ही तुमचा सगळा वर्तमान तिथे ओकलात की मग ती तुम्हाला तुमचा भूतकाळ तिथे ओकायला लावतात. असे करत करत ती तुम्हाला जगासमोर नागडी करून ठेवतात. तुम्ही काही वर्षांनी तिथे आपल्याजवळचे सगळे खासगी, वैयक्तिक आणि मोलाचे असे देऊन बसता आणि तुमच्या आयुष्याचे एक टीव्ही चॅनेल कधी तयार झाले हे तुम्हाला कळतच नाही. काही वर्षांनी नकळत माणसाच्या मनावर या गोष्टीचा मानसिकदृष्ट्या गंभीर परिणाम होऊ लागतो. आपण प्रत्यक्ष कसेही दिसू पण पर्यायी जगात आपली प्रतिमा चांगली राहायला हवी. आपले सेलिब्रिटींसोबत तिथे भरपूर फोटो हवेत. आपल्या हसऱ्या सेल्फी हव्यात. आपले घर, आपले कुटुंब याची इतर माणसांना असूया वाटायला हवी असे आपल्याला सतत वाटत राहते. कारण आपल्याला आपल्या गावात, आपल्या गल्लीत, आपल्या कुटुंबात स्टार होण्याचे व्यसन सतत समाजमाध्यमे वापरून तयार झाले आहे हे आपल्याला कळत नाही. पर्यायी जगामध्ये जाऊन शांतपणे मनाला मोकळे सोडण्यासाठी माणसे एकटी किंवा एकत्र येऊन दारू पितात, गांजा ओढतात त्यापेक्षा वेगळे असे काहीही या बाबतीत घडत नसते. शिवाय महाराष्ट्रात समाजोपयोगी आणि सामाजिक जाणीव असण्याचे जे व्यसन लागले आहे त्यामुळे अनेक माणसे घरचे सोडून गावची धुणी धूत बसतात आणि त्याविषयी कंटाळा येईल इतके बोलत बसतात. समाजसेवा करून स्टार बनता येते याचे वाईट व्यसन आपले चित्रपट कलाकार आपल्याला लावत असतात आणि आपण सगळेच महान समाजसेवक बनून तिथे वावरतो. कधीतरी मेन स्वीच बंद करून टाकायला हवा आणि या जाळ्यातून मोकळे आणि निवांत व्हायला हवे. मनाने उभारी घेतली आणि काही सुचले तर डायरीत लिहून ठेवायला हवे. आपला खासगीपणा, आपली मुल, आपले कुटुंब मोलाचे असते. ते लोकांच्या स्पर्धात्मक नजरेतून जपायला हवे. एखादी गोष्ट नाही आवडली तर काही वेळाने विचार करून मग व्यक्त व्हायला शिकायला हवे. सारासार विचार करण्याची आपली बुद्धी जागृत ठेवायला हवी. मुख्य म्हणजे आपल्या गल्लीत प्रसिद्ध होण्याची हौस थोडी आवरली तर आपलेच हसे होणार नाही याची जाणीव असायला हवी. समाजमाध्यमांचे फार चांगले परिणामही होत असतात. अनेक माणसे एकत्र येऊन चांगले उपक्रम करायला आणि आपल्याकडे असलेल्या आवश्यक माहितीची देवाण-घेवाण करायला त्यांचा चांगला वापर करत असतात. आपल्या चेहऱ्याचे फोटो आणि आपल्या कुटुंबाची माहिती अशी उघड्यावर टाकणे चांगले लक्षण नाही. आपल्याला हे माहीत असते की दुसऱ्याविषयी उगाच आपण वाईट बोललो की आपले मन आपल्याला खाते. हे असूनही जवळजवळ रोज आपण सर्व गोष्टींविषयी इंटरनेटवर जाऊन गरळ ओकत बसतो हे किती योग्य आहे याचा विचार प्रत्येकाने नीट आणि समंजसपणे करायला हवा.
छोट्या गावात आणि अर्धवट मोठ्या शहरात हल्ली अनेक लोक समीक्षक बनून चित्रपटांना स्टार देतात. त्यांना या मानसिक रोगाची किती मोठी लागण झाली आहे हे आपल्याला लक्षात येणार नाही. सगळा फरक हा ‘आपल्याला वाटणे’ आणि ‘आपल्याला कळणे’ या एकाच गोष्टीत असतो. वाटले म्हणजे कळले असे नाही. पण फेसबुकवर जाऊन बसले की सगळे वाटलेले कळले आहे असे आपल्याला वाटू लागते. मानसिक आजार होऊ लागण्याची ही लक्षणे आहेत.
सिनेमातील माणसे आणि राजकारणी माणसे जेव्हा फेसबुक वापरतात तेव्हा ते नीट आखून विचार करून आणि ठरवून केलेले असते. त्यांची प्रतिमा तयार करणारी अख्खी टीम त्यावर काम करत असते, कारण प्रतिमा तयार करून ती विकणे हा त्यांचा व्यवसाय आहे. स्वत:च्या मुलांचे, घराचे फोटो कधी टाकायचे, केव्हा, किती शब्दात कुठे आणि काय बोलायचे, कशावर आणि कुठे मत व्यक्त करायचे हे त्यांचे आठवडा आठवडा आधी नीट ठरलेले असते. आपल्याला नटांचे वागणे आपलेसे करायचे असेल तर त्यामागचे त्यांचे डावपेचसुद्धा कळायला हवेत. आणि आपल्या खासगी आयुष्याची शोरूम होण्यापासून स्वत:ला वाचवायला हवे.
(ख्यातनाम लेखक, दिग्दर्शक)