प्रियांका चोप्रा अमेरिकेत विकतेय वडापाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2021 06:00 AM2021-08-08T06:00:00+5:302021-08-08T06:00:06+5:30

वडापाव म्हणजे खास पोटभरीचा प्रकार. श्रमिकांसाठी जन्माला आलेला. पोटात गप बसणारा, भूक भागेल असा, स्वस्त आणि मस्त! पण हा पदार्थ आता फक्त गरिबांचा राहिलेला नाही!..

Priyanka Chopra sells Vadapav in America! | प्रियांका चोप्रा अमेरिकेत विकतेय वडापाव!

प्रियांका चोप्रा अमेरिकेत विकतेय वडापाव!

googlenewsNext
ठळक मुद्देहॉटेलात बसणे परावडण्याजोगे नाही.. चालता चालता खाता येईल असे सुटसुटीत खाणे हवे, स्वस्त हवे, परत पोट भरायला हवे.. या सर्व नियमात वडापाव असा फिट्ट बसतो, जसा पावात चटणी.

- शुभा प्रभू साटम

जिवा-शिवाच्या जोड्या! त्याही खाद्यपदार्थाच्या! आलीत ना, नावं लगेच तोंडावर!

मोदक-तूप, आमरस-पुरी, आंबोळी-चटणी, वरण-भात, राजमा-चावल, पुरी-भाजी... आणि येस.. वडा-पाव (पाव-वडा नाही). त्याला कोण विसरणार?

आता तर अमेरिकेत प्रियांका चोप्राच्या ‘सोना’ या न्यूयॉर्क स्थित हॉटेलात वडापाव मिळतो! वास्तविक रस्त्यावर खाल्ले जाणारे असे अनेक पदार्थ जगभरात प्रसिद्ध झाले आहेत. इतकेच काय तर पॉश हाॅटेलात देखण्या रूपात ते पेश होतात. वडापावचाही त्यात समावेश झाला आहे. पोटभरीच्या या खाण्याची ही ग्लोबल ओळख!

जागतिक अन्न नकाशात मराठी पदार्थ अभावाने दिसतात हे सत्य! छोले-पुरी, राजमा-चावल, समोसा, ठेपला, तंदुरी यांच्या गर्दीत उगा अधेमधे मोदक आणि पुरणपोळी..पण मला वाटतं, वडा-पाव असा प्रथमच जगाच्या नकाशावर पोहोचला असावा.

अतिशय सुटसुटीत असा हा पोटभरीचा प्रकार. दादरमध्ये तो उगम पावला. रात्रपाळीला जाणारे कामगार, टॅक्सीचालक, अन्य श्रमिक.. यांना सोयीस्कर असा हा वडापाव रात्रीच मिळायचा. उभ्या उभ्या खायचे आणि वाटेला लागायचे! पाव म्हणजे पोटात गप बसणारा, भूक भागेल असा आणि स्वस्त. तेव्हा रात्रीच मिळणारा हा प्रकार बघता बघता कमालीचा लोकप्रिय झाला आणि मुख्य म्हणजे तरुण वर्गाला भावला. तरुण म्हणजे इथे महाविद्यालयीन नाहीत तर लहानमोठी नोकरी करणारे, एकटे राहणारे, असे पण. ज्यांना उडपी हॉटेलात मिळणारी राइस प्लेटपण आवाक्याबाहेर असायची, त्यांना हा स्वस्त आणि चविष्ट वडापाव प्रचंड भावला. बाकी पुढचा सारा इतिहास आपल्याला माहीत आहे. ‘आमच्या इथला वडापाव एकदम वरिजिनाल’ असे दावे करत अनेक लहानमोठी दुकाने फोफावली आणि बघता बघता मराठी खाणे म्हणजे वडापाव हे समीकरण रूढ झाले. मुंबई आणि घाई हे सयामी जुळे. इथे श्वास घ्यायला उसंत नसते, तिथे खायला वेळ कोण काढणार?

हॉटेलात बसणे परावडण्याजोगे नाही.. चालता चालता खाता येईल असे सुटसुटीत खाणे हवे, स्वस्त हवे, परत पोट भरायला हवे.. या सर्व नियमात वडापाव असा फिट्ट बसतो, जसा पावात चटणी. तरुण, श्रमिक, कष्टकरी वर्गाला फार सोपस्कार असणारे खाणे भावत नाही की परवडत नाही. वेळ वाचणे महत्त्वाचे आणि ही अट वडापाव शंभर टक्के पूर्ण करतो. मग तो कॉलेज, ऑफिसच्याबाहेर टपरीवर खा किंवा रेल्वे स्टेशन, एस टी स्टँड, कॅन्टीन इथून उचला.. भूक हमखास भागणार याची गॅरण्टी!

अर्थात रस्त्यावर कागदात लालभडक चटणीसोबत पावात लपेटून येणारा वडापाव, चोप्राताईच्या हॉटेलात नाजूक डिशमधून, देखण्या काट्यासोबत येत असावा.

वास्तविक अनेक देशातील रस्ता खाणे आता लोकप्रिय झालेय. टाको घ्या किंवा बुरीतो.. मेक्सिकन श्रमिक वर्गाचे खाणे आता फॅशनेबल झालेय. तपास म्हणून स्पेनमधील खानावळीत खलाशी, प्रवासी यांच्यासाठी दिला जाणारा प्रकार बघताबघता सरदार-उमराव यांच्या पंगतीत पेश केला जाऊ लागला. मध्यपूर्वेतील कामगारांचे रोल सर्व जगभरात आवडीने खाल्ले जातात. इतकेच काय, भारतात जो बर्गर खातात तो अमेरिकेत ‘श्रमिक खाणे’ म्हणून प्रसिद्ध होता. पण हे सर्व तुफान प्रसिद्ध झाले. त्यामानाने आपला वडापाव उशिरा येता झाला. पण मला खात्री आहे, न्यूयॉर्कच्या पॉश हॉटेलात आज मिळणारा वडापाव, उद्या टाइम स्क्वेअरमधील फूड ट्रकवर पण येईल.. वॉल स्ट्रीटवर काम करणारे म्हणा, अथवा तत्सम फिरंगी तो झटक्यात उचलतील.. नाक डोळे पुसत.. ‘प्लीज, ॲड ड्राय गार्लिक चटणी!’ अशी ऑर्डर देतील, की पुंडलिक वरदा हरी विठ्ल.. मराठी मन भरून पावले. कारण गोऱ्यांनी ओळख दिली की आपण देशी नेटिव्ह खूष.!!!

आता पुढील पदार्थ काय?

मला वाटते झुणका-भाकरी!

ग्लूटेन फ्री, मिलेट फ्रेंडली लाटेत झुणका-भाकर फिट्ट बसते बघा..

तुमचं काय मत?

कळवा बघू? अमेरिकेच्या रस्त्यावर कोणतं मराठी खाणं असावं??..

(लेखिका खाद्य संस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)

shubhaprabhusatam@gmail.com

 

Web Title: Priyanka Chopra sells Vadapav in America!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.