पुरुषोत्तम बोरकर, मी आणि मेड इन इंडिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 06:34 PM2019-07-20T18:34:07+5:302019-07-20T18:34:47+5:30

आज पर्यंत या एकपात्री चे 980 प्रयोग झालेत. हजार वा प्रयोग बघण्याची आतुरता त्यांना होती पण दुर्दैव .. आता त्यांच्या सदेह उपस्थितीत तो होणे नाही. पण त्यांनी अजरामर केलेली मेड इन इंडिया सुरूच राहील.

Purushottam Borkar, Me and Made In India | पुरुषोत्तम बोरकर, मी आणि मेड इन इंडिया

पुरुषोत्तम बोरकर, मी आणि मेड इन इंडिया

Next

पुरुषोत्तम बोरकर यांचेवर इतक्या लवकर मृत्युलेख लिहावा लागेल ही कल्पना तरी कुणाला होती का ? पण दुदैर्वानं नियतीन ही वेळ माज्यावर आणली. काय लिहू? एवढ्या प्रचंड क्षमतेचा हा माणूस आपण शब्दबद्ध करू शकू का? त्यांच्या साहित्यिक मूल्याला आपण न्याय देऊ शकू का? पुरुषोत्तम बोरकर हे अफाट रसायन होतं. व-हाडी भाषेचा हा अनभिषिक्त सम्राट. आपल्या कसदार लिखाणानं ते घराघरात पोहोचले. मेड इन इंडिया प्रसिद्ध झाल्यावर पुण्या-मुंबईच्या साहित्यिकांच्या मनावर बोरकर नावाचं गारूड तयार झालं. अगदी पु ल देशपांडे पासून शांताबाई शेळके आणि सदाशिव अमरापुरकर यांपासून निळू फुले पर्यंत.
व्यावहारिक चौकटीत आयुष्य जगणे त्यांना मान्य नव्हते कारण ते सतत लिखाणाच्या मस्तीत कलंदर पणे जगत असत. त्याची त्यांना कधी खंत पण वाटत नसे. एका ठिकाणी राहणे त्यांना कधी पटलच नाही. पत्रकारिता मग काही दिवस भूविकास बँकेत नोकरी, पूर्ण पत्रकारिता, कादंबरी लेखन चरित्रलेखन. तसेच शहर बदलण्याच्या बाबतीत. अकोला, अमरावती, पुसद, नागपुर, पुणे, अकोला आणि सरतेशेवटी खामगाव. त्यांच्या बाबतीत एक गोष्ट सांगण्यासारखी आहे. ते सतत वाचन करायचे आणि महत्त्वाचं म्हणजे पुस्तक विकत घेऊन वाचायचे. यामध्ये त्यांनी आपली आर्थिक परिस्थिती कधीच आड येऊ दिली नाही. पाचशे रुपये मिळाले की अडीचशे रुपयांचे पुस्तकं विकत घेत असत. त्यांना त्यांनी लिहिलेल्या प्रत्येक शब्दाची किंमत ठाऊक होते.
बोरकर यांच्या साहित्यनिर्मिती बद्दल व त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल इतरत्र बरेच प्रसिद्ध झाले. मी आज मेड इन इंडिया हा एक पात्री करताना त्यांच्यातील लेखक मला कसा जाणवला हे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे.
1990 च्या नोव्हेंबर महिन्यात त्यांची भेट झाली. या कादंबरीवर मी एक पात्री करावा असा प्रस्ताव त्यांनी ठेवला. मी नखशिखांत मोहरुन गेलो. कारण कादंबरीवर आधारित एकपात्री करणे ही कल्पनाच मुळी आव्हानात्मक होती. सुरुवातीला मला हे आव्हान अशक्यप्राय वाटले. पण बोरकर निश्चित होते. त्यांना त्यांच्या निर्मितीबद्दल गाढ विश्वास होता. 1992 ला पहिला प्रयोग झाला. आणि त्यांच्या माज्यावरील विश्वासाने घोडदौड सुरू झाली. 30 एप्रिल 1994 रोजी शंभरावा प्रयोग सादर झाला. माझे मित्र कै. लक्ष्मण देशपांडे प्रमुख अतिथी होते. त्यावेळेस ते म्हणाले होते की हा प्रयोग जागतिक पातळीवर वाखाणल्या जाईल. पुढे अमेरिकेत प्रयोग करून आम्ही त्यांचा विश्वास सार्थ ठरवला. मग पुढे मुंबई ईटीव्हीमराठी वगैरे ठिकाणी धडाक्यात प्रयोग सुरू झाले.
या ठिकाणी बोरकरांच्या लिखाणातील व मी सादर केलेल्या प्रयोगातील काही गोष्टी अधोरेखित होतात.
मुळातच उपहास गर्भ शैलीतून अविष्कृत झालेली ही विराट शोकांतिका आहे. या तरल तन्मयतेची फलश्रुती म्हणून की काय प्रेक्षकांसमोर खराखुरा पंजाब वावरतोय, आत्मकथन करतोय, हसवतोय, रडवतोय पयार्याने अंतर्मुख व्हायला लावतोय असा सत्या भास होतो आणि ही बोरकरांच्या लेखणीतील ताकद. याला मी प्रामाणिकपणे न्याय देण्याचा प्रयत्न केला.
स्वातंत्र्योत्तर काळातील राजकीय बजबजपुरी, राष्ट्र निष्ठेचे विस्मरण, समाज धारणांची विटंबना ग्रामीण संस्कृतीतली
जगण्याची कुतरओढ आणि कौटुंबिक असं सर्वस्पर्शी विदारक दर्शन घडवणारे प्रसंग ही बोरकरांच्या सूक्ष्म अवलोकनाची परिणीती.
संहीतेतील काही प्रसंग प्रेक्षकांच्या मनाला घर करून जातात आणि बोरकरांच्या संहितेला प्रेक्षक आपसूकच सलाम करतात.
सांगून आलेल्या पोरी विषयी बापाशी संवाद साधताना पंजाब म्हणतो, आपनही सायाचे कातळीचे भोक्ते. मंग कुरूप, अपंग पोरीनं काय कराव ,जीव द्यावा ? आपन नुसतं कव्हर पायतो. रंग पायतो, अंतरंग नाही पहात. मग अशा मेथळनं बायको घरी आननं म्हणजे 50 -60 किलो मटन घरी आनन्या सारखं आहे. बस उपभोगाच यंत्र. एक विदारक सत्य बोरकर सहजपणे लिहून जातात.
उपहासगर्भ ही बोरकरांची लिखाणाची शैली. आपल्या लिखाणात राजकीय राक्षसी महत्त्वाकांक्षे वर ते मार्मिक बोट ठेवतात. गरसोळी खुर्दच्या सरपंचापासून राजकीय गिमिक्स करत शॉर्टकटने आपल्या पोराने देशाचे पंतप्रधान व्हावे मग मी मेल्यावर पंतप्रधानाचा बाप म्हणून राजघाटावर बाप्पूले खेटून माही समाधी बांधल्या जाईल. असं दिवा स्वप्न पाहणा?्या बापाला पंजाब दाद देत नाही.
आणि शेवटच्या प्रसंगी तर बोरकरांच्या प्रतिभेने अत्युच्च उंची गाठली. हा प्रसंग शब्दबद्ध करणारे बोरकर आपल्या निर्मितीने मोठ्या साहित्यिकांना का भुरळ घालू शकले ते लक्षात येते आणि म्हणून मेड इन इंडिया मधील विनोद हा अंतिम सत्याकडे नेणारा परिपक्व शॉर्टकट आहे असे गौरवोद्गार कै. पु ल देशपांडे यांनी काढले होते. मी मेल्यावर माही राख पूर्णा नदीतून समुद्रात जाईन तिथून खंबायता च्या आखातात जाईन. मग वायु बनून माहे ढग बनती न अन गरसोळी खुर्दच्या भेगा पडेल वावराले लोण्यासारखे मुलायम करून टाकीन. अन मी असं चक्र होऊन जाईन या धरतीच या मातीच. कलावंत म्हणून अभिनित करताना मी मनातल्या मनात म्हणतो हॅट्स आॅफ टू यु बोरकर.
आज पर्यंत या एकपात्री चे 980 प्रयोग झालेत. हजार वा प्रयोग बघण्याची आतुरता त्यांना होती पण दुर्दैव .. आता त्यांच्या सदेह उपस्थितीत तो होणे नाही. पण त्यांनी अजरामर केलेली मेड इन इंडिया सुरूच राहील--- त्यांचं नसणं त्यांनी लिहिलेल्या संहिते सोबत आमच्याबरोबर कायम असणार आहे माज्या शेवटच्या श्वासापर्यंत. कारण बोरकरांची शब्दकळा माज्या मनावर , आत्म्यावर कोरली गेलीय.. धन्यवाद बोरकर धन्यवाद. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो....

- दिलीप देशपांडे
नाट्यकलावंत
अकोला 

Web Title: Purushottam Borkar, Me and Made In India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.