कोल्हापूरच्या प्रश्नांचे त्रांगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 11:59 PM2019-06-01T23:59:11+5:302019-06-02T00:00:22+5:30

कोकणसह सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांना भूषणावह आणि महत्त्वाचे असणारे प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबितच आहेत. काही प्रस्तावित, काही अपूर्ण, तर काहींची केवळ घोषणाच झाली आहे.

The questions of Kolhapur's questions | कोल्हापूरच्या प्रश्नांचे त्रांगडे

कोल्हापूरच्या प्रश्नांचे त्रांगडे

Next
ठळक मुद्देया प्रश्नांची आव्हाने घेऊनच नवनिर्वाचित खासदारांनी संसदेत प्रवेश करावा.

कोकणसह सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांना भूषणावह आणि महत्त्वाचे असणारे प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबितच आहेत. काही प्रस्तावित, काही अपूर्ण, तर काहींची केवळ घोषणाच झाली आहे. कोकणातील जलसिंचन प्रकल्प, स्वतंत्र विद्यापीठ, सातारा जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींचा प्रश्न, अभयारण्ये, खंबाटकी घाटातील अत्याधुनिक बोगदा, सांगली जिल्ह्यातील सिंचन योजना, ड्रायपोर्ट, रस्ते विकास, तर कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर-कोकण रेल्वे, पंचगंगा प्रदूषणमुक्त, विमानतळाचा विकास या प्रश्नांची आव्हाने घेऊनच नवनिर्वाचित खासदारांनी संसदेत प्रवेश करावा.


विश्वास पाटील
कोल्हापूरचे महत्त्वाचे तीन प्रश्न केंद्र शासनाच्या पातळीवर पाठपुरावा करून सोडविता येण्यासारखे आहेत. त्यामध्ये कोल्हापूर-कोकण रेल्वेला जोडणे, विमानतळाचा विकास आणि पंचगंगा नदीची प्रदूषणापासून मुक्तता. मी बातमीदार म्हणून १९९५ पासून काम करीत आहे. त्याच्या अगोदरपासून या तिन्ही प्रश्नांच्या बातम्या वृत्तपत्रांत प्रसिद्ध होत आहेत; परंतु त्याची सोडवणूक येथील राजकीय नेतृत्वाला करता आलेली नाही. आता सुदैवाने दोन्ही खासदार शिवसेनेचे आहेत.

संभाजीराजे हे थेट पक्षीय खासदार नसले, तरी त्यांच्यामागे सत्तारूढ भाजपचे बळ आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा पक्षीय दबदबा मुख्यमंत्र्यांइतकाच आहे; त्यामुळे या चौघांनी दिल्लीत जाऊन तळ मारला, तर या पाच वर्षांत या प्रश्नांत काहीतरी नक्की चांगले घडेल. तेवढी राजकीय इच्छाशक्ती हे चौघे दाखविणार का? यावरच या प्रश्नांचे भवितव्य अवलंबून आहे.

पुणे-सोलापूर जशी इंटरसिटी कनेक्टिव्हिटी झाली, तशीच सोय कोल्हापूर-पुणे या मार्गावर होण्याची गरज आहे. कोल्हापुरातील तरुण मोठ्या संख्येने आयटी क्षेत्रात आपले भवितव्य घडवित आहेत. त्यांच्यासाठी ही गरज आहे. कोल्हापूर-मिरज विद्युतीकरणचे काम अंतिम टप्प्यात असले, तरी दुहेरी ट्रॅकच्या कामाने अजून वेग घेतलेला नाही. मध्यवर्ती बसस्थानक ते राजारामपुरी या पादचारी पुलाचे काम महापालिकेने अजून सुरू केलेले नाही. कोल्हापूर-कोकण रेल्वेचे चारवेळा सर्व्हे झाले आहेत; त्यासाठी अर्थसंकल्पात २० कोटींची तरतूदही झाली. नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी कोल्हापूर कोकणला जोडण्यासाठी मनापासून पुढाकार घेतला आहे; परंतु आजही हा प्रकल्प सर्व्हेमध्येच अडकला आहे. रेल्वेचा मार्ग बावडामार्गे न्यायचा की पाचगावमार्गे हे अजून निश्चित होत नाही.

या कामात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अजिबातच लक्ष दिलेले नाही. माजी खासदार धनंजय महाडिक यांनी काही पाठपुरावा जरूर केला; परंतु विषय सोडविता आलेला नाही. त्यामुळे हे काम चार नेत्यांची एकत्रित कोअर कमिटी स्थापन करून दर दोन महिन्यांनी पाठपुरावा व्हायला हवा.पंचगंगा प्रदूषणप्रश्नी तर गेल्या अनेक वर्षांत चर्चेचेच जास्त प्रदूषण झाले आहे. नदीकाठावरील गावांचे सांडपाणी अडविण्याचा सात गावांतील प्रकल्प जिल्हा परिषदेने हाती घेतला; परंतु तो अजून सुरूझालेला नाही. याच प्रकारचा प्रस्ताव दोनवेळा केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने नामंजूर केला आहे. त्याचा पाठपुरावा होण्याची गरज आहे.

कोल्हापूर महापालिका व इचलकरंजी नगरपालिकेचा प्रदूषणातील हिस्सा मोठा आहे. कोल्हापुरातील सात नाले वळविण्याचे कामही अपूर्ण आहे; त्यासाठी निधी आला आहे; परंतु काम ठप्प आहे. भूमिगत सांडपाणी वाहिन्या १00 टक्के टाकण्यासाठी निधीची गरज आहे. त्याशिवाय पंचगंगेशिवाय इतर नद्यांच्या प्रदूषणाचा खोरेनिहाय आराखडा करावा, यासाठी पर्यावरण मंत्रालयाकडे पाठपुरावा आवश्यक आहे.

विमानतळाचे काही प्रश्न माजी खासदार धनंजय महाडिक यांनी ट्रॅकवर आणून ठेवले आहेत; परंतु अजूनही महत्त्वाचे प्रश्न लोंबकळत आहेत. बोर्इंग विमाने उतरायची असतील तर धावपट्टीचे विस्तारीकरण व नाईट लँडिंग सुविधा महत्त्वाची असते.
धावपट्टीच्या विस्तारीकरणासाठी ६४ एकर जमिनीचे अधिग्रहण अजून झालेले नाही. नाईट लँडिंगसाठीही काही अडथळे दूर करण्याची गरज आहे. ही दोन्ही कामे खरेतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मनावर घेतले तरी पूर्ण होण्यासारखी आहेत; परंतु तेच तर होत नाही.

कोल्हापूर-तिरूपती विमानसेवेस चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच कोल्हापूर-शिर्डी सुरूझाले तर कोल्हापूर धार्मिक पर्यटनाच्या केंद्रस्थानी येईल. मुंबईत विमान उतरण्याचा स्लॉट मिळत नाही, हे कोल्हापूर-मुंबई विमानसेवेचे अनेक वर्षांपासूनचे दुखणे आणि दुष्टचक्र आहे. आता जेट विमानसेवा बंद झाली आहे. तिचे सुमारे ३५0 स्लॉट उपलब्ध झाले आहेत. राज्य शासनाकडे तगादा लावून हा प्रश्न सुटण्यासारखा आहे. त्यासाठी नव्या खासदारांनी ताकद लावावी.

कोल्हापूर-कोकण रेल्वेला जोडणे
या रेल्वेमार्गाचा चारवेळा सर्व्हे झाला. अर्थसंकल्पात २0 कोटींची तरतूदही झाली; परंतु आजही हा प्रकल्प सर्व्हेमध्येच अडकला आहे. तसेच रेल्वेचा मार्ग बावडामार्गे न्यायचा की पाचगाव हे अजून निश्चित होत नाही.

विमानतळाचा विकास
धावपट्टीच्या विस्तारीकरणासाठी ६४ एकर जमिनीचे अधिग्रहण अजून झालेले नाही. नाईट लँडिंगसाठीही काही अडथळे दूर करण्याची गरज आहे.
कोल्हापूर-शिर्डी विमान सुरूझाले तर कोल्हापूर धार्मिक पर्यटनाच्या केंद्रस्थानी येईल.

पंचगंगा प्रदूषणमुक्त
नदीकाठावरील गावांचे सांडपाणी अडविण्याचा सात गावांतील प्रकल्प अजून सुरूझालेला नाही. भूमिगत सांडपाणी वाहिन्या १00 टक्के टाकण्यासाठी निधीची गरज आहे. नद्यांच्या प्रदूषणाचा खोरेनिहाय आराखडा करावा, यासाठी पर्यावरण मंत्रालयाकडे पाठपुरावा आवश्यक आहे.

Web Title: The questions of Kolhapur's questions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.