राजभवन
By Admin | Published: February 13, 2016 05:20 PM2016-02-13T17:20:25+5:302016-02-13T17:20:25+5:30
एक संपन्न, वैभवशाली दास्तां मुंबईतलं मलबार हिल. समुद्राचं खारं वारं अंगावर घेत उभा मुंबईतला अत्यंत उच्चभ्रू भाग. त्याच परिसरात तिन्ही बाजूनं समुद्रानं वेढलेली एक अत्यंत देखणी वास्तू. राजभवन! महाराष्ट्राच्या राज्यपालांचं अधिकृत निवासस्थान.
>- सुधारक ओलवे
क्षण-चित्र
एक संपन्न, वैभवशाली दास्तां मुंबईतलं मलबार हिल.
समुद्राचं खारं वारं अंगावर घेत उभा मुंबईतला अत्यंत उच्चभ्रू भाग. त्याच परिसरात तिन्ही बाजूनं समुद्रानं वेढलेली एक अत्यंत देखणी वास्तू.
राजभवन!
महाराष्ट्राच्या राज्यपालांचं अधिकृत निवासस्थान.
समुद्रकिनारा आणि त्यालगतची जमीन यावर अलगद झुलावं असा हा सारा राजभवनाचा देखणा परिसर नजरेला अक्षरश: मोहिनी घालतो. आकाशाकडे ङोपावणारं जंगल, उंचच उंच कडे, निळाशार समुद्र, चमचमती वाळू या सा:याला स्वत:त सामावत चाळीस एकर भूभागावर हे राजभवन वसलं आहे.
नव्वदच्या दशकात वृत्तपत्र छायाचित्रकार म्हणून मी राजभवनात कितीतरी कार्यक्रम ‘कव्हर’ केले. दरम्यान राज्यपाल बदलले, सरकारं बदलली, राज्यकर्ते आले आणि गेले, पण राजभवनाची गरिमा मात्र तशीच कायम राहिली. उलट या भवनाची शान उंचावतच गेली.
राजभवनाचा हा सुंदर वारसा मला कायम मोहात पाडत होता. राज्यपाल कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांनाही या वास्तूचं सौंदर्य, इथलं बांधकाम, प्रत्येक खोलीचं मनोहारी रूप, राजभवनातली मैदानं, डोळे सुखावणारी हिरवळ हे सारं छायाचित्रंच्या रूपात साठवावंसं वाटलं. त्यांच्याचमुळे माझा राजभवनातला प्रवास सुरू झाला. आधी पाहिलेली वास्तू नव्यानं पाहणं, त्यातली सौंदर्यस्थळं नव्यानं समजून घेणं सुरू केलं. यानिमित्तानं महाराष्ट्रातल्या अन्य राजभवनांनाही मी भेट दिली. नागपूरचं जैवविविधतेनं नटलेलं राजभवन, विदेशी देखण्या पक्ष्यांची रेलचेल, अत्यंत मोहक फुलपाखरं. हे सारं या भवनाच्या प्रांगणात सुखानं नांदत असतं. महाबळेश्वरातलं राज्यपालांचं निवासस्थान आणि आजूबाजूचा हिरवाकंच परिसर, त्यातल्या ऊनपावसाच्या छटा. हे सारं एखाद्या विलक्षण देखण्या चित्रपेक्षाही अद्भुत!
मुंबईतल्या राजभवनात तर जुन्या काळाच्या कितीतरी खुणा दिसतात. लाल कौलारू छत, पांढ:या रंगातली वास्तू, मोठ्ठे रुबाबदार दिवाणखाने, अत्यंत देखणं लाकडी फर्निचर, पांढरे शुभ्र स्तंभ, परिसरातल्या हिरवळीवरचे नाचरे मोर आणि अरबी समुद्राच्या निळाईत परावर्तित होऊन येणारी चमचमती सोनेरी सूर्यकिरणं, तो सोनसळी प्रकाश, शतकभर वयाची अजस्त्र गोरखचिंचेची झाडं, झाडावेलींनी बहरलेल्या बागा. हे सारं या वास्तूच्या आजवरच्या इतिहासाचे साक्षीदार आहेत.
ही नुस्ती वास्तू नाही, तो एक सांस्कृतिक वारसा आहे या जाणिवेनंच राज्यपाल कार्यालयानं राजभवनाच्या छायाचित्रंचं एक पुस्तक प्रसिद्ध करायचं ठरवलं. ‘राजभवन्स ऑफ महाराष्ट्र : विटनेस टू ग्लोरी’ अर्थात ‘महाराष्ट्रातील राजभवनं : वैभवशाली इतिहासाचे साक्षीदार’ या नावानं इंग्रजी-मराठीतली ही पुस्तकं साकारली; ज्यात मी काढलेल्या छायाचित्रंसह राजभवनाच्या संग्रहित छायाचित्रंचा समावेश आहे. त्यातलीच ही काही छायाचित्रं. राजभवनाची. अशा एका वास्तूची; जी महाराष्ट्राच्या संपन्न सांस्कृतिक, राजकीय वारशाची साक्षीदार आहेत. इतिहासाची जणू जिवंत दास्तां आहेत. आजवर आपण हा वारसा जपला आहे. राज्याचा-देशाचा संपन्न-वैभवशाली ऐतिहासिक ऐवज म्हणून तो असाच जपायला हवा!
(छायाचित्रणाच्या माध्यमातून समाजकार्याबद्दल
पद्मश्री पुरस्कारप्राप्त छायाचित्रकार
‘लोकमत’ समूहाचे फोटो एडिटर आहेत.)