क्रिकेटमध्ये दादागिरी गाजवणारा भारत फुटबॉलच्या रोमांचक मैदानात का नाही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 02:33 PM2018-06-16T14:33:27+5:302018-06-17T12:31:19+5:30
बदलत्या बाजाराशी जोडून घेण्याची जी चलाखी क्रिकेटने दाखवली, त्यात भारतीय फुटबॉल मागे पडला. कोलकात्यात ईस्ट बंगालने मोहन बागानला हरवलं की मोहन बागानने ईस्ट बंगालला नमवलं या चर्चेपलीकडे ना ध्यास, ना स्वप्नं!
- राजदीप सरदेसाई
देशाच्या बर्याचशा भागात आजच्या रविवारी घरातल्या टीव्हीसमोर बसून नाहीतर बाहेर हॉटेलात/क्लबात जाऊन, मित्रमंडळींना जमवून फुटबॉलचा थरार अनुभवण्याचे बेत शिजलेले असणार. या धसमुसळ्या खेळाचं वेड घेऊन असं सगळं विसरून जाण्याची धुंदी चढत नाही असे अपवाद अगदी मोजके. त्यातला एक महत्त्वाचा अपवाद म्हणजे भारत! क्रिकेटच्या मैदानातली जीत असो वा हार, सगळंच अगदी रक्तात चढवण्याच्या वेडाची जुनी झिंग असलेला भारत फुटबॉलच्या युद्धात मात्र त्या खुमखुमीने उतरण्याला नाखूश दिसतो. का? फुटबॉल हा जगभर सामान्यांचा खेळ मानला जातो. प्युअर मॅन्स स्पोर्ट. एक मैदान, एक चेंडू आणि किमान दोघांचे चार पाय - फुटबॉल खेळायला एवढी सामग्री पुरते. या खेळासाठी फार साधनं लागत नाहीत, पैसा लागत नाही, जगभरातल्या माणसांनी या खेळाला आपलंसं केलं, मग तोच फुटबॉल भारतात का रुजला नाही? साहेबाचं क्रिकेट रुजलं मग फुटबॉल का नाही?
आज कुणाला सांगून खरं वाटणार नाही की, स्वातंत्र्यानंतरचं पहिलं दशक या देशात फुटबॉलनेच गाजवलं होतं. 1950च्या दशकात जगात सर्वोत्तम मानल्या जाणार्या संघांत भारतीय फुटबॉलचं नाव घेतलं जायचं. 1950 ते 1960 हा भारतीय फुटबॉलचा सुवर्णकाळ. 1950 साली ब्राझीलमध्ये झालेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ खेळणार होता. त्यासाठीची पात्रताही त्यांनी कमावली होती. पण त्यावेळी ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनने सांगितलं की, ब्राझीलला जाण्यासाठी आवश्यक प्रवासखर्चाचे पैसे आमच्याकडे नाहीत, पैसे नाहीत म्हणून आम्ही फिफा वर्ल्डकपमध्ये सहभागी होऊ शकत नाही. त्या स्पर्धेत सहभागी होण्याचं महत्त्वच त्याकाळी कुणाला उमगलं नव्हतं. चर्चेअंती ब्राझीलने प्रवासखर्च देण्याची तयारीही दर्शवली तरीही भारतीय संघानं त्या स्पर्धेतून माघारच घेतली.
.. त्याचं कारण असं की, तोवर भारतीय संघातले खेळाडू अनवाणी फुटबॉल खेळत असत. 1948 साली फिफानं केलेल्या नियमानुसार बूट घालूनच स्पर्धेत सहभागी होणं बंधनकारक होतं. पैशाची अडचण तर होतीच; पण बूट घालून खेळण्याचा सराव नसल्यानंही भारतीय संघानं स्पर्धेतून काढता पाय घेतला. भारतीय फुटबॉलची विश्वचषकातली दावेदारी याच टप्प्यावर संपली. मात्र याकाळातही दर्जा म्हणून, गुणवत्ता म्हणून भारतीय संघ उत्तमच होता. आशियाई स्तरावर तर निर्विवाद वर्चस्व सांगत होता.
1956च्या ऑलिम्पिक स्पर्धेर्पयत भारतीय फुटबॉल संघानं धडक मारली, त्या स्पर्धेत भारतीय संघ चौथ्या क्रमांकावर राहिला. ऑस्ट्रेलियात मेलबर्नला झालेल्या उपांत्य सामन्यार्पयत भारतीय संघानं धडक मारली होती. त्यानंतर 1951 साली झालेल्या आशियाई स्पर्धेचं विजेतेपद भारतानं जिंकलं. इंडोनेशिया, इराण या मातब्बर संघांना भारतीय खेळाडूंनी धूळ चारली. हा भारतीय फुटबॉलसाठी सुवर्णकाळ होताच. याच काळात कोलकात्यात स्थानिक फुटबॉल सामन्यासाठीही लोक खचाखच गर्दी करायचे. शैलेन दत्त, जर्नेल सिंग सारखे मातब्बर खेळाडू याच काळातले. त्यांनी हे दशक गाजवलं, लोक त्यांचे दिवाने होते. 1940चं दशक हॉकीनं गाजवलं, ध्यानचंद नावाचा हॉकीचा जादूगार देशानं याचकाळात पाहिला. पुढच्या दशकात ती जागा फुटबॉलनं घेतली.
1970च्या दशकात बाजारपेठीय अर्थचक्र जोमानं फिरू लागलं आणि बाजारपेठेचा हात धरून मोठं होणं, त्याच्यावर स्वार होणं हे जे क्रिकेटला जमत गेलं ते फुटबॉलला काही साधलं नाही. फुटबॉललाच कशाला, हॉकीलाही साधलं नाही. 1970च्या याच दशकात फुटबॉल पश्चिम बंगाल, केरळ, गोवा आणि काहीअंशी पंजाब याच राज्यात घुटमळत राहिला. बदलत्या बाजारपेठीय अर्थव्यवस्थेशी जोडून घ्यायचा प्रयत्न न करता सार्वजनिक क्षेत्रातील विविध कंपन्यांकडून मिळणार्या निधीवरच भारतीय फुटबॉल अवलंबून राहिला. कोलकात्यात जेसीबी, मुंबईत मफतलाल आणि टाटा या बडय़ा उद्योगांनी फुटबॉलला समर्थन दिलं. बाजारपेठीय अर्थव्यवस्था आणि नवीन बाजारपेठीय आर्थिक ताकदीही फुटबॉलला आपलंसं करायला तयार होत्या, त्यासाठी पायघडय़ा घालायला इच्छुक होत्या, फुटबॉलनं मात्र हे सारं संधी म्हणून स्वीकारलं नाही. खेळ आणि बाजारपेठ यांचं सूत जमतंय हे कदाचित त्याकाळात लक्षातच आलं नाही.
दुसरीकडे क्रिकेट. मध्यमवर्गीय-उच्चमध्यमवर्गीय स्तरातले लोकच त्याकाळी भारतात क्रिकेट खेळत. क्रिकेटचा हात धरून समाजाच्या वरच्या स्तरात सरकणं हे या वर्गाला साधत होतं. 1983 साली भारतीय संघानं एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकप जिंकला. ती संधी साधून बडय़ा कंपन्यांनी क्रिकेटच्या मागे आपली ताकद उभी केली. म्हणता म्हणता क्रिकेट हा भारताचा अव्वल खेळ झाला, देशभर पसरला. फुटबॉल मात्र क्लब लेव्हलवरच राहिला. जेमतेम चार राज्यांपुरता उरला. बाजारपेठ, अर्थसत्ता ज्याच्या पाठीशी तो खेळ टिकतो हे उघड आहे. फुटबॉलच्या पाठीशी अर्थसत्ता उभी राहिलीच नाही.
भारतीय फुटबॉललाही या सगळ्याची काही खेदखंत नसावी. कोलकात्यात ईस्ट बंगालने मोहन बागानला हरवलं की मोहन बागानने ईस्ट बंगालला नमवलं याचंच आकर्षण आणि तेवढीच चर्चा! या क्लब लेव्हलच्या पलीकडे कोणी कधी पाहिलंच नाही. बंगालमध्ये फुटबॉल अव्वल क्रमांकाचा खेळ; पण त्याबाहेर जाऊन जगात आपण नाव कमवावं, जागतिक क्रमवारीत प्रथम ठरावं अशी महत्त्वाकांक्षाही या जगाला कधी वाटली नाही. जगाचं जाऊ द्या; पण निदान आशिया स्तरावर तरी प्रथमस्थानी असावं हेदेखील कधी कुणाच्या मनात आलं नाही. परिणाम व्हायचा तोच झाला, जागतिक दर्जा तर विसराच, आशिया स्तरावर पोहचणंही आपल्या फुटबॉलला साधलं नाही. आपला खेळ सुधारावा, त्याला जागतिक दर्जा लाभावा, आपले फुटबॉलपटू जेमतेम खेळतात, त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर घडवावं, तसं एक्सपोजर मिळावं असा काहीच विचार फुटबॉल फेडरेशननं केला नाही. जपान आणि कोरिया या देशांत मात्र बरोबर याविरुद्ध घडलं. 1950-60च्याच दशकात या दोन देशांनी फुटबॉलला मनापासून स्वीकारलं आणि तो आपल्या मातीत रुजावा म्हणून प्रय} केले. म्हणता म्हणता त्यांनी आशियाई फुटबॉलवर अधिराज्य गाजवायला सुरुवात केली. तेच आखाती देशांत झालं. आखाती देशांत पैसा आला तसा त्यांनी ती ताकद फुटबॉलच्या पाठीशी उभी केली. म्हणता म्हणता आखाती देशांतही फुटबॉल क्रमांक एकचा खेळ ठरला. भारतात जेसीटी पंजाब, ईस्ट बंगाल, मोहन बागान, गोव्यात साळगांवकर या क्लबपुरताच फुटबॉल उरला. आपापसात खेळायचं आणि एकमेकांना हरवायचं यापलीकडे त्यांचं लक्ष्यच नव्हतं. आज आपण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या नावे कितीही नाकं मुरडत असलो तरी क्रिकेटनं बाजारपेठीय व्यवस्थेचा हात धरल्यावर का होईना बीसीसीआयने क्रिकेटमध्ये एक रचना आणली. प्रत्येक स्तरावरचे सामने खेळवले जाऊ लागले. स्टेडिअमचा दर्जा सुधारला, स्पर्धा भरवल्या जाऊ लागल्या. अंडर 14 पासून पुढे विविध स्तरावर स्पर्धा खेळून मुलांना पुढे सरकता यायला लागलं. फुटबॉल काही क्लबपुरता, त्याच चक्रात आणि क्लब लेव्हलवरच अडकून पडला.
ते असं अडकण्याचं अजून एक कारण म्हणजे आपला समाज ब्राrाणी, उच्चवर्गीय वळणाचा आहे. सुखवस्तू जगण्याची, शारीरिक कष्ट होता होईतो टाळण्याची एक ओढ या समाजात दिसते. क्रिकेटच्या संदर्भातही हेच झालं. 1930 आणि 1940च्या दशकात राजे-महाराजे क्रिकेट खेळू लागले ते ब्रिटिश सत्ताधीश वतरुळात प्रवेश मिळावा म्हणून. त्या काळी क्रिकेट खेळणं ‘एलिट’ होतं. स्वातंत्र्यानंतर मध्यमवर्गीय-उच्चमध्यमवर्गीय शहरी लोक क्रिकेट खेळू लागले. त्यातही आपल्याकडे फलंदाजांची परंपरा मोठी कारण गोलंदाजी करणं, क्षेत्ररक्षण करणं ही शारीरिक कष्टाची कामं, ती करण्यापेक्षा एकाजागी उभं राहून फलंदाजी करणं तुलनेनं कमी कष्टाचं होतं. शारीरिक तंदुरुस्तीचा विचार क्रिकेटमध्येही अगदी अलीकडच्या काळार्पयत नव्हता. फुटबॉलचं तसं नाही, तो रांगडा खेळ. शारीरिक कष्ट, धावपळ, धसमुसळ करत अंगावर येणं, परस्परांना धक्के देऊन उसळत्या वेगाने पुढे जाणं त्यात सर्रास होतं. जातिव्यवस्था मानणार्या, स्पृश्य-अस्पृश्यता मानणार्या, वर्ण-वर्गाच्या उच्च-नीचतेविषयी अतिरेकी जागरूक असलेल्या, होताहोईतो शारीरिक घसट टाळणार्या आणि अंतर राखून वागणार्या आपल्या समाजात फुटबॉलचा रांगडा धसमुसळेपणा रुजला नाही. बंगाल-केरळ या राज्यांत फुटबॉल रुजला कारण तिथं डाव्या विचारसरणीची सरकारं होती. या सरकारने जातीविरहित समाजरचनेला प्रोत्साहन देत परस्पर सामीलकीची विचारधारा मांडली. तिथं सामान्य माणसंही एकमेकांशी दंगा करत फुटबॉल खेळू लागली. गोव्यातही चर्चच्या मैदानात मुलं फुटबॉल खेळायची. चर्चने फुटबॉल खेळण्याला पाठिंबा दिला कारण गोव्यातली पोतरुगिज सत्ता. इतरत्र मात्र ते घडलं नाही. क्रिकेटमध्येही पहा, महाराष्ट्रातही सुरुवातीच्या काळात ब्राrाण आणि मराठा या दोन जातींचे खेळाडू दिसतात. आता कुठं खेळाडूंची आडनावं बदलायला लागलेली आहेत. मात्र आजही एकही आदिवासी खेळाडू क्रिकेटमध्ये मोठा नावारूपाला आलेला दिसत नाही. क्रिकेट हा तसा फिजिकल स्पोर्ट नाही. त्यामुळे फार अंगचटीला न येता अंतर राखून खेळणं शक्य असतंच. वर्णवर्गाच्या उच्च-नीचतेची शिवाशिव पाळणारी समाजधारणा न झुगारता क्रिकेट खेळणं साधलं ते अशारीतीनं.
आता या चर्चेत अजून एक प्रश्न महत्त्वाचा ठरतो तो म्हणजे फुटबॉल खेळण्यासाठी आवश्यक तंदुरुस्तीचा. बाजारपेठीय अर्थसत्ता जशी आपल्या फुटबॉलकडे नव्हती तसं उत्तम बाहुबलही नव्हतं. शारीरिक क्षमताही नव्हती. युरोपिय देशातले खेळाडू धिप्पाड, बलदंड, त्यांच्या पायांत फुटबॉलसाठी आवश्यक ताकद होती. पैसाही होता. त्याउलट आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका खंडातले देश. त्यांच्याकडे आर्थिक कुमक कमी असेल; पण पायांत जोर होता. आफ्रिकेतली माणसं भारतीय माणसांपेक्षा चणीनं धिप्पाड आणि बलदंडच. त्यामुळे पैसा नसला तरी त्यांच्या अंगात फुटबॉलसाठी आवश्यक रग आहे. भारतीयांकडे शारीरिक चणीच्या स्वाभाविक मर्यादा आहेतच; पण त्या ओलांडून पुढं जायचं तर एकूणच आरोग्य-व्यवस्था आणि शारीरिक तंदुरुस्तीविषयी आपल्या देशात आनंदच! आत्ता आपल्याकडे फिटनेस चॅलेंजेस दिली - घेतली जातात, फिटनेसची चर्चा आहे, जिम संस्कृती उभी राहताना दिसतेय. मात्र आजवरचं चित्र काय होतं? आपल्या शहरांत मोकळी मैदानं तरी किती आहेत? आपल्या शाळांना मैदानं तरी आहेत का? मुलांना मनसोक्त खेळता येईल अशा सोयी आहेत का? मोकळी मैदानं, खेळाची मैदानं ही महत्त्वाची गुंतवणूक आहे असा विचार तरी आपण कधी केला का? खेळाला आपल्याकडे काही महत्त्वच नाही,
पढोगे लिखोगे बनोगे नवाब,
खेलोगे कुदोगे होंगे खराब!
- ही आपली खेळांकडे पाहण्याची वृत्ती! त्यामुळे देशात मध्यमवर्गीय कुटुंबांनी शिक्षणाचा हात धरला; पण खेळाला काही महत्त्वच दिलं नाही. खेळात करिअर होऊ शकतं हा विचार तर स्वपAातही कुणी करत नसे. क्रिकेटमध्ये पैसा दिसायला लागल्यावर चित्र काहीअंश बदललं. क्रिकेट खेळण्यासाठीच्या सुविधा उभ्या राहिल्या. मैदानं तयार झाली. बाकीच्या खेळांना हे सुदैव मिळालं नाही.
टेनिस, बॅडमिंटन, कुस्ती, अॅथलेटिक्ससाठी बरे दिवस येऊ लागले आहेत ते आत्ता आत्ता!
जे चित्र समाजात दिसलं ते माध्यमांत. टेलिव्हिजन चॅनल्सही जितके क्रिकेटच्या मागे उभे राहिले तितके फुटबॉलच्या पाठीशी आले नाहीत. त्याचं कारणही तेच, जिथं पैसा तिथं कॉर्पोरेट्स, तिथं जाहिराती आणि तिथंच चॅनल्स. त्यामुळे ज्या खेळात पैसा त्या खेळाला माध्यमांनीही उदंड प्रसिद्धी दिली. कबड्डीत पैसा आला तेव्हा कुठं कबड्डी टीव्हीवर दिसायला लागली. आता हळूहळू फुटबॉलकडे कॉर्पोरेट्चं लक्ष जाऊ लागलं आहे. फुटबॉलचे परकीय संघ, स्पर्धा यात देशातल्या तरुण पिढीचा वाढता रस पाहून सामने लाइव्ह दाखवणं सुरू झालं. तरुण भारतीय शहरी प्रेक्षकाला स्वतर्शी जोडून घेण्यासाठी आता चॅनल्स आणि कॉर्पोरेट कंपन्या, उद्योगपती, फुटबॉलचा हात धरू लागले आहेत. त्यातून इंडियन सॉकर लीगसारखी कल्पना पुढे आली. नीता अंबानी यांनी ती स्पर्धा भरवण्याचं ठरवलं. त्याचं कारणही उघड आहे, आयपीएलमध्ये त्यांचा संघ आहेच; पण क्रिकेटमध्ये अनेक बडी नावं, बडय़ा कंपन्या आहेत. फुटबॉल हे अस्पर्शित क्षेत्र आहे, त्यात आपली सत्ता असावी या हेतूनं त्यांनी फुटबॉलला समर्थन दिलं आहे. रणबीर कपूर, ऋतिक रोशन, अभिषेक बच्चन, विराट कोहली यांसारखे स्टार्सही आता फुटबॉलमध्ये गुंतवणूक करू लागले आहेत. भारत हा जसजसा जागतिक बाजारपेठेचा भाग होतोय तसतशा बहुराष्ट्रीय कंपन्याही फुटबॉलद्वारे आपल्या सेवा/वस्तू उत्पादनं भारतीय बाजारपेठेत उतरवू आणि खपवू पाहत आहेत.
देशांतर्गत फुटबॉल स्पर्धा, आंतरराष्ट्रीय दर्जाची आस, त्यासाठी स्वतर्त सुधारणा करण्याचे प्रय} आणि आर्थिक गुंतवणूक यासाठीचे प्रय} जर नियमित आणि दीर्घकाळ होत राहिले तर मला आशा आहे येत्या 25-30 वर्षात भारतीय फुटबॉल एक नवी भरारी घेईल. भारतीय फुटबॉलचा पुनजर्न्म होऊ शकेल.
पण म्हणजे थेट फुटबॉल विश्वचषक स्पर्धेर्पयत मजल मारता येईल का?
- तर त्याचं उत्तर इतकं सोपं नाही. इतर देश इतके पुढे निघून गेलेत की दर्जा म्हणून त्यांना गाठणं सोपं नसेलच. मात्र जपान-कोरियाला नमवत भारत निदान आशियाई मैदानांवर सरस होण्याचं ध्येय ठरवू आणि गाठू शकतो.
अर्थात, हे झालं दूरचं!
.तोर्पयत आपण कुठल्यातरी आवडत्या संघाला पाठिंबा देत फुटबॉल विश्वचषक सामने पहायचे.. सोनी टीव्हीची कॅचलाइन आहे ना,
विच कण्ट्री यू सपोर्ट.?
- त्याचं उत्तर आपापल्यापुरतं शोधतातच भारतीय प्रेक्षक!!
***
बायचुंग भूतिया ते सुनील छेत्री
फुटबॉल विश्वचषक पाहताना माझे बाबा नेहमी पोतरुगिज संघाचं समर्थन करायचे. कारण गोव्याचं पोर्तुगिज असलेलं नातं. बंगाली माणसं कायम ब्राझील किंवा अर्जेण्टिनाला पाठिंबा देतात. म्हणजे फुटबॉल सामने पाहताना आपल्याला नेहमी कुठला तरी देश उसना घेऊन सामना पाहावा लागतो. क्रिकेट किंवा हॉकीचे सामने पाहताना तसं होत नाही. क्रिकेटमध्ये तर विजय मर्चण्ट, विजय हजारेंपासून गावसकर, तेंडुलकर, धोनी, कोहलीर्पयतचे सुपरस्टार आपण पाहिले. लोकांनी त्यांना डोक्यावर घेतलं. हॉकीतही ध्यानचंद हे त्याकाळी सुपरस्टारच होते. भारतीय फुटबॉलने मात्र असा कुणी सुपरस्टार दिला नाही. घडला नाही. अपवाद बायचुंग भूतियाचा. मात्र तोही संपूर्ण देशासाठी स्टार झाला नाही.
आपल्या समाजाची मानसिकताच अशी की, आपण खेळात सुपरहिरो शोधतो.. सुपरटीम नाही! आपला समाज व्यक्तिगत कामगिरीला जास्त महत्त्व देतो, आपल्याला सांघिक कामगिरीचं फार मोल नाही.
हॉकीनं तरी एकेकाळी ध्यानचंदसारखा जादूगार दिला. फुटबॉलमध्ये तर कुणीच ‘देसी’ सुपरहिरो नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर, इंग्लंडच्या क्लबमध्ये जाऊन व्यावसायिक पातळीवर फुटबॉल खेळेल या क्षमतेचा तर कुणीच नाही. त्यामुळेही फुटबॉलला भारतात पाठीराखे लाभले नाहीत. बायचुंग भूतियाचं एक नाव काही काळ गाजलं, आता सुनील छेत्री चर्चेत आहे. मात्र आपला अस्सल देसी हिरो फुटबॉलला लाभला नाही, हेही फुटबॉल सामान्यांचा खेळ न होण्याचं एक कारण म्हटलं पाहिजे.
**
..धार वज्राची मिळू दे!
जागतिकीकरणाविषयी आपण बोलतो पण खर्या अर्थानं ती ‘जागतिक’ वृत्ती, सर्वोत्तम असण्याची ईर्षा, त्यासाठीची काटेकोर मेहनत आणि दृष्टी आपल्याकडे नाही. आपल्याकडे संघसंस्कृती नाही. आपण सुपरस्टार सिंड्रोम घेऊन जगतो, एकाच माणसाला पुजतो-भजतो. जागतिक दर्जाचा फुटबॉल खेळायचा तर आपल्याला हे टीम कल्चर रुजवावं लागेल. भारतीयांना ते आजवर जमलेलं नाही. ‘चालतंय’चा कोमटपणा झुगारून दिल्याशिवाय ती ग्लोबल दृष्टी आपल्याला लाभणार नाही. फुटबॉल खेळायचा तर जगासोबत धावावं लागेल. जर्मनी, इंग्लंड, ब्राझील, अर्जेण्टिना या देशांत एरव्ही काय साम्य? - पण फुटबॉल त्यांना समपातळीवर आणून उभं करतो. सगळ्या देशांना जिंकण्याची समान संधी देतो. सगळ्या जगातल्या माणसांना एकसमान पातळीवर त्या खेळाशी जोडतो. क्रिकेट खेळणारे देश जेमतेम दहा-बारा! शंभरहून अधिक देश फुटबॉल खेळतात. त्या फुटबॉल जगाचा भाग व्हायचं तर ‘मामुली’ गुणवत्तेत आणि यशात समाधान मानण्याची वृत्ती आपल्याला झुगारावी लागेल. बाकी भारत नावाची बाजारपेठ मोठी आहे म्हणून बडय़ा बहुराष्ट्रीय कंपन्या फुटबॉलचा हात धरून देशात येतीलही. पण फुटबॉल खेळणं हे खेळण्याइतकंच जागतिक ऊर्मी आणि वृत्तींशीही जोडलेलं आहे, हे नक्की.
**
भारतीय फुटबॉलचं भविष्य काय? : ईशान्य भारत!
याची मला खात्री वाटते. आजही भारतीय फुटबॉल संघात सर्वाधिक मुलं मणिपूरची आहेत. काही मिझोरामची. भारतीय फुटबॉलचा प्रचार-प्रसार व्हायचा असेल तर फुटबॉलवेडय़ा ईशान्य भारतात फुटबॉल अकॅडमी होणं गरजेचं आहे. ती मुंबईत झाली तर क्रिकेटवेडय़ा मुंबईत तिचं कुणाला अप्रूप असणार नाही.
ईशान्य भारतात अजून क्रिकेट पोहचलं नाही, खेळाडूंना भुलवणारीआयपीएलची तगडी कॉण्ट्रॅक्टस पोचलेली नाहीत. पण तिथे फुटबॉलचं वेड मात्र तुफान आहे. ही पहाडी मुलं फुटबॉल उत्तम खेळतात. बायचुंग भूतिया सिक्कीमचाच. त्यामुळे त्यांना लोकल स्टारही मिळाला. आयपीएलची कॉण्ट्रॅक्टस पोहचण्याच्या आधी जर तिथल्या फुटबॉलला आर्थिक बळ आणि गुणवत्तेला प्रोत्साहन दिलं तर भारतीय फुटबॉल जगाच्या नकाशावर नेण्याचं काम ही ईशान्य भारतीय मुलं करतील असा मला विश्वास वाटतो. मिझोरामबरोबरच बंगाल, गोवा, केरळ इथंही क्रिकेट संस्कृती रुजलेली नाही, तिथं फुटबॉल वाढू शकतो.
(लेखक ख्यातनाम पत्रकार आहेत)
शब्दांकन : मेघना ढोके