मराठी ग्रंथव्यवहार इतका कोमट का आहे?  - या जुन्या प्रश्नाचा ताजा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 08:00 AM2020-01-05T08:00:00+5:302020-01-05T08:00:07+5:30

महाराष्ट्र बारा कोटींचा. त्यातले सात कोटी मतदार. त्यातले  वाचक किती? जे मराठी चित्रपटांचं रडगाणं तेच मराठी नाटकांचं, जे नाटय़ संमेलनाचं  तेच साहित्य संमेलनाचं, जे मराठी साहित्यिकांचं तेच मराठी प्रकाशन संस्थांचं ! लिहिणारे उदंड, छापणारे उदंड, समीक्षा करणारे उदंड, पुरस्कार देणा-या संस्थाही उदंड! अशा कोलाहलात खोटय़ा प्रतिष्ठेलाच महत्त्व येतं. महाराष्ट्रातल्या अनेक प्रकाशन संस्थांची, साहित्यिकांची, पुरस्कार देणा-या संस्थांची, साहित्य संस्थांची सध्या अशीच अवस्था झालेली आहे. 

Ram Jagtap takes a stock of Marathi Literary scene | मराठी ग्रंथव्यवहार इतका कोमट का आहे?  - या जुन्या प्रश्नाचा ताजा शोध

मराठी ग्रंथव्यवहार इतका कोमट का आहे?  - या जुन्या प्रश्नाचा ताजा शोध

googlenewsNext

-राम जगताप 

‘मराठी ग्रंथव्यवहार इतका कोमट का आहे?’
- ते कोमट आहे कारण सुशिक्षित मराठी मध्यमवर्गाचं एकंदर जगणंच कोमट आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमन म्हणायचे, ‘पहिल्या दर्जाचा अमेरिकन माणूस देशाचा राष्ट्राध्यक्ष होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगत नाही, तो एखाद्या कंपनीचा सीईओ होण्याचा प्रयत्न करतो !
त्याच चालीवर असं म्हणता येईल की, पहिल्या दर्जाची महाराष्ट्रीय माणसं मराठी प्रकाशक होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगत नाहीत, ती डॉक्टर-इंजिनिअर वा उद्योगपती होण्याची, युरोप-अमेरिकेत जाण्याची स्वप्नं बाळगतात. आणि हे आत्ताच नाही तर मराठी प्रकाशन व्यवसायाला 1840च्या  दशकात सुरुवात झाली तेव्हापासूनच पाहायला मिळतं आहे. सुरुवातीचा बराचसा काळ तर मराठी प्रकाशन व्यवसायाला हौसेचंच स्वरूप होतं. कालांतरानं त्यात काही ध्येयवादी माणसं आली. पण त्यांचा ध्येयवाद हा एकांडय़ा शिलेदारांसारखाच राहिला. 
कुणाही एकटय़ा माणसाच्या प्रयोगशीलतेला मर्यादा असतात. पण बहुतेकांचा त्याच्यावरच भर असतो. संघटितपणो विचार करून, चळवळ करून, दीर्घकाळ निश्चित ध्येयाचा पाठपुरावा आपल्याला फारसा मानवत नाही. त्यामुळे आपल्या चळवळींना किंवा संघटितपणालाही हौसेचं स्वरूप येतं आणि वैयक्तिक प्रयोगशीलतेची परिणती तर हमखास एकांडय़ा शिलेदारीतच होते. अशा प्रकारांना स्वभावत:च मर्यादा असतात. पण आपलं प्रायोगिकतेचं वेड अतोनात. त्यामुळे एकांडय़ा प्रयोगांचे किंवा वैयक्तिक अनुभवांचे सामाजिक सिद्धान्त होत नसतात, हे लक्षात घेण्याऐवजी त्यातच इतिकर्तव्यता मानणा-यांचीच संख्या महाराष्ट्रातल्या (राजकीय-सामाजिक क्षेत्रंप्रमाणोच) सांस्कृतिक क्षेत्रात जास्त असलेली दिसते. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ याचं आपल्याला कौतुक वाटतं ते त्यामुळेच. इच्छाशक्ती भरपूर दिसते. पण ती पंचवीस, पन्नास असे टप्पे पार करताना इतकी गळाठते की, पंचाहत्तर, शंभर या टप्प्यांर्पयत ती अनेकदा पोहचतही नाही. आणि तरीही त्यालाच ‘प्रदीर्घ परंपरा’, ‘समृद्ध परंपरा’,   ‘सांस्कृतिक परंपरा’ अशी लेबलं लावली जातात.
जे मराठी चित्रपटांचं रडगाणं तेच मराठी नाटकांचं, जे नाटय़संमेलनाचं तेच साहित्य संमेलनाचं, जे मराठी साहित्यिकांचं तेच मराठी प्रकाशन संस्थांचं ! एकूण सा-या  रडकथाच ! तरीही आपण अधूनमधून मराठी ज्ञानभाषा होत असल्याची बढाई मारत असतो आणि महाराष्ट्र पुरोगामी असल्याचा अभिमान बाळगत असतो ! 
ही कृतक समाधान मानण्याची वृत्ती मराठी ग्रंथव्यवहारातही आटोकाट भरलेली दिसते. कारण मराठी ग्रंथव्यवहार ही ज्यांना इतर काही फारसं जमत नाही किंवा ज्यांच्या हौसेला इतर कुठे फारसं मोल नाही, अशा काही मोजक्या सुशिक्षित मध्यमवर्गीयांची मिरासदारी आहे.
महाराष्ट्रातल्या सुशिक्षित मध्यमवर्गाला न्या. रानडय़ांचा उदारमतवाद मानवला नाही, आगरकरांचा बुद्धिवाद झेपला नाही, लो. टिळकांची प्रखर देशभक्ती पेलवली नाही, महात्मा फुलेही त्याला लवकर पचवता आले नाहीत आणि आंबेडकर पचवणं तर त्याला आजही जडच जातं. या मध्यमवर्गाने चळवळी खूप केल्या; पण त्यांची व्यापक वा दीर्घकालीन परिणती नेमकी काय झाली, हे तो कधी धडपणो आजमावू शकलेला नाही. वर्गकलहाविषयी तो तावातावानं बोलत असला तरी त्याला त्याचं भयच वाटतं. क्रांतीची भाषा त्याला फारशी सोसत नाही. पुरोगामी चळवळींना बळ देण्यापेक्षा त्यांना विरोध करण्यातच त्याला धन्यता वाटते. आधी राजकीय सुधारणा की आधी सामाजिक सुधारणा, जीवनासाठी कला की कलेसाठी जीवन, कलावाद श्रेष्ठ की ध्येयवाद श्रेष्ठ, अशा प्रकारच्या वादात कुठल्या तरी एका पक्षात सामील होऊन झेंडेकरी होण्यातच त्याला धन्यता वाटते. या सगळ्यामागे त्याची सद्भावना चांगली असेलही; पण आपल्या चार उजळ विचारांची ‘रंगीत तालीम’ आपल्यासारखेच उजळ विचार असलेल्यांसमोरच करत राहण्यापेक्षा तसे विचार नसलेल्यांसमोर त्यांचा ‘परफॉर्मन्स’ करायचा असतो, हे त्याच्या बहुतेक वेळेला लक्षातच येत नाही की काय, असा प्रश्न पडतो.
त्यामुळे होतं काय की, लिहिण्या-वाचण्या-शिकवण्याशी ज्यांचा संबंध असतो, त्यांच्यापलीकडे मराठी ग्रंथव्यवहार फारसा विस्तारतानाच दिसत नाही. याची हजार उदाहरणं देता येतील. 
अजूनही महाराष्ट्राच्या कित्येक जिल्ह्याच्या ठिकाणी पुस्तकांची दुकानं नाहीत. जी आहेत ती जोडधंदा म्हणून तरी आहेत किंवा धड स्थितीत तरी नाहीत. आजही मराठी ग्रंथव्यवहार पुण्या-मुंबईच्या बाहेर जायला तयार नाही. आजही मराठीत प्राध्यापक, प्रशासक अशा भरपूर वेळ गाठीशी असलेल्या किंवा निवृत्तीनंतर लेखनकाम करणा-या लेखकांचीच चलती आहे. चाळिशीर्पयतचे तरुण लेखक नवनव्या आव्हानांना पुरेशा सामथ्र्यानिशी भिडताना दिसत नाहीत. आपल्या मर्यादित जीवनानुभवाला आणि अभ्यासाला ते प्रायोगिकतेचे केवळ मुलामेच चढवत राहतात. 
परिणामी मराठी ग्रंथव्यवहाराचा परिघ रुंदावण्याऐवजी त्याचं   ‘डम्पिंग ग्राउण्ड’ होत असल्याचंच दिसतं. 
गेल्या तीनेक वर्षात नोटबंदी-जीएसटी यांनी इतर अनेक क्षेत्रंप्रमाणोच मराठी ग्रंथव्यवहाराचीही कोंडी केली आहे. पण त्याआधीपासूनच मराठी ग्रंथव्यवहाराच्या घसरणीला सुरुवात झालेली आहे. मराठी ग्रंथव्यवहाराचा एक प्रकारे प्राणवायू असलेल्या वाङमयीन  नियतकालिकांना ओहोटी लागली आहे. काही नियतकालिकं अजूनही प्रकाशित होत आहेत; पण त्यांना ना वलय आहे, ना वाचक. त्यामुळे त्यातील साहित्याची फारशी दखल कुणी घेत नाही. दखल घेण्यासारखं त्यात फार काही नसतंही. दोन वर्षापूर्वी  ‘अंतर्नाद’ बंद पडलं. नुकतंच सुरू झालेलं ‘अक्षरधारा’ हे मासिक वर्षभरातच बंद पडलं.   ‘साहित्य सूची’ही बंद पडलं. ‘आजचा सुधारक’ बंद पडलं.   ‘भाषा आणि जीवन’, ‘समाजप्रबोधन पत्रिका’, ‘नव अनुष्टुभ’,  ‘ललित’, ‘मसाप पत्रिका’ म्हणायला चालू आहेत ! श्रीविद्या, प्रतिमा, रविराज-अस्मिता, मौज प्रकाशन गृह या प्रकाशन संस्था थंड बस्त्यात तरी गेल्या आहेत किंवा बंद तरी पडल्या आहेत. नवनवीन प्रयोग करणा:या अनिल कोठावळे यांचं मॅजेस्टिक बुक हाऊस बंद झालं. पण त्याची फारशी चर्चा मराठी ग्रंथव्यवहारात होताना दिसत नाही.
मराठी प्रकाशकांच्या दोन संघटना आहेत. अगदी खरं सांगायचं तर त्या असून नसल्यातच जमा आहेत. दोनेक वर्षापूर्वी ज्योत्स्ना, रोहन, राजहंस, मौज, पॉप्युलर आणि कॉन्टिनेन्टल या सहा प्रकाशनसंस्थांनी  ‘मराठी रीडर’ हे अँप सुरू केलं. म्हणजे त्यांनी ई-बुक निर्मितीमध्ये पुढाकार घेतला आणि त्यांची विक्री करण्यासाठी हे अँप सुरू केलं. संघटनात्मक पातळीवरचं हे अतिशय चांगलं पाऊल होतं. त्यामुळे मराठी ग्रंथव्यवहाराची कोंडी फुटायला मदत होऊ शकली असती. निदान काहीतरी सकारात्मक घडू शकलं असतं. पण हा प्रयोग धडपणो उभा राहण्याआधीच कोमेजला.
एकेकाळी श्री. पु. भागवत, पु.ल. देशपांडे यांचा शब्द महाराष्ट्रातील सांस्कृतिक जगतासाठी प्रमाण होता. त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे मराठी ग्रंथव्यवहाराचं पुढारपण केलं, त्याला दिशा दिली आणि त्याचा परिघ रुंदावण्याचाही प्रयत्न केला. पण त्यांच्या या प्रयत्नांना संघटित चळवळीचं स्वरूप आलं नाही. मौज प्रकाशनाचं पुस्तक निर्मितीच्या पातळीवर अनुकरण करणा-या प्रकाशन संस्था निर्माण झाल्या. पण त्यांना मौजेच्या तोडीची ग्रंथनिर्मिती काही फार काळ, सातत्यानं निर्माण करता आली नाही. पु.ल. देशपांडे यांनी नवसाहित्याचं जाहीर कौतुक केलं आणि त्याचा प्रचारही केला, दलित साहित्यातल्या ख-याखु-या जीवनानुभवांना मनमोकळी दाद दिली. त्यांच्याइतकी इतरांच्या पुस्तकांची तरफदारी करणारा एकही मोठा साहित्यिक गेल्या तीसेक वर्षात मराठी ग्रंथव्यवहारात सापडत नाही.
 ‘सत्यकथा’ हे केवळ वाङमयीन  मासिक नव्हतं, ती वाङमयीन  चळवळ होती. साहित्य, चित्रकला, रंगभूमी, चित्रपट, संगीत अशा विविध क्षेत्रंतील मंडळी ‘सत्यकथे’शी जोडली गेलेली होती. भागवत-पटवर्धन या संपादकद्वयींनी ते जाणीवपूर्वक केलं होतं. तसं इतर कुठल्याही वाङमयीन  नियतकालिकाच्या संपादकाला करता आलेलं नाही आणि प्रकाशनसंस्थेलाही. सर्वानी आपल्याभोवती आपापल्या लेखकांचा गोतावळा जमवला; पण त्यातून सांस्कृतिक चळवळ उभी राहील या दृष्टीनं कुणी फारसं काही केल्याचं दिसत नाही. 
ग्रंथ प्रकाशन हा व्यवसाय आहे. तो पूर्ण वेळ आणि व्यवसायाच्या नीतिमूल्यांनुसार करणारे मराठी प्रकाशक किती आहेत? अगदी थोडे. त्यांची संख्या पंचवीसेक भरेल, फारतर पन्नास. बाकीच्यांपैकी बहुतेकांचा हा जोडधंदा आहे. काही प्रकाशक तर केवळ काळा पैसा पांढरा करण्यासाठीही प्रकाशन संस्था चालवतात. आता तर शिक्षणसंस्था चालवणारेही प्रकाशन संस्था काढू लागले आहेत. 

 

प्रकाशन संस्था चिक्कार, त्या प्रकाशित करत असलेल्या पुस्तकांची संख्याही भरमसाठ. (मराठीत दरवर्षी तीनेक हजाराच्या घरात पुस्तकं प्रकाशित होतात.) पण ‘टॉक ऑफ द टाउन’ पुस्तकांची संख्या किती? आजच्या घडीला मराठीमध्ये सर्वाधिक विक्री होणारे लेखक कोण? पु.ल. देशपांडे आणि मंगेश पाडगावकरच? मग दरवर्षी जी भरमसाठ पुस्तकं प्रकाशित होतात, ती विकली जातात तरी कशी? ज्याअर्थी ती छापली जातात, त्याअर्थी ती विकली जात असतीलच आणि ज्या अर्थी ती विकली जातात, त्याअर्थी ती वाचली जात असतीलच, असं आपण गृहीत धरतो. पण वस्तुस्थिती नेमकी तशी आहे का? 
मान्यवर लेखकाच्या पुस्तकाची पहिली आवृत्ती आजही हजार-अकराशे प्रतींचीच असते. आणि ती संपायला दोन-चार र्वष लागतात. तेही जाहिरात, कार्यक्रम, परीक्षणं असे प्रचार-प्रचाराचे प्रय} करून. इतर काही प्रकाशकांच्या पुस्तकांच्या आवृत्त्या तर पाचशे, तीनशे, अडीचशे प्रतींच्याही असतात. त्यातली निम्मी पुस्तकं खुद्द लेखकानेच विकत घेतलेली असतात किंवा ती छापण्यासाठी प्रकाशकाला पैसे दिलेले असतात.
तंत्रज्ञानामुळे पुस्तक छपाई अतिशय सोपी झालेली आहे, जागतिकीकरणामुळे मध्यमवर्गाकडे पुरेसा पैसा आलेला आहे, प्राध्यापकांचे पगार तर लाखांच्या घरात गेलेले आहेत. त्यामुळे - आणि युरोप-अमेरिकेत ज्यांची मुलं स्थायिक झालेली असतात किंवा ज्यांच्याकडे निवृत्तीनंतर चांगला पैसा असतो त्यांच्यासाठी - पुस्तक लिहिणं, ते छापून घेणं हे वेळ घालवण्याचं साधन झालेलं आहे. काही प्रकाशन संस्था असे रोख व्यवहार करण्यासाठीच सुरू झालेल्या आहेत. (उस्मानाबादमध्ये होऊ घातलेल्या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं मराठवाडय़ातील काही प्रकाशन संस्थांनी रोख पैसे घेऊन ‘विशेष सवलती’त पुस्तकं छापून देण्याच्या योजना जाहीर करून त्या यशस्वीपणो पार पाडल्या आहेत !) काही येनकेनप्रकारे कुठल्या तरी शासकीय ग्रंथ खरेदीत आपल्या पुस्तकांचा समावेश होईल किंवा कुठल्या तरी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आपलं पुस्तक लावता येईल किंवा महाराष्ट्रातल्या खाजगी ग्रंथालयांना त्यांच्या मागणी वा बजेटनुसार संख्येनं भरपूर पुस्तकं कशी देता येतील, याचाच विचार करून सुरू झालेल्या आहेत. 
असा रोखठोक व्यवहार असलेल्या प्रकाशन संस्थांनी आणि खिशातला पैसा आपल्या लेखनकामासाठी खर्च करण्याची ऐपत असलेल्या लेखकांनी मराठीत ग्रंथव्यवहारात बाळसं धरलं असेल, तर तो उत्साहवर्धक कसा असणार?
मूल्यं, नीतिमत्ता या बोलायच्या गोष्टी असतात. व्यावसायिक नीतिमत्ता ही इतरांना ऐकवण्यासाठी असते. व्यापक समाजहित इतरांना उपदेश पाजण्यासाठी असतं. हा सुशिक्षित मराठी मध्यमवर्गातल्या काहींचा स्वभावधर्म झालेला आहे. त्यातले अनेकजण मराठी ग्रंथव्यवहारात सक्रिय आहेत. 
सत्याचा अपलाप, मूल्यांची धरसोड, तारतम्यपूर्ण विवेकाशी फारकत, नीतिमत्तेला तिलांजली, हाच ज्यांचा स्वभावधर्म झालेला असतो, त्यांच्याकडून ‘डम्पिंग ग्राउण्ड’चीच निर्मिती होते. ही बजबजपुरी साहित्यबाह्य अवगुणांना जन्म देते. लिहिणारे उदंड, छापणारे उदंड, समीक्षा करणारे उदंड, पुरस्कार देणा-या संस्थाही उदंड ! अशा कोलाहलात खोटय़ा प्रतिष्ठेलाच महत्त्व येते. महाराष्ट्रातल्या अनेक प्रकाशन संस्थांची, साहित्यिकांची, पुरस्कार देणा-या संस्थांची, साहित्य संस्थांची सध्या अशीच अवस्था झालेली आहे. 
मराठी ग्रंथव्यवहाराच्या कोमटपणावर एक उतारा नेहमी दिला जातो की, लोक वाचतच नाहीत, मराठी भाषेला ओहोटी लागली आहे, चांगल्या साहित्याची समाजाला कदरच राहिलेली नाही, महाराष्ट्रातला सुशिक्षित वर्ग पाठय़पुस्तकांशिवाय दुसरं काही वाचतच नाही. पण ही कारण परंपरा शंभरेक वर्षापासून तरी सांगितली जाते आहे. खरं कारण वेगळंच आहे. 
महाराष्ट्र बारा कोटींचा. त्यातले सात कोटी मतदार. त्यातले पाच कोटी सुशिक्षित मानू. पण त्यातले वाचक किती? अ. भा. मराठी साहित्य संमेलनाला पाच-सात लाख लोकांनी भेट दिल्याच्या आणि या संमेलनात दहा-बारा कोटींची पुस्तकविक्री झाल्याच्या बातम्या आपण दरवर्षी वाचतो. यातच मराठी ग्रंथव्यवहारातले काही जण कृतक समाधान मानत असले तरी या प्रकारच्या बातम्यांची विश्वासार्हता नेहमीच संशयास्पद राहिलेली आहे. पण अशी  ‘संशयास्पदता’ हाच ज्यांच्या जगण्याचा लसावीमसावी असते, त्यांना समाधानाचा ‘देखावा’ करावा लागतोच. हे   ‘देखावे’ पाहून काही जण अचंबित, चकित किंवा आश्चर्यचकित होतात. त्यातून काहींना आपली ‘संस्कृती’ टिकून असल्याचा दिलासा मिळतो. काहींना त्यातून आपलंही भलं होईल याचा ‘भरवसा’ मिळतो. त्यामुळे ते अधिकाधिक ‘देखावे’ निर्माण करण्याच्या मागे लागतात. परिणामी गर्दी वाढते. पण गर्दीचं मानसशास्र वेगळं असतं. फुकट करमणुकीला कुठेही गर्दी होते; पण जिथं खिशाला कात्री लागते, तिथं दहा वेळा विचार केला जातो!
गर्दीचं वा ग्राहकांचं मानसशास्र बदलवता येतं. त्याला आपल्याला हवं तसं वळण लावता येतं. आपल्या संभाव्य ग्राहकाच्या प्राधान्यक्रमात आपल्या उत्पादनाचा समावेशही करता येतो. आपलं उत्पादन आपल्या ग्राहकाची ‘नडीव गोष्ट’ही करता येते. या सगळ्यासाठी त्याचं उपयुक्तता मूल्य पटवून द्यावं लागतं. त्यात एका मर्यादेर्पयत आपल्या उत्पादनाच्या दर्जाचा संबंध असतो, त्यानंतर जाहिरात, वितरण, प्रसिद्धी, प्रचार-प्रसार यांचा संबंध असतो. 
-मराठी ग्रंथव्यवहारानं ही एवढी ‘व्यावसायिक नीतिमत्ता’ नीट अंगी बाणवली तरी त्याचं कोमटपण दूर होऊ शकतं!

------------------------------------------------------------


सोशल मीडियावरच्या  ‘सेलिब्रिटी’ बतावण्या


मराठी साहित्यिकांना जागतिकीकरणाचा सामना करता आलेला नाही, तसाच मराठी प्रकाशकांनाही नाही. परिणामी मराठीत ‘सेल्फ हेल्प’ प्रकारच्या अनुवादित, रूपांतरित, आधारित पुस्तकांची बाजारपेठ अवतरली आणि ती वाचकांवरही थोपवण्याचा प्रय} केला गेला. महत्त्वाकांक्षी, चंगळवादी मध्यमवर्गाने त्याला काही प्रमाणात प्रतिसाद दिला. पण लाटच ती. काही काळानं आली तशी ओसरली. सोशल मीडियाचा (फेसबुक, व्हॉट्सअँप) वापर मराठी साहित्यिकप्रकाशकपुस्तक विक्रेते मोठय़ा प्रमाणावर करतात; पण कशासाठी? तर केवळ लाइक्स, कमेंट आणि शेअरिंग मिळवण्यासाठी ! त्यातून आपल्या पुस्तकांच्या पाच-दहा प्रति विकल्या गेल्या तरी ते शंभर-दोनशेंची बतावणी करतात. काही काळच काही लोकांना मूर्ख बनवता येतं, सर्व काळ सर्व लोकांना मूर्ख बनवता येत नाही, हा जॉर्ज ऑर्वेलचा सिद्धान्त सोशल मीडिया वापरणा:यांनाही लागू पडतो, याचं भान मराठी ग्रंथव्यवहारातल्या भल्याभल्यांना अजून आलेलं दिसत नाही. त्यामुळे काहींचा सोशल मीडियावर गाजावाजा खूप होतो, ते सेलिब्रिटी वगैरे होतात; पण त्यांची पुस्तकं मात्र आहे त्या गतीनेच संपतात. कारण माध्यम कुठलंही असलं तरी कुठलाही ग्राहकवाचक आपली फसवणूक एकदाच करून घेतो, हा मानसशास्त्राचा नियम आहे!

jagtap.ram@gmail.com
(लेखक ‘अक्षरनामा’ या फीचर्स पोर्टलचे संपादक आहेत.)

Web Title: Ram Jagtap takes a stock of Marathi Literary scene

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.