लडाखमधील रॅन्चो!

By गजानन दिवाण | Published: September 24, 2017 02:00 AM2017-09-24T02:00:00+5:302017-09-24T02:00:00+5:30

जम्मू-काश्मीरमधील पूर्व लडाखच्या बाजूला असलेले हेमिस नॅशनल पार्क हिमबिबट्यांची भारतातील राजधानीच. या पार्कमध्ये प्राण्यांच्या जवळपास २० आणि पक्ष्यांच्या ३० प्रजाती आढळतात. नऊ गावे या पार्कमध्ये येतात. रुम्बक हे त्यापैकीच एक. समुद्रसपाटीपासून चार हजार मीटर उंची. घरे नऊ आणि लोकसंख्या ‘तब्बल’ ७०! नॅशनल पार्क आज सुरक्षित आहे, ते या लोकांमुळेच !

Rancho in Ladakh! | लडाखमधील रॅन्चो!

लडाखमधील रॅन्चो!

Next

2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘थ्री इडियट्स’ या चित्रपटाचा गल्ला किती झाला, याच्याशी लडाखवासीयांना देणे-घेणे नाही. या चित्रपटाने स्वत:चा गल्ला मात्र चांगलाच वाढविला. लडाखमधील पँगाँग त्सो हे सरोवर असो वा लेहजवळील ड्रक पद्मा कार्पो स्कूल. या चित्रपटाचे शूटिंग झाले ती सर्व ठिकाणे आता पर्यटकांनी बहरून गेली आहेत. ड्रक व्हाईट लोटस स्कूल नावानेही ही शाळा ओळखली जायची. आज म्हणाल तर ‘रान्चो स्कूल’ हीच या शाळेची ओळख. लेह ते शे पॅलेस, थिक्से मोनस्टरी रस्त्यावर ही शाळा लागते. आम्हा भारतीयांना चित्रपटाचे भारी वेड. लेहमध्ये येणारा प्रत्येक देशी पर्यटक इथे जातोच जातो. सकाळी ९ ते संध्याकाळी ६पर्यंत ही शाळा पाहता येते. ना कुठले प्रवेश शुल्क, ना कुठली कॅमेरा फी. या शाळेत रंगवलेली ‘इडियट वॉल’ पर्यटकांना फोटो घ्यायला भाग पाडते.
२००८ पर्यंत साधारण चार लाख भारतीय पर्यटक लडाखला भेट द्यायचे. ‘थ्री इडियटस्’नंतर ही संख्या दुपटीने वाढली. २०११ साली तर ही संख्या १६ लाखांवर पोहचली. यामुळे इथल्या लोकांचा व्यवसाय बहरला. अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न मिटला. या चित्रपटानंतर बाजारपेठ एकदम झूम झाल्याचे लेहमधील टोपी विक्रेता लू चिंग सांगते. लहान-मोठ्या सर्व उद्योगांची हीच परिस्थिती आहे. ‘थ्री इडियट्स’ या चित्रपटाने यांच्या पोटापाण्याची सोय करून दिली. म्हणूनच तर या परिसरात अनेक दुकानांची नावे थ्री इडियट्स कॅफे, रान्चो कॅफे अशी आढळतात.

२००९ पूर्वी म्हणजेच हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी येथे पर्यटक यायचे; पण ते मुख्यत: विदेशी असायचे आणि ट्रेकिंगसाठीच यायचे. त्यामुळे ती शहरात कमी आणि पर्वतरांगांमध्ये जास्त दिसायची. परिणामी ग्रामीण लडाखलाच या पर्यटनाचा अधिक फायदा व्हायचा. ‘थ्री इडियट्स’ने देशी पर्यटकांच्या माध्यमातून तो शहरातही पोहचविला. हिमबिबट्या अर्थात स्नो लेपर्ड दिसण्याचे भारतातील हे हमखास ठिकाण. लडाखमध्ये जवळपास ३०० हिमबिबटे आढळतात. लेह जिल्ह्यातील हेमिस नॅशनल पार्कमध्ये ६०, तर रुम्बक रेंजमधील संख्या नऊच्या घरात सांगितली जाते. माझा मुक्काम या रुम्बकमध्येच होता. याच बिबट्याचे शूटिंग करण्यासाठी सोनी बीबीसी अर्थ या वाहिनीने २०१३-१५ असे तब्बल तीन वर्षे हेमिस नॅशनल पार्कमध्ये घालविले. हिवाळ्यात इथे उणे ३० डिग्री अंश सेल्सिअस इतके तापमान असते. अशा रक्त गोठविणाऱ्या थंडीत या वाहिनेने तब्बल ९० दिवस बिबट्याचे शूटिंग केले. १८ सप्टेंबरपासून सहा भागांत त्याचे प्रक्षेपण सुरू करण्यात आले. मी रुम्बकला गेलो तेव्हा म्हणजे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मध्यरात्रीचे तापमान सहा अंशांदरम्यान होते.

जम्मू-काश्मीरमधील पूर्व लडाखच्या बाजूला असलेले हेमिस नॅशनल पार्क हिमबिबट्याची भारतातील राजधानीच समजले जाते. प्रसिद्ध मोनस्टरी हमिस गोंपाच्या नावावरून या पार्कला हे नाव देण्यात आले. या मोनस्टरीला जवळपास ४०० वर्षांचा इतिहास सांगितला जातो. समुद्रसपाटीपासून ३३०० ते ६ हजार मीटर उंचीवर ६०० चौरस कि.मी.वर पसरलेल्या या नॅशनल पार्कमध्ये प्राण्यांच्या जवळपास २० प्रजाती आणि पक्ष्यांच्या ३० प्रजाती आढळतात. या नॅशनल पार्कमध्ये नऊ गावे येतात. रुम्बक हे त्यापैकी एक. समुद्रसपाटीपासून साधारण चार हजार मीटर उंचीवर वसलेले हे गाव. घरे नऊ आणि लोकसंख्या ७०. जोरात ओरडले तर या टोकाचे त्या टोकाला ऐकू यावे असे या गावचे क्षेत्रफळ. आपल्याकडच्या जंगलात जाणवणारा मानव-प्राणी संघर्ष येथे अजिबात नाही. उलट प्राणी आणि पर्यावरण कसे जपले जाईल, याचीच काळजी ते घेतात. म्हणून हिमबिबट्याची शिकार झाली किंवा इतर प्राण्यांना मारले असे इथे घडत नाही. मुळात लाजाळू असलेला हा हिमबिबट्या म्हणूनच इथे कोणावर हल्लाही करीत नाही. त्यामुळे या पार्कमधून गावे बाहेर काढण्याची मागणी कधीच पुढे आली नाही. उलट ही गावे आहेत म्हणून पार्क सुरक्षित आहे, असे वनविभागालाही वाटते. या परिसरातील रेंज ऑफिसर खटर यांनी तशी कबुलीही दिली.

देशभरातील जंगलांमध्ये शिकाºयांनी धुमाकूळ घातला असताना गेल्या अनेक वर्षांत इथे अशी एकही घटना घडली नाही, याचे श्रेय या गावकऱ्यांनाच जाते, असे खटर म्हणाले. या गावात नऊ कुटुंबे राहतात. हिमबिबट्याला पाहण्यासाठी या गावचा परिसर उत्तम. या हिमबिबट्यानेच या गावच्या पोटापाण्याची सोय करून दिली आहे. हिमबिबट्या, आशियाई बोकड, तिबेटियन लांडगा, तपकिरी अस्वल आणि लाल कोल्हा हे या परिसराची ओळख. या गावात लॉज नाही वा हॉटेल नाही. साधे किराणा दुकानही नाही. ट्रेकिंगसाठी किंवा हिमबिबट्याच्या शोधात येणाºया पर्यटकांना गावकºयांचे घर हेच राहण्याचे ठिकाण. माणसी प्रति दिवस १२०० रुपये आकारले जातात. यात नास्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंतची सोय असते. खालच्या मजल्यावर स्वत: गावकरी राहतात आणि वरचा मजला या पाहुण्यांसाठी राखीव असतो. रोटेशन पद्धतीने ही घरे दिली जातात. पहिला पर्यटक पहिल्या घरी थांबला, तर दुसऱ्या माणसाला दुसºयाच घरी जावे लागते. गावकऱ्यांनी स्वत:च हा नियम घातल्याने पर्यकांसाठी खेचाखेची होत नाही.

लेहवरून या गावाला येण्यासाठी दोन तास कारने प्रवास करावा लागतो. पुढे कुठलेच वाहन जात नाही. एक तर घोडा किंवा पायी चालणे एवढाच पर्याय. ज्यांना चालायला होत नाही अशांसाठी आणि त्यांचे सामान वाहून नेण्यासाठी घोड्यांचा वापर इथे मोठ्या संख्येने केला जातो. एक माणूस साधारण सात-आठ घोडे सांभाळतो. त्यावरच त्याचे कुटुंब चालते. रुम्बक गाठण्यासाठी जवळपास चार तास पायी चालावे लागते. पर्वतरांगांमधला हा प्रवास ट्रेकिंगची भूक भागवितो. सुरुवातीपासून गाव येईपर्यंत नदीतील पाण्याच्या आवाजाचा खळखळाट अजिबात साथ सोडत नाही. कुठे पर्वताचा चढ तर कुठे उतार असा प्रवास करताना थंडीतही घाम सुटतो. हिमबिबट्यासह अनेक प्राणी इथे दिसतातच. सोबत पक्ष्यांच्या इतर कुठेच न आढळणाऱ्या प्रजाती इथे हमखास पहायला मिळतात. रेड बिल चोऊ, ब्राऊन अ‍ॅसेंटर, हिमालयन स्नोकॉक, तिबेटियन स्नोफींच आदी पक्षी येथेच भेटतात. या गावात सायंकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंतच वीज असते. वनविभागाने जनरेटरच्या माध्यमातून एवढी सोय करून दिली आहे. नंतर सकाळी पर्वताच्या रांगांमधून सूर्य डोकावेपर्यंत गाव अंधारातच असते. हे गावकरी शेतीत बार्ली (रोटी बनविण्यासाठी स्थानिक धान्य) आणि बटाटा ही दोनच पिके घेतात आणि तीच खाल्ली जातात. केवळ खाण्यासाठीच हे पिकविले जाते. विकण्याचा अजिबात विचार केला जात नाही. शिवाय पर्यटकांच्या माध्यमातून गावातील प्रत्येक घर वर्षाला किमान एक ते दीड लाख रुपये कमावते.

‘वाइल्डलाइफ’चे खेनराब फुंटरोग सांगत होते. पुढील वर्षी या गावात सौरऊर्जा प्रकल्प राबवायचा आहे. गावापुरती वीजनिर्मिती झाली तरी पुरे. परिसरातील काही गावांत हा प्रयोग राबविण्यातदेखील आला आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून खेड्यांतून शहरांकडे येणाºयांचा लोंढा दिवसेंदिवस वाढत असताना रुम्बक हे गाव याला अपवाद म्हणावे लागेल. वय वर्षे ५६ असलेली तशी सुमो म्हणाली, ‘आम्ही गाव सोडून गेलो तर हे सारे जिवंत कसे राहील?’

शहरातला झगमगाट यांना अजिबात खुणावत नाही. असे किती वर्षे चालणार? पुढची पिढी इथे कशी राहील या प्रश्नावर सुमो म्हणाली, ‘पुढचे माहीत नाही. मी असेपर्यंत हे नक्कीच राहील.’ दोन कि.मी.वरील शेतात बार्लीचे पीक काढून काठी टेकवत टेकवत त्या गावी परतत होत्या.

हेमिस नॅशनल पार्कचे वैभव टिकून आहे ते या गावकºयांमुळे. जोपर्यंत या गावकºयांची ही मानसिकता जिवंत आहे तोपर्यंत हेमिस नॅशनल पार्कला आणि तिथे राहणाऱ्या कोणत्याही पक्षी-प्राण्याला धोका नाही.

रोजगाराची वाट... बिहार टू रुम्बक
रुम्बक परिसराला निसर्गाने भरभरून दिले आहे. चारही बाजंूनी असलेल्या पर्वतरांगा पांढºयाशुभ्र बर्फाची चादर पांघरून झोपी गेल्या असाव्यात असा भास होतो. गावाशेजारची नदी १२ महिने वाहती असते आणि त्यातील पाणी आपल्या फ्रीजरलाही लाजविणारे असते. ऊन-पावसाच्या खेळामुळे इथल्या शेतकऱ्यांना आपल्या पिकाची मोठी काळजी घ्यावी लागते. बार्ली काढणीचा सप्टेंबर हाच काळ. या दिवसात घरातल्या मोजक्याच माणसांना ठरावीक वेळेत पीक काढणे जमत नाही. याची कुणकुण बिहारला कशी लागली कुणास ठाऊक? गेल्या काही वर्षांपासून या काळात बिहारमधून काही कामगार इथे येत असतात. दोन-तीन महिने इथेच राहून इथला पिकाचा हंगाम पार पडला की, हे मजूर गावी परतात.

Web Title: Rancho in Ladakh!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.