विश्वाच्या अंगणी रंगली सांगलीची रंगवल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 12:22 AM2019-03-03T00:22:56+5:302019-03-03T00:27:07+5:30

एखाद्या कलेचा डंका विश्वविक्रमी पुस्तकांमध्ये सातत्याने वाजत ठेवण्याचे काम मोजक्याच कलाकारांनी केले. मात्र, रांगोळीच्या विश्वात सांगलीच्या आदमअली मुजावर या रंगावलीकाराने याच रांगोळीला विश्वाच्या अंगणी

 Rangbhalli of Sangli Ranges in the fold of the universe | विश्वाच्या अंगणी रंगली सांगलीची रंगवल्ली

विश्वाच्या अंगणी रंगली सांगलीची रंगवल्ली

Next
ठळक मुद्दे राज्याला आणि पर्यायाने देशाला जगाच्या पटलावर मानाचे स्थान देण्याचे काम समाधान देणारे असते.

-अविनाश कोळी

एखाद्या कलेचा डंका विश्वविक्रमी पुस्तकांमध्ये सातत्याने वाजत ठेवण्याचे काम मोजक्याच कलाकारांनी केले. मात्र, रांगोळीच्या विश्वात सांगलीच्या आदमअली मुजावर या रंगावलीकाराने याच रांगोळीला विश्वाच्या अंगणी सजविताना भारतीय परंपरा, इतिहास येथील महापुरुषांच्या प्रतिमा साकारत असाच डंका वाजविण्याचे काम केले.

सण, उत्सव, परंपरा, मंगलकार्य अशा अनेक शुभ गोष्टींशी नाते जोडलेल्या रांगोळीने हजारो वर्षांच्या प्रवासात अनेक जुन्या-नव्या गोष्टींना कवेत घेत, कलेच्या प्रांतात आपली मुशाफिरी कायम ठेवली. रामायण, महाभारत किंवा अनेक पुरातन ग्रंथांमध्येही या कला प्रकाराचा उल्लेख आढळतो. संस्कृतमध्ये या रांगोळी कलेस रंगवल्ली, कर्नाटकात रंगोली, गुजरातमध्ये रंगोळी, तमिळनाडूत कोलम, राजस्थानात मांडना, मध्य प्रदेशमध्ये चौकपुरना, उत्तर प्रदेशात सोनारख्खा, बंगालमध्ये अलिपना, केरळला कलम अशा प्रांतनिहाय वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. नावे वेगळी असली तरी, ही कला आणि तिच्याशी निगडित परंपरा, त्यामागील उद्देश सारखाच आहे. रांगोळी साकारणाऱ्या साहित्यामध्ये बदल होत गेले आणि आधुनिक युगात या रांगोळीने नवा आयाम प्राप्त केला. दारातील रांगोळी विश्वाच्या अंगणी नटू लागली. ही किमया करणारे अनेक कलाकार भारतात, भारताबाहेर उदयास आले. सांगलीच्या आदमअली मुजावर या रंगावलीकाराने याच रांगोळीला विश्वाच्या अंगणी सजविताना भारतीय परंपरा, इतिहास, येथील महापुरुषांच्या प्रतिमा साकारत असाच डंका वाजविण्याचे काम केले.
आरग (ता. मिरज) या छोट्याशा गावातील सामान्य शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेल्या या कलाकाराने रांगोळीच्या माध्यमातून सांगलीला नवी ओळख निर्माण करून दिली. ‘गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नऊ वेळा आपली दावेदारी करणाºया मुजावर यांचा २००३ ला रांगोळीचा विश्वविक्रम नोंदला गेला. तो आजअखेर अबाधित आहे. त्यानंतर वेगवेगळ्या विक्रमांच्या नोंदी ठेवणाºया चार पुस्तकांमध्ये त्यांच्या नावे रांगोळीचे विश्वविक्रम आहेत. मनाला भावणारे रंग, त्यांच्या संगती, त्यातून उमटणारी छबी यांच्या माध्यमातून होणारा आविष्कार आनंदलहरी घेऊन डोळ्यांमधून पार होत अंगा-अंगात खळाळत राहतो.
आदमअलींच्या आजवरच्या रांगोळींनी अशाच विशालकाय उधाणलेल्या आनंदलाटा अनेकांच्या मनात उत्पन्न करण्याचे काम केले. रांगोळीचा आनंद हा क्षणिक असतो. साकारलेली रांगोळी पुन्हा त्याच निर्मात्याला नंतर पुसण्याचे काम जड अंत:करणाने करावे लागते. त्यामुळे ती कला दीर्घकाळ चित्रांसारखी किंवा अन्य कलांसारखी जपून ठेवता येत नाही. मात्र, रसिकांच्या मनात अनेक वर्षे या रांगोळींच्या प्रतिमा तशाच घर करून आहेत. जमिनीवर रेखाटलेल्या रांगोळींची छबी मनात, डोळ्यांमध्ये उमटताना येथील रसिकांनी अनुभवली. केवळ विक्रमांसाठीच नव्हे, तर सामाजिक चळवळीचा भाग म्हणूनही व्यसनमुक्ती, एड्स जनजागृती, स्त्री भ्र्रूणहत्या अशा विविध सामाजिक विषयांवरील रांगोळी त्यांनी रेखाटल्या. कलेच्या प्रांतात बागडणाºया मुजावर यांच्यावर पुरस्कारांचाही वर्षाव झाला. या वर्षावात न्हाऊन निघताना रांगोळीच्या नव्या वाटा, नव्या गोष्टींचे शोधकार्य त्यांनी कधीही थांबविले नाही. एक कलाकार म्हणून कलेला, त्या शहराला, राज्याला आणि पर्यायाने देशाला जगाच्या पटलावर मानाचे स्थान देण्याचे काम समाधान देणारे असते. मंगलमयी वातावरणनिर्मिती करणाºया शहनाईइतकीच रांगोळीही महत्त्वाची मानली जाते. आदमअली यांनी अनेक कलांची पंढरी म्हणून ज्या सांगलीने आपले नाव देशात आणि जगाच्या पटलावर नेले, त्याच सांगलीचे नाव रांगोळीच्या माध्यमातून विश्वाच्या अंगणी विविध रंगरेषांच्या छटांनी सजले आहे.
(लेखक लोकमतच्या सांगली आवृत्तीत वरिष्ठ उपसंपादक आहेत.)

Web Title:  Rangbhalli of Sangli Ranges in the fold of the universe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.