तुरुंग-सुधारणांच्या प्रारंभी..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 06:45 AM2018-09-23T06:45:22+5:302018-09-23T06:45:22+5:30
खुल्या तुरुंगांच्या प्रयोगाविषयीचा रवींद्र राऊळ यांच्या लेखावरची प्रतिक्रिया
- दत्ता सराफ, नाशिक
(मंथन, 16 सप्टेंबर) वाचला. या प्रयोगाचा प्रारंभ महाराष्ट्रात झाला, त्या कालखंडाचा मी प्रत्यक्ष साक्षी आहे.
पत्रकारितेतील माझी कारकीर्द सुरू होण्याआधी जेमतेम अकरा महिने मी येरवडा मध्यवर्ती तुरुंगात जेलर म्हणून काम केले आहे. 1955-56 चा काळ. तुरुंग प्रशासनात नुक्ते सुधारणांचे वारे वाहू लागले होते. सुधारणावादी लोक ‘करेक्टीव्ह अडमिनिस्ट्रेशन’ चा पाठपुरावा करीत. म्हणजे कैद्यांना नुस्ते दंडुके दाखवण्यापेक्षा त्यांच्यामधल्या वर्तनबदलासाठी प्रयत्न करणारे तुरुंग-प्रशासन. ज्यांच्या हातून भावनेच्या / क्षणिक संतापाच्या भरात गुन्हा घडून गेला आहे, ज्यांचे तुरुंगातले वर्तन चांगले आहे आणि ज्यांची शिक्षेची शेवटची काही वर्षे बाकी आहेत, अशा कैद्यांसाठी ‘ओपन जेल’ सुरू करण्याची तयारी तुरुंग प्रशासनाने सुरू केली होती. येरवडा सेंट्रल प्रिझनपासून अवघ्या मैलभराच्या अंतरावर नवे ‘जेल ऑफिसर्स ट्रेनिंग स्कूल’ ( जेओटीएस) सुरू झाले होते. त्याचे प्राचार्य होते डी. जे. जाधव. मोठा तळमळीचा माणूस. कैद्यांचे अनावश्यक लाड करणारा हा पोरखेळ आहे, या परंपरावाद्यांच्या टीकेला पुरून उरलेल्या या माणसाने मोठ्या हिंमतीने जेओटीएसचे काम निष्ठापूर्वक चालवले होते. पण प्रत्यक्ष तुरुंग प्रशासनामध्ये मात्र या प्रयोगशीलतेची खिल्ली उडवणारेच वातावरण तेव्हा होते. रेव्हेंन्यू खात्यातून थेट नियुक्तीवर येऊन तुरुंग प्रशासनाचे आयजी झालेले एम. के. देशपांडे यांनी मात्र जाधवांच्या पाठी आपली पूर्ण ताकद उभी केली होती.
येरवड्याच्या तुरुंगातला भोंगळ कारभार आणि भ्रष्टाचाराला कंटाळून मी पहिल्या काही महिन्यातच राजीनामा दिला, तेव्हा जाधवांनी मला बोलावून घेतले. ते म्हणाले होते, आता परिस्थिती बदलेल. तुमच्यासारख्या तरुण जेलरची या कामाला गरज आहे. तुम्ही विश्वास ठेवायला हवा बदलांवर!
त्यांनी माझा राजीनामा फाडून टाकला आणि मला जेओटीएसच्या प्रशिक्षणासाठी भरती करून घेतले.
खुल्या तुरुंगांच्या प्रयोगातला सुधारणावाद माझ्यासारख्या तरुणाला मोहवून टाकणाराच होता. व्यवस्थेत काहीतरी मुलभूत परिवर्तन होते आहे, आणि आपण ते घडवून आणू शकतो; अशा ध्येयवादाने भारून जाऊन मी ‘जेओटीएस’च्या प्रशिक्षणातून बाहेर पडलो आणि पुन्हा येरवड्याला जेलर म्हणून रुजू झालो.. पण मैलभर अंतरावर रुजू घातलेल्या सुधारणांचा वाराही त्या तुरुंगांच्या भिंतींच्या आत पोचला नव्हता. ‘शिकलात ते सगळे विसरा आणि आम्ही म्हणतो, करतो तसेच करत राहा’ असा आदेश मिळाला आणि तुरुंगातली जुनीच ‘दंडा-बेडी’ पुन्हा चालू झाली.
- मला ते मानवणे शक्य नव्हते. पुढल्या काही महिन्यातच मी राजीनामा देऊन बाहेर पडलो, आणि वाचलो!
आज आपल्या देशात होऊ घातलेल्या तुरुंग-सुधारणांचा तपशीला वाचून ते जुने दिवस आठवले, एवढेच!
dattasaraph@rediffmail.com