आई-बाबा, मुलांसाठी गंमत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2021 06:00 AM2021-10-17T06:00:00+5:302021-10-17T06:00:02+5:30

मराठी मुलांनाही समजतील, वाचता येतील अशी इंग्रजी भाषेतील पाच पुस्तके नुकतीच रुचिरा दर्डा यांनी लिहिली आहेत. लहानांबरोबरच मोठ्यांनाही या गोष्टींतील गंमत खिळवून ठेवेल..

Readable fun for parents and the kids | आई-बाबा, मुलांसाठी गंमत

आई-बाबा, मुलांसाठी गंमत

googlenewsNext
ठळक मुद्दे लहान मुलांसाठी सोप्या भोेत गोष्ट लिहिणं ही बाब वाटते तेवढी सोपी नाही, पण रुचिरा दर्डा यांनी खास मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांनाही वाचायला आवडतील अशी पाच पुस्तके नुकतीच लिहिली आहेत..

- गैारी पटवर्धन

जगातल्या सगळ्या लहान मुलांना काय आवडतं याचं एका शब्दात उत्तर द्यायचं झालं तर ते आहे... गोष्ट! आईबाबांच्या कुशीत गोष्ट ऐकत झोपणाऱ्या बाळापासून ते ऑफ पीरियडला “सर गोष्ट...” असं म्हणून हक्काची मागणी करणाऱ्या शाळेतल्या मुलांपर्यंत सगळ्या मुलांना कायम आवडणारा प्रकार म्हणजे गोष्ट. आपल्या घरातल्या, शाळेतल्या, ओळखीच्या, परिसरातल्या मुलांसाठी अनेक मोठी माणसं गोष्ट सांगत असतात.

पण, लहान मुलांसाठी गोष्ट लिहिणं ही बाब वाटते तेवढी सोपी नाही. त्यासाठी मुळात लहान मुलं समजावी लागतात. त्यांना कशाची गंमत वाटेल, त्या गोष्टींतून आपल्याला मुलांना कुठली मूल्ये शिकवायची आहेत आणि ती मूल्ये हळूच गोष्टींतून त्यांच्यापर्यंत कशी पोहोचवायची हे सगळं ज्यांना समजतं अशा लेखकांची पुस्तकं मुलांना आणि त्यांच्या पालकांनाही आवडतात.

अशी मुलांना खूप आवडणारी नवीन पुस्तकं लिहिली आहेत रुचिरा दर्डा यांनी! मराठी मुलांनाही समजतील, वाचता येतील, अशा सोप्या इंग्रजीत, छोट्या वाक्यांत लिहिलेल्या छोट्या गोष्टी आणि उत्तम चित्रं असलेली ही पुस्तकं म्हणजे लहान मुलांसाठी खजिना आहे. प्रत्येक गोष्टीत घडणाऱ्या घटना या लहान मुलांच्या आयुष्यात घडणाऱ्या असल्यामुळे मुलांना त्या आपल्याशा वाटतात.

शाळेत शिक्षा करतील म्हणून शाळेत जाणार नाही, असं म्हणणारा शेरा, आपण बनवलेला खाऊ सगळ्यांना आवडलाच पाहिजे, असं म्हणून हटून बसलेलं अस्वलाचं पिल्लू, शेतात राहणाऱ्या उंदराला अडचणीत सापडल्यावर मदत करणारे त्याचे मित्रमैत्रिणी, एवढ्यातेवढ्या गोष्टींवरून चिडचिड करणारी साळू आणि एरवी छान वागणारं पण मध्येच केव्हातरी वेडेपणा करणारं माकडाचं पिल्लू...

ही सगळी पात्रं आणि त्यांना येणाऱ्या अडचणी घरोघरीच्या मुलांना येत असतात. मुलांनी कसं वागावं हे त्यांना शिकविण्याचा प्रयत्न त्यांचे पालक करीत असतात. रुचिरा दर्डा यांनी लिहिलेली ही पाच पुस्तकं मुलांना वाचायला तर आवडतीलच; पण त्यांच्या पालकांनाही त्यातून मुलांकडे बघण्याचा, त्यांचे प्रश्न समजून घेण्याचा, शोधण्याचा एक नवीन दृष्टिकोन मिळेल.

अर्थात हे सगळं असलं, तरी या पुस्तकांची सगळ्यात मोठी गंमत ही आहे, की त्यात सगळ्या बाबी उलगडून सांगितलेल्या नाहीत. त्याऐवजी फक्त विचार करण्याची दिशा दाखवलेली आहे. कारण तेच सगळ्यात महत्त्वाचं असतं. स्वतः स्पिरिच्युअल आणि पेरेंटिंग कोच असणाऱ्या रुचिरा दर्डा यांना अशी दिशा दाखविण्याचा अनेक वर्षांचा अनुभव आहे आणि त्यांच्या लिखाणात त्या अनुभवांचं प्रतिबिंब स्पष्टपणे पडलेलं दिसतं.

म्हणूनच त्यांच्या कुठल्याही गोष्टीतली आई मुलांच्या चुकांवर, वेड्यासारख्या वागण्यावर चिडत नाही, तर त्यांना योग्य मार्ग दाखवते.

म्हणून ही पुस्तकं मुलांनी तर वाचावीतच, पण पालकांनी मुलांबरोबर बसून वाचावीत; कारण ती फक्त मुलांची पुस्तकं नाहीत, तर मुलं आणि पालकांची पुस्तकं आहेत!

पुस्तकांची नावं-

१- होप ॲण्ड हनिसिकल्स

२- द माऊसट्रॅप

३- शेरा ॲण्ड हिरा

४- पॉज प्लीज, मिस पॉरक्युपाइन

५- द फिकल मंकी

प्रकाशक : बिर्च बुक्स

लेखिका : रुचिरा दर्डा

उपलब्धता- ॲमेझॉन आणि क्रॉसवर्ड

Web Title: Readable fun for parents and the kids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.