जट्रोफा  आणि विनायकराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 07:00 AM2018-09-16T07:00:00+5:302018-09-16T07:00:00+5:30

विनायकराव पाटील यांचे जट्रोफाच्या शेतीचे अनुभव गेले दोन रविवार ‘मंथन’मध्ये वाचले आणि एक तळमळीचा, दूरदृष्टीचा, ‘हाडा’चा शेतकरी किती दूरवर पाहू शकतो, हे जाणवून विनायकरावांच्या हिमतीचे विशेष वाटले.

Readers Response | जट्रोफा  आणि विनायकराव

जट्रोफा  आणि विनायकराव

Next

-

विनायकराव पाटील यांचे जट्रोफाच्या शेतीचे अनुभव गेले दोन रविवार  ‘मंथन’मध्ये वाचले आणि एक तळमळीचा, दूरदृष्टीचा, ‘हाडा’चा शेतकरी किती दूरवर पाहू शकतो, हे जाणवून विनायकरावांच्या हिमतीचे विशेष वाटले. असे प्रयोग करण्याला अनुकूल वातावरण नसताना त्यांनी ही यातायात केली होती. आता परिस्थिती फार नसली, तरी थोडी बदलते आहे, असे म्हणावयास वाव आहे.

मुळातच आपल्या सरकारांची वृत्ती जुन्या चाकोरीतून गाडा (कसा का असेना) चालता ठेवण्याकडे असते. त्यात सामाजिक स्तरावरही वातावरण प्रयोगानुकूल नाही. कारण यशाचा उदंड गौरव आणि अपयशाची नुसती भीतीच नाही, तर जणू सामाजिक लांच्छनच! तेव्हा इतरांवेगळे करायला कोणी गेले, की त्याची फार ऊर्जा आधी विरोधी वातावरणात स्वत:ची ऊर्मी जिवंत टिकवून धरण्यातच खर्ची पडते. त्यात शेतीत प्रयोग म्हणजे आणखीच अवघड.

- अशा पार्श्वभूमीवर विनायकरावांनी केलेली धडपड वाचताना खरेच विशेष वाटले.

जट्रोफापासून केलेल्या इंधनावर विमान उड्डाणाची चाचणी यशस्वी झाल्याच्या बातम्या आल्यावर आता पुन्हा एकवार या पिकाकडे शेतकर्‍यांचे लक्ष जाईल असे दिसते.
एकूणच इंधन दरांचा भडका उडाल्यावर तरी काही पर्यायी व्यवस्थेचा विचार आपल्या देशात गांभीर्याने सुरू होईल, अशी आशा धरायला जागा दिसते.

शेतीमधली प्रयोगशीलताही आता अन्य पर्याय संपल्याने का असेना, आपल्याकडे मूळ धरू लागली आहे, हेही तसे चांगलेच चिन्ह! मात्र इंधनानुकूल पिकांच्या संबंधात मोठय़ा प्रमाणावर प्रबोधन आणि त्याही आधी माहितीचा पुरेसा प्रसार होणे मला गरजेचे वाटते. सरकारी कृषी खात्यांनीही याबाबतीत ‘एक खिडकी योजना’ सुरू करून तसेच हेल्पलाईन चालवून शेतक-याच्या जिज्ञासेला योग्यवेळी खतपाणी 
घालण्याची व्यवस्था उभारली पाहिजे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे या दिशेने प्रयत्न चाललेले दिसतात. त्या प्रयत्नांना स्थानिक स्तरावर योग्य ती जोड मिळणे आवश्यक आहे.

- आणि मुख्य म्हणजे त्या प्रयत्नांमध्ये विनायकराव पाटलांसारख्या मातीत पाय आणि हातही असलेल्या प्रयोगशील ज्येष्ठ व्यक्तींनाही सामावून घेतले पाहिजे.

- राजशेखर हिरे, भंडारा
 

वाचकांचे विचार, प्रतिक्रिया, वाद आणि प्रतिवादांसाठी : manthan@lokmat.com

Web Title: Readers Response

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.