काजवे आणि फुलपाखरं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 06:03 AM2019-09-15T06:03:00+5:302019-09-15T06:05:08+5:30

वन्यजीव संवर्धन सप्ताहानिमित्त शाळेनं  अनेक उपक्रम आयोजित केले होते. सर्वाेत्तम निबंधाला मोठं बक्षीस होतं. हुशार विद्यार्थ्यांनीही त्यासाठी  झटून तयारी केली होती; पण ज्यांच्याकडून काहीच अपेक्षा नव्हती, त्यांनाच बक्षिसं मिळाली! असं का झालं?..

Real and unique efforts of children to save wildlife.. | काजवे आणि फुलपाखरं!

काजवे आणि फुलपाखरं!

Next
ठळक मुद्देधड ना लहान, धड ना मोठे अशा ‘मधल्या’ मुलांसाठी नवी ‘विण्डो’

- गौरी पटवर्धन
आज शेवटी बक्षीस समारंभाचा दिवस उजाडला. शाळेतली माध्यमिक विभागाची एकूण पंधराशे मुलं मैदानात रांगेत बसली होती. त्यांच्या शाळेने एका स्थानिक स्वयंसेवी संस्थेसह आयोजित केलेल्या वन्यजीव संवर्धन सप्ताहाचा आज शेवटचा दिवस होता. या सप्ताहामध्ये वन्यजीव संवर्धन या विषयावर अनेक उपक्रम शाळेत राबवले होते. मुलांना फिल्म्स दाखवल्या होत्या, भाषणं दिली होती आणि विविध स्पर्धांही आयोजित केल्या होत्या. त्या स्पर्धांचा बक्षीस समारंभ आज होता.
शाळेतल्या शिक्षिका बक्षीस मिळालेल्या एकेका मुलाचं नाव पुकारत होत्या आणि तो मुलगा किंवा मुलगी व्यासपीठावर जाऊन बक्षीस घेऊन येत होती. पाचवी ते सातवीच्या लहान गटाची बक्षिसं देण्याचा कार्यक्र म चालू असताना नववी ‘अ’मधला चार-पाच मुला-मुलींचा गट आपापसात दबक्या आवाजात चर्चा करत होता. ही पाचही मुलं वर्गातली अत्यंत हुशार मुलं होती. अभ्यासाव्यतिरिक्त होणार्‍या सगळ्या उपक्रमांमध्ये कायम सहभागी होणारी होती. त्यातले दोघं वक्तृत्व स्पर्धांमधून कायम ढाल घेऊन यायचे. याही वेळी सगळ्यात जास्त महत्त्वाच्या स्पर्धेचं बक्षीस त्यांच्यापैकीच कोणाला तरी मिळणार याची त्यांना खात्नी होती.
यावेळी आयोजकांनी निबंध स्पर्धेसाठी सगळ्यात मोठं बक्षीस ठेवलं होतं, आणि ते म्हणजे जवळचं अभयारण्य आईबाबांबरोबर बघायला जाण्यासाठीचं तिकीट. ते बक्षीस आपल्यापैकीच कोणाला तरी मिळालं पाहिजे हे त्यांचं ठरलं होतं. त्यात आयोजकांनी विषय अगदीच सोपा ठेवला होता, ‘आपल्या परिसरातील वन्यजीव संवर्धनासाठी आपण काय कराल?’
निबंध लिहून द्यायला तीन दिवसांचा वेळ होता. त्यामुळे या सगळ्या हुशार गॅँगने इंटरनेट आणि लायब्ररी या दोन्हीचा पुरेपूर वापर करून अतिशय अभ्यासपूर्ण निबंध लिहिले होते. त्यातही त्यांनी आपापसात स्ट्रॅटेजी आखून वेगवेगळ्या उपविषयांवर निबंध लिहिले होते. एकीने व्याघ्रसंवर्धन या विषयावर निबंध लिहिला होता. बिबट्या कुठल्या कुठल्या भूप्रदेशात आढळतो, त्याच्या सवयी काय असतात, तो माणसांवर हल्ला करतो का, कुठल्या परिस्थितीत करतो, अशी सगळी माहिती देऊन माणूस आणि बिबट्या यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी आपण काय करू शकतो याची यादी देऊन तिने तो निबंध संपवला होता. पण जर का आपल्याला बक्षीस मिळालं तर आपलं तिकीट दादाला देऊन टाकायचं आणि त्याबदल्यात त्याच्याकडून त्याचा मोबाइल वापरायला मिळवायचा हे तिचं ठरलेलं होतं. कारण तिला सगळ्याच प्राण्यांची भयंकर भीती वाटायची. आणि उघड्या जीपमध्ये बसून जाताना जर समोर बिबट्या आला तर आपल्याला तिथेच हार्ट अटॅक येईल याबद्दल तिची खात्नी होती. म्हणजे निबंध लिहिण्याच्या निमित्ताने तिला आता हे समजलं होतं, की असा बिबट्या समोर आला तर आपण काय करावं आणि काय करू नये; पण तरी बिबट्या समोर येईल अशा ठिकाणी आपण जायचंच कशाला, असा तिला प्रामाणिक प्रश्न होता.
दुसर्‍या एका मुलाने हत्ती आणि माणूस यांच्यातील संघर्षाबद्दल लिहिलं होतं. तिसर्‍याने जंगलातील परिसंस्था कशी वाचवावी असा विषय घेतला होता. चौथ्या मुलीने झाडं वाचवली तर एकूणच निसर्गाचा समतोल कसा राखला जातो आणि त्यामुळे वन्यजीवांचं अपोआप संवर्धन होतं असा मुद्दा मांडला होता, तर पाचव्याने माणूस कसा निसर्गाचं नुकसान करतो, त्यामुळे सगळ्या गोष्टींचा समतोल कसा बिघडतो आहे असा काहीसा व्यापक विषय घेतला होता.
त्या पाचही जणांच्या निबंधांमध्ये भरपूर आकडेवारी होती, अनेक उदाहरणं होती, मोठय़ा-मोठय़ा पर्यावरणतज्ज्ञांची वाक्यं उद्धृत केलेली होती. सगळ्यांनी एकमेकांचे निबंध वाचले होते. आणि आपल्यापैकीच कोणाला तरी बक्षीस मिळणार याची त्यांना खात्नी होती. प्रश्न एवढाच होता, की कोणाला?
एव्हाना मोठय़ा, आठवी ते दहावीच्या गटाचा बक्षीस समारंभ सुरू झाला होता. बाईंनी इतर स्पर्धांची बक्षिसं जाहीर केली आणि म्हणाल्या,
‘आता या सप्ताहातल्या सगळ्यात महत्त्वाच्या स्पर्धेचे विजेते कोण आहेत हे आपण बघूया. आयोजकांनी मुद्दाम निबंध स्पर्धेसाठी मोठी बक्षिसं जाहीर केली आहेत. कारण त्यानिमित्ताने, तुम्ही वाचावं, माहिती शोधावी, विचार करावा आणि ती माहिती सुसूत्नपणे मांडावी असं आयोजकांना आणि आपल्या शाळेला वाटतं. कारण तुमचे विचार तुमच्या कृतीत उतरण्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे.. तर, आता आपण वळूया आपल्या पहिल्या विजेत्याकडे. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मिळतंय आठवी ‘ब’मधील निकिताला..’
पाचही जणांनी एकमेकांकडे आश्चर्याने बघितलं. कारण त्यांच्या अपेक्षेप्रमाणे तीनही बक्षिसं त्यांनाच मिळायला पाहिजे होती. पण अजून दुसरं आणि पहिलं बक्षीस बाकी होतं. मात्र दुसरं बक्षीसही दुसर्‍याच कोणाला तरी मिळालं. आता पहिलं मात्न आपल्यालाच मिळायला पाहिजे असा विचार करत ते पाचही जण उठायच्या तयारीत बसले होते आणि बाईंनी जाहीर केलं, ‘पहिलं बक्षीस आणि अभयारण्याचं तिकीट जिंकणार्‍या विद्यार्थ्यांचं नाव आहे, विशाल, नववी क.’ 
अगदी मागे बसलेला विशाल उठून बक्षीस घ्यायला निघाला. त्याच्या सकट संपूर्ण शाळेला त्याला पहिलं बक्षीस मिळाल्याचं आश्चर्य वाटलं होतं. बक्षीस समारंभासाठी आलेले संस्थेचे अध्यक्ष म्हणाले, ‘मला या मुलाच्या निबंधाबद्दल दोन शब्द बोलायचे आहेत.’ त्यांनी विशालला स्टेजवर उभं केलं आणि म्हणाले,
‘या स्पर्धेत तुमच्या शाळेतल्या अनेक मुलांनी भाग घेतला. तुम्ही सगळ्यांनीच खरोखर खूप अभ्यास करून, माहिती शोधून निबंध लिहिले आहेत. वन्यजीव संवर्धन या विषयावर यानिमित्ताने तुम्ही इतका विचार केलात ही फार छान गोष्ट आहे; पण मग इतके सगळे निबंध चांगले असताना या मुलाच्या निबंधाला पहिलं बक्षीस का दिलं, हा प्रश्न मला तुम्हा सगळ्यांच्या डोळ्यात दिसतो आहे. त्याचंच उत्तर द्यायला मी इथे उभा आहे. या निबंधाला पहिलं बक्षीस मिळालं कारण, तो निबंध  खरा  आहे. म्हणजे मी एकच उदाहरण सांगतो, या मुलाने असं लिहिलंय की मी माझ्या आजूबाजूला कोणी भिंगाचे किडे किंवा काजवे पकडून काड्यापेटीत ठेवत असेल तर त्यांना तसं करू देणार नाही. किंवा कोणी मुलं फुलपाखराच्या पायाला दोरा बांधून उडवत असतील तर मी त्यांना तसं करण्यापासून थांबवीन. कारण वाघ आणि हत्तीसारखं फुलपाखरू आणि भिंगाचा किडापण वन्यजीवच असतो; पण आपण त्यांना पाळत नाही. वाघ आणि हत्तींसाठी मी काही करू शकत नाही; पण माझ्या आजूबाजूला कोणी खाण्यासाठी तितर मारत असेल, तर मी त्याला थांबवीन.’
एवढं बोलून अध्यक्षांनी विशालला जवळ बोलावलं आणि म्हणाले, ‘हे बक्षीस निबंध चांगला लिहिण्यासाठीच नाहीये. हे बक्षीस स्वत:च्या र्मयादा ओळखून त्या र्मयादेत आपण जे सर्वोत्तम करू शकतो त्याचा विचार करण्यासाठीचं आहे. तू नक्कीच खूप मोठा होशील. पण कितीही मोठा झालास तरी हा खरेपणा मात्न जपून ठेव.’
संपूर्ण शाळेने टाळ्यांचा कडकडाट केला. कारण विशालला मिळालेलं बक्षीस योग्य होतं हे सगळ्यांनाच पटल होतं. 
lpf.internal@gmail.com
(गौरी ‘लिट्ल प्लॅनेट फाउण्डेशन’ची समन्वयक आहे.)

Web Title: Real and unique efforts of children to save wildlife..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.