प्रज्ञावंत शापित देवीदास बागुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 06:03 AM2019-03-10T06:03:00+5:302019-03-10T06:05:05+5:30

बऱ्याच दिवसांत त्यांची भेट झाली नव्हती, म्हणून काही दिवसांपूर्वीच त्यांच्याकडे गेलो, तर कळलं, ते ‘गेलेत’! मी खिन्नपणे त्यांच्या माझ्या झालेल्या असंख्य भेटी, वाद-विवाद, भरभरून बोलणं आठवत राहिलो. आणि लक्षात येत गेलं की, ‘देवीदास बागुल’ नाव धारण केलेला हा ‘पारा’ प्रत्येक वेळी माझ्या हातातून निसटून गेलाय...

Real crusader Devidas Bagul, who fought for the rights of the artists.. | प्रज्ञावंत शापित देवीदास बागुल

प्रज्ञावंत शापित देवीदास बागुल

Next
ठळक मुद्देदेवीदास बागुल प्राध्यापक होते, लेखक होते, डिझायनर होते, व्याख्याता होते, फोटोग्राफर होते, पण त्याहीपेक्षा ‘फोटोग्राफर’ला कलावंताचा दर्जा मिळावा, त्याला त्याचे योग्य श्रेय मिळावे यासाठी आयुष्यभर झगडलेले एक सच्चे ‘क्रूसेडर’ होते.

- सतीश पाकणीकर

शाळेत असताना एकदा शास्राच्या तासाला ‘पारा’ या विषयावर सर शिकवीत होते. पाऱ्याच्या गुणधर्मांविषयी शिकवताना तो एकमेव असा धातू आहे, की जो तापमान आणि दाब यांच्या साधारण मानक स्थितीमध्ये द्रवरूप असतो, ‘एचजी’ या चिन्हाने तो दर्शविला जातो व त्याची आण्विक संख्या ८० आहे. ‘क्विक सिल्व्हर’ या नावानेही तो ओळखला जातो वगैरे वगैरे. पण आजही लक्षात राहिला तो पाºयाचा हातातून निसटून जाण्याचा गुण. आपल्या बोटांच्या चिमटीत पारा काही सापडत नाही.
हे सर्व आत्ता आठवण्याचे कारण म्हणजे काही कारणाने संदर्भासाठी मी एक जुने पुस्तक शोधत होतो. तो दिवस होता ८ जानेवारी २०१९. माझ्या सहाय्यकाने, जितेंद्रने आॅफिसमधील बºयाच पुस्तकांचा ढीग माझ्या टेबलावर आणून ठेवला. ती पुस्तके बघता बघता अचानक मला एक सुंदर डिझाईन केलेली वीस पानी पुस्तिका सापडली. ‘कैवार आणि कौतुक’ अशा शीर्षकाची ती पुस्तिका. मुखपृष्ठ व त्यावरच अनुक्र मणिका असलेले अनोखे डिझाईन. मी मुखपृष्ठ उलगडले... आतील पानावर लिहिले होते - ‘‘प्रिय सतीश, तुझ्या सहोदर वाटचालीत माझीही प्राणप्रतिष्ठा असू दे. - देवीदास बागुल.’’ माझ्या मनात विचार आला, बºयाच दिवसात त्यांची भेट झाली नाही ही आठवण करून देण्यासाठी तर ही पुस्तिका समोर नसेल आली? आज-उद्या जाऊ करीत चक्क एक आठवडा कसा गेला कळलेच नाही. लॉ कॉलेज रोडवरून येताना आठवले चौकात डावीकडे वळल्यावर कृतांजली अपार्टमेंट आहे. तेथे बागुलांचे घर. आठवड्याभरानंतर एकदा मी त्या चौकात डावीकडे वळलो. मागील बाजूने त्यांच्या घराच्या खिडक्या दिसतात. त्या बंद होत्या. नसणार ते घरात. मी परत वळलो. तेवढ्यात त्या बिल्ंिडगची सफाई करणारा कामगार दिसला. त्याला मी बागुलांविषयी विचारले. त्याने झाडझूड करतानाच रुक्षपणे उत्तर दिले की, ‘‘वो यहाँसे वृद्धाश्रम में गये और बाद में चल बसे’’. मी सुन्न झालो. टेबलावरची पुस्तिका आठवली. पण मन काही मानायला तयार नव्हते. मग अजून दोन ठिकाणी चौकशी केल्यावर कळले की, बागुल खरोखरीच ८ जानेवारीला हे जग सोडून निघून गेले. त्याचं हे जग सोडून जाणं आणि त्याच दिवशी ती पुस्तिका सापडणं हा काय विलक्षण योगायोग. मी खिन्नपणे त्यांच्या माझ्या झालेल्या असंख्य भेटी, वाद-विवाद, भरभरून बोलणं आठवत राहिलो. आणि लक्षात येत गेलं की ‘देवीदास बागुल’ नाव धारण केलेला हा ‘पारा’ प्रत्येक वेळी माझ्या हातातून निसटून गेलाय.
देवीदास बागुल कोण होते, या प्रश्नाचं उत्तर बºयाच व्यक्ती वेगवेगळे देतील. ते प्राध्यापक होते, ते लेखक होते, ते डिझायनर होते, ते व्याख्याता होते, ते उत्तम श्रोता होते, ते फोटोग्राफर होते, ते फोटोंचे उत्तम रसग्रहण करणारे वक्ता होते आणि महत्त्वाचे म्हणजे ते ‘फोटोग्राफर’ला कलावंताचा दर्जा मिळावा, त्याला त्याचे योग्य श्रेय मिळावे यासाठी आयुष्यभर झगडलेले एक सच्चे ‘क्रूसेडर’ही होते. फोटोग्राफरला कलावंत म्हणून वागवावे, त्याच्या प्रकाशचित्रावर त्याचा हक्क असावा, लेखक, चित्रकार यांच्याप्रमाणेच त्याचे प्रकाशचित्र वापरणाऱ्यांनी त्याची परवानगी घ्यावी, त्याच्या नावाचा उल्लेख करावा, त्याची रॉयल्टी द्यावी या साºया न्याय्य मागण्या असूनही त्या सहजासहजी न पाळल्या गेल्याने झालेल्या भांडणांमुळे ते ‘भांडकुदळ’ या उपाधीहीचेही धनी झाले. फक्त धनीच झाले असे नाही तर आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत निष्कांचनही राहिले. भल्या भल्या व्यक्तींशी व संस्थांशी ‘कॉपीराइट’बाबत पंगा घेतल्याचे बक्षीस काय तर - ‘निष्कांचन अवस्था’! बागुलांनी भविष्य, पैसा यांचा विचार न करता कलास्वातंत्र्य, कलावंताचा हक्क यासाठी दिलेला लढा व त्याबद्दल ‘माझी छायाचित्रकला’ या पुस्तकात केलेले सुस्पष्ट लेखन पाहून चकित व्हायला होते. सरस्वतीची इतकी वरदानं असलेली बागुल नावाची व्यक्ती तरीही कायम शापितच राहिली.
मी १९८९ साली एक प्रकाशचित्र प्रदर्शन केले. नाव होते ‘या गोजिरवाण्या घरात’. नुकत्याच जन्म होऊ घातलेल्या, नाळही न कापलेल्या बाळापासून ते किशोरावस्थेपर्यंतची मुला-मुलींच्या भावमुद्रा हा त्या प्रदर्शनाचा विषय. त्याही आधीपासून मी बागुलांनी टिपलेल्या भावमुद्रा पाहिल्या होत्या. बरोबरीनेच तेव्हा नुकतेच माझ्या वाचनात त्यांनी लिहिलेले ‘नवे बालसंगोपन’ हे पुस्तकही आले होते. माझ्या प्रदर्शनाचा विषय लहान मुलांबाबत असल्याने मनात कल्पना केली की जर या प्रदर्शनाबरोबर तीन दिवस तीन व्याख्याने ठेवली तर हे प्रदर्शन वेगळे ठरेल. मी तशी तयारी केली. तीन दिवस तीन वक्ते. त्यापैकी दोन वक्त्या या त्यांच्या कार्यक्षेत्रात सुप्रसिद्ध अशा होत्या. त्यांनी होकारही लगेच दिला. मग मी बागुलांना विचारायला गेलो. त्यांना अतिशय आनंद झाला. त्यांचाही होकार आला. पण त्यांनी विचारले की, ‘‘त्या दोन वक्त्यांना तू मानधन किती देणार आहेस?’’ मी सांगितले की प्रत्येकी पाचशे रु पये. (त्यावेळी बालगंधर्व कलादालनाचे भाडे तीन दिवसास पाचशे रु पये होते.) लगेचच ते म्हणाले की - ‘‘मग मला तू सातशे पन्नास दिले पाहिजेस.’’ मी कारण विचारले. यावर त्यांनी खुलासा केला की, ‘‘त्या दोघी नोकरी करून उरलेल्या वेळेत हे काम करतात; पण मी तर नोकरी करत नाही.’’ मला हे कारण खूपच विचित्र वाटले. हा त्यांच्या स्वभावाचा मी पाहिलेला पहिला कंगोरा. याला विक्षिप्त म्हणावं का असुरक्षित भावना? पण मी विचार केला की एक सिद्धहस्त फोटोग्राफर त्याने केलेल्या बालसंगोपनातील अनुभव फोटोंच्या प्रदर्शनात विशद करायला तयार आहे नं? जाऊदे थोडे पैसे जास्त. मी लगेचच होकार दिला. अन् माझ्या प्रदर्शनात बागुलांनी अप्रतिम दर्जाचे व्याख्यान दिले.
पुढे मी नेहमी त्यांच्याकडे जात राहिलो. कधी तेही माझ्याकडे येत. वादावादीही होत राहिली. एकीकडे ते मला ‘‘तू मला मुलासारखा आहेस’’ असे म्हणायचे. पण त्या मुलाने जर काही हिताची गोष्ट सांगितली तर त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करायचे. कोणत्यावेळी त्यांचा मूड कसा असेल हे जाणून घेणे ही तारेवरची कसरत असायची.
एकदा असेच अचानक ते आले. मला म्हणाले - ‘‘मला तुझ्या मुलांचे फोटो काढायचे आहेत. पण माझी एक अट आहे की, मी फोटो काढताना तू तिथे असता कामा नये. नाहीतर तुला कळेल माझं टेक्निक.’’ पण नंतर मला बोलावून माझा, मुलाचा व माझ्या पत्नीचा असा एक अप्रतिम फोटो त्यांनी टिपला.
एकदा मी त्यांच्याकडे गेलो असताना त्यांनी मला एक अतिसुंदर फोटो दाखवला. म्हणाले - ‘‘ओळख, सूर्योदय आहे का सूर्यास्त?’’ मग त्यानंतर झाले त्याचे रसभरीत वर्णन आणि अनुपमेय रसग्रहणही. कॅमेरा असला की कोणीही फोटोग्राफर होऊ शकतो; पण ‘कलावंत’ व्हायला एक संवेदनाशील मन लागतं याचा तो दाखला होता. फोटोची ती फ्रेम मी तत्काळ त्यांच्याकडून विकत घेतली. आजही मला ते रसग्रहण जसेच्या तसे आठवते... बागुल म्हणतात - ह्लळँी ं्रे ङ्मा ं१३, ्रल्ल ३ँी ६ङ्म१२ि ङ्मा ढं४’ ङ’ीी, ्र२ ल्लङ्म३ ३ङ्म १ीस्र१ङ्म४िूी ३ँी ५्र२्रु’ी, ु४३ ३ङ्म ें‘ी ५्र२्रु’ी.'
शकील बदायुनीची एक गझल आहे. ‘चौधवीका चांद हो .. या आफताब हो’ या ओळीत कवीने स्रीसौंदर्याची महती सांगताना पौर्णिमेच्या चंद्राशी तुलना करण्याऐवजी चतुर्दशीच्या चंद्राशी केलेली आहे. कारण कोणत्याही सौंदर्यात एक कला कमी असल्याने त्या सौंदर्याचे आकर्षण वाढते. ते आकर्षण इतके प्रभावी वाटते की कवी म्हणतो की, तो प्रभाव सांगण्यासाठी सूर्याच्या तेजाचीच आठवण येते. सौंदर्यात एक तेज असते. त्या तेजाचे स्मरण व्हावे म्हणून कवीने सूर्याचे - आफताबचे - स्मरण केले आहे.
छायाचित्रात दिसणारे चंद्रबिंब इतके धवल आहे की ते बिंब सूर्याचे आहे असेही वाटून जाते. हा चौधवीका चांद- चतुर्दशीचा चंद्र एरवी ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट दिसतो. पण पावसाळ्यात जर विरळ ढग असतील तर सूर्यास्ताच्या प्रकाशाने पूर्वेला रंगांची उधळण होते. आणि चौधवीका चांद रंगवतारी होऊन तळपत राहतो.’’ एका क्लिक मागे केवढा विचार. आणि अर्थातच असा अनमोल क्षण टिपण्याचे कौशल्यही.
सुरुवातीपासून आमचे जे मैत्र जुळले ते मी शेवटचा त्यांना भेटलो ते ३० एप्रिल २०१८पर्यंत. त्या दिवशी मी भेटायला गेलो असताना तेथे फिल्म इन्स्टिट्यूटमधील क्षितिज बोरसे नावाचा एक तररुण व त्याची पत्नी त्यांच्या काही महिन्यांच्या मुलीला घेऊन आले होते. क्षितिज, बागुलांना हवे-नको पाहायला येत होता. वयाची पंचाऐंशी पार केलेले बागुल त्या चिमुरडीबरोबर हरखून गेले होते. मला एकदम त्यात बालसंगोपनवाल्या बागुलांचा चेहरा दिसू लागला. अजाणतेपणी माझा हात खिशाकडे वळला आणि माझ्या मोबाइल कॅमेºयात त्या आजोबांचा त्या चिमुरडीबद्दलचा गहिवर टिपला गेला.
मित्रवर्य देवीदास बागुल ... तुम्ही ८ जानेवारीला हा इहलोक सोडून गेलात. पण तुम्ही काय मागे ठेवून गेला आहात याची कल्पना आहे का तुम्हाला? परवाच माझ्या एका मित्राचा फोन आला होता. त्याच्या तेरा वर्षाच्या मुलाने बरेच फोटो टिपले होते. त्यातील काही माझ्या मित्राने मला पाहण्यासाठी पाठवले. त्या प्रत्येक फोटोवर खालच्या कोपºयात त्या मुलाने त्याचा कॉपीराईट टाकला होता. तुम्ही इतक्या वर्षांपूर्वी हक्काबाबत जे रोप लावले होते त्याला आता पानफुटी आली आहे. प्रकाशचित्रकाराच्या हक्कांबाबतची काळरात्र मिटून उष:काल होतो आहे....
(लेखक प्रसिद्ध प्रकाशचित्रकार आहेत.)

sapaknikar@gmail.com

Web Title: Real crusader Devidas Bagul, who fought for the rights of the artists..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.