लडाखमधील शिक्षण आणि पाणी प्रश्नाशी दोन हात करणारा प्रत्यक्षातला भन्नाट रॅंचो.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 07:00 AM2018-11-18T07:00:00+5:302018-11-18T07:00:03+5:30
लडाखसमोर आज दोन मोठे प्रश्न आहेत. मुलांना उपयोगी पडेल असं शिक्षण आणि पाण्याच्या दुर्भिक्षाशी लढणं. या दोन्ही आघाड्यांवर लढणारा लडाखी माणूस एकच आहे, सोनम वांगचुक! ‘थ्री इडियट्स’मधल्या फुनसुख वांगडूपेक्षा प्रत्यक्षातला हा रॅँचो फारच भारी आहे !
-गौरी पटवर्धन
सकाळी साडेसहा वाजता तीस हजार फूट उंचीवरून खाली पसरलेल्या चॉकलेटी रंगाच्या, बर्फाच्या पांढर्या टोप्या घातलेल्या डोंगररांगा दिसायला लागल्या की विमानात बसलेल्या प्रत्येकाचं मन अपेक्षेने भरून जातं. कारण पुढच्या वीस मिनिटात त्यांच्या विमानाची चाकं भारतातल्या अत्यंत अद्भुत भूप्रदेशावर टेकणार असतात. त्यांचे पाय लडाखच्या धूळभरल्या भूमीला लागणार असतात.
प्रवासाची किंवा खरं म्हणजे भटकायची आवड असणा-या प्रत्येकासाठी लडाखची ट्रिप हे एक उराशी बाळगलेलं स्वप्न असतं. मग ते कोणी श्रीनगर किंवा सिमल्यापासून गाडीने जाऊन पूर्ण करतं, कोणी बाइकवर तर कोणी सायकलवर ! मात्र बव्हंशी लोक ते विमानाने जाऊनच पूर्ण करतात.
आणि यावेळी ते स्वप्न पूर्ण करायला विमानात बसलेल्यांच्या यादीत माझंही नाव होतं. पण माझं स्वप्न विमानातल्या इतरांपेक्षा जरा वेगळं होतं. त्यांचं स्वप्न गोड-गुलाबी होतं; पण माझ्या त्या स्वप्नाला सोनेरी किनारसुद्धा होती. कारण त्या लेहच्या ट्रिपमध्ये मला सोनम वांगचुक भेटणार होते.
तेच ते ! 2018 सालचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार ज्यांना मिळाला ते, त्यांची शाळा बघायला मिळणार होती. आइस स्तूप ही जगभरात गाजलेली आयडिया बघायला मिळणार होती. थोडक्यात सांगायचं तर ओरिजिनल रँचो ऊर्फ फुनसुख वांगडू ‘लोकमत दीपोत्सव’मध्ये लेख लिहिण्याच्या निमित्ताने याची देही, याची डोळा मला भेटणार होते. आणि म्हणूनच यावेळची लेह ट्रिप जरा जास्तच भारी होती.
लेह ट्रीपची गंमत विमान लॅण्ड होण्यापासूनच सुरु झाली. आधी कितीतरी वेळ उंचच्या उंच डोंगरांवरून विमान उडत होतं, आणि मग ते अचानक दोन डोंगरांच्या मधल्या दरीतून खाली झेपावलं तेव्हा खाली होती खळखळत वाहणारी सिंधू नदी आणि तिच्या दोन्ही तटांवर पसरलेलं विस्तीर्ण वाळवंट.
या वातावरणातला प्रत्येक अनुभव मला घ्यायचा होता आणि म्हणूनच राहण्यासाठी मुद्दाम लेहजवळच्या फयांग गावातलं एका शेतातलं फार्म स्टे निवडलेलं होतं. एरवी लडाखमध्ये फिरताना फक्त बाहेरून दिसणा-या घरातली ही उबदार माणसं यावेळी माझ्याही आयुष्यात आली. गेल्या गेल्या लडाख स्पेशल खारट गुडगुड चायने त्यांनी जे स्वागत केलं, त्यातली ऊब पूर्ण प्रवासात कायम राहिली. इथले स्थानिक पदार्थ कुठले? असं विचारल्यावर मोमोचा बेत एका संध्याकाळी ओघानेच ठरला. पण एका दुपारी आजोबांनी उत्साहाने सातूच्या पिठाचं खोलाक खायला करून दिलं.
शेजारच्यांच्या घरातलं एक झाड मला आवडलं तर त्यांनी माझ्यासाठी त्याची एक फांदी मागून आणली. आपल्या घरी पैसे देऊन राहायला आलेल्या माणसाबद्दल इतकी आत्मीयता दाखवणं, हा लडाखी संस्कृतीचा एक भाग आहे.
कारण लडाखी माणूस हा मुळात निर्मळ, निष्कपट आणि बव्हंशी निरागस असतो. लेहच्या मार्केटमध्ये फूटपाथवर तंबू लावून काही लडाखी बायका तिथले स्थानिक पदार्थ विकतात. तिथे जेवल्यानंतर बिल किती झालं असं विचारलं, तर त्या मावशींनी कागदावर लिहिलेलं मेन्यू कार्ड माझ्या हातात ठेवलं आणि म्हणाल्या, ‘तुम्ही जे जे घेतलंत त्याची तुम्हीच बेरीज करा’!
- या व्यवहारात आपल्याला कोणी फसवेल असं त्यांच्या मनातही येत नाही. आणि खरं सांगायचं, तर आपल्याला कोणी फसवेल असं आपल्याही मनात येत नाही.
एरवी शहरात राहात असताना आपण आपल्याही नकळत सतत सावध असतो. रिक्षात बसताना, उशीर झाल्यावर एकटीने प्रवास करताना, गर्दीत जाताना आपल्या मनात कायम शंकेची एक पाल चुकचुकत असते. ती पाल लडाखमध्ये गेल्यावर एकदम गप्प होते. लेहमधल्या काही मोजक्या जागा सोडल्या तर बाकीची टूरिस्ट लोकेशन्स सगळी लांब आहेत, रस्ते खराब आहेत, लेहच्या बाहेरच्या रस्त्यावर अनेकदा अजिबात ट्रॅफिक नसतो. आपण जिथे गेलेलो असतो तिथून परत यायला अनेकदा अंधार होऊन जातो. पण या भागात कधीही त्याची भीती वाटत नाही.
स्टॅँझिन दोर्जे ग्या नावाच्या फिल्ममेकरचा इंटरव्ह्यू घ्यायला जाताना बराच उशीर झाला. परत यायला रात्रीचे साडेनऊ वाजतील असं लक्षात आलं, शिवाय ते ठिकाण माझ्या राहण्याच्या जागेपेक्षा बरंच लांब होतं, म्हणून मी जिथे राहात होते त्या अम्मांना विचारलं की जाऊ ना? सेफ आहे ना? तर त्यांना माझा प्रश्नच कळला नाही. त्यात काय अडचण असेल ते त्यांच्या लक्षातच येईना. जॅकेट बरोबर घेऊन जा हे सोडलं तर सुरक्षिततेसाठी कुठलीही सूचना त्यांनी मला दिली नाही, आणि त्याची खरोखर गरज नव्हती.
लडाखी माणसं मुळातच माणूस म्हणून फार चांगली आहेत. इथे एकेकट्या बायका मेंढय़ांचे कळप घेऊन डोंगरावर राहू शकतात. पण लडाखी संस्कृती, तिथलं मूळ राहणीमान आणि बाहेरचं बदलतं जग यात ही माणसं भरडली जायला लागली आहेत. तिथे येणा-या टुरिस्टांच्या प्रचंड गर्दीला लेहमध्येपण सगळ्या गोष्टी चकाचक पाहिजे आहेत. फ्लश टॉयलेट्स पाहिजेत, मातीचं बांधकाम त्यांना शॅ बी वाटतं, त्यांना प्रेमळ आणि घरगुतीपेक्षा प्रोफेशनल सर्व्हिस हवी आहे आणि या सगळ्यातून लडाखचा गाभा बदलतो आहे.
पण हे सगळेच बदल काही चांगले नाहीयेत. एकीकडे टुरिस्ट ब-याच प्रमाणात लडाखची अर्थव्यवस्था चालवतात, त्यामुळे त्यांच्या गरजा भागवल्या गेल्या पाहिजेत आणि दुसरीकडे सतत वाढणा-या पर्यटनामुळे इथल्या निसर्गावर प्रचंड ताण पडतो आहे. कारण किती झालं तरी लडाख हे बारा हजार फुटांवरचं वाळवंट आहे.
त्यामुळेच लडाखसमोर आज दोन मोठे प्रश्न आ वासून उभे आहेत. पहिला म्हणजे लडाखी मुलांना लडाखमध्ये उपयोगी ठरेल आणि इतर ठिकाणीही कामी येईल असं शिक्षण देणं, आणि दुसरा म्हणजे हवामानबदलाला तोंड देत पाण्याच्या दुर्भिक्षाशी लढणं.
आणि या दोन्ही आघाड्यांवर लढणारा लडाखी माणूस एकच आहे सोनम वांगचुक! त्यांची भेट आणि त्या भेटीची ही गोष्ट आहे. त्यांच्या गप्पांमधून लक्षात आलेलं त्यांचं तत्त्वज्ञान हे केवळ लडाख नाही, तर संपूर्ण देशाला, जगाला दिशा देऊ शकणारं आहे. शिक्षणाचा मुळातून विचार करायला लावणारी ही गोष्ट आहे. हवामानबदलाशी लढा देण्यासाठी प्रत्यक्ष प्रयत्न करण्याची गोष्ट आहे. कितीही सन्मान मिळाले तरी जमिनीवरचे पाय सुटू न देण्याची ही गोष्ट आहे.
कारण प्रत्यक्षातला हा फुनसुख वांगडू सिनेमातल्या रॅँचोपेक्षा फारच जास्त भारी आहे!
(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)
manthan@lokmat.com