बालमृत्यू आणि कुपोषणाचे वास्तव
By admin | Published: October 8, 2016 04:54 PM2016-10-08T16:54:02+5:302016-10-08T16:54:02+5:30
गेल्या वर्षी महाराष्ट्रात १८ हजार बालमृत्यू झाल्याचे जाहीर झाले आणि अनेक जण खाडकन जागे झाले. पण आजही अनेक बालमृत्यूंची नोंदच होत नाही. ती संख्या विचारात घेतली तर महाराष्ट्रातील बालमृत्यूंची संख्या होते ७५ हजार! शासनाच्याच समितीने २००४ मध्ये निष्कर्ष काढला होता,राज्यात २० ते ३० टक्के बालमृत्यू नोंदवलेच जात नाहीत.. आजही ते तितकेच खरे आहे.
- डॉ. अभय बंग
गेल्या वर्षी महाराष्ट्रात १८,००० बालमृत्यू झाले; हे फारच भयानक घडले; हे सर्व कुपोषणामुळे घडले असे मानून स्वयंसेवी संस्था, न्यायालय, माध्यमे सर्व जण क्षुब्ध आहेत.
‘महाराष्ट्रात १८,००० बालमृत्यू’ ही जरी दु:खद बाब असली तरी गणिताला गणिताच्या दृष्टीनेच बघायला हवे. वस्तुत: महाराष्ट्रात वर्षभरात जर खरोखर केवळ १८,००० बालमृत्यू झाले असतील तर यशाचा उत्सव साजरा करायला हवा.
महाराष्ट्रात दरवर्षी जवळपास २० लक्ष बाळे जन्माला येतात. बालमृत्यूंचा नुसता आकडा न बघता ते कितीपैकी आहेत हे बघणे आवश्यक आहे. सहसा एक हजार जन्मांमागे किती बालमृत्यू अशा रीतीने त्यांचे प्रमाण मोजले जाते. २० लक्ष जन्मांमागे १८,००० बालमृत्यू म्हणजे हे प्रमाण हजार जन्मांमागे नऊ असे येते. हे प्रमाण अमेरिकेतील बालमृत्यूंच्या प्रमाणाच्या जवळपास येते. प्रश्नच सुटला !
१८,००० बालमृत्यूंचा आकडा माहितीच्या अधिकारात राज्य शासनाकडून प्राप्त झाला असे न्यायालयीन याचिकेचे वकील अॅड. उदय वारुंजीकर म्हणाले. बालमृत्यू न नोंदवून किंवा कमी नोंदवून हा प्रश्न सोडवायची जुनी शासकीय परंपरा आहे. मग खरा आकडा कोणता?
भारत सरकारची सँपल रजिस्ट्रेशन सिस्टीम गेली अनेक दशके देशातील साठ ते सत्तर लक्ष लोकसंख्येच्या रँडम सँपलमध्ये मोजमाप करून दरवर्षी राज्यांचा अर्भक मृत्युदर सांगते. शिवाय नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे (एन.एफ.एच.एस.) हे दर सात-आठ वर्षांनी होणारे राष्ट्रीय सर्वेक्षण अर्भक व बालमृत्युदरांविषयी अधिकृत अंदाज देतात.
एन.एफ.एच.एस. चौथ्या सर्वेक्षणाचा अहवाल नुकताच उपलब्ध झाला असून, त्यानुसार महाराष्ट्राचा बालमृत्युदर (०-५ वर्षे वयातील मृत्यू) हा २०१५ मध्ये हजार जन्मांमागे २९ होता. हे प्रमाण २० लक्ष जन्मांना लावले की महाराष्ट्रातील एकूण बालमृत्यूंचा आकडा ५८,००० एवढा येतो.
पण २००१ साली महाराष्ट्रातल्या तेरा स्वयंसेवी संस्थांनी मिळून केलेल्या ‘कोवळी पानगळ’ अभ्यासावर आधारित, ‘हिडन चाइल्ड मॉरटॅलिटी इन महाराष्ट्र’ हा अहवाल भारत सरकारच्या आरोग्य विभागाने प्रकाशित केला आहे. (बंग, रेड्डी व देशमुख, २००५) त्यानुसार सँपल रजिस्ट्रेशन सिस्टीम व एन.एफ.एच.एस.देखील काही प्रमाणात नवजात बालकांचे मृत्यू नोंदणे चुकवितात व वास्तविक बालमृत्युदर २५ ते ३० टक्क्यांनी जास्त होता. त्या हिशेबाने महाराष्ट्रातील सध्याच्या बालमृत्यूंची संख्या ७५,००० च्या जवळपास जाते.