वेळू

By admin | Published: August 20, 2016 08:53 PM2016-08-20T20:53:41+5:302016-08-20T20:53:41+5:30

डोंगरावर चर खोदून, रक्त ओतून, घाम गाळून, हातात हात गुंफून गावचं पाणी गावात अडवून धरणारं

Reed | वेळू

वेळू

Next
- सचिन जवळकोटे

वेळू... दुष्काळी कोरेगांव तालुक्याचं शेवटचं टोक असल्यानं विकासाच्या नावानंही आनंदी-आनंदच. त्यामुळं आजपावेतो कुठंतरी अडगळीत पडलेलं हे गाव अकस्मातपणे प्रकाशझोतात आलं, तसं साऱ्या जगाच्या नजरा इकडं वळाल्या... कारण या गावानं तब्बल पाऊण कोटीची घसघशीत रक्कम पटकावलीय.आणि त्याहीपेक्षा लाखमोलाचं पाणी गावातच अडवून धरलंय!
आमीर खानच्या ‘पानी फाउंडेशनच्या’ वतीने घेण्यात आलेल्या ‘वॉटर कप’ स्पर्धेत वेळू गावानं पैलं बक्षीस पटकावलंय... ही बातमी सोपी नाही, त्यामागे आहे बदलासाठी स्वत: उठून उभ्या राहिलेल्या एका गावाची जबरी कहाणी!
साताऱ्याहून औंधला जाताना रहिमतपूरच्या पुढं डावीकडं एक फाटा. आतमध्ये वळल्यानंतर अगोदर ‘साप’ गाव लागतं. त्या गावच्या वेशीसमोरूनच अजून एक रस्ता ‘वेळू’कडे गेलेला. गावच्या वेशीवरच भलीमोठी कमान. आत शिरताच मात्र जागोजागी छोटे फलक. वेगळेच. ‘ज्याला समजले पाणी.. तोच खरा मानव प्राणी’ अशा शेकडो वाक्यांच्या फलकांनी अवघा गाव भरून गेलेला. कुणाच्या घरावर स्वच्छतेचा, तर कुणाच्या दुकानावर सचोटीचा फलक. हनुमान मंदिरावर आरोग्याचा, तर विद्युत खांबांवर ऊर्जा बचतीचा. हे गाव आहे की शाळेचा वर्ग, याचा विचार करत-करतच सरपंचांचं घर गाठलं. 
या गावात सध्या महिलांचंच राज्य आहे. तरुण सरपंच पूनम भोसले, ग्रामसेविका माया इंगवले, कृषी सहायिका वैशाली सुतार, पोलीसपाटील रूपाली बुधावले अन् झेडपी शाळा मुख्याध्यापिका जाधवबाई या पाच महिलांच्या हातीच जणू गावचा कारभार एकवटलेला. गावच्या राजकारणातही तशा दोन-तीन पार्ट्या. एक काँग्रेसची, तर दुसरी राष्ट्रवादीची. तिसरी मात्र स्वतंत्र. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एकमेकांशी अत्यंत कडवटपणे झुंजणारी ही मंडळी इतर वेळीही वेगवेगळ्या दिशेला तोंड करून बसायची. गावावर आलेलं अस्मानी-सुलतानी संकट जेव्हा सर्वांना जाणवलं तेव्हा सर्वांच्याच मानसिकतेत प्रचंड फरक पडत गेला अन् आश्चर्यकारक चमत्कार घडला. 
सरपंच पूनम भोसले सांगत होत्या, ‘आमच्या गावच्या अखत्यारित सुमारे साडेबाराशे हेक्टर जमीन. त्यात फॉरेस्टची अडीचशे हेक्टर. गावामागच्या जंगलात अन् सुळकी डोंगरावरच बहुतांश शेती. शिवारातल्या पाण्याची पातळी खूप खाली. तीनशे फूट खाली बोअर मारला तरच कुठंतरी थोडंफार पाणी लागायचं. यंदाच्या उन्हाळ्यात तर फक्त एक-दोन टक्केच ऊस राहिलेला. बाकीची पिकंही पाण्याअभावी जळून गेलेली. मे-जूनमध्ये रोज चार टँकर यायचे. खूप वाईट अन् विचित्र अवस्था बनली होती गावाची.’
पाण्याविना तडफडणाऱ्या गावातील अनेकांनी साताऱ्याकडं स्थलांतर केलं. शेती ओसाड टाकून अनेकजण रोजंदारीकडे वळले. आजूबाजूची गावं हिरव्यागार शिवारानं बहरलेली असताना आपल्याच नशिबी दुष्काळाचा शाप का, या जाणिवेनं तरुण पिढी निसर्गावर चिडून उठलेली. याच काळात एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ संकल्पनेची पोस्ट एकानं वाचली. त्याला उत्सुकता वाटली. त्यानं संबंधित अविनाश पोळ यांच्याशी संपर्क साधला. ‘आमच्या गावाला दुष्काळातून मुक्त करायचंय!’ अशी विनंती केली. तेव्हा पोळांनी सरकारी यंत्रणेवर विसंबून राहण्यापेक्षा श्रमदानावर भर देण्याचा सल्ला दिला. मग काय.. गावातले तरुण कामाला लागले. मंदिराच्या आवारात ग्रामसभा बोलावली; पण हाय... अवघी सतरा माणसं उपस्थित. तरीही या तरुणांनी हार मानली नाही. डोंगरावर श्रमदानाला सुरुवात केली. कुठं चर मारायचे अन् कुठं बांध घालायचा याची थोडीफार जुजबी माहिती घेऊन ही मूठभर मंडळी दर रविवारी डोंगरावर धापा टाकू लागली. घाम गाळू लागली. मात्र हे पाहून गावातली काहीजण चक्क नाक मुरडून हसू लागले. ‘यांच्या मागच्या दहा पिढ्यांनी तरी कधी खड्डे खोदून पाणी अडविलं होतं काय?’ अशी कुजबूज करू लागले. मात्र या साऱ्या टोमण्यांकडे दुर्लक्ष करत ही तरुण पोरं ‘सोशल संडे वर्क’ करतच राहिली. याच दरम्यान ‘पानी फाऊंडेशन’ची ‘वॉटर कप’ स्पर्धा जाहीर झाली. दुष्काळी पट्ट्यातील चाळीस गावांसोबत वेळूचाही या स्पर्धेत समावेश केला गेला. तेव्हा या पोरांनी अजून एक ग्रामसभा बोलावली. यावेळी मात्र ग्रामस्थांचा आकडा पन्नासवर पोहोचला. ‘कोणत्याही परिस्थितीत स्पर्धा जिंकायचीच!’ असा निर्धार झाल्यानंतर मात्र गावकऱ्यांचा या मोहिमेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत गेला. पाहता-पाहता श्रमदान करणाऱ्यांची संख्या वाढत गेली.
गावातले जुनेजाणते पांडुरंग जाधव सांगत होते, ‘स्पर्धेसाठी पंचेचाळीस दिवसांचा अवधी होता. एवढ्या काळातच डोंगराएवढी कामं उपसायची होती. म्हणून रोज सकाळी अन् संध्याकाळी तीन-तीन तास गावासाठी द्यायचं ठरवलं. आम्ही मंदिरावर भोंगा बसवला. बरोबर पहाटे सहा वाजता भोंगा वाजला की ग्रामस्थ मंडळी पटापट आवरून डोंगराकडं पळू लागली.’
सुरुवातीला गावानं ‘वॉटर कप’ स्पर्धेचे सर्व नियम नीट समजून घेतले. केवळ पाण्याची पातळी वाढविणं इतकंच नव्हे तर गावाची एकी अन् गावातली स्वच्छता या गोष्टीही अधिक महत्त्वाच्या असल्याचं लोकांच्या लक्षात आलं. भाडळी खोऱ्यातील हिरवे शिबिरात बाराजणांनी चार दिवसांचं प्रशिक्षणही घेतलं. डीप-सीसीटी, सीसीटी, बांध-बंदिस्ती, गॅबियन स्ट्रक्चर, ओढा खोलीकरण-रुंदीकरण, नवीन मातीबांध, जुन्या मातीबांधातील गाळ हटाव असे अनेक नवनवीन तांत्रिक शब्द गावकऱ्यांनी पाठ केले.
सकाळी सात ते दहा अन् सायंकाळी चार ते सात असे एकूण सहा तास गावच्या शिवारात मंडळी राबू लागली. गावातलं राजकारण, गटांमधली ईर्ष्या अन् वैयक्तिक रागलोभ विसरून सारं गाव एक झालं. लोकांची एकी पाहून सरकारी यंत्रणाही उत्साहित झाली. स्वत: जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी या कामांसाठी लागणाऱ्या यंत्रसामग्रीची तत्काळ मदत करण्याचा आदेश संबंधित खात्यांना दिला. याचवेळी राज्यसभेच्या खासदार अनू आगा यांनी आपल्या निधीतून तब्बल शहाण्णव लाखांची मदत गावाला दिली. गावाचा हुरूप वाढला. अवघं गाव श्रमदानासाठी लोटू लागलं. एकेदिवशी तर तब्बल साडेसातशे माणसं घरदार विसरून डोंगरावर काम करत होती. एक नवा पैसाही न घेता. 
रायसिंग सूर्यवंशी त्या कामाविषयी बोलताना भलतेच उत्साहित झाले होते, ‘सलग पंचेचाळीस दिवस झालेल्या या श्रमदानात गावातली चिल्ली-पिल्ली होती. जुनी-जाणती वयस्कर मंडळीही होती. गावच्या शिवारात पाच पाझर तलाव होते. पहिला तलाव बहात्तरच्या दुष्काळात बांधलेला. मात्र अलीकडच्या काळात तो भरल्याचं आठवत नाही. मग आम्ही हे पाचही तलाव एकमेकांना जोडले, जेणेकरून सायफन पद्धतीनं एकदम वरच्या तलावातलं पाणी शेवटच्या तलावापर्यंत पोहोचावं. याचबरोबर आम्ही दोनशे हेक्टर जागेत बांध-बंदिस्ती केली, तर अडीचशे लूज बोल्डर तयार केले. नव्वद हेक्टरमध्ये डीप-सीसीटीही बनविले. विशेष म्हणजे, या सगळ्या कामांसाठी प्रत्येक शेतकऱ्यानं आपली थोडी-थोडी जागा दिली जी जवळपास शंभर एकर इतकी भरली. आता अजून काय पाहिजे हो लोकांकडून?’
या मोहिमेत सर्वाधिक पुढाकार घेऊन सर्वांना कामाची जबाबदारी देणारे प्रवीण भोसले चालता-चालता सांगत होते, ‘या श्रमदानात गावातल्या सर्व गटांना आम्ही एकत्र घेतलं. विरोधकांनाही हातात हात घालून मोठ्या सन्मानानं डोंगरावर नेलं. ईगो बाजूला ठेवला. गावातली अपंग मंडळीही यात मोठ्या हिरीरीनं उतरलेली. पंचाऐंशी वर्षांचे रामचंद्र आजोबा यांचा एक पाय तुटलेला. जयपूर फूट लावून काठीच्या आधारे चालणाऱ्या या आजोबांनीही रोज कैक टोपली माती उचलली. मग बुधावलेंचा राजू असो की विश्वजित किंवा भास्कर असो.. त्यांनीही आपल्या अपंगत्वाचा बाऊ न करता सिंहाचा वाटा उचललेला. अरुण शिंदे नामक रिटायर पोलीस दम्याचे आजारी, तरीही त्यांनी या कामात दांडगा उत्साह दाखवला.’ 
आजपावेतो दुष्काळात पिचून गेलेल्या या गावकऱ्यांची मानसिकता ‘एकी’नंतर कशी झपाट्यानं बदलत गेली, याची सुरस कहाणी ऐकत-ऐकत गावालगतचा तलाव कधी आला, ते समजलंच नाही... अवघा तलाव तुडुंब भरलेला. वरच्या तलावातून सायफन पद्धतीनं पाणी आल्यानं आजूबाजूचा परिसरही हिरवागार बनलेला. 
यंदा गावची सारी तळी भरली आहेत. भूगर्भातल्या पाण्याची पातळीही वाढली आहे. अवघ्या अर्ध्या हापशात भरभरून पाणी हातपंपातून वाहू लागलंय. शिवारात मायंदाळ पाणी साठलंय. तरीही गावानं ठरवलंय की, यापुढे ऊस नाही लावायचा. केवळ ठिबक सिंचनातून बाकीची पिकं घ्यायची. निसर्गानं यंदा भरभरून दिलेल्या पाण्याचा प्रत्येक थेंब पुढच्या उन्हाळ्यापर्यंत वाचवायचा. कारण या गावकऱ्यांनी केलेलं श्रमदान केवळ ‘वॉटर कप’ मिळविण्यासाठी नव्हतं, तर पुढच्या पिढ्यांसाठीही ‘कायमची पुंजी’ बनविण्यासाठी होतं! याच तलावाच्या काठावर काही महिला कसल्या तरी कामात गर्क होत्या. जवळ जाऊन पाहतो तर काय, स्पर्धेत मिळालेल्या भल्यामोठ्या ‘वॉटर कप’ची पूजा करण्यात या महिला गुंतलेल्या. एक मावशी कृतकृत्य होऊन म्हणाली, ‘ज्या पाण्यानं आम्हाला संघर्ष शिकविला, ज्या संघर्षातून आम्हाला हे बक्षीस मिळालं, त्याच तलावाच्या साक्षीनं हळदीकुंकू व्हातोय, बाबा.. लक्ष्मीच आली नव्हं का गावात!’

वॉटर कप : एक
आमीर खानच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या ‘पानी फाउंडेशन’ने यावर्षीच्या दुष्काळात महाराष्ट्रातल्या ११६ गावांमध्ये ग्रामस्थांना साद घालत एकत्र केले आणि गावात पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब गावातच अडवण्यासाठी लोकांच्या हाती कुदळी आणि फावडी आली.
सरकारवर अवलंबून न राहता आपले पाणी आपणच अडवण्याचा, जिरवण्याचा, वाचवण्याचा आणि जबाबदारीने वापरण्याचा वसा घेऊन कामाला भिडलेल्या या गावांनी जबरदस्त लढत दिली. पाण्याच्या थेंबाथेंबासाठी झालेल्या या स्वयंस्फूर्त संघर्षाच्या यशोगाथांनी ग्रामीण महाराष्ट्रात एक नवे चैतन्य आणले आहे.
पानी फाउंडेशनचा ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ जिंकणाऱ्या गावांमध्ये फिरून त्या-त्या गावांची यशोगाथा शोधणाऱ्या मालिकेतली ही पहिली भेट : सातारा जिल्ह्यातल्या वेळू गावाची!!


...सदतीस लाखांचे अमूल्य श्रम

गावात पडणारं पावसाचं पाणी अडवण्यासाठी वेळू गावातल्या लोकांनी जीव ओतला. डोंगरांवर सलग पंचेचाळीस दिवस सरासरी तीनशे लोकांनी श्रमदान केलं. दीडशे पुरुषांचे रोज साडेतीनशे रुपये रोजंदारीप्रमाणे बावन्न हजार, तर दीडशे महिलांचे रोज दोनशे रुपयांप्रमाणे तीस हजार.. म्हणजे रोजच्या ब्याऐंशी हजारांचे पंचेचाळीस दिवस मोजले तर होतात तब्बल सदतीस लाख रुपये... एवढ्या रकमेचं काम या गावकऱ्यांनी एक नवा पैसाही न घेता केलं. कशासाठी.. तर गावच्या भल्यासाठी!

रामचंद्र आजोबा

हे पंचाऐंशी वर्षांचे रामचंद्र आजोबा. यांचा एक पाय जायबंदी आहे. पण जयपूर फूट लावून काठीच्या आधारे चालणाऱ्या या आजोबांनीही रोज कैक टोपली माती उचलली गावासाठी!

वेळू
लोकसंख्या - १५११ 
घरं - ४४५

श्रमदानातून केलेली पाणी साठवण्याची एकूण व्यवस्था : २,३१,००० क्यूबिक मीटर्स

गावातील शाळेच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी थेट विहिरीत उतरवण्याची व्यवस्था

२० विहिरी आणि ३ विंधनविहिरींचे जलपुनर्भरण

२२२ हेक्टरवरील शेतजमिनींसाठी ठिबक सिंचन संच, तर ३४ हेक्टर्सवर तुषार सिंचन संच

गावातील ५ पाझर तलावांची 
एकमेकांशी जोडणी

गावासाठी वॉटर-बजेट

रोजच्या पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून असलेल्या गावात आता वर्षभरासाठी पुरेल आणि वेळ पडल्यास शेजारी गावांचीही तहान भागवता येईल एवढा पाणीसाठा.


ट्रॅक्टर-ट्रॉली आणि डिझेल

सलग पंचेचाळीस दिवस रोज सहा तास तीनशे गावकरी श्रमदान करतात, तेव्हा तो ठरतो त्या गावासाठी सर्वात मोठा ‘इव्हेंट’. मग त्याचं ‘मॅनेजमेंट’ही तेवढ्याच ताकदीचं असायला हवं. ‘वेळू’ गावानं नेमकं हेच केलं. रोज या सर्वांना शिवारात घेऊन जाण्यासाठी दोन गावकऱ्यांनीच आपली ट्रॅक्टर-ट्रॉली उपलब्ध केली. ट्रॅक्टरचं भाडं मोफत; मात्र डिझेल गावकऱ्यांच्या पैशातून. त्यानंतर गावच्याच पैशातून दहा-बारा डझन टिकाव, खोरी अन् घमेली विकत आणली गेली. ती सांभाळायची जबाबदारी एकावर.


दीपक, संदीपची पळी आणि विळी

सकाळचा चहा-नाष्टाही शिवारातच; मात्र रोज तो नाष्टा तयार करायला दोन तरुण पुढं सरसावले. दीपक जाधव अन् संदीप भोसले ही त्यांची नावं. त्यापैकी संदीप चक्क साताऱ्याच्या एका नामवंत कंपनीत अभियंता म्हणून नोकरीला. तोही समाजातली आपली पद-प्रतिष्ठा बाजूला ठेवून हातात विळी अन् पळी घेऊन गावासाठी आचारी बनला. कधी शिरा-उपीट, तर कधी पोहे-वडा. पहाटे लवकर उठून तीनशे लोकांचा नास्ता बनवायचा मगच नोकरीला पळायचं, हा शिरस्ता ठेवला. 
या नास्त्याला लागणारी कांदा-मिरची कापण्यासाठी महिलांची टीम वेगळी, तर नाष्टा, चहा अन् पाण्याचे बॅरल घेऊन शिवारात पोहोचणारी मंडळी वेगळी. सारं कसं शिस्तबद्धपणे चाललेलं. कुठंही गोंधळ नाही, गडबड नाही.


बांधावर वाढदिवस, शिवारात ग्रामसभा

गावकऱ्यांची ही एकी पाहून परगावी राहणारी नोकरदार मंडळीही मोठ्या उत्साहानं या मोहिमेत उतरली. साताऱ्यातील दुपारची ‘ओपीडी’ दीड महिना बंद ठेवून विक्रम भोसले डॉक्टरही रोज गावच्या शिवारात रमले. मग वसंतराव वकील असो की शरद बिल्डर.. यांनीही रोज आपल्या कारमधून कुटुंबासह गावचा रस्ता धरला. या काळात प्र्रत्येकाचा वाढदिवसही शिवारातच साजरा झाला. एवढंच नव्हे तर तीन ग्रामसभाही एका शेताच्या बांधावरच रंगल्या... 


पाऊण कोटीची पुंजी गावाच्या गाठीशी

हेच सारं ‘टीमवर्क’ स्पर्धेसाठी कामी आलं अन् सव्वाशे गावांमधून पहिल्या क्रमांकाचं पन्नास लाखांचं बक्षीस घेऊन ‘वेळू गगनावरी’ गेलं. वर मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री निधीतून वीस लाख जाहीर केले आणि वरचे जमलेले पाचेक लाख अशी पाऊणेक कोटीची रक्कम आज गावाच्या गाठीला आहे. 
ही रक्कम ‘कायमस्वरूपी मुदत ठेव’ म्हणून बँकेत ठेवून त्याच्या व्याजावर दरमहा गावची कामं करण्याचा मानस गावकारभाऱ्यांनी व्यक्त केलाय.

(लेखक ‘लोकमत’च्या सातारा आवृत्तीचे प्रमुख आहेत.)

sachin.javalkote@lokmat.com

Web Title: Reed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.