पडझड झालेल्या वास्तूंचा कायाकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 06:01 AM2020-01-12T06:01:00+5:302020-01-12T06:05:01+5:30

कोणतेही शहर अमरपट्टा घेऊन अस्तित्वात येत नाही.  निसर्ग नियमाप्रमाणे त्याचीही झीज, पडझड होते.  दुसर्‍या महायुद्धात असंख्य शहरे, इमारती बेचिराख झाल्या. त्यातूनच शहरांच्या जीर्णोद्धाराचे एक नवे दालन  आता निर्माण झाले आहे.

Rejuvenation of cities in the world | पडझड झालेल्या वास्तूंचा कायाकल्प

पडझड झालेल्या वास्तूंचा कायाकल्प

Next
ठळक मुद्देसिटीज ऑफ टुमॉरो-जगभरातील ’प्रयोगशील’ शहरांच्या कहाण्या

- सुलक्षणा महाजन

काही महिन्यांपूर्वी न्यू यॉर्कमधील ‘हाय लाइन’ला भेट देऊन एका जुन्या, दुर्लक्षित उन्नत रेल्वेमार्गाचा पुनर्जन्म अनुभवला. 1850च्या दशकात न्यू यॉर्क बेटाच्या पश्चिम किनार्‍याला आणि दोन रुंद रस्त्यांना समांतर असा केवळ मालगाड्यांसाठी हा रेल्वेमार्ग बांधला होता. या मार्गाच्या आधाराने दोन्ही बाजूला अनेक कारखाने उभे राहिले होते. मात्न जमिनीवरील हा रेल्वेमार्ग अपघात आणि मृत्यूचा मार्ग झाला. 1910 साली एका वर्षात पाचशेपेक्षा जास्त लोक प्राण गमावून बसले तेव्हा त्यावरच लोखंडी खांबावर धावणारा उन्नत रेल्वेमार्ग बांधला गेला. परंतु काही दशकातच शहरातील कारखाने बंद पडायला लागले. 1980च्या दशकात शहरातील उत्पादक पळाले, मालवाहतूक करण्याचे कारण संपले. शहराचा कारखानदारी असलेला हा विभाग पडीक आणि दुर्लक्षित झाला. हा रेल्वेमार्ग पाडण्याचे कामही खर्चिक होते. त्यामुळे उन्नत रेल्वेमार्ग तसाच पडून राहिला.
2004 साली एका कल्पक वास्तुकाराला या मार्गावर उगवलेले नैसर्गिक जंगली गवत आणि झाडाचे साम्राज्य बघून चांगले नागरी उद्यान करण्याची कल्पना सुचली. महापालिकेला त्याने ती संकल्पना सादर केली. न्यू यॉर्कचे नागरिक, उद्योजक, दानशूर लोक आणि महापौर एकत्न आले. त्यांनी या खासगी रेल्वेमार्गाचा शहरी उद्यान म्हणून पुनर्जन्म करायचे ठरविले. त्यासाठी आवश्यक निधी उभारला आणि तीन टप्प्यांमध्ये सुमारे अडीच किलोमीटर लांबीचा, रेल्वेचे रूळ शाबूत असलेला उन्नत मार्ग आता ‘हाय लाइन’ बगिचा म्हणून तयार होऊ लागला. 2014 सालापासून पर्यटक आणि नागरिकांचे मोठे आकर्षण बनला. विशेष म्हणजे आजूबाजूला पडीक आणि निर्जन झालेल्या जुन्या कारखान्याच्या इमारती आणि मोकळ्या पडलेल्या जमिनी यांनाही नवसंजीवनी मिळाली. काही इमारती डागडुजी करून नव्या वापरासाठी तयार झाल्या तर काही नव्याने बांधून तयार झाल्या. त्यात घरे, दुकाने, बाजार आणि कार्यालये, करमणूक केंद्रे थाटली जाऊ लागली. महापालिकेला त्यातून उत्पन्न मिळाले, अनेकांना नव्याने रोजगार आणि घरे मिळाली. गुगल कंपनीने तेथील इमारतींमध्ये कार्यालये थाटली. दुकाने आणि खाद्यगृहे आली. तरुण लोकांची वर्दळ वाढली.
गेल्या पंधरा वर्षांमध्ये न्यू यॉर्कच्या या हाय लाइन प्रकल्पाने अनेक शहरांमधील पडीक, निर्जन विभागांना, पडीक पायाभूत सेवांच्या मृत सांगाड्यांना नवजीवन देण्याची प्रेरणा आणि स्फूर्ती दिली.
मानवनिर्मित शहरे किंवा शहरातील पायाभूत सेवा, वास्तू किंवा महत्त्वाची ठिकाणे काही अमरपट्टा घेऊन अस्तित्वात येत नसतात. त्यांचीही निसर्ग नियमाप्रमाणेच झीज होत असते. जुने धंदे बंद पडतात. नवीन येत नाहीत. घरांना भाडेकरू मिळत नाहीत. आर्थिक कोंडी होते, तेव्हा इमारतींची देखभाल-दुरुस्तीअभावी आबाळ होते. शहरातले काही विभाग नव्याने घडत असतात, तर जुने विभाग, उद्योग कालबाह्य होऊन ते निर्जन होतात. जुन्या मोठय़ा दगडी इमारतींचे ढाचे भरभक्कम असले तर कितीतरी काळ शाबूत राहतात. कालांतराने निकामी होऊन मृतही होतात.
गेल्या चारशे-पाचशे वर्षांपासून वसाहतवाद, औद्योगिक आणि वाहतूक क्रांतीच्या परिणामी युरोप आणि अमेरिकेत असंख्य महानगरे भरभराटीला आली. परंतु विसाव्या शतकात वसाहतीचे देश स्वतंत्न झाले आणि त्यांच्यावर राज्य केलेल्या देशांना आर्थिक धक्के बसले. वसाहतीच्या भरभराटीच्या काळात, औद्योगिक क्रांती पर्वात तेथे वाढत्या शहरात बांधलेल्या असंख्य इमारती, रेल्वेस्थानके, व्यापारी बंदरे ओस पडू लागली. अनेकदा अतिशय भक्कम बांधकामे असलेल्या इमारतींचे वापरच संपले आणि त्यांचे दगडी-लोखंडी खांब, भिंती, छप्पर यांचे पोकळ सांगाडे अनेक शहरांमध्ये जागोजागी दिसायला लागले.
1970च्या दशकात लंडन शहरातील बंदर असेच संपूर्ण निकामी आणि रिकामे झाले होते. जहाजांच्या वाहतुकीसाठी बांधलेले कालवे, धक्के, मोठी मोठी गोदामे ओस पडू लागली. जुन्या लहान जहाजांच्या  वाहतुकीला कंटेनर आणि प्रचंड मोठय़ा जहाजांनी मागे टाकले. त्यांच्यासाठी नवीन, आधुनिक, यंत्ने आणि क्रेन असलेले बंदर टिल्बरी येथे उभारणे क्र मप्राप्त झाले. लंडनचे बंदर पार ओस पडले. या सर्व गतकालीन वैभवाचे करायचे काय अशी मोठी समस्या निर्माण झाली. न्यू यॉर्कमध्ये आणि इतर अनेक सागरी बंदरे असलेल्या शहरांमध्ये अशाच समस्या निर्माण झाल्या. त्यावर ताबडतोब काही उपायही सुचेनात. सुचले तरी त्यावर एकमत घडविणे आणि पुनर्विकासासाठी लागणारे पैसे गुंतविणे कठीण झाले. अनेक भागांत अशा पडीक आणि निर्जन ठिकाणी गुंड, माफिया आणि अमली पदार्थांचे अड्डे बनले आणि नवीनच डोकेदुखी तयार झाली.
लंडन, न्यू यॉर्क यांसारख्या शहरांच्या प्रयत्नांमधून शहरांच्या जीर्णोद्धाराचे एक नवीन अभ्यास दालन शहर नियोजनाच्या विद्याशाखेत आणि व्यवसायात निर्माण झाले आहे. 
शहराचे जुने पडीक इमारतींचे विभाग पाडून नव्याने बांधले तरी अशा इमारती किंवा विभागाला नागरिक, उद्योजक आणि व्यापारीवर्गाचा प्रतिसाद मिळतोच असे नाही. त्यामुळे अशा विभागातील पुनरुज्जीवन करण्यासाठी आर्थिक धोरण आखावे लागते. अशा अनेक अनुभवांमधून शहरांचे पुनरु ज्जीवन यशस्वी करण्याचे प्रयत्न जगभर होत आहेत. जुने ऐतिहासिक वास्तूवैभव नव्या पर्यटन उद्योगाला चालना देते याची अनेक उदाहरणे आहेत.
युरोपमध्ये दुसर्‍या महायुद्धामध्ये असंख्य शहरे आणि तेथील इमारती बेचिराख झाल्या होत्या. पायाभूत सेवांचे नुकसान झाले होते. परंतु अतिशय थोड्या काळात तेथील वास्तुतज्ज्ञ आणि अभियांत्रिकी क्षेत्नातील लोकांनी असे विभाग पुनरुज्जीवित केले आहेत. आज लंडन, पॅरीस, बर्लीन, अशा अनेक बेचिराख झालेल्या शहरांनी जुने विभाग, इमारती दुरु स्त करून त्यांना गतवैभव प्राप्त करून दिले आहे. जुन्या दगडी इमारती, त्यांच्यावर केलेली कलाकुसर, नक्षीदार लोखंडी खांब, जाळ्या, झरोके खिडक्या हे सर्व जपून त्यांचा काचा, धातू, विजेची उपकरणे, दिवे अशा नवनवीन इमारत साधनांशी मेळ घातला जात आहे. इमारतींमध्ये वातानुकूलित यंत्नणा, स्वच्छतागृहे तयार करून त्यांना आधुनिक इमारतींप्रमाणेच सर्व सेवा मोठय़ा हुशारीने पुरविल्या आहेत. तेथे कोठेही लोंबकळत असलेल्या वायरी, पाण्याचे वेडेवाकडे नळ दिसत नाहीत. रस्त्यांच्या दुतर्फा प्रशस्त पदपथ बांधून झाडे लावली गेली आहेत. दिवे, बाकडी आणि बसण्याच्या, खाण्याच्या आकर्षक जागा निर्माण झाल्या आहेत. तेथे भटकताना त्या विभागांची युद्धकाळात किती आणि कशी दुर्दशा झाली असेल त्याचा मागमूसही आपल्याला दिसत नाही. त्यात इतिहासाचा, शहराचा, आणि निसर्गाचा आदर आहे, नव्या तंत्नाचा आधार आहे तशीच सौंदर्य जोपासण्याची दृष्टी आहे.

 sulakshana.mahajan@gmail.com
(लेखिका प्रख्यात नगर नियोजनतज्ज्ञ आहेत.)

Web Title: Rejuvenation of cities in the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.