कॅनव्हास!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 08:29 AM2018-05-06T08:29:23+5:302018-05-06T08:29:23+5:30
चित्राला भाषा नसते, पण त्याला अस्तित्व असतं. एक विचार असतो. ती सृजनाची प्रक्रिया, शोधाचा प्रवास असतो.
-शि. द. फडणीस
आयुष्य फार मजेशीर असतं.. मी ९२ वर्षांचा आजवरच्या आयुष्याचा पट मांडून बसतो.. पाहतो मागे वळून जीवनातले सारे चढउतार... मांडतो माझ्याच आयुष्याचा हिशोब.. मला जमेच्या बाजू कितीतरी दिसतात... कलेचा स्पर्श जाणवतो.. कलेमध्ये रमून जाणं आठवतं... एका कल्पनेचा मनात झालेला जन्म आणि कागदावर त्याचं झालेलं प्रकटीकरण हा प्रतिभेचा आणि सृजनाचा आविष्कार दिसतो... माझी चित्रं पाहण्यासाठी रांगा लावलेले रसिक दिसतात आणि समाधान, कृतज्ञता, अपार आनंद मनात दाटून येतो. मग जाणवतं, किती भरभरून दिलंय आयुष्याने आजवर मला..!
बालपण आठवायचं आणि सगळी स्मृतींची पानं चाळायची तर कितीतरी मागे जावं लागतं.. माझं जन्मगाव भोज. बेळगाव जिल्ह्यातलं एक खेडेगाव. मी लहान असतानाच वडील गेले... त्यांच्या आठवणींसारखाच एक अस्पष्ट फोटो माझ्याजवळ जपलेला.. पुढे मी कोल्हापुरात आलो तेव्हा पहिल्यांदा चित्रकलेशी ओळख झाली. कलामहर्षी बाबूराव पेंटर, बाबा गजबर, गणपतराव वडणगेकर अशी दिग्गज मंडळींची चित्र पाहिली त्याचे मनावर संस्कार झाले. ती पाहतानाच वाटायचं की आपण चित्रकार व्हायचं.. मनातल्या त्या सुप्त भावनांना खरोखरच आकार येईल आणि मी खरोखरच चित्रकार होईन असं कधी वाटलं नव्हतं...
मी लहानपणी आवड म्हणून चित्र काढायचो; पण चित्राची भाषा समजण्याची कुवत माझ्यात आहे हे माझ्या शिक्षकांनी तेव्हा हेरलं आणि मला चित्र काढण्याकडे लक्ष देण्याचा आग्रह केला. मी लहानपणी गणेशोत्सवात नकला करायचो. वयानुसार ते मागे पडलं. मग आता विचार करतो, त्या ज्या नकला करायच्या राहून गेल्या होत्या त्याच आता कागदावर येत असाव्यात. वेगळ्या स्टेजची गरज नाही. कागद हेच माझं स्टेज!
चित्रकला शिकण्याचे जे अभ्यासक्रम होते तिकडे गेलो. चित्रकलेचे अनेक प्रकार होते. कमर्शिअल आर्ट हा प्रकार त्या काळी नवीन होता. नुसती चित्र काढून पोट भरेल अशी स्थिती तेव्हा नव्हती म्हणून मी चरितार्थाला एक मार्ग मिळावा म्हणून कमर्शिअल आर्ट निवडले.
हंस या विनोद विशेषांकाला मी १९५१ला चित्र पाठवलं होतं. ते प्रसिद्ध झालं आणि कमालीचं लोकप्रिय झालं आणि माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला. त्या काळापर्यंत मुखपृष्ठावर विनोदी व्यंगचित्राची कल्पनाच नवीन होती. मी नवीन पायंडा पाडला होता. एक नवी वाट चोखाळली होती. त्या चित्राने मला दाखवून दिले की ही तुझी दिशा आहे. मी चित्र काढू लागलो तसतसं त्यातील कलेची गंमत मला उलगडू लागली. लोकांना आपली चित्र आवडतात. आपल्याला चित्रातील मर्म समजतं असं लोकांना वाटतं, असं लक्षात आल्यानंतर या माध्यमाची खरी ताकद मला समजू लागली आणि मी अधिक अंतर्मुख झालो. सृजनशील आविष्काराची ताकद किती मोठी असते हेदेखील लक्षात आलं. चित्राच्या माध्यमातून जेव्हा मी गणिताचं पुस्तक साकारलं तेव्हा मला लक्षात आलं की, आकलन होणं ही जी गोष्ट आहे ती केवळ शब्दांतूनच घडते असे नाही. चित्रसुद्धा आकलनाला मदत करते. त्याचा प्रभाव आणि परिणाम कमालीचा वेगळा आहे.
चित्राकडून मी व्यंगचित्रांकडे वळलो. दिवाळी अंकांना आणि विविध ठिकाणी व्यंगचित्रांतून मी लिहू लागलो आणि हे लोकांच्या पसंतीस उतरतंय असं माझ्या लक्षात आलं. परंतु राजकीय व्यंगचित्रांपासून मी दूर राहिलो. त्या ऐवजी समाजातील व्यंग, त्यातील गंमत मांडण्यावर मी अधिक भर दिला आणि त्यालाही रसिकांचे भरभरून प्रेम लाभले. देशातच नव्हे परदेशांत माझी प्रदर्शने भरवली गेली. त्याचे मुख्य कारण म्हणजे शब्दविरहित चित्र. त्यामुळे त्याला भाषेचा अडसर कुठेच आला नाही. सीमा, प्रांत ओलांडून चित्र सातासमुद्रापार गेले. चित्रांनीच मानमरातब, पुरस्कार आणि वेगळी ओळख मिळवून दिली. लाखो लोकांनी माझ्या कलेला दाद दिली. ‘हसरी गॅलरी’ने तर लोकांना मनमुराद आनंद दिला. लहानथोरांना हसवले.
आजही मी चित्रं काढतो. सलग बसताना थोडा डोळ्यांवर ताण येतो; पण अजूनही हात चांगला चालतो. चित्र थांबलेलं नाही. स्वान्तसुखाय चित्र काढू शकतो याचं समाधान फार मोठं आहे. चित्र काढण्याचा प्रवास हा अत्यंत सुंदर असतो. चित्र जेव्हा सुचतं तेव्हा त्याला अस्तित्व असतं. त्याला भाषा नसते. एक विचार असतो. चित्र रेखाटत असताना एक शोधाचा प्रवास असतो. सृजनाची प्रक्रिया असते. चित्र तुमच्या डोक्यात असतं. लोकांना समजण्यासाठी ते कागदावर आणावं लागतं.
आचारात, विचारात विसंगती येते, त्रुटी येते ती दाखवून देण्याचे माध्यम म्हणजे व्यंगचित्र आहे. सारासार विचारापासून माणूस जेव्हा बाजूला होतो तेव्हा तिथे चित्रकाराला व्यंग दिसतं. त्याचा संबंध हा ज्ञानाशी नाही तर शहाणपणाशी अधिक आहे. सारासार विचार राहिला नाही तर विचार आणि कृती चुकते. तेव्हा चित्रकाराला ती दिसते आणि तो ती व्यंगचित्राच्या रूपातून मांडतो. व्यंगचित्र साकारलं जातं तेव्हा त्याचा प्रभाव आणि वेग जबरदस्त असतो. ते थेट हल्ला चढवत असते. त्यामुळे काही वेळा तुम्ही काढलेली चित्र बोचतात असा अनुभव मला आला होता. पुण्यात बिंधुमाधव जोशींसाठी मी एक काल्पनिक चित्र काढले होते. भाववाढ निषेध सभेचे एक व्यंगचित्र एका संस्थेला आक्षेपार्ह वाटले होते. असेच एक जबलपूरमधले साधुसंतांचा ढोंगीपणा दाखवणारे चित्र मी काढले होते. त्यावरूनही गदारोळ झालेले; पण समाधान देणारी असंख्य छायाचित्रे आहेत. त्यातले एक चित्र मात्र मला मनापासून खूप आवडते. एक मच्छीमार एक मासा गळ टाकून पकडतोय आणि त्याच वेळी तो बोटीसह देवमाशाच्या तोंडात गेलेला आहे, असं ते चित्र आहे. ते मला स्वत:ला कलासंपन्न आणि आशयगर्भ असं चित्रं वाटतं. कारण काळाच्या संदर्भात आपत्ती मोठी असतानाही अनेकदा तिचं आकलनच होत नाही असं सूचित करणारं ते चित्र आहे. ब्रिटिशांनी भारत कसा घेतला याचं ते प्रातिनिधिक चित्र मला वाटतं. मोठी संकटं लवकर दिसत नाहीत हे त्या चित्रातून सांगायचंय. गमतीचा भाग त्या चित्रात आहेच; पण गंभीरपणे अंतर्मुख होऊन विचार करणाऱ्याला त्या चित्रातली पुढची गंमत कळेल.
आपल्याकडे भाषेच्या भिंती मोठ्या आहेत. मी परराज्यांत आणि परदेशांत जाण्यासाठी जरा उशिरानेच प्रयत्न केले; पण ज्या प्रमाणात ही कला आणखी जनमानसात पोहोचायला हवी होती त्यात काहीसा कमी पडलो हे मात्र जाणवून जाते.
आयुष्याचा लेखाजोखा मांडतो तेव्हा आत्यंतिक समाधान देणारा क्षण कोणता असा विचार जर केला तर मला वाटतं, माझं प्रदर्शन भरलेलं असताना मी तिथे मुद्दाम जाऊन थांबतो. रसिकांच्या संवेदना मला टिपायच्या असतात. तो अविस्मरणीय आनंदाचा ठेवा असतो. पुरस्कार वगैरे हा लौकिक भाग असतो. आंतरिक समाधान मात्र लोकांच्या नजरेत माझ्या कलाकृती पाहताना मला दिसून येतं. ते कुठल्याही पुरस्कारापेक्षा कैक पट मोठं आहे. खाणंपिणं दिनक्रम हा सारा भाग बाहेरचा; पण आतला ‘अॅटिट्यूड’ फार महत्त्वाचा. तीच माझ्या जगण्याची ऊर्जा आहे. वयाच्या ९२व्या वर्षीही मी म्हणूनच तर इतका अॅक्टिव्ह आहे ना..
आजचे ‘चित्र’ समाधानकारक!
चित्रकारांची तसेच व्यंगचित्रकारांची संख्या वाढतेय ही समाधानाची बाब आहे. आमच्यावेळी मर्यादित पर्याय होते. आम्ही कोल्हापुरात जेव्हा व्यंगचित्रकारांचे पहिले संमेलन भरवले होते तेव्हा त्यात तीन संस्था प्रयत्न करीत होत्या. त्यावेळी सगळे मिळून राज्यभरातून केवळ ११ व्यंगचित्रकार जमले होते, आजमितीला परिस्थिती आश्वासक आहे. आज छोट्या छोट्या ठिकाणी वृत्तपत्रे, मासिके येथे व्यंगचित्रांना स्थान मिळते. त्यांची संख्याही वाढते आहे.
माझ्या चित्रांना माझाच चेहरा
मला एक असा गुरु नव्हता. मला आवडणारे अनेक चित्रकार होते. मात्र यापैकी कुणासारखे व्हावे असं मात्र मला कधी वाटले नाही. शि. द. फडणीसच व्हावं असं वाटलं. माझ्या चित्रांना माझाच चेहरा पाहिजे. तुमची शैली म्हणजे तुमच्या चित्रांना असणारा तुमचा चेहरा. तो तेव्हाच मिळतो जेव्हा तुम्ही कुणाचं अनुकरण करत नाही. प्रभावित होणं वेगळं. राजा रवि वर्मांसारखी चित्र काढून बघितली; पण त्याच्यासारखं बनवण्यासाठी नाही. आपलं स्वत्व जपणंच महत्त्वाचं! एखादी कला आत्मसात करण्याचा प्रवास सोपा नसतो त्याला साधना लागते.