आठवले

By admin | Published: January 24, 2015 02:47 PM2015-01-24T14:47:56+5:302015-01-24T14:47:56+5:30

जनरली स्मशानाकडे, घाटावर दहाव्याला, तेराव्याला वगैरे जायचं टाळतोच. मला आवडत नाही. अर्थात, कुणाला आवडतं म्हणा!

Remembered | आठवले

आठवले

Next

- चंद्रमोहन कुलकर्णी

 
 
जनरली स्मशानाकडे, घाटावर दहाव्याला, तेराव्याला वगैरे जायचं टाळतोच. मला आवडत नाही. अर्थात, कुणाला आवडतं म्हणा!
 
एकदा जावंच लागलं.
पिंडाला कावळा शिवल्यावर जिवंत मंडळी जरा रिलॅक्स झाली, विड्याकाड्या, तंबाखू/तपकिरीची देवघेव सुरू झाली.
मी अजून मागेच रेंगाळत होतो.
मृताचं क्रियाकर्म आणि त्यामुळे निर्माण होणारा विषण्णपणा ही अशी एक गोष्ट आहे की तुम्ही तिच्यातून झटकन बाहेर येऊ शकत नाही. माझे तर पायच जड होतात. त्यासाठी गेलेलं माणूस आपल्या कुणी फार जवळचंच असायला लागतं असं काही नाही. ती जागाच घशात आवंढे आणते, नकारात्मकतेची पुनर्मांडणी करते, तुमच्या काळजाला भोकं पाडते.
पुष्कळ वेळानं जडशीळ झालेल्या पायावर पाणी घेऊन शेवटी एकदाचा बाहेर पडलोच.
मृत्यूनंतरच्या जगाची बॉर्डर सोडून आपल्या नेहमीच्या व्यवहाराच्या जिवंत माणसांच्या वाहत्या जगात येण्याच्या त्या वाटेवर किरकोळ दक्षिणा मिळेल किंवा एखादं ओशट वस्त्न, नाहीतर पसाभर शिधा, किमानपक्षी पोटाला दोन घास तरी मिळतील एवढय़ा आशेवर फाटक्या कपड्यातले फाटक्या अंगाचे भिक्षेकरी अंगातली जानवी ठळकपणे दिसतील अशा पद्धतीनं बसून तुमच्यापुढे हात पसरून रिकाम्या नजरेनं तुमच्या डोळ्यात बघत असतात.
मृत्यूच्या फायनॅलिटीचं जवळून दर्शन झालेली मंडळी हळव्या मन:स्थितीत असतात. काहीबाही देतात भिकार्‍यांच्या हातात. कुणी दुर्लक्ष करतं, कुणी दुवा घेतं. 
  ‘‘नमस्कार, चंद्रमोहनसाहेब.’’
डायरेक्ट नावानंच हाक मारली पायापासच्या एका दाढीवाल्या, जाड्या भिकार्‍यानं!
मी सटपटलोच. मायला, म्हटलं, कोणे हा! आपल्याला नावानिशी ओळखतो?! तोंडातल्या तोंडात उच्चार असले तरी उच्चारण्याची ब्राह्मणी पद्धत माझ्या मेंदूतल्या व्हॉइस रेकॉर्डरनं झटक्यात ओळखली.
फाटलीच माझी.
मणक्यातनं सण्णकन लहर गेली मेंदूपर्यंत.
पायाला एकदम फुलस्टॉप ब्रेकच लागला.
आठवलं:  आ ठ व ले !! 
हो. आठवलेच होते ते. स्पष्टच ओळखलं मी त्यांना. 
त्यांचे कोकणस्थी डोळे मी विसरू शकत नाही. लांब नाक, रापलेली त्वचा, थोडी पुढे आलेली मोठी हनुवटी, गालावर दाढीचे खुंट, जबडा मोठा, मळकट आखूड पायजमा. अनवाणी. आत्ममग्न. 
स्वत:च्या नादात असणार्‍या माणसाचं चालणं एका विशिष्ट प्रकारचं असतं, त्याप्रमाणे आठवल्यांची चाल होती. पाठीत थोडा पोक काढून, खाली वाकून चालत. व्यायामशाळेत खांद्यांचे व्यायाम करून घेताना डंबेल्स श्रग्ज किंवा बारबेल्स श्रग्ज नावाचा एक व्यायामप्रकार करून घेतात. हातात बार किंवा डंबेल्स घेऊन ते वजन खांद्यानं उचलायचं असतं. तसे उचललेले खांदे असायचे आठवल्यांचे. काही उंच माणसांचे चालताना हात फार हालतात, तसं आठवल्यांचे हात फार हलत आणि ते स्वत:ही हाताच्या हालचाली फार करत. लांबसडक हात होते त्यांचे! चालता चालता मधूनच आपली लांबसडक बोटं केसातून फिरवण्याची त्यांची ती लकब.  स्वत:शीच बडबडताना अचानकच आकाशाकडे नजर किलकिली करून पाहत. उजेडाचा त्रास होत असणार, बहुतेक! क्षणात लगेच जमिनीकडे नजर टाकत.
..आणि त्यांचा तो थुंकीनं भरलेला, लाळेनं थबथबलेला, जाड पण भिजका, अस्पष्ट उच्चार असलेला आवाज.
तो तर मी कधीच विसरू शकत नाही.
 
‘‘काय, इकडे आज? कुणी नातेवाईक वगैरे का?’’
मला आस्थेनं विचारत होते आठवले. आणि मी त्यांना निरखत होतो.
आठवले? 
हा आठवले आहे?
मनात आलं, हा फायनली भिकारी झाला वाटतं.
शरीरानं जाड, पोट सुटलेला, गाल वर आलेला भिकारी आपल्याला पटत नाही. भिकार्‍याचा जसा एक ड्रेस कोड असतो, तसा बॉडी कोडही असतो.
फाटक्या कपड्यातला भिकारी अंगानंही फाटकाच असायला हवा अशी आपली सर्वसाधारण कल्पना असते.
आठवले याला अपवाद होते.
मला पूर्वीचे आठवले आठवले!
आठवले जेव्हा भिकार्‍यापेक्षा सधन परिस्थितीत होते, तेव्हा ते लुकडे, अशक्त दिसत. 
आठवले तेव्हा भिकारी नव्हते.
एक माणूस होते.
वाड्मयीन वातावरणातला एक माणूस होते!
माझ्या लहानपणापासून मी आठवल्यांना ओळखत होतो. वाड्मयीन क्षेत्रात महत्त्वाचं योगदान असलेल्या एका महत्त्वाच्या मासिकाच्या कार्यालयात काम करत होते आठवले. मी लहानपणापासूनच त्या कार्यालयात जात असे. चित्र काढायचो मी त्या मासिकासाठी. ईमेल नसण्याचा तो काळ होता. त्यामुळे हस्तलिखितं, चित्र द्यायला घ्यायला प्रत्यक्ष जावं यावं लागायचं. मी जायचा यायचा कंटाळा केला की संपादक म्हणत, ‘‘आमचा माणूस येईल तुमच्याकडे’’ किंवा माणसाकडे द्या, माणूस पाठवतो असा उल्लेख. ह्याआधी मी तसा उल्लेख कधी ऐकला नव्हता, म्हणून एखाद्या माणसाचा कुणी केवळ माणूस  असा उल्लेख करतंय ह्या प्रकाराची गंमत वाटे.
त्याप्रमाणे कधीकधी आठवले येत असत माझ्याकडे. आठवल्यांकडे सायकलच्या म्युझियममधून आणलीय असं वाटावं अशी एक सायकल होती. अत्यंत जुनी. ठिकठिकाणी गंजून ब्राउनिश पडलेली. चेन तर पडलेलीच असायची कायम! मुख्य म्हणजे आठवले त्या सायकलवर बसलेले मला कधीच दिसले नाहीत. सायकलचं हँडल धरूनच ते सायकल स्वत:बरोबर ढकलत ढकलत नेत. कशाला वापरायचे, कोण जाणे! बरं, हॅण्डलला कधी एखादी पिशवी किंवा कॅरियरला पुस्तकाचा एखादा गठ्ठा, असं सामानही कधी दिसलं नाही.
सायकलचा स्टॅण्ड सदैव तुटलेल्या अवस्थेत. त्यामुळे माझ्याकडे आले की सायकल लावायला एखाद्या भिंतीचा आधार शोधण्याचा कार्यक्रम प्राधान्यानं हाती घ्यावा लागे. भिंत एंगेज असली तर बिनदिक्कतपणे सायकल रस्त्यावर झोपवायचेच! 
आठवल्यांचं एक खास वैशिष्ट्य होतं. शर्ट भारी भारी घालायचे! जांभळे, हिरवे, चक्क व्हरमिलियन, सेरेलिन ब्ल्यू.. असले अतिशय ब्राईट कलरचे, नव्या  रुबाबदार फॅशनचे, मुख्यत: मोठय़ा चेक्सचे आणि स्ट्राइप्सचे! पण एक होतं, शर्ट नव्या फॅशनचे असले, तरी नवे मात्र नसायचे.
मी विचारायचो, ‘‘आठवले, शर्ट भारी आहे, कुठून घेतलात?’’   
दुकानाचा पत्ता लागू न देता अतिशय गोड लाजून म्हणत,
‘‘इथलाच आहे!’’  
 
आठवले जिथं काम करत, ते संपादक मोठे हौशी. नव्याची आवड असलेले. स्वत: कलावंत. आजूबाजुला मित्रमंडळीही तसलीच असल्यानं त्या वर्तुळातल्या सगळ्यांचीच कपड्यांची आवडनिवड जरा  ‘हटके’ होती.
आठवले क्रिकेट उत्तम खेळत. मासिकाच्या कार्यालयाच्या मागे एक ग्राउंड होतं. तिथे क्रिकेट चाले. आठवल्यांचा बराच वेळ तिथे जाई. मघाशी मी सांगितलं तसं आठवल्यांचे हात सारखे वळवळत असत. अप्रतिम गोलंदाजी करत. स्लो बोलिंग. चेंडू वळवण्यात हातखंडा! 
संपादक म्हणत, ‘‘च्यायला ह्या आमच्या माणसाचा काही नेम नाही. एकदा बाहेर गेला की कधी लवकर परतत नाही. तासन्तास मॅच बघत बसतो कुठंतरी!’’
 
आणि ते खरंच होतं. तिथल्या परिसरातल्या 
कितीतरी क्रिकेटवीरांना ह्या आठवल्यांनी फलंदाजीचे आणि गोलंदाजीचे धडे दिले होते.
मॅचेस सुरू असण्याच्या दिवसात माझ्याकडे आले, की थुंकीनं लडबडलेल्या आवाजात स्कोअरची चौकशी केली जाई. माझ्याकडे रेडिओ नसला तर शेजारपाजारच्या एखाद्या घरी जाऊन आधी बाहेरून, दारातूनच चौकशी करत. मग हळूच उंबरठय़ाच्या आत जाऊन, थोड्या वेळानं थेट खुर्चीवरच स्थानापन्न होऊन उंटाच्या गोष्टीतल्यासारखं बस्तान बसवीत! 
मग थोडं विश्लेषण. थोडी आकडेवारी. भारतीय खेळाडूंना व्यक्तिगत सल्ला, असं करून मुख्य ज्या कामासाठी आलेले असायचे, ते सर्वांत शेवटी करून महर्षी आपल्या कार्यालयात परत जात!!
दिवाळीत अंक मार्केटमधे गेल्यावर वगैरे निवांत, पुष्कळ दिवसांनी स्टुडिओवर येत. बाहेरच उभे राहात. मी आत बोलावल्याशिवाय कधीच आत आले नाहीत.
‘‘चांगली झालियेत चित्र’’ असं म्हणून थांबायचे नाहीत, पुढे पुस्ती जोडत : ‘‘लेआऊट मस्त बसलेत!’’
मी खूश!
‘दिवाळी’ मागायलाच आलेले असायचे, ती घेऊन झाली, की क्रि केट! क्रि केटमधला माझा शून्य इंटरेस्ट एव्हाना त्यांच्या परिचयाचा झाला होता. मग आजूबाजूच्या मंडळींवर प्रयोग सुरू ठेवत. 
काळ पुढे सरकला. संवादाची माध्यमं बदलली, साधनं बदलली. फोनवर, कुरिअरमार्फत कामं होऊ लागली. ईमेल वगैरे गोष्टींनी तुमचं आमचं आयुष्य झपाट्यानं बदललं. टेक्नॉलॉजीनं कम्युनिकेशन फार फार सोपं केलं, माणसं मात्र फार अंतरावर फेकली गेली. दूर जाऊन पडली एकमेकांपासून. एकमेकांकडे प्रत्यक्ष जाणं कमी होऊन कामं परस्पर होऊ लागली. नेहमीच्या व्यवहार, व्यवसायातली माणसं सहासहा महिने एकमेकांना भेटेनाशी झाली, भेटीवाचून कामं अडेनाशी झाली.
काळाच्या ह्या सगळ्या रेट्याबरोबर आपल्या नकळत आपण पुढे सरकत राहतो.
चेन पडलेली सायकल ढकलत ढकलत, स्वत:शीच बडबडत, हातवारे करत, डोक्यातनं बोटं फिरवणारी, रस्त्यावरच्या, गल्लीतल्या क्रिकेटमधे रमणारी माणसं बघता बघता मागे पडतात. भणंग होतात,
कधी शनिमंदिरापुढे पथारी टाकून बसलेली दिसतात, तर कधी घाटावर भिक्षेकर्‍यांच्या रांगेतून आपल्याला हाक मारतात, 
‘‘नमस्कार, चंद्रमोहनसाहेब.
काय, इकडे आज? !’’
(लेखक ख्यातनाम चित्रकार आहेत.)

Web Title: Remembered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.